आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमन नटवरा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी भाषेमध्ये म्हटले जाते की, आपण कमावलेल्या एक रुपयापैकी 60 पैसे खाण्यासाठी, तर 40 पैसे कलेकरिता खर्च करावेत. कारण 60 पैसे तुम्हाला जगवायला मदत करतील व उरलेले 40 पैसे कसे जगायचे ते शिकवतील. हे कसे जगणे म्हणजे अर्थातच उत्तम साहित्य, संगीत आदी कला. अस्सल रसिक व्यक्तीचे सरासरी आयुष्यमान हे जरा जास्तच असते आणि नुसतेच जास्त नव्हे तर आनंदी व समाधानी असते हे आता शास्त्रानेसुद्धा सिद्ध केले आहे. अशा वेळी आपल्या अंगात एखादी कला असेल, कलासक्त स्वभाव असेल तर त्याचा करिअर म्हणून विचार केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो. विविधतेतून एकात्मता असलेल्या आपल्या एका भारत देशामध्ये अनेक भाषा, धर्म, संस्कृती सुखासमाधानाने नांदताहेत. आपल्या महाराष्‍ट्र राज्यापुरते बोलायचे झाले तर महाराष्टÑ आणि लोककला असे अस्सल समीकरण आता जगाच्या कानाकोप-यात जाऊन पोहोचले. म्हणून आपल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसाठी ही एक अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब असू शकते. शाळेमध्ये वार्षिक संमेलनच्या वेळी किंवा कॉलेजमध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी एखादी कला पेश करणारे बरेच जण असतात. पण यापैकी कुणाला या लोककला प्रकारामध्ये करिअर करावयाचे झाल्यास मुंबई विद्यापीठाने याबाबतचा कोर्स काही वर्षांपूर्वीच सुरू केला आहे. एक वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार पदवीधर असावाच लागतो. बाकी वयाचीही कोणतीही अट नाही. फक्त विद्यार्थी क्षमता 30 जणांची असल्यामुळे 30 हून अधिक विद्यार्थी झाल्यास मग प्रत्यक्ष मुलाखत किंवा अन्य निवड प्रक्रियेतून प्रवेश मिळू शकतो.
मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पूर्ण माहिती उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाचा लोककला अकादमी विभाग अतिशय तत्परतेने विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यास नेहमीच उत्सुक असतो. पूर्ण वेळ वर्षभराचा या डिप्लोमा कोर्समध्ये गण-गवळण, बतावणी, तमाशा, लावणी, पोवाडा, दशावतारसारखे कलाविष्कार तसेच ढोलकी, हलगी, चुंबळ, तुणतुणे यासारख्या वाद्यांचाही अभ्यास शिकवला जातो. पुस्तकी विद्या तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या डिप्लोमा कोर्समध्ये अनेक महोत्सवांमधून विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. अशा वेळी भिन्न देशांच्या लोकांपुढे आपली कला सादर करण्याचे भाग्य विद्यार्थ्यांना मिळू शकते. तसेच निरनिराळ्या देशातील लोककलांचा अभ्यासही प्रत्यक्ष होतोच. तेव्हा आपल्या मातीमधला शेकडो वर्षांचा इतिहास असलेली ही कला जिवंत ठेवण्यासाठी लोककलेमधील करिअर आपल्या विद्यार्थ्यांना साक्षात नटेश्वर देवतेचे आशिष मिळवून देऊ शकते. विद्यार्थ्यांनी वरवरच्या रागरंगाला न भूलता खरोखरीच सचोटीने, जिद्दीने आणि संयमाने पाऊल उचलल्यास करिअर चांगले होऊ शकते. आज अनेक वाहिन्या आलेल्या आहेत. तिथेही संधी मिळू शकते. स्वत:चे कार्यक्रम करता येऊ शकतात. फक्त असुरक्षिततेचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा. एखादी लावणी तीन मिनिटांमध्ये सादर करता आली म्हणजे आपल्याला कला अवगत झाली असे नव्हे, तर त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास, सतत सराव, झटपट प्रसिद्धी, पैसा, वलय यापेक्षाही लोककलेबद्दलची आंतरिक तळमळ, ओढ, जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये स्वीकार केल्यास महाराष्‍ट्राचे नाव जगाच्या कानाकोप-यात झळकायला वेळ लागणार नाही.