आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे कसे हे माणूसपण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान आणि त्यांची पत्नी सुशीला या मुस्लिम आणि हिंदू दांपत्याचा मुलगा असलेल्या सलमान खानने काही वर्षांपूर्वी ‘बिर्इंग ह्यूमन’ (माणूसपण जपणारी अशा अर्थाने!) या नावाने एक लोकोपयोगी संस्था सुरू केली. ह्यूमन बिइंग म्हणजे मानव, मनुष्य. सर्वसाधारणपणे स्वत:च्या चांगुलपणाबद्दल, अस्तित्वाबद्दल बोलताना आपण अभिमानाने ‘आय एम ह्यूमन बिइंग’ असा उल्लेख करतो. माणुसकीची जपणूक करणारा, असेही आपल्याला त्यात सुचवायचे असते.

माणुसकी, मानवी मूल्ये, परोपकारी वृत्ती, सत्य आदी गुणधर्मांचा आदरभाव ठेवून ‘बिइंग ह्यूमन’ ही संस्था स्थापन करणार्‍या सलमान खानच्या घरी बुद्धीचे अधिष्ठान असणार्‍या गणेशाच्या मूर्तीची विधिवत स्थापना नित्यनेमाने केली जाते. खुद्द सलमान खानच्या कुटुंबामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, तसेच भारतातील बर्‍याच प्रांतांचा संगम आढळतो. त्यामुळे दिवाळीबरोबरच नाताळ आणि रमजान हे सण जोशात साजरे केले जातात. सलमान खान आणि त्याचे कुटुंब म्हणजे खर्‍या अर्थाने न्यायप्रिय, धर्मनिरपेक्षतेचे मूर्तिमंत प्रतीक मानले जाते. परंतु हे सर्व जमा बाजूस असतानाच सलमान खानच्या गाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या गरिबांच्या बाजूस मात्र खान कुटुंबीय उभे ठाकलेले दिसत नाहीत. हे सर्व माणुसकीचा कैवार घेणार्‍या सलीम खान-सलमान खान यांच्या कौटुंबिक व्यक्तिमत्त्वास छेद देणारे ठरते.

एरवी, सलमान खान हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय नि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. जसे देशभरातले चाहते त्याचा माग काढत असतात, तसेच पोलिस आणि कोर्ट जणू सलमान खानचा पाठलाग करतात. 1998मध्ये सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आदी जोधपूर येथे चित्रीकरणासाठी गेले होते. येथील वास्तव्याच्या दरम्यान या सर्वांनी काळवीट आणि मोर या दोन्ही संरक्षित वन्यजीवांची शिकार केली होती. जोधपूरमधील बिष्णोई जमातीच्या लोकांनी या सर्वांच्या विरोधात निदर्शने केल्यानंतरच सलमान खान आणि इतरांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात अजूनही न्यायालयीन खटला सुरू असून घटनेतील सरकारच्या बाजूने उभे राहिलेले साक्षीदार उलटले आहेत. मद्याच्या धुंदीत पदपथावर झोपलेल्यांना गाडीखाली चिरडल्याच्या प्रकरणात सध्या सुरू असलेला न्यायालयीन खटलाही साधारण याच वळणाचा आहे.

या खटल्यातला मुख्य साक्षीदार पोलिस गार्ड रवींद्र पाटील याचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. या केसमधील काही साक्षीदारांनी ऐन वेळी साक्ष बदलली आहे. म्हणजेच एका बाजूला दानधर्म आणि समाजकार्यात पुढाकार घेणारा दयाळू सलमान खान दखलपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकलेला आहे. यात त्याची वा त्याच्या कुटुंबाची न्याय-अन्यायाची वेगळी व्याख्या आहे, हेही दिसून आले आहे. म्हणूनच बॉम्बस्फोटातील सहभागामुळे पाच वर्षांची शिक्षा भोगत असलेला संजय दत्त याच्याकडून अजाणतेपणी गुन्हा घडला असला, तरीही त्याने कर्करोगग्रस्तांसाठी केलेल्या कार्यामुळे शिक्षेत सूट देण्यात यावी, अशी अजब विनंती चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी केली होती. त्यात सलमान खानच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. अलीकडेच जिया खान या अभिनेत्रीच्या कथित आत्महत्या प्रकरणातही त्याचाच प्रत्यय आला होता. ज्या सूरज पंचोलीवर जिया खानच्या आत्महत्येसंदर्भात संशयाची सुई आहे, त्यालाच सलमान खानने जाहीर पाठिंबा दिला आहे.

वस्तुत: माणुसकीची कड घेणार्‍या सलीम खान यांनी सलमान खानच्या चुकांना पाठिंबा न देता, त्यास प्रायश्चित्त घेण्यास प्रवृत्त करावयास हवे होते; परंतु तसे प्रत्यक्षात घडलेले नाही. एरवी तिरुपती बालाजी, साईबाबा, सिद्धिविनायक किंवा हाजी अलीला भेट द्यायची; भरभक्कम देणगी देऊन प्रसिद्धी मिळवायची; एखाद्या प्रसिद्ध धर्मादाय संस्थेसाठी सदिच्छादूत म्हणून भूमिका बजावायची; यातून जमेल तितकी प्रसिद्धी मिळवताना जनमानसातील आपली डागाळलेली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत राहायचा, असा बर्‍याच सेलिब्रिटींचा व्यवहार राहिला आहे. ‘बिइंग ह्यूमन’ असे स्वत:चे वर्णन करणारे सलमान आणि त्याचे कुटुंबीय यास अपवाद राहिलेले नाहीत.