आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Dalvi Article About Virat Kohali, Divya Marathi

बिनधास्त नि बेधडक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेहवाग, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांना एकत्र अनुभवायचे असल्यास विराट कोहलीची फलंदाजी पाहा. विराट दिल्लीचा. दिल्लीकरांमध्ये उपजत असलेली बेदरकारी जपतच तो मोठा झाला. चेंडू अधिक जोरात, अंतराळात भिरकावण्याची मनीषा बाळगूनच तो खेळपट्टीवर आजवर येत गेला. समोरचा गोलंदाज कोण आहे, याचा फारसा विचार न करता त्याला टाकलेल्या चेंडूच्या ठिकर्‍या उडवायच्या असतात. सेहवागचे हेच तत्त्व तो जगत आलाय. त्याचे बचावतंत्र राहुल द्रविडसारखे आहे. या तंत्राला साजेसा त्याचा स्वभाव मात्र बिलकुल नाही. सचिन तेंडुलकरसारखा, त्याचा फटक्यांचा भाता समृद्ध आहे. त्या भात्यात त्याने स्वत: विकसित केलेले काही फटकेही आहेत. भारताच्या तीन महान फलंदाजांच्या गुणवत्तेतला त्रिवेणी संगम मार्टिन क्रो याला त्याच्यामध्ये दिसला. प्रत्येकाने मात्र आपल्या सोयीनुसार आणि कुवतीनुसार विराट कोहली पाहिला कुणाला तो उर्मट वाटला. काहींना व्रात्य, तर काहींना अत्यंत शिवराळ. काहींनी त्याची गणना गुलछबू तरुणांत केली.

अर्थातच, पोरीबाळींमध्ये तो अधिक रमायचा. ‘बॅड बॉय’चे लेबल त्याला चिकटले. 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक जिंकून दिल्यानंतरची त्याची प्रतिमा हवेतच विरली. एक वाया गेलेला क्रिकेटपटू, अशी त्याची नवी ओळख बनली. दिल्लीचा असल्यामुळे आणखी बदनामी त्याच्या वाट्याला आली. वाईट नाद, वाईट संगत आणि बेदरकार वृत्ती यामुळे तो पुरता दलदलीत सापडला...
त्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी सुरिंदर खन्ना नामक दिल्लीचाच माजी क्रिकेटपटू त्याला भेटला. आयपीएल सामना दिल्लीत खेळताना सुरिंदरने त्याला गाठले. सुरिंदर त्याला म्हणाला, असेही दिल्लीचे सर्वच क्रिकेटपटू बदनाम होतात. त्यामुळे त्या बिरादरीत तुला सहज स्थान मिळेल; पण एक लक्षात ठेव, नंतर तू कितीही मोठा क्रिकेटपटू झालास, तरीही तुला कुणीही मान देणार नाही. दारू पितोस, ती जगाला दाखवण्याची काय गरज आहे? स्वत:च्या खोलीत जाऊन पी. पार्टीत, रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर कशाला पितोस? एकदा का संघात अशी प्रतिमा निर्माण झाली की आयुष्यभर लोक तुझी किंमत करणार नाहीत.

सुरिंदर खन्ना यांनी विराटचे वेळीच कान उपटल्याने त्याच्यात कमालीचा बदल झाला. स्वभावातील आक्रमकपणा, उच्छृंखल वृत्ती, कुणालाही भिडण्याची सवय त्याच्या फलंदाजीत उतरली. समाजाविरुद्धचा राग त्याच्या बॅटीतून व्यक्त होऊ लागला. त्याची बॅट आग ओकू लागली. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याने शतक पूर्ण केले, तेव्हा तेव्हा त्याच्या तोंडातून ‘शिवी’ आपोआपच बाहेर पडत गेली...

विराट असा का वागतो? मुळात तो असा का झाला? खरं तर इतरांप्रमाणेच मोठा क्रिकेटपटू होण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन तो वाढला. शालेय क्रिकेटमध्ये नाव कमावले. सारं काही सुरळीत सुरू असतानाच अचानक 2007च्या सुमारास त्याचे वडील वारले. वडिलांच्या मृत्यूने तो कोसळला. त्या वेळी तो जेमतेम 16 ते 17 वर्षांचा असावा. आपण काय करतो आहोत, याचे भानही त्याला राहिले नाही. त्यानंतरचे वर्ष-दीड वर्ष त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली.

