आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Dalvi's Artical On Marethon Secreat Of African Competators

केनियन स‍िक्रेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगभरात मॅरेथॉन शर्यतींचा हंगाम सुरू आहे. बॉस्टनपासून बीजिंगपर्यंत आणि पुण्या-दिल्लीपासून पाच खंडांतील कोणत्याही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीच्या विजेत्यांमध्ये एक समान बाब म्हणजे, सगळीकडे केनियन चेहरेच सातत्याने आढळत आहेत. अवघी चार कोटी लोकसंख्या असणारा, आपल्या एखाद्या राज्याच्या आकाराचा केनिया हा देश मात्र 70 ते 80 टक्के विजेतीपदे लुटून नेतो, हे आश्चर्यचकित करणारे सत्य आहे.
वर्णद्वेष आणि उपासमारीच्या वणव्यात होरपळत असणारे आफ्रिकी खंडांचे धावपटू जगण्याचा संघर्ष करत मॅरेथॉन विजयाची जिद्दही बाळगतात. मात्र, त्याच वेळी निसर्गदत्त देणगी असलेल्या या आफ्रिकी खंडांतील सर्वच धावपटूंच्या वाट्याला हे यश येत नाही, हेही तेवढेच खरे. 1980च्या सुमारास पूर्व आफ्रिकी देशांनी धावण्याच्या शर्यतीतील तंत्रज्ञान आणि प्रोटिनयुक्त आहार या बाबतीत पाश्चिमात्य देशांची बरोबरी करण्यास सुरुवात केली. मात्र दीर्घ पल्ल्यांच्या शर्यतीवर केनियन धावपटूंचीच मक्तेदारी आहे. 2000पर्यंत केनियन महिला धावपटूंसाठी मात्र या शर्यती जवळजवळ वर्ज्यच होत्या. बालविवाह आणि महिलांच्या पायात खोडा बनलेल्या रूढी-परंपरांनी महिला धावपटूंना जखडून ठेवले होते. पण आज केनियन पुरुषांच्या बरोबरीनेच केनियन महिला धावपटूही अग्रेसर आहेत. 3000 मीटर्स स्टिपलचेस शर्यतीच्या 25 पुरुष विजेत्यांपैकी 18 केनियन आहेत. तर लंडन मॅरेथॉनच्या गेल्या आठ विजेत्यांपैकीही सात केनियन आहेत.
हे वर्चस्व फक्त केनियन धावपटूच का राखून आहेत, हा खरा संशोधनाचा विषय आहे. युरोपियन अ‍ॅथलेटिक्स युनियनने या कारणांचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. केनियाच्या एका विशिष्ट भागातून आलेले धावपटूच आजवर विजेते ठरत आले आहेत. त्यामुळे अभ्यासकांनी त्याच भागातील काही धावपटूंना अल्प प्रशिक्षण देऊन दर्जेदार धावपटूंसोबत शर्यतीत उतरविले होते. त्या वेळी असं आढळून आलं, की जुजबी प्रशिक्षण मिळालेल्या त्या केनियन धावपटूंनी पट्टीच्या पाश्चिमात्य धावपटूंना सहज मागे टाकले. त्या वेळी आणखी एक गोष्ट चटकन लक्षात आली ती म्हणजे, केनियाच्या धावपटूंची देहयष्टी, शरीरसंपदा अन्य धावपटूंपेक्षा खूप वेगळी आहे. कदाचित ही गोष्ट आनुवंशिकही असावी. देहयष्टीच्या तुलनेत केनियन धावपटूंच्या पायांची लांबी अधिक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, सडपातळ हात, पाय आणि पक्ष्याच्या आकाराची देहयष्टी यामुळे केनियन धावपटू दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत इतरांपेक्षा उजवे ठरतात.
