आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vinod Shirsath Rasik Article Marathi Vishwa Sahitya Sammelan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरोगाम्यांनी परिघाबाहेर ठेवलेला अभ्यासक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
५ आणि ६ सप्टेंबरला अंदमान येथे झालेल्या चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनातील मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने (खरे तर त्यातील काही विधानांनी) छोटेसे वादळ उठले आहे. अर्थातच ते वादळ लवकर शमणार आहे; जरी ते वादळ घोंघावत राहावे, अशी प्रा. मोरे यांची इच्छा असली तरी! हे भाकीत काही वाचकांना जरा विचित्र वाटेल; पण तसे होणार आहे, हे खरे! हे भाकीत कशाच्या आधारावर केले जात आहे, असा प्रश्न काही वाचकांच्या मनात येईल; त्याचे उत्तर ‘यापूर्वी असेच होत आले आहे’ असे आहे. म्हणजे? म्हणजे, प्रा. मोरे यांना घणाघाती चर्चा, वाद हवे असतात आणि त्यांना तो आनंद मिळू द्यायला पुरोगामी वर्तुळातील लोक फारसे उत्सुक नसतात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे...

महाराष्ट्रात ‘पुरोगामी’ नावाचे जे काही वर्तुळ आहे; ते बरेच विशाल, बेशिस्त व अस्ताव्यस्त आहे आणि त्या मोठ्या वर्तुळात अनेक छोटी-छोटी वर्तुळे आहेत. या सर्व लहान वर्तुळांची आपापली अशी केंद्रे आहेत. एक वर्तुळ गांधींना केंद्र मानणारे, दुसरे नेहरूंना, तिसरे आंबेडकरांना, चौथे महात्मा फुल्यांना, पाचवे आगरकर/रानडे यांना, सहावे मार्क्सला आणि असेच आणखी काही... ‘पुरोगामी’ या लेबलखाली वावरणारी ही सर्व वर्तुळे म्हणजे, लहान-मोठे गट-तट परस्परांशी सतत भांडत असतात; इतरांशी भांडण कमी पडले, तर स्वतःशीच भांडत असतात. परिणामी, हे सर्व गट-तट वेळी-अवेळी तुटत असतात, फुटत असतात; आणि पुन्हा परस्परांत मिसळून एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. हे करताना परस्परांवर ‘नाही नाही ते’ आरोप करीत असतात आणि ‘आम्हीच कसे खरे पुरोगामी’ असे छातीठोकपणे सांगत असतात. पण... पण यापैकी कोणताही गट-तट प्रा. शेषराव मोरे यांच्याशी भांडत नसतो, मोरे यांचे काही वाचत नसतो आणि अर्थातच त्यांना कार्यक्रमांसाठी बोलावतही नसतो; या सर्व गटा-तटांनी शेषराव मोरे हा विषय ऑप्शनलाच टाकलेला असतो. थोडक्यात काय, तर पुरोगामी वर्तुळाने शेषराव मोरे नावाचा अभ्यासक आपल्या परिघाबाहेर ठेवलेला असतो. पुरोगाम्यांचे हे वर्तन ‘अप्रिय पण...’ या प्रकारातील आहे, म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचा राग उफाळून आला असला तरी, त्याला कोणाकडेही इलाज नाही.

प्रा. शेषराव मोरे यांची लेखन कारकिर्द दोन तपांहून अधिक काळाची आहे आणि या काळात त्यांची डझनभरापेक्षा अधिक पुस्तके आली आहेत. सरासरी दोन वर्षांनी एक पुस्तक, असे ते प्रमाण आहे. त्यात त्यांनी सावरकर, इस्लाम, काश्मीर आणि भारताची फाळणी हे विषय प्रामुख्याने हाताळले आहेत. अर्थातच, हे सर्व काम त्यांनी कठोर परिश्रम घेऊन केले आहे. म्हणजे अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास करून प्रा. मोरे यांचे जाडे-जाडे ग्रंथ आकाराला आले आहेत, त्यांच्या काही आवृत्त्या निघाल्या आहेत आणि त्यांना वाचकप्रियताही लाभली आहे. इतकी की, प्रा. शेषराव मोरे यांचे चाहते, अनुयायी, भक्त यांचाच एक संप्रदाय झाला आहे, असे म्हणायला हरकत नसावी. ‘मी कुठल्याही गटातटाचा नाही’ असे प्रा. मोरे म्हणतात, हे खरेच आहे; पण त्यांचा स्वतःचाच एक गट तयार झाला आहे, हेही खरे आहे.

प्रा. शेषराव मोरे यांना सावरकर अभ्यासण्याची प्रेरणा रा. स्व. संघाकडून किंवा हिंदू महासभेकडून किंवा अन्य संघटनेकडून मिळालेली नाही, असे ते सांगतात. त्यांच्या शाळेतील उप्पेगुरुजींकडून सावरकर अभ्यासण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि वयाच्या विशीत संपूर्ण सावरकर वाचून काढला, अशी माहितीही ते देतात. त्यामुळे अनेक पुरोगाम्यांना वाटते की, वयाच्या त्या कोवळ्या टप्प्यावर प्रा. शेषराव मोरे यांच्यात सावरकरांचा विचार भिनलेला असेल, तर आपण वाद-चर्चा करून उपयोग होणार नाही. आणखी एक कळीचा मुद्दा असा आहे की, प्रा. शेषराव मोरे त्यांच्यावरील वैचारिक प्रभाव सांगताना नरहर कुरुंदकर यांचा उल्लेख आवर्जून करतात; पण कुरुंदकरांची अभ्यासपद्धती आणि प्रतिपक्षाला चकवण्याची शैली जरी प्रा. मोरे यांनी घेतली असली तरी कुरुंदकरांचा ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ मात्र त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशीच काहीशी ती स्थिती आहे. दोघांच्या तर्कशैलीतील साम्य बघा... कुरुंदकरांनी ‘मी नास्तिक का आहे?’ असे सरळ न सांगता ‘मी आस्तिक का नाही?’ या शीर्षकाचा लेख लिहिला. प्रा. शेषराव मोरे यांनी ‘काँग्रेसने व गांधींनी खंडित भारत का स्वीकारला?’ असे न म्हणता, ‘अखंड भारत का नाकारला?’ असा तिरपागडा प्रश्न विचारला. आता दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूमधील फरक बघा... कुरुंदकर म्हणायचे, ‘मी समाजवादीच आहे, पण माझा समाजवाद राष्ट्रीय समाजवादापेक्षा निराळा आहे.’ प्रा. शेषराव मोरे यांच्या म्हणण्यातून ‘मी हिंदुत्ववादीच आहे, पण माझे हिंदुत्व प्रचलित हिंदुत्वापेक्षा निराळे आहे’, असाच अर्थ ध्वनित होतो आहे. असो. मुद्दा काय तर, कुरुंदकर व शेषराव मोरे दोन टोकांवर उभे आहेत, जरी त्यांची अभ्यासपद्धती व तर्कशैली यात साम्य असले तरी!

अशा या शेषराव मोरे यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे आणि ते संमेलन अंदमानला होणे, असा योग अनपेक्षितपणे जुळून आला. त्यामुळे त्यांना परमोच्च आनंद होणे व काहीसा कैफ चढणे स्वाभाविक होते. पण या संमेलनाची, संमेलनाच्या अध्यक्षांची पुरोगामी वर्तुळातून दखल घेतली न जाणे, हा प्रकार प्रा. मोरे व त्यांच्या चाहत्यांसाठी जरा क्लेशदायक ठरला असावा. त्यातच भर म्हणजे, हे संमेलन साहित्य संमेलन नाही, तर शिवसेना व भाजप यांचे मेळावे असल्याप्रमाणे अनेकांना भासले... आणि स्वतः प्रा. मोरे यांनी त्याला समारोपाच्या दिवशी ‘सावरकर मराठी राष्ट्रीय संमेलन’ असे संबोधल्याचे प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे कैफ आणि क्लेश अशा संमिश्र भावनांचा निचरा करण्याच्या प्रक्रियेतून संमेलनाच्या अध्यक्षाची भाषणे झाली असावीत, असा एक अंदाज आहे.

प्रा. शेषराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात जी काही वक्तव्ये केली; त्याला काही जण तोफ डागणे म्हणतील, काहींना त्यात खंत दिसेल, तर काही जणांना त्यात वैफल्याची भावना असल्याचे जाणवेल. प्रत्यक्षात, या तिन्हींचे अजब मिश्रण म्हणजे ती वक्तव्ये आहेत. खरे तर त्यांची ती वक्तव्ये जुनीच आहेत, अनेक वेळा अनेक व्यासपीठांवरून केली गेलेली आहेत; पण आता विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून ती आलीत, म्हणून छोटे वादळ निर्माण झालेले दिसते आहे. त्यातील माध्यमांनी उचलून धरलेले एक वक्तव्य असे आहे की, ‘हिंदूविरोधी असणे/बोलणे म्हणजे पुरोगामी, असे वैचारिक क्षेत्रात समजले जाते.’ दुसरे वक्तव्य, ‘डावे-उजवे अशी विभागणी करणारे पुरोगामी हे वैचारिक दहशतवादी आहेत.’ आणि तिसरे वक्तव्य, ‘सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत.’

वरील तीन वक्तव्यांकडे पुरोगामी कसे पाहतात? एक तर हिंदू पुरोगाम्यांनी हिंदू धर्मातील मूलतत्त्ववादाच्या विरोधात, मुस्लिम धर्मातील पुरोगाम्यांनी मुस्लिम मूलतत्त्ववादाच्या विरोधात, ख्रिश्चन धर्मातील पुरोगाम्यांनी ख्रिश्चन मूलतत्त्ववादाच्या विरोधात, आणि त्या-त्या धर्मातील पुरोगाम्यांनी त्या-त्या मूलतत्त्ववादाच्या विरोधात असणे/काम करणे ही ‘पुरोगामी’ असण्यासाठीची/म्हणवून घेण्याची पूर्वअट असते. त्यामुळे प्रा. मोरे यांचा पहिला आक्षेप हाच मुळात आक्षेपार्ह ठरतो. दुसरे वक्तव्य आहे, डावी-उजवी मांडणी करण्याबाबतचे... पुरोगाम्यांच्या गटा-तटांचे इतर कशावर एकमत होत नाही; पण सावरकर हे केंद्र मानून ज्याचा अभ्यास आकाराला येतो, त्याला पुरोगामी वर्तुळातील लोक आपल्यातला मानत नाहीत. आणि प्रा. शेषराव मोरे यांनी तर स्वतःचे छोटे वर्तुळ सावरकरकेंद्री करून पुरोगामी वर्तुळाच्या बाहेरच राहण्याचा निर्णय स्वतःच घेऊन ‘आमच्यासाठी तुमच्या खेळाचे नियम बदला’, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पुरोगाम्यांमधील अनेकांना ही मागणीच वैचारिक दहशतवादासारखी वाटते आहे. आणि तिसरे वक्तव्य, ‘सावरकरांच्या विचारांचा विपर्यास केला गेला आहे’, हे सांगताना प्रा. मोरे असाही दावा करतात की, सावरकरच खरे सेक्युलर होते आणि त्यांचाच विचार राज्यघटनेत आला आहे. पण गंमत अशी आहे की, पुरोगाम्यांमधील अनेकांना मोरे यांचे असे निष्कर्ष हाच मोठा विपर्यास वाटतो. त्यामुळे प्रा. मोरे यांच्या म्हणण्याप्रमाणे, विपर्यास करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल, तर मोठीच समस्या निर्माण होते.

‘अखंड भारत का नाकारला?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रा. शेषराव मोरे म्हणतात, ‘मी वकीलच आहे, पण वकील कधीही विरोधी पक्षाची बाजू मांडत नाही.’ खरेच आहे ते. पण त्या पुस्तकाबाबत कळत-नकळत असा दावा केला जात आहे की, यातून काँग्रेस व नेहरू-गांधी यांची बाजू मांडली/पुढे आणली आहे. त्यामुळे काही पुरोगाम्यांना असेच वाटते की, त्या पुस्तकात (नावापासूनच) सर्वत्र गांधी, नेहरू व काँग्रेसच्या भूमिकांचा विपर्यास केलेला आहे; पण ते पुरोगामी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार स्वप्नातही करूच शकत नाहीत, कारण त्यांना प्रा. मोरे यांना आनंद मिळू द्यायचाच नाहीये... असो.
मोरेसर, पुरोगामी वर्तुळाच्या परिघावरून जे दिसले, त्यातील काही निरीक्षणे केवळ वर आम्ही मांडली आहेत. त्यामुळे तुमच्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असा आरोप कृपया आमच्यावर ठेवू नये.

vinod.shirsath@gmail.com
(लेखक साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.)