आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटचे भजे !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैदानावर क्रिकेट जेवढे गाजते, चमकते, त्यापेक्षाही अधिक रंग मैदानाबाहेरच्या क्रिकेट प्रशासनाच्या खेळीत भरले जातात. प्रशासनातील श्रीनिवासन यांच्यासारख्या प्रस्थापित पदाधिकार्‍याला सत्तेचा मोह सुटता सुटत नाही. त्याच वेळी प्रस्थापितांच्या वर्चस्वाखाली दबला गेलेला, असाहाय्य असा गट, सत्तालोलुप राजकारण्यांसाठी संघटनेची दारे सताड खुली करून देत अंतर्गत राजकारणाचे बारकावे सांगत आहे. या साठमारीमुळे भारतीय क्रिकेट होरपळणार आहे का? असा प्रश्न भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आयपीएल स्पर्धेच्या लोकप्रियतेला आणि विश्वासार्हतेला लागलेली ओहोटी हे त्याचेच द्योतक मानायचे का? राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार आणि अमित शहा या दोन धुरंधरांची क्रिकेटमधील हातमिळवणी क्रिकेटरसिकांच्या चेहर्‍यावरील काळजीच्या छटा वाढवणार का?

भारतीय नव्हे, तर जागतिक क्रिकेटच्याच प्रतिष्ठेला, विश्वासार्हतेला आणि स्थैर्याला धोका पोहोचू शकेल, अशा हालचाली वाढू लागल्या आहेत. सात-आठ वर्षांपूर्वी आयसीएल क्रिकेट लीगची स्थापना करून बीसीसीआयच्या क्रिकेट मक्तेदारीला आव्हान देणारे ‘झी’ चॅनलचे सुभाषचंद्र गोयल पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. या वेळी त्यांच्या या विश्वक्रिकेटच्या नव्या जडणघडणीच्या रथाचे दृश्य-अदृश्य रूपात सारथ्य करताहेत आयपीएलचे जनक ललित मोदी. परंतु एकीकडे ललित मोदी स्वत: गोयल यांची आयसीसीला समांतर क्रिकेट संघटना स्थापन करण्याची कल्पना अवास्तव असल्याचे म्हणत आहेत; मात्र त्याच वेळी मोदींचे उद्योगजगतातील एक भागीदार डिन किनो (जे ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटचा उद्योग व कायदेविषयक कारभार पाहत होते), तेही या महत्त्वाकांक्षी योजनेत सामील असल्याचे वृत्त आहे.

नेहमीप्रमाणे गाफील न राहता आयसीसीने या तिघांच्या हालचालींची माहिती काढण्यासाठी आपली गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आयसीसीचे भारत-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीन दिग्गज सदस्य मोदी-सुभाषचंद्र-एस्सेल ग्रुप यांच्या हालचालींमुळे खडबडून जागे झाले आहेत. श्रीनिवासन यांनी तर त्रिसदस्यीय समिती स्थापन करून, त्यांना अधिकृत अहवाल द्यायला सांगितले आहे.

मात्र, या घटनेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षाही भारतीय क्रिकेटवर अधिक दूरगामी परिणाम होणार आहेत. कारण, यात कुरुक्षेत्रभूमी ही भारतीय क्रिकेटची असेल. एकमेकांचे कपडे फाडण्याच्या प्रयत्नात, भारतीय क्रिकेटचे आजी-माजी पदाधिकारी अनेक गुप्त गोष्टी उघड करतील. एकमेकांची कटकारस्थाने चव्हाट्यावर आणतील. श्रीनिवासन यांनी तर पारदर्शी कारभार हा शब्दच आपल्या शब्दकोशातून हद्दपार केला होता. कोणत्याही प्रश्नाचे ना प्रसिद्धी माध्यमांना उत्तर द्यायचे किंवा सदस्यांनाही काही कळू द्यायचे नाही, ही कपटनीती त्यांनी आपल्या कार्यकाळात वापरली. त्याच नीतीला आलेल्या वाईट फळांचे परिणाम स्वत: श्रीनिवासन आणि भारतीय क्रिकेट सध्या भोगत आहेत.

एस्सेल ग्रुप आणि सुभाष गोयल यांनी यापूर्वी फक्त बीसीसीआयपुढे आव्हान उभे केले होते. त्या वेळी आयसीएल लीग सुरू करून त्यांनी आयपीएललाच आव्हान दिले होते. समेट होता होता बोलणी फिस्कटली आणि बीसीसीआयने आयसीसीचा आधार घेऊन आयसीएलची पाळेमुळेच उखडली. मात्र, या वेळी गोयल जागतिक क्रिकेटचे नियंत्रण करणार्‍या आयसीसीच्या विरोधातच उतरले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन बड्या देशांनी आयसीसीच्या गल्ल्यावर डल्ला मारण्याचे विधिवत जाहीर केल्यानंतर त्यांनी असंतुष्टांची मोट बांधायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी ललित मोदी या बीसीसीआयच्या शत्रूला आणि ‘आयपीएल’च्या जनकालाच हाताशी धरले. पण मोदींनी गोयल यांची महत्त्वाकांक्षा आणि क्षमता यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे पाहून अर्धवट मोहिमेतूनच पळ काढला आहे. मोदी म्हणतात, क्रिकेटच्या जागतिक संघटनेला आव्हान देणे सोपे नाही. क्रिकेट या खेळाच्या विकासाची तळापासून सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्टर’ आवश्यक आहे. ‘लॉजिस्टिक्स’चा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रचंड पैसा फेकला की खेळाडू मिळतीलही; मात्र विश्वासार्हता निर्माण करणे अवघड गोष्ट आहे. आयपीएल सुरू करताना ही आव्हाने माझ्यापुढे नव्हती. त्यामुळे सुभाष गोयल यांच्या महत्त्वाकांक्षेचा काही महिने अभ्यास केल्यानंतर मी त्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’

मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘गोयल यांच्याकडे प्रचंड आर्थिक बळ आहे. मात्र, क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी संकल्पना रुजविणे सोपी गोष्ट नाही. ज्यामध्ये त्यांना यश मिळणार नाही, असे वाटते. अर्थातच या झमेल्यापासून मोदी स्वत:ला दूर ठेवण्याइतके चाणाक्ष निश्चितच आहेत. दुसरीकडे, एस्सेल ग्रुप विविध देशांत व भारतात कंपन्यांची नोंदणी करीत आहेत. आगरतळा क्रिकेट लीग, ऐझवाल क्रिकेट लीग, इम्फाळ क्रिकेट लीग, इटानगर क्रिकेट लीग, कोहिमा क्रिकेट लीग अशा लीगची नोंदणी करण्यात आली असून आश्चर्याची गोष्ट अशी की, सर्व लीगचे संचालक नरेश धुंडियाल हे एस्सेल ग्रुपचे एक अधिकारी आहेत.

त्याच वेळी अवध, हिमाचल प्रदेश, चंदिगड, गढवाल आणि झारखंड व आसाम या लीगची नोंदणी करून एस्सेल ग्रुपच्याच अशोक संघवी यांची सर्वच लीगच्या संचालकपदी नोंद करण्यात आली आहे. दुसरे अधिकारी अनिल चौगुले हे पाच संघांच्या संचालकपदी आहेत. त्या सर्व लीगची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज््मध्ये नोंद करण्यात आली आहे. २००९मध्ये बीसीसीआयवर आयपीएल फ्रँचायझी देण्यासाठी दबाव टाकण्याकरिता अशा लीगची व संघांची नोंदणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात या लीगचे कधी सामनेही झाले नाहीत.

प्रत्यक्ष क्रिकेटच्या विकासापेक्षा गोयल आणि एस्सेल ग्रुपने कागदावरच्या लढाईसाठीच सुरू केलेल्या या हालचाली आहेत. त्यामुळे बीसीसीआयला धडा शिकविण्यासाठी तत्पर आणि संधीची वाट पाहत असणार्‍या ललित मोदी यांनाही ही पूर्वतयारी परिपूर्ण वाटत नाही. मात्र, त्याच वेळी मोदी यांनी आयसीसीला सावधानतेचा इशाराही दिला आहे. गोयल यांना कमी लेखू नका, असे स्पष्ट करून पुन्हा एकदा १९७०च्या सुमारास आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘केरी पॅकर सर्कशी’च्या वादळाची चाहूल असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. कदाचित, त्याचे परिणाम भारतीय क्रिकेटवर दिसणार नसतीलही; मात्र इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट संघटक गोयल यांच्या हालचालींमुळे सावध झाले आहेत. एस्सेल ग्रुपच्या धसक्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या विद्यमान संघातील १९ खेळाडूंना प्रदीर्घ काळासाठी करारबद्ध केले असून त्यासाठी घसघशीत रक्कमही मोजली आहे. त्यात स्टिव्ह स्मिथला वर्षासाठी २० लाख डॉलर्स देऊ केले आहेत. डेव्हिड वॉर्नर त्याखालोखाल आहे. मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, मायकल क्लार्क यांनाही कुणी अधिक पैशाचे आमिष दाखवून पळवू नये, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे सरसावली आहे. एस्सेल ग्रुपचे लक्ष्य ट्वेंटी-२० क्रिकेट हे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने त्या क्रिकेटमध्ये नाव असलेल्या आपल्या युवा खेळाडूंनाही मोठ्या रकमेचे आणि प्रदीर्घ काळाचे करार देऊ केले आहेत.

इंग्लंडमध्येही तीच परिस्थिती आहे. मात्र, इंग्लंडचा क्रिकेट ढाचा आणि आर्थिक धोरण यामुळे गोयल आणि कंपनीला तेथे पाय रोवण्यास थोडाफार वाव आहे. भारतात काही वर्षांपूर्वी त्यांचे हात पोळले आहेत. शिवाय, भारतातील सर्वच स्तरांवरच्या क्रिकेटपटूंना एवढा प्रचंड पैसा बीसीसीआयकडून मिळत आहे की, अशा अन्य लीगच्या जाळ्यात पकडण्यासाठी आमिषही प्रचंड मोठे असावे लागणार आहे. मात्र, गोयल आणि एस्सेल ग्रुप यांचे लक्ष त्यापेक्षाही, आयपीएलप्रकरणी कुणाकुणाला शिक्षा होते आणि त्याचे परिणाम व पडसाद कसे उमटतात, याकडे अधिक लागले आहे. एक खेळ म्हणून क्रिकेटचे भले होणे, ही त्यांच्यासाठीसुद्धा दुय्यम बाब आहे.
विनायक दळवी
vinayakdalvi41@gmail.com
बातम्या आणखी आहेत...