तो जवळजवळ संपल्यात जमा होता. भारतीय संघात निवड होऊनही त्याला संघात संधी दिली गेली नव्हती. तो अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने रागातच, सर्व मित्रांशी फारकत घेतली. डिस्कोला कायमचा विसरला. फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. पार्टीप्रेमी मित्र-मैत्रिणी बोलवायच्या; पण कुणीही त्याचा निग्रह तोडू शकला नाही. वडिलांच्या मृत्यूच्या आघाताने त्याला एवढे कठोर केले होते, की कुणालाही त्याचा निश्चय मोडता आला नाही.

या गोष्टींचा सकारात्मक लाभ झालाच. रणजी स्पर्धेत सलग पाच शतके ठोकून, त्याने आपल्या बदललेल्या रूपाची जाणीव सर्वांना करून दिली. फक्त समाजच नव्हे, तर त्याच्या बदललेल्या रूपाने तमाम क्रिकेटविश्वही अचंबित नि प्रभावित झाले.
सारं काही झपाट्याने बदलत गेलं. आत्मविश्वास गवसला. भात्यातील फटके वाढायला लागले. त्याने स्वीपचा स्वत:चा असा फटका विकसित केला. नेहमीप्रमाणे झाडू मारावा, तसा तो स्वीपचा फटका मारत नाही. ‘स्नाक स्वीप’ हा त्याचाच आविष्कार! सीनियर खेळाडूंना पाहून तो बरंच काही शिकत गेला. बॅकफूट खेळाची महती त्याला पटली होतीच. सचिन, राहुल, सेहवाग, लक्ष्मण यांचे डाव पाहून त्याच्या फलंदाजीत परिपक्वता यायला लागली. तो सीनियर्सचा आदर करायला शिकला.

कुंबळेला त्याच्यातला आक्रमकपणा भावला. दक्षिण आफ्रिकेत एकदा पाकिस्तानविरुद्ध डाव सुरू होता. समोर सचिन होता. विराटने थर्ड मॅनला मारलेले चेंडू पॉइंटचा क्षेत्ररक्षक सतत अडवत होता. हा अगतिक झाला. सचिनने त्याची अस्वस्थता पाहिली. त्याला सांगितले, बॅटचे ब्लेड ओपन करून थर्डमॅनला खेळू नकोस, त्याऐवजी किंचित ‘बॅट टिल्ट’ कर. त्यानंतर आजतागायत त्याला थर्डमॅनला समस्या उद््भवली नाही. गॅरी कर्सनने त्याला सांगितले, क्रिकेट हा चौकार-षटकारांचा खेळ नाही. मोठी इनिंग खेळण्यासाठी मध्येमध्ये सिंगल धावा काढणे महत्त्वाचे असते. कर्सनचा सल्ला त्याने मानला आणि त्याच्या नावावर मोठमोठ्या डावांची नोंद व्हायला लागली. मोठ्यांचं म्हणणं तो ऐकू लागला आणि त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली... आजही फॅशन, हेअर स्टाइल, म्युझिक, आणि घरचे खाणे याचा तो शौकीन आहे. त्याला सहकार्‍यांच्या किंवा सतत सान्निध्यात असलेल्या व्यक्तींच्या नकला करायला आवडते. तो हुबेहूब नकला करतो.
हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याचा छंद त्याने जोपासला आहे. हिंदी चित्रपटातील जुन्या काळातील त्याची आवडती नायिका रेखा होती. आता करिना कपूरचा तो दिवाना आहे. मात्र, त्याचे प्रेमप्रकरण सध्या अनुष्का शर्माशी सुरू असल्याची वदंता आहे. हीरोंमध्ये आमीर खान त्याचा आवडता नट आहे. आमिर खानचा ‘जो जीता वही सिकंदर’ हा त्याचा आवडता चित्रपट आहे. त्याशिवाय ‘लगान’ व ‘थ्री इडियट’नेही त्याला मोहित केले आहे. जॉनी डेप, अँजेलिना जोली हे त्याचे आवडते सितारे आहेत. असं म्हणतात, प्रभुदेवाने त्याला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. त्याने त्याचा विचारही केला नाही. मात्र, त्याच्या मते सध्याच्या भारतीय संघात हिरोचा चेहरा, व्यक्तिरेखा असणारा एकच खेळाडू आहे; तो म्हणजे झहीर खान! या त्याच्या आवडी-निवडीबद्दल तरीही त्याच्या आईची जराही तक्रार नाही. ती म्हणते, वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने स्वत:ला सावरले हेच खूप आहे. त्याची एकच गोष्ट मला अजूनही खुपते, ती म्हणजे त्याच्या तोंडातील शिव्या...!