आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Talekar About Student Organizetion, Rasik, Divya Marathi

विद्यार्थी संघटनांचा घोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणार्‍या युवा नेत्यांसाठी निवडणुका म्हणजे एक सुवर्णसंधी असते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेल्या या संधीचा जितका वापर अभाविपने केला, तितका तो इतर पक्षांच्या विद्यार्थी संघटनांना करता आला नाही...'

लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाच्या सहा महिने आधीच मोदी हे राजधानी दिल्लीतल्या एका विजयाचे शिल्पकार ठरले होते. ही निवडणूक खरंतर होती दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची. त्यामुळे एखाद्या विद्यापीठाची निवडणूक एका राष्ट्रीय नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवली जाणं, हे आश्चर्यकारक होतं, पण दिल्ली विद्यापीठाच्या या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेचा पुरेपूर वापर करत संघ परिवाराच्या विद्यार्थी शाखेने म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दणदणीत विजय संपादन केला होता. साहजिकच त्या निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषात ‘अब दिल्ली दूर नहीं’ अशी प्रतिक्रियाही मोदींच्या पाठीराख्यांच्या तोंडी ऐकायला मिळत होती. या विजयाने संघ परिवारातल्या युवा वर्गाचा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ झाला होता.
2014 ची लोकसभा जशी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्तित्वाचा संघर्ष ठरली होती, तशीच ती विविध पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या भवितव्यासाठी महत्त्वाची होती. मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणार्‍या युवा नेत्यांसाठी अशा निवडणुका म्हणजे एक सुवर्णसंधी असते. मात्र या संधीचा जितका वापर अभाविपने केला, तितका तो इतर पक्षांशी संलग्न असलेल्या वा विचारधारेशी नाते सांगणार्‍या विद्यार्थी संघटनांना करता आला नाही, हे वास्तव लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
यंदाच्या विजयादशमीला सरसंघचालकांनी आपल्या प्रकट भाषणात शत-प्रतिशत मतदान・हा नारा दिला. पाठोपाठ संघ परिवारातल्या सगळ्या संघटना कामाला लागल्या. सामान्यत: विजयादशमीचे सरसंघचालकांचे भाषण म्हणजे फक्त संघ परिवारातल्या संघटनांसाठीच नव्हे, तर हिंदुत्ववादी विचार मानणार्‍या समाजातल्या विखुरलेल्या ठिपक्यांसाठीही पुढच्या वर्षभरातल्या कामांची दिशा असल्याचे मानले जाते. त्यामुळे सरसंघचालकांचा सांकेतिक आदेश शिरसावंद्य मानून, संघाच्या सगळ्या संघटना कामाला लागल्या. आपापल्या संपर्कक्षेत्राच्या आणि प्रभावक्षेत्राच्या मर्यादांमध्ये शत-प्रतिशत मतदान・या अनुषंगाने काम सुरू झाल्याने साहजिकच अभाविपने विद्यार्थी आणि युवा वर्गावर लक्ष केंद्रित केले. डिसेंबर 2013 ला पाटणा इथे भरलेल्या अभाविपच्या 58 व्या राष्ट्रीय अधिवेशनातही मतपेट्यांतून युवक दिसला पाहिजे, अशा आशयाचा ठराव पारित करण्यात आला. यासाठी मग अभाविपने पॉवर ऑफ वन・ही संकल्पना राबवली. युवकाच्या एका मताचे महत्त्व, त्यांनी प्रभावीपणे विद्यार्थी वर्गात पटवून देण्यावर भर दिला. यामधला तोच तोचपणा टाळण्यासाठी मग याच संकल्पनेचा विस्तार करत आय अ‍ॅम ए वोटर, आर यू वोटर・किंवा इफ यू आर एटीन, गो फॉर वोटिंग・अशा मोहिमा राबवण्यात आल्या. इथपर्यंत अभाविपने ते केले, जे इतर पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनीही कमीअधिक फरकाने केले. पण यापुढच्या अभाविपच्या कार्यपद्धतीत संघाच्या शिस्त आणि सूत्रबद्धतेची छाप दिसली. 挿अभाविपची कॉलेज कट्टा・ही संकल्पना भाजपच्या विजयात खारीचा वाटा उचलून गेली, असे म्हणण्यास वाव आहे.
या संकल्पनेनुसार एखाद्या कॉलेजच्या कट्ट्यावर ‘अभाविप’चा कार्यकर्ता भिडायचा. त्या कट्ट्यावर कोणत्या राजकीय नेत्याचा प्रभाव आहे हे जाणून घेणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट... यातून संघाच्या दृष्टिकोनातून एक धक्कादायक बाब आढळली ती म्हणजे तरुणाईमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा केजरीवालांचे वाढत असलेले आकर्षण... मग योजनेत केंद्रीय स्तरावरून थोडा बदल केला गेला. आधी फक्त मतदान करा, मग ते कोणालाही करा, असा जो सूर ‘अभाविप’चा होता, तो मग विश्वासार्हता, अनुभव आणि विकासाच्या बाजूने मतदान करा, इथपर्यंत बदलला. त्यातच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केजरीवालांनी ‘अभाविप’चे काम अधिकच सोपे केले.
मग मोदीकेंद्रित प्रचाराला अधिक धार आली. युवावर्गासह मग त्याच्या कुटुंबीयांचा पाठिंबा मिळवण्याचाही प्रयत्न सुरू झाला. जोडीला एखाद्या रेल्वेच्या डब्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या आणि निव्वळ टाइमपास अशा स्वरूपाच्या राजकीय चर्चेला मोदींच्या दिशेने वळवणे, यासारखे क्षुल्लक वाटणारे प्रकारही केले गेले. या सगळ्याचं मॉनिटरिंग अर्थातच ‘अभाविप’च्या जिल्हा कार्यालयातून आणि मग त्याच्यावर असलेल्या राज्य मुख्यालयातून सुरू होतं. ‘अभाविप’ने आता इतकं सगळं मोदींसाठी केलं, तर मग मोदी सत्तेत आल्यानंतर एरवी, विद्यार्थी विश्वातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात राहिलेली, ही संघटना यापुढे मोदीधार्जिणी भूमिका घेणार का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर त्याचे उत्तर नाही, असेच आहे. कारण ‘अभाविप’ ही काही भाजपची विद्यार्थी संघटना नाही. ‘अभाविप’ची स्थापना आहे 1949ची. भाजप त्यानंतर साधारण तीन दशकांनी जन्मला.. ‘अभाविप’ ही संघाला पितृस्थानी मानणारी आणि विद्यार्थी हितासाठी लढणारी संघटना असल्याची ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांची ठाम भावना आहे. म्हणूनच वाजपेयींचे सरकार असतानाही या संघटनेने केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणविषयक अनेक निर्णयाविरोधात आंदोलनं केली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्याविरोधात जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, तेव्हाही या संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची जोरकसपणे मागणी केली होती. म्हणूनच आम्ही राजकारणापासून वेगळे आहोत, पण त्यापासून अलिप्त नाही, अशी भूमिका ‘अभाविप’ मांडते.
(vinod.talekar@dainikbhaskargroup.com)