आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ।’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट सृष्टीला उद्योगाचा अधिकृत दर्जा मिळाल्यामुळे म्हणा किंवा अनेक खासगी वाहिन्या, माध्यमांकडून चित्रपटसृष्टीला सतत चढा भाव मिळत गेल्यामुळे म्हणा अभिनय क्षेत्रामध्ये रितसर अभ्यासक्रम उपलब्ध होऊ लागले.
प्रत्येक मुलाला हृतिक रोशन किंवा सलमान खान किंवा मुलीला माधुरी किंवा कॅटरिना होण्याचं स्वप्न असतं. पण ते वास्तवात उतरवण्यासाठी कोणत्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, यासाठी अशा अभ्यासक्रमांचा निश्चितच फायदा होतो. अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील विविध कलागुणांवर जाणीवपूर्वक अभ्यास करायला हवा.

आपले स्वप्न येथे पूर्ण होऊ शकते
अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण कुठे मिळू शकते बरं? मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या काही वर्षांपासून अत्यंत उपयुक्त असे तीन वर्षांचे, दोन वर्षांचे कोर्सेस सुरू झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे सर्टिफिकेट कोर्स तसेच डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्ससारखे कोर्स आहे. पदवीधर इथे प्रवेशासाठी पात्र ठरू शकतो. याचबरोबर चेन्नई युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. शिवाय म्हैसूर विद्यापीठ, राजस्थान विद्यापीठ, एस.एस.युनिव्हर्सिटी बडोदा, पाँडेचरी विद्यापीठ इथेही अभिनयाचे कोर्सेस चालवले जातात. काही विद्यापीठांमध्ये फिल्म अँड ड्रॅमॅटिक्स असे कोर्सेस आहेत तर काही ठिकाणी ड्रॅमॅटिक्स फिल्म असं वेगवेगळे कोर्सेस आहेत, याची विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी. बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये तीन वर्षांचे बॅचलर्स दोन वर्षांचे मास्टर्स असं अभिनयाचे दोन्ही कोर्सेस उपलब्ध आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एन.एस.डी.) दिल्ली, या लोकप्रिय संस्थेचा तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स आर्ट‌्स असा कोर्स आहे. मात्र इथले शिक्षण हे, खडतर असते. पदवीधर (१८ ते ३० वयोगटातील) अर्ज करू शकतात. एस.सी./एस.टी. उमेदवारांसाठी पाच वर्षांनी ही अट शिथिल केलीय. उत्तम आरोग्याचं प्रमाणपत्र बंधनकारक आहे. प्राथमिक निवड ही दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता या शहरांमध्ये होते अंतिम निवड मात्र एन.एस.डी. दिल्ली मध्ये होते. यासाठी आवाजातील चढउतार, स्वच्छ वाणी, संगीताचे ज्ञान , श्वासांवरील नियंत्रण आणि अन्य काही बाबींवर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतो. आर्थिक बाजू भक्कम असलेल्या विद्यार्थ्यांनी अनुपम खेर यांच्या ‘अक्टर प्रिपेअर्स’ सारख्या खासगी संस्थेचा विचार करायला हरकत नाही. एकदा शिक्षित/प्रशिक्षित होऊन पडल्यानंतर बाहेर मग रंगभूमी, दूरदर्शन वाहिन्या, चित्रपट अशा मोठया कॅनव्हासवर तुम्हांला संधी प्राप्त करता येवू शकते.

रितसर शिक्षणच हवे : सभाधीटपणा,वक्तृत्व, आवाज, नकला किंवा इतरांच्या लकबी अचूक टिपण्याची कला, प्रचंड निरीक्षण क्षमता या काही अगदीच मूलभूत गोष्टीअंगी असणं खूप फायद्याचं ठरू शकतं. हौस म्हणून एकांकिका करणं किंवा एखाद्या बक्षिसाने हुरळून जाण्यापेक्षा रीतसर जर अभिनयाचे शिक्षण घेतलं तर करिअरच्या दृष्टीने खूप फायदा होऊ शकतो. इथे खरं तर कॉर्पोरेटसारखं पदवी मिळाली की लगेच पॅकेजची नोकरी असं समीकरणच नसतं मुळी. त्यामुळे भूमिका करताना तुम्हाला मान्यताप्राप्त पदवीच असायला हवी असं काही नाही. करिअरच्या दृष्टिकोनातून बघितल्यास विविध आव्हाने पेलण्यासाठी पदवीचा निश्चित फायदा होऊ शकतो. प्रभावी सादरीकरण, सादरीकरणातील बारकावे, नाटकाचा अभ्यास, रंगभूमीचा इतिहास, नाट्यतंत्रे, चित्रपट/रंगभूमी रसग्रहण, व्यवस्थापन अशा कितीतरी गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास असतो.
(vilasgavraskar@yahoo.co.in)