आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Talekar Article About Political Analytical

वलयाकिंत विश्लेषक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुका जाहीर झाल्या की जितकी चर्चा राजकीय पक्षांची होते, जितके वलय राजकीय नेत्यांना येते; तितकीच चर्चा न्यूज चॅनल्सचीही होते आणि तितकेच वलय त्या-त्या चॅनलच्या पत्रकार-निवेदकांनाही प्राप्त होते. गेल्या तीन दशकांपासून जनमानसावर प्रभाव टाकणार्‍या न्यूज चॅनल इंडस्ट्रीतल्या काही वलयांकित चेहर्‍यांवर टाकलेला हा प्रकाशझोत...

1984 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सेफालॉजिस्ट म्हणजेच निवडणूक विश्लेषणाचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केलेल्या एका नवख्या तरुणाने दूरदर्शनच्या पडद्यावर एक आगळावेगळा प्रयोग केला. तो तरुण म्हणजे सध्याच्या एनडीटीव्ही या नावाजलेल्या वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक असलेले डॉ. प्रणव रॉय आणि तो प्रयोग होता लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्या वेळी केलेले विश्लेषण. दूरदर्शन स्टुडिओतल्या हिरव्या पडद्यासमोर एका टेबलाभोवती बसलेले चौघे जण आणि त्यांच्यात तासभर सुरू असलेली निवडणूक निकालांवरची चर्चा. या कार्यक्रमाचे नाव होते, ‘वर्ल्ड धिस वीक : इलेक्शन स्पेशल’. त्या वेळी अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या दूरदर्शनचा फारसा प्रसार झालेला नसल्यामुळे हा प्रयोग तसा दुर्लक्षितच राहिला. पुढे नव्वदीच्या दशकात पांढर्‍याशुभ्र सदर्‍यावर खादीची जाकिटे घालून निवडणुकांचे विश्लेषण करणारे विनोद दुआ आणि सध्याचे आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव तुमच्या-आमच्यापैकी अनेकांनी पाहिले असतील. त्यांच्या ओघवत्या हिंदी बोलण्याच्या शैलीमुळे त्या वेळी हे दोन राजकीय विश्लेषक लोकांच्या पसंतीला उतरले. या काळात निवडणुकांचे विश्लेषण हे निकालाच्या दिवशी आणि अगदी दोन- तीन तासांसाठी असे. शिवाय त्यावर सरकारी नियंत्रण असल्याने विशिष्ट मर्यादेबाहेरच्या मतप्रदर्शनाला फारसा वावही नसे. पुढे जसजसा काळ बदलत गेला तसतसे या विश्लेषणात्मक कार्यक्रमांचे स्वरूपही बदलत गेले. आता तर खासगी वाहिन्यांच्या जंजाळात निवडणुकांच्या वर्ष-दीड वर्ष आधीपासूनच निवडणुकीचे अंदाज आणि राजकीय शक्यतांवर आधारलेल्या कार्यक्रमांचा भडिमार सुरू होतो. आणि निवडणुका संपल्यावरही साधारण महिनाभर हा रतीब सुरूच असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता घराघरात टीव्ही चॅनल्सचा प्रसार झाला आहे आणि म्हणूनच असे कार्यक्रम सादर करणार्‍यांच्या जबाबदार्‍याही वाढल्या आहेत. कोण आहेत हे लोक; जे आज अधिकारवाणीने आपल्या चर्चांच्या माध्यमातून जनमतावर प्रभाव टाकत असतात? काय आहेत त्यांच्यासमोरची आव्हाने आणि काय आहेत त्यांच्या मर्यादा? या मुद्द्यांवर म्हणूनच चर्चेची गरज आहे.

सध्याच्या सगळ्या राजकीय विश्लेषक आणि राजकीय निवेदकांचे आद्यगुरू म्हणता येतील असे डॉ. प्रणव रॉय. आपली पत्नी राधिका रॉय यांच्यासमवेत त्यांनी त्या वेळी एक प्रॉडक्शन हाऊस असलेल्या आणि आता चोवीस तास वृत्तवाहिनीत रूपांतरित झालेल्या एनडीटीव्हीची स्थापना केली. परदेशातून सीएची पदवी मिळवून पुढे दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ. रॉय यांचा टेलिव्हिजन माध्यमातला अधिकार मोठा आहे. राजकारण, अर्थकारण आणि जबरदस्त सामाजिक भान असलेल्या डॉ. रॉय यांचा जागतिक स्तरावरही म्हणूनच दबदबा आहे. एक अर्थतज्ज्ञ, राजकीय विश्लेषक आणि वृत्तनिवेदक एवढ्यापुरतेच त्यांचे वर्णन करता येणार नाही. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे सहप्राध्यापक अशीही त्यांची एक वेगळी ओळख आहे.

डॉ. रॉय यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या एनडीटीव्हीने सध्याच्या पत्रकारितेतले अनेक चेहरे दिले. त्यापैकी एक असलेले राजदीप सरदेसाई. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर राजदीप यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले व त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबईतल्या आवृत्तीसाठी सिटी एडिटरपदाची जबाबदारी सहा वर्षे सांभाळली. 1994च्या सुमारास त्यांनी नव्याने सुरू झालेल्या ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीचे राजकीय संपादक म्हणून टेलिव्हिजन पत्रकारितेत प्रवेश केला. सध्या सीएनएन आयबीएनचे मुख्य संपादक असलेल्या राजदीप सरदेसार्इंचे चौफेर भान ठेवून केलेले राजकीय विश्लेषण ही त्यांची जमेची बाजू. राष्ट्रीय राजकारणाची चांगलीच जाण असलेल्या सरदेसार्इंची समाजकारण आणि अर्थकारणावरही तितकीच चांगली पकड आहे.

अर्णब गोस्वामी. सध्याच्या इंग्रजी पत्रकारितेतला सर्वाधिक चर्चेतला चेहरा. एका सेनाधिकार्‍याच्या या मुलाