आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांची कविता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘उजेडाचे कवडसे’ या अनघा तांबोळींच्या कविता-संग्रहातील कवितांमध्ये सर्वसामान्यांची भावना व्यक्त होते. या संग्रहाची सुरुवातच ‘कॉमन मॅन’ नावाच्या कवितेने होते. यामध्ये कवयित्रीने शाळेतील बालपणीच्या आठवणी जागवल्या असून सोशिक असलेल्या सामान्य माणसाला जेव्हा स्वत्वाची जाणीव होते, तेव्हा त्याच्यात हत्तीचे बळ असल्याची प्रचिती येते. ‘शर्यत’ कवितेत सध्याच्या स्पर्धेच्या युगात अभ्यास करण्यामुळे बालपणच हरवत चालल्याची भावना व्यक्त झाली आहे...
शाळा नसून या सगळ्या
घोड्यांच्या पागा आहेत
बाप आमच्यावर पैसे लावतात
तर शिक्षक आमचे जॉकी आहेत!
अशी भावना कवयित्रीने व्यक्त केली आहे.
‘दुष्काळ’ या कवितेत शेतकरी आत्महत्येचा विषय हाताळण्यात आला आहे. अवर्षणामुळे बळीराजाला आत्महत्या करावी लागते. मेल्यानंतर तो म्हणतो,
जाळू नका, पुरा मला
त्याच्यावरती बी पेरा
मी खत बनून राहीन
पीक माझ्यावर फोफावेल!
देवा रखमीच्या डोळ्यामंदी
एकदा तरी हासू दे रे..
माझ्या फोटुपुढचं फूल तरी
धोत-याचं नसू दे रे..!
अनघाच्या कवितेतील अबला ‘चंडिके’चं रूपही धारण करते. असुराचा कसा वध केला, हे सांगताना ती म्हणते...
मायच्या पदराला जेव्हा
त्याने हात घातला..
तेव्हा सहनशक्तीचाच
माझ्या सारा बांध फुटला..!
ना भगवान, ना समाज
नाही येणार मदतीला..
चंडिकाच व्हावं लागतं एखादीला..!
खरंच तुम्हाला वाटतं का
मी काही गुन्हा केला
की कातडं ओढलेल्या समाजातला
एक असुर कमी केला.
मुंबईत बालपण गेलेल्या कवयित्रीने ‘मुंबई’लाही कवितेचा विषय करून टाकलं आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई सोडलेल्या कवयित्रीला मुंबईच्या आठवणी व्याकुळ करतात, म्हणून ती म्हणते...
ब-याच वर्षांनी मी
माझ्या मुंबईत आले,
माझी बालमैत्रीण म्हणून
तिच्या गळ्यात पडले..
‘चिपकती कायकू’ म्हणत
मुंबईने मला दूरदूर सारले
दुरूनच ‘हँडशेक’ करत
बोलायचेही टाळले..!
अशा या मुंबईने भारतातील सर्वच राज्यांतील नागरिकांना सामावून घेतलं असून त्यांचे सण-उत्सव, रूढी-परंपरा आपल्याशा केल्या आहेत...
ओळखायलाही येत नाही
इतकी मुंबई पार बदलली
भांगात तिच्या केशरी सिंदूर
अन् तोंडामध्ये पंजाबी गाली..!
कधी हातामध्ये दांडिया धरून
देवीपुढे रास खेळते...
तर कधी भं..भं...भोले म्हणत
भांग पिऊन पडून राहते...
‘शिवण’ या कवितेत कपड्याला टाका घालून शिवता येते; मात्र नातीच कच्ची असतील, उसवली असतील तर ती कशी सांधणार, असा प्रश्न ‘अनघा’ला पडला आहे...
आजकाल नातीच इतकी कच्ची असतात
हात लावल्याबरोबर फाटतात..
युज अँड थ्रोचा जमाना आहे बाई
लग्गेच ‘डस्ट बीन’ची वाट धरतात..
आजकाल भाऊ भावाला विचारत नाही
नवरा बायकोला नांदवत नाही
पोरांना आईबाप जड होतात
म्हातारपणीसुद्धा घटस्फोट होतात..!
लग्नानंतर नवीन घरात ‘अ‍ॅडजस्ट’ केलं आहे; संसार फुलल्यावर मुलं मोठी झाली; त्यांना अडगळ वाटतेय म्हणून त्यांनीच (मुलांनी) म्हातारपणी उंब-याबाहेर काढून दिल्यावर जी अवस्था होते, ती ‘उंबरा’ कवितेत कवयित्रीने व्यक्त केली आहे...
आज मी परत एकदा उंब-यापार झालेय
पोटच्या पोरांनीच मला तडीपार केलंय...
ठरवलं होतं पडायचं नाही
उंब-याबाहेर शेवटच्या हाकेतोवर
पण तो उंबराच आपला नव्हता कधी
जो हक्काचा समजत होते आजवर..!
ज्या मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्यांनीच रस्त्यावर आणले; म्हातारपणी जन्मदातेच कसे अडगळ वाटतात, याचं चित्रण करून विचार करायला भाग पाडलं आहे.
पुस्तकाचे नाव : उजेडाचे कवडसे (कवितासंग्रह)
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे -4
पृष्ठे : 70, किंमत : 80 रुपये