मात्र, केनियन धावपटूंच्या क्षमतांचा हा मुद्दा लक्षात न घेता, जगातील क्रीडा अभ्यासकांनी त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पारंपरिक, सांस्कृतिक पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले. केनियन धावपटूंच्या या शारीरिक आनुवंशिकतेपेक्षा अन्य पैलूंवरच अधिक लिहिले गेले. केनियन धावपटू यशस्वी ठरतात, कारण ते शाळेत जाण्यासाठी कित्येक मैलाचा प्रवास पायी चालत किंवा धावत पूर्ण करतात, असा गैरसमज पसरविण्यात आला. प्रत्यक्षात अलीकडच्या काही केनियन विजेत्यांना त्यांनी शाळेचा दररोजचा प्रवास कसा केला होता, अशी कुतूहलमिश्रित विचारणा झाली तेव्हा सर्वसामान्य मुलांप्रमाणे, शाळेच्या बसमधून आम्ही प्रवास करतो, असे उत्तर त्यांनी दिले. आणखी एक गैरसमज क्रीडा जगतात रूढ करण्यात आला आहे तो म्हणजे, केनियन धावपटूंनी अनवाणी धावूनच दीर्घ पल्ल्यांच्या शर्यतीचे आपले कौशल्य विकसित केले आहे. खरे तर, आशिया खंडातील अनेक युवक अनवाणी प्रवास करताना, धावताना आढळतात. त्यांनाही केनियन धावपटूंप्रमाणे यश मिळायला हवे होते. पण तसे होत नाही. एरवी, केनियन लोकांचा आहार प्रथिनयुक्त नाही, असे सांगितले जाते किंवा देशातील गरिबीचा आणि गरिबीमुळे होत असलेल्या उपासमारीचा उल्लेख केला जातो. या विपरीत परिस्थितीमुळेच त्यांच्यामध्ये यशप्राप्तीसाठी आवश्यक इच्छाशक्ती बळावते, असाही मुद्दा मांडला जातो. प्रत्यक्षात आफ्रिकेत आजही असे अनेक देश आहेत, जिथे गरिबी आणि उपासमारीमुळे युवकांना पूर्णान्न मिळत नाही. पण ते मात्र उत्तम धावपटू बनत नाहीत. त्यांच्यात केनियन धावपटूंप्रमाणे इच्छाशक्ती बळावत नाही.
केनियाचे बहुतेक धावपटू ग्रेट रिफ्ट व्हॅलीमधून येतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 7 हजार फूट उंचावर असलेल्या त्या भागात प्राणवायू अत्यंत कमी असतो. अशा वातावरणात धावपटूंच्या फुप्फुसांची क्षमता वाढते. किमान प्राणवायूच्या साहाय्याने धावण्याचा त्यांना सराव होतो. त्यामुळे अधिक प्राणवायू असणा-या अन्य ठिकाणी केनियन धावपटूंच्या क्षमता इतरांच्या तुलनेत विस्तारलेल्या असतात. त्यामुळेच कदाचित या केनियन धावपटूंची दीर्घ पल्ल्यांच्या शर्यतीत अन्य धावपटूंच्या तुलनेत कमी दमछाक होते. अर्थात, हेही एक गृहीतकच. कारण समुद्रसपाटीपासून उंचीवर असणा-या आल्प्स पर्वतराजी किंवा अन्य उंच ठिकाणावरील धावपटूंना मात्र केनियन धावपटूंना होणारा लाभ होत नाही, हेही वास्तव आहे. केनियन धावपटूंच्या या यशाचे पृथक्करण करताना काहींनी मात्र अचूक अवलोकन आणि निष्कर्ष काढलेले दिसतात. हे यश केनियातील आदर्श भौगोलिक परिस्थिती, कठोर मेहनत, एकाग्रता यामुळे मिळालेले आहे. या यशस्वी धावपटूंचा आदर्श प्रत्येक केनियन नागरिकापुढे असतो, जो अनेकांना प्रेरित करत असतो.
या संदर्भात आणखी एक बाब पुढे आली आहे ती म्हणजे, चार कोटी केनियन लोकांमधील कलेन्जीन या जमातीचे धावपटू मुख्यत्वे आजवर मॅरेथॉन स्पर्धांमध्ये पदक विजेते ठरले आहेत. आनुवंशिकता हा त्यामागील जाणकारांनी काढलेला निष्कर्ष आहे. या जमातीतील लोकांचे पक्ष्यांसारखे अधिक लांब पाय कमी शक्तीचा व्यय करतात आणि लांब ढेंगांमुळे इतरांच्या तुलनेत हे धावपटू इतरांच्या तुलनेत अधिक अंतर कापतात. याबाबतचे उत्तम उदाहरण म्हणजे, बीजिंग व लंडन ऑलिम्पिक गाजवणारा जलतरणपटू मायकल फेल्फ किंवा वेगवान धावपटू युसेन बोल्ट. या दोघांचीही शरीरयष्टी सर्वसामान्य खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. ती बाब आनुवंशिक आहे. म्हणूनच त्यांना मिळालेले यशही वेगळ्या पातळीवरचे आहे. हीच गोष्ट ‘कॅलेन्जीन’ जमातीलाही लागू आहे.
vinayakdalvi41@gmail.com