आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikas Shukla Writes About His Inter Religion Marriage

30 वर्षांपूर्वीची गोष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१६ जून १९८६ रोजी मी आणि जुलेखाने नोंदणी पद्धतीने विवाह केला. मी म्हणजे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण असलेला युवक आणि जुलेखा म्हणजे दाउदी बोहरा समाजाची युवती. त्या वेळी आम्ही दोघेही उच्चविद्याविभूषित असलेले पंचविशीतील सुजाण, सुविद्य आणि चांगल्या घरातले युवक-युवती होतो. माझे वडील गावातील प्रख्यात वकील आणि एका चित्रपटगृहाचे मालक. मला दोन भाऊ आणि एक बहीण. जुलेखा एकुलती एक. जुलेखाचे वडीलसुद्धा मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदकविजेते वकील आणि गावातील एका प्रख्यात हार्डवेअर दुकानाचे मालक. जुलेखा कायदा शाखेची पदवीधर आणि नुकतीच वकिली करू लागलेली आणि मी वाणिज्य शाखेचा पदवीधर, बँकेत नोकरी करणारा आणि बाहेरून परीक्षा देऊन जुलेखाप्रमाणेच कायदा शाखेच्या पदवीचा विद्यार्थी. आम्ही दोघेही कॉलेजपासूनचे मित्र. आमचा ८-१० मुलामुलींचा ग्रुप होता, स्पार्क नावाचा. आम्ही सर्व जण रोटरॅक्ट क्लबचे सदस्यही होतो. एकमेकांच्या घरी जाणे-येणे, सहली काढणे, एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे अशा आमच्या एकत्र अ‍ॅक्टिव्हिटीज चालायच्या. हळूहळू इतर मुलींची लग्ने झाली आणि त्या ग्रुप सोडून गेल्या. मुले नोकरीला लागली. गाव सोडून गेली. शेवटी गावात राहणारे आम्ही दोघेच उरलो. आणि तेव्हा आम्हाला जाणीव झाली की, आमच्यात मैत्रीपेक्षाही अधिक जवळचे असे प्रेमाचे नाते तयार झालेले आहे आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नापूर्वीची ही अशी जवळजवळ ८ वर्षांची मैत्री झाल्यानंतर मग आम्ही लग्न केले. आमचे लग्न इतकी वर्षं टिकले याचे कारण ही लग्नाआधीची ८ वर्षं आहेत, असे आम्हाला वाटते.

लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्थातच घरी तो जाहीर करावा लागला. घरातून विरोध होणार याची कल्पना होतीच. कारण माझे घर अगदी कर्मठ असे ब्राह्मणी कुटुंब. आणि बोहरी म्हटले तरी ती मुसलमान. अशा पोरीशी लग्न म्हणजे तोबा तोबा! या उलट जुलेखाचे वडील म्हणजे बोहरी धर्मगुरू सय्यदना यांचे विरोधक असणारे असगर अली इंजिनिअर यांचे अनुयायी. त्यामुळे ते अगदी उदारमतवादी बोहरी. शिवाय मला आणि माझ्या कुटुंबाला चांगले ओळखणारे. त्यांना माझ्याविषयी खात्री होती. शिवाय मी बँकेत नोकरीला लागलेलो. कर्ज घेऊन घर बांधलेले. त्यामुळे घरच्या आर्थिक आधाराची गरज नसलेला. त्यामुळे त्यांनी लग्नाला पाठिंबा दिला. आम्ही जिल्ह्याच्या गावी जाऊन एक महिना आधी लग्नाची नोटीस देऊन आलो. आम्ही घरी येण्याच्या आधी ही बातमी गावात आणि आमच्या घरी येऊन पोहोचलेली होती. त्यामुळे माझ्या घरी विरोधाचे नाटक सुरू झाले. आईवडिलांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली, गावातील सर्व पुढारी, नेत्यांकडे गाऱ्हाणी नेऊन झाली, भाऊ जिल्ह्याच्या गावी जाऊन ज्या दिवशी रजिस्ट्रार लग्न लावायला येणार होता, त्याला धमकी देऊन आला. तू येऊ नकोस, कारण गावात या लग्नावरून दंगल होणार आहे. त्यामुळे तो घाबरून ज्या दिवशी आम्ही लग्न करणार होतो त्या दिवशी आलाच नाही. (अर्थात त्याच्या न येण्याचे हे कारण आम्हाला नंतर कधी तरी समजले.) घरच्यांचा विरोध असलेले प्रेमिक यासाठी पळून जाऊन लग्न करतात; पण आम्ही सुरुवातीपासूनच दोन गोष्टी पक्क्या ठरवलेल्या होत्या. पळून जायचे नाही, गावातच लग्न करायचे आणि कोणीही धर्मांतर करायचे नाही. आहे तोच धर्म पुढेही पाळायचा. त्यामुळे काही पुढा-यांनी जुलेखाच्या धर्मांतराचा आग्रह धरला (आपण तिला शुद्ध करून घेऊ.) पण आम्ही जुमानले नाही. त्यामुळे ठरलेल्या दिवसाच्या दोन दिवसांनंतर मी जिल्ह्याच्या गावी जाऊन रजिस्ट्रारला धरून आणले आणि जुलेखाच्या वडिलांच्या घरासमोर मांडव टाकून गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांसमोर आणि गावातील मान्यवर नगराध्यक्ष आणि त्यांच्या परिवाराच्या आशीर्वादाने आमचे शुभमंगल नोंदणी पद्धतीने लागले.
माझ्या घरातून माझी बहीण व मेहुणे वगळता बाकी सर्वांचा बहिष्कार होता. जुलेखाच्या मात्र सर्व नातलगांनी लग्नाला हजेरी लावली आणि मनापासून लग्नाचे स्वागत केले. (वास्तविक बोहरी समाज हा खूप कमी लोकसंख्या असलेला आणि परंपरावादी समजला जातो. असे असूनही त्यांनी लग्न मान्य केले आणि लग्नानंतर पुढील आयुष्यात सर्व कार्यक्रमांत मला मानाचे स्थान दिले.) गावातील सर्व मित्रमंडळी आणि प्रतिष्ठित नागरिक या लग्नात सामील झाले. सर्व मोठमोठ्या वर्तमानपत्रांत लग्नाच्या बातम्या झळकल्या.
आता आमच्या लग्नाला ३० वर्षे व्हायला आली. लग्नानंतर आमच्यासोबत जुलेखाचे आईवडील त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि भाची तिच्या लग्नापर्यंत राहिली. माझ्या घरच्यांचा विरोध आमचा पहिला मुलगा झाला तसा मावळला. घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यानंतर मुलगी झाली.

आम्ही आमच्या गावी आमचा स्वतंत्र व्यवसाय करत आहोत. रोटरी, इनरव्हील, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहोत. मित्रांनी, नातेवाइकांनी, समाजाने, आम्हाला कुठेही अव्हेरले नाही. लहान गाव असूनही गावाने आम्हाला मनापासून स्वीकारले. दोघेही नास्तिक असल्याने धर्मपालनाबद्दल मुळीच आग्रही नाही. दिवाळी साजरी करतो, ईदचा शिरखुरमासुद्धा आवडीने खातो. इतर नवराबायकोप्रमाणे आमची भरपूर भांडणे होतात; पण धर्म या विषयावरून आमचे आजतागायत एकही भांडण झालेले नाही. नास्तिक असलो तरी एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. आमची मुले पाच भाषा बोलतात. मातृभाषा उर्दू आणि बोहरी समाजाची गुजराती. माझी मराठी आणि इंग्रजी शाळेत शिकल्याने इंग्रजी आणि राष्ट्रभाषा असलेली हिंदी. आता त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांनी आपापला जीवनसाथी स्वत:च निवडावा, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. बघूया.