आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनाम पेशातील चांगली माणसं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्याचे रिक्षावाले या विषयावर भरपूर लिहिले आणि बोलले गेले आहे. त्यांचा उर्मटपणा, प्रवाशांना दिली जाणारी वागणूक इत्यादी इत्यादी बरंच काही. पण लेखकाला नुकतेच आलेले दोन अनुभव जरा वेगळे होते.

आम्ही पुण्यात गेल्या १० वर्षांपासून मुलांकडे दरमहा येत असतो. ट्रॅवल्सची बस पहाटेच शिवाजीनगरच्या संचेती हॉस्पिटलजवळ येऊन पोहोचते आणि प्रवाशांना उतरवून पुढे निगडीच्या दिशेने जाते. काकडत्या थंडीत १०-१२ रिक्षावाले उभे असतात. त्यांच्याशी भाड्यावरून हुज्जत घालत घालत साधारणपणे दीडपट भाडे ठरले की निघायचं, असं घडतं. अशी घासाघीस करण्यात बायका जास्त तरबेज असल्याने ही कामगिरी माझ्या बायकोकडे असते. मी आधी प्रेक्षक आणि भाडे ठरल्यावर रिक्षात सामान ठेवणारा हमाल, या दोन भूमिका पार पाडत असतो. परंतु या वेळेला बायको दोन दिवस आधीच आलेली असल्याने, मी एकटाच आलो होतो आणि भाडे ठरविण्याची घासाघीस मलाच करावी लागली. जो आकडा ठरविण्यात बायको यशस्वी झाली असती त्याच्यापेक्षा ४० रुपये जास्त ठरवून मी एकदाचा रिक्षात बसलो आणि चल बाबा आता लवकर, असे मनातल्या मनात म्हणणार, एवढ्यात एक आजी-आजोबासुद्धा आमच्या रिक्षात बसले. तेसुद्धा असेच कोणत्या तरी ट्रॅवल्सच्या बसमधून पुण्यात आलेले दिसत होते. रिक्षा थोडी पुढे गेली आणि अचानक आजोबांना आठवले की, ते त्यांचा चश्मा बसमध्येच विसरले आहेत. झालं! आता चश्म्याशिवाय कसं काय होणार, असा आजोबांना धसका बसला. आता ती बस कशी काय सापडणार, असा आम्हा तिघांनाही प्रश्न पडला. माझ्या मनात विचार आला, आता हा रिक्षावाला काय करणार? त्याचा रोल आता मदत करण्याचा असेल की, अडवणुकीचा असेल? आणि मदत करायची झाली तर तो त्याचे तो किती पैसे मागणार?

पण हा रिक्षावाला जणू पुण्यातला नसावाच, अशा रीतीने वागला. पहिली गोष्ट म्हणजे, “काय च्यायला कटकट आली ही नवी आता?” अशी प्रतिक्रिया न देता त्याने आधी त्या आजोबांना आश्वस्त केले. धीर दिला. “तुम्ही मुळीच घाबरू नका आजोबा, चश्मा सापडेल तुमचा. आधी तुम्ही मला बस कोणत्या रंगाची होती आणि कोणत्या ट्रॅवल कंपनीची होती ते सांगा.” आजोबांना कंपनीचं नाव काही आठवेना; पण रंग लाल होता, हे त्यांना आठवत होतं. कोणत्या गावावरून येणाऱ्या बसेस कोणत्या ट्रॅवलच्या असतात, हे रिक्षावाल्याला माहीत होतं. आजोबा मराठवाड्याकडून आलेले होते. त्यामुळे रिक्षावाला त्या-त्या ट्रॅवल कंपन्यांची ऑफिस शोधत निघाला. “आजोबा तुम्ही घाबरू नका. आपण वाटल्यास पार निगडीपर्यंत जाऊ आणि बस शोधून काढू. सगळ्या बस निगडीला जाऊन थांबतात दिवसभर”, असा तो त्यांना धीरसुद्धा देत होता.
आता मला प्रश्न पडला की, या चश्माशोध मोहिमेत माझा रोल काय असायला पाहिजे? घरी जायचं सोडून मी किती वेळ यांच्यासोबत फरफटत जाणार? पण चश्मा सापडतो की नाही, याची मलासुद्धा उत्सुकता असल्यामुळे मी रिक्षातच बसून राहायचा निर्णय घेतला. अर्थात, बायको बरोबर असती तर निर्णय वेगळा झाला असता, ही गोष्ट अलाहिदा!

सुदैवाने फक्त पाच मिनिटांतच आजोबांची बस सापडली आणि तिच्यातला चश्मासुद्धा. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आजोबांनी रिक्षावाल्याला बक्षीस देण्याकरता शंभराची नोट काढली, पण त्याने ती आदरपूर्वक नाकारली आणि घराच्या दिशेने आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला.

दुसरा प्रसंग उबर कॅबच्या चालकाच्या संदर्भात होता. रिक्षावाल्यांच्या अरेरावीला कंटाळून आता बरेचसे पुणेकर उबर किंवा ओला कॅब बोलावणे पसंत करू लागले आहेत. कॅबचा प्रवास रिक्षापेक्षा नक्कीच आरामशीर असून तुलनेने त्यात पैसेसुद्धा फार जास्त लागत नाहीत. कॅब वातानुकूलित, स्वच्छ असतात, तीनपेक्षा जास्त माणसे बसू शकतात, मागे सामान ठेवायला जास्त जागा असते, हे अधिकचे फायदे.

तर पुण्याहून परत जाण्यासाठी आमची बस शॉपर्स स्टॉपपासून निघणार होती. तिथे पोहोचण्याकरता मुलाने आम्हाला उबरची कॅब करून दिली. टाटा इंडिगो कंपनीची नुकतीच घेतल्यासारखी दिसणारी गाडी आम्हाला घ्यायला आली. राजेश्वर नावाचा पोरगेलासा चालक होता. मूळ मराठवाड्यातला असलेला राजेश्वर बडबड्या होता. त्यामुळे त्याच्याशी खूप गप्पा झाल्या.

“अरे मित्रा, तुझी गाडी तर एकदम नवी दिसते?”
“हो काका. चार दिवसांपूर्वीच घेतलीय. सात लाखात पडली. दोन लाख मी टाकले. बाकीचे लोन घेतले.”
“कधीपासून कॅब चालवतो तू?”
“दोन वर्षांपासून. पण ड्रायविंग लाइनमध्ये सात वर्षांपासून आहे. आधी मी मोठी गाडी चालवायचो. लांब लांब जायचो. पण घरापासून लांब राहणं, ढाब्यावर खाणं हे काही जमेना. म्हणून मग टॅक्सी चालवायला लागलो. आधी इंडिका होती, ती विकून आता ही मोठी गाडी घेतली.”
“तू तर शिकलेला दिसतोस.”
“हो काका, बारावीपर्यंत शिक्षण झालंय माझं. पण त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. खेड्यातलं शिक्षण म्हणजे फक्त कॉप्या करून करून पुढे सरकायचं. त्याला कोणी काही किंमत देत नाही.”
“तुझ्यासारखी पोरं पोलिस नाहीतर सैन्य भरतीसाठी फार प्रयत्न करतात. तू नाही केलास का?”
“केला होता. औरंगाबादला सैन्यभरतीमध्ये सिलेक्ट झालो होतो, पण मेडिकलमध्ये उडवला गेलो. माझ्या छातीचे हाड लहानपणापासून जरा पुढे आलेले आहे, त्यावरून नापास झालो.”
“अरेरे!”
“जाऊ द्या काका, नव्हतं आपल्या नशिबात. ही लाइनपण चांगली आहे.”
त्याच्या बोलण्याची स्टाइल मकरंद अनासपुरेसारखी होती. त्याला तसं सांगितल्यावर तो म्हणाला, “तो पन आमच्या मराठवाड्यातलाच हाय की!”
मग संभाषण मराठवाड्यावर गेलं.
“मराठवाड्याचं काय बी खरं नाय काका. लई दुष्काळ आहे तिकडे. प्यायलाबी पाणी नाही.”
“पण तुमच्या मराठवाड्याने तीन-चार नेते दिले की महाराष्ट्राला! विलासराव, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण, आता पंकजा मुंडे!”
“काही अर्थ नाही त्यांच्यामध्ये! फक्त सोताचा इकास करत्यात. गोपीनाथदादा गेले त्या सहानुभूतीच्या जोरावर पंकजा जिकली. आता काय निवडून नाय येयाची.”
“तुझ्या घरची पण शेती असेल ना?”
“हाये ना पाच एकर. पन पाणी नाय.”
तेवढ्यात त्याला पुढच्या वर्दीचा फोन आला. एका महिलेला आॅफिसमधून घरी जाण्यासाठी गाडी हवी होती. राजेश्वरने तिला अतिशय नम्रपणे सांगितले की, त्याला १५ मिनिटं लागतील येण्यासाठी. ती तितका वेळ थांबेल का?
तिने त्याला होकार दिला.
“पण तुला तुझ्या घरी आळंदीला जायला हवं ना? घरचे वाट पाहतील.”
“अहो काका, ती बिचारी माझ्यासाठी उशीर झाला तरी थांबायला तयार आहे, तर मीसुद्धा थोडा उशीर झाला तरी जायला पाहिजे. ग्राहकाचे मन राखायला पाहिजे.”
मला त्याचा हा विचार खूप आवडला. आणि हा मुलगासुद्धा मला खूप आवडला. बदनाम अशा चालक पेशामधील दोन चांगली माणसे एकाच ट्रिपमध्ये आम्हाला भेटली, याचेही खूप नवल वाटले.
anucsn@gmail.com
बातम्या आणखी आहेत...