आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगलाष्टक वन्स मोअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मॅरेजेस आर फिक्सड इन हेवन अँड परफॉर्म्ड ऑन अर्थ’ अर्थात विवाह स्वर्गात जुळतात आणि धरतीवर संपन्न होतात, असे म्हणतात. पण अतिश्रीमंत, बड्या उद्योगपतींच्या बाबतीत विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळतात आणि आकाशात संपन्न होतात, असेही आपल्या वाचनात आहे. सलग काही तास विमानात आकाशामध्येच काही वर्षांपूर्वी विवाह संपन्न झाला होता. यावरून ‘विवाह’ या विषयाची करिअरच्या दृष्टीने असणारी व्याप्ती आपल्या लक्षात येऊ शकते. उद्योगपतींचे कशाला? तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या घरातसुद्धा विवाह म्हणजे एक मोठे स्वप्न, सोहळा आणि (उरलंच तर) संस्कार असतो. अगदी हळदी-कुंकवापासून ते व्याही भोजन/विहीण पंगतीपर्यंत आणि शेरवानी/सूटसारख्या कपड्यांपासून ते दागिन्यापर्यंची सगळी खरेदी. कामे लक्षात ठेवणे, याद्या करणे, खरोखरच दिव्य असते. म्हणूनच तर म्हणतात ना, लग्न पाहावं करून! एवढा वायफळ खर्च करण्यापेक्षा लग्न साधेपणानेच करू आणि उरलेले पैसे मुलाच्या संसारासाठी फिक्सडमध्ये टाकू, असे म्हणूनही शेवटचे वाक्य निघतेच पुन्हा थोडेच होणार आहे लग्न. या लग्नातच सर्व हौस भागवायची आणि मग पुन्हा याद्या हिशेब सर्व सुरू होतं.
वेळेअभावी व विभक्त कुटुंब पद्धतीच्या संसर्गाची लागण झाल्यामुळे वेळेची तसेच मनुष्यबळाचीही मर्यादा असते. अशा वेळी वेडिंग प्लॅनर तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. वेडिंग प्लॅनर म्हणजे तुमच्या ग्राहकाची विवाहाची सर्व जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडणे, वेळेचे नियोजन, आर्थिक नियोजन सोहळा अधिकाधिक दिमाखदार, आकर्षक होण्यासाठी जे जे आवश्यक असते ते सर्व कौशल्य पणाला लावून लक्षात राहण्याजोगा विवाह पार पाडणे हे वेडिंग प्लॅनरचे काम असते. सेलिब्रिटी स्टेटस असणारे लोक, उद्योगपती, राजकारणी नेते लोक यांना त्यांच्या गरजेनुसार विवाह सोहळा आखायचा असतो. तिथे वेडिंग प्लॅनर खूप सर्व सांभाळू शकतात. कार्यक्रमाचे स्वरूप, अपेक्षा बजेटनुसार कार्यक्रमाचे स्थळ निवडणे, तिथे रोषणाईपासून ते स्थानिक पातळीवर लागणा-या विविध परवानग्या तसेच आग, वीजसारख्या माध्यमातून सुरक्षा इत्यादी गोष्टींचे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रणासारखे महत्त्वाच्या कायद्याचे पालन, इच्छित स्थळी येण्यासाठी लोकांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था अशा कितीतरी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. ब-याच छोट्या गोष्टींमुळेसुद्धा ऐनवेळी घोटाळा होऊ शकतो. अशा वेळी अनुभवी, प्रशिक्षित वेडिंग प्लॅनर चांगली कामगिरी बजावू शकतात. या क्षेत्रात कल्पकता, सृजनशीलता, संयम, मृदू वाणी, माणसे जोडण्याची कला, मेहनती वृत्ती, सेवाभाव चिकाटी या गुणांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. शिवाय व्यावहारिक माहिती, वेगवेगळ्या कायद्यांविषयक ज्ञानसुद्धा त्यामुळे एमबीएचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. जे केवळ पदवीधर आहेत त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण चालू ठेवून एखाद्या वेडिंग प्लॅनरकडे काम केल्यास त्या अनुभवाचा निश्चितच खूप फायदा होऊ शकतो. इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्ससुद्धा उपयोगी ठरतो. तेव्हा आजच या कोर्सची माहिती घ्या आणि एकदा का तुम्ही इथे प्रवेश करून बुद्धी व कल्पकतेच्या जोरावर पैसा मिळवलात म्हणजे तुम्हीच म्हणाल, मंगलाष्टक वन्स मोअर!