आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीआयपी दुल्हनिया ले जायेंगे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीयांच्या लग्नाला युरोप-अमेरिकेमध्ये ‘इंडियन फॅट वेडिंग’ असे संबोधतात. अशा लग्न समारंभांना भारतामध्ये ‘व्हीआयपी’ किंवा ‘एलिट’ वेडिंग्ज म्हणतात. ही अशा मोठ्यांची, प्रतिष्ठितांची लग्नं जमतात कशी...? सोयरीक किंवा स्थळं सुचवतात कशी? त्यांचे मध्यस्थ कोण असतात? बोलणी कोण करतात? वगैरे वगैरे... असे प्रश्न आपल्यासारख्यांच्या मनात येतात. मात्र, या प्रश्नावर उत्तर शोधून काढलं, ‘शादी डॉट कॉम’ (आज ही कंपनी साधारण शंभर कोटी रु.चा व्यवसाय वर्षाला करते आणि दरवर्षी जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढ करत आहे.) आणि ‘भारत मॅट्रिमॉनी’ या कंपन्यांनी. अनुपम मित्तल या तरुणाला लग्न करायचे होते. त्यासाठी तो अमेरिकेतून भारतात आला. त्याला लग्नाच्या संपूर्ण प्रक्रियेत ज्या अनुभवातून जावे लागले, तो अनुभव इतरांना येऊ नये, या उद्देशाने त्याने १९९६मध्ये व्हीआयपी मंडळींसाठी ‘शादी डॉट कॉम’ या पोर्टलला जन्म दिला. विश्वासार्हता, गुप्तता या मूलभूत धोरणांच्या आधाराने ही सेवा काम करते. ‘व्हीआयपी’ क्लायंट प्रमुख्याने ‘ऑन इन्व्हिटेशन’ या तत्त्वावर घेतले जातात. यासाठी त्यांची समाजातील पत, उत्पन्न, व्यवसाय, उत्पन्नाचा स्रोत... आदी घटकांचा विचार केला जातो. बहुतेक करून व्हीआयपी क्लायंट्स ओळखीने अथवा संदर्भामुळेच संपर्कात येतात.

सर्वसाधारणपणे तीन महिन्यांसाठी पन्नास हजार रुपये ते दोन लाख रुपये इतके सेवा शुल्क आकारले जाते. ‘व्हीआयपी क्लायंट्स’मध्ये राजकीय व्यक्ती, उद्योगपती, अतिवरिष्ठ शासकीय अधिकारी, खेळाडू, जवाहिरे, कॉर्पोरेट‌्स क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, तसेच युरोप- अमेरिकेतील वरिष्ठ पदांवर कार्यरत असणारे भारतीय असतात. अशा व्यक्तींना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना सहजपणे आपली ओळख पटवून लग्न जमवणे कठीण जाते. अशा वेळेस अशी एखादी संस्था मदतनीस म्हणून उपयोगी ठरू शकते. नाव नोंदणी व अपेक्षा याची माहिती दिल्यावर संगणकाद्वारे उपलब्ध ‘डेटा बँक’मधून मॅचमेकिंग केले जाते. सर्वसाधारणपणे एका आठवड्यात किमान दोन तरी ‘स्थळं’ सुचवली जातात. प्रत्येक ‘व्हीआयपी’ना एक कन्सल्टंट मदतनीस म्हणून काम करीत असतो. मॅचमेकिंग करण्यापासून प्रत्यक्ष भेट घडवण्यापर्यंत सर्व कामांमध्ये या मदतनीसाची भूमिका महत्त्वाची असते. ही एक ‘पर्सनलाइज्ड’ सेवा असते. हे सर्व तरुण/तरुणी बहुभाषिक आणि एमबीएव्यतिरिक्त संभाषण कलांमध्ये पारंगत असतात. बर्‍याच वेळेस अतिशय संवेदनशील माहिती उदा. ब्लड ग्रुप, व्यसन अथवा अगदी सॅलरी स्लिप किंवा शैक्षणिक माहिती विचारण्यापर्यंत जबाबदारी या मदतनीसाकडून मिळू शकते.

सुमारे सहा हजार कोटी रु.चा व्यवसाय करणार्‍या घराण्यानेदेखील आमच्या सेवेचा फायदा घेतला असल्याचे एका ‘मॅचमेकिंग’ सेवा पुरवणार्‍या कंपनीने सांगितले. भारतामध्ये वर्षभरात जवळपास सव्वा कोटी लग्ने होतात. यामध्ये सुमारे तीस ते पन्नास हजार लग्ने ‘व्हीआयपी’ किंवा ‘एलिट’ प्रकारातली असतात. एका व्हीआयपी अथवा एलिट वेडिंग्जला सर्वसाधारणपणे पाच कोटी ते पंचवीस कोटी रु. यादरम्यान खर्च केला जातो. साधारणपणे तीन महिन्यांच्या आत पन्नास टक्के ‘व्हीआयपी’ लग्ने जुळवली जातात. भारतामध्ये दहा कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणार्‍या वर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०१३मध्ये जाहीर झालेल्या ‘वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट’नुसार भारतामध्ये दरवर्षी २२ टक्क्यांहून अधिक नवश्रीमंत वर्ग तयार होत आहेत. यामुळे अशा सेवांची गरज वाढत जाणार आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

vikas.naik@gmail.com