आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilas Gavaskar About Food Technology, Divya Education

अन्नपदार्थ तंत्रज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. या शेतीमधून येणारे उत्पन्न वाढून विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा भारत सरकारचा उपक्रम म्हणजे ‘अन्न पदार्थ तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन’ अर्थात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्युरएशिप अँड मॅनेजमेंट’ ( एनआयएफटीईएम). भारतीय शेतीची पद्धती, तंत्रज्ञान, येणारे पीक, धान्य, त्यांची उपलब्धता, जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था, अन्न पदार्थावर केल्या जाणार्‍या विविध प्रक्रिया, वापरात येणारी विविध रसायने, त्यातील मानवाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी पोषक मूल्ये यासारख्या कितीतरी सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास ‘फूड टेक्नॉलॉजी’सारख्या करिअरमध्ये करण्यात येतो. इथे अभियांत्रिकी, विज्ञान, अन्नपदार्थ, शेती, मानवी शरीर रचना, पौष्टिक व सकस अन्नाचे महत्त्व, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे संवर्धन, निगा, त्यांचा योग्य प्रमाणामध्ये होणारा वापर, गोदामे, पेठा तसेच बाजारातील दुकानांपर्यंत किंवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था, (सप्लाय चेन मॅनेजमेंट) अशा कितीतरी गोष्टी शिकण्याची संधी मिळते. परदेशी थेट गुंतवणूक स्वीकारल्यामुळे भारतीय शेती व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून, देशातील आयात-निर्यात धोरणावर विशेष अभ्यास करून काहीतरी सक्रिय करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने एनआयएफटीईएमची स्थापना केली आहे. हरियाणा राज्यातील सोनिपत जिल्ह्यातील कुंडली गावात ही संस्था आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध असलेली ही संस्था डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. म्हणून इथल्या कोर्सला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. विविध प्रकारचे धान्य, कडधान्य, भाज्या, फळफळावळ, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ, अन्न घटक, पदार्थांचे विश्लेषण, पृथ:करण, वर्गीकरण, संशोधन, विविध उपयुक्त रसायनांचा वापर, त्यावरील प्रक्रिया, अन्नपदार्थ टिकविण्याकरिता वापरात येणारे तंत्रज्ञान, पदार्थ निर्यात करताना घ्यावी लागणारी दक्षता, पदार्थांची चव यासारख्या अनेक गोष्टी या शाखेत प्रत्यक्ष शिकावयास मिळतात. चार वर्षांचा आठ सत्रांचा पूर्णवेळ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात बीटेक, दोन वर्षांचा एमटेक शिवाय पीएचडीसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस इथे चालविले जातात. प्रवेशासाठी पात्रता अर्थातच बारावी सायन्स कमीत कमी पन्नास टक्क्यांनी पास अशी आहे.
शिवाय जेईई (मेन) ऑल इंडिया ओपन रँक मधून निवडले गेलेले विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात. प्रवेश घेतल्यानंतर मुलांसाठी आणि मुलींसाठी अशी स्वतंत्र होस्टेलची सोय आहे. कोर्स पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना फूड प्रोसेस इंजिनिअर, न्यूट्रिशन स्पेशालिस्ट, फूड फर्मेंटेशन स्पेशालिस्ट, फूड अ‍ॅनलिस्ट, फूड रेग्युलेटरी, रिटेल-सप्लाय चेन मॅनेजर, क्वालिटी कंट्रोल सुपरवाइजर सारख्या पदांसाठी खूप चांगली नोकरीची संधी मिळू शकते. या संस्थेमधून पीएचडी करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे असून बी. टेक. एम. टेक. प्रवेशासाठी शेवटची तारीख 20 जून आहे. संस्थेच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. एनआयएफटीईएम. एसी. इन ह्या संकेत स्थळावर अर्ज करता येऊ शकेल.
(vilasgavraskar@yahoo.co.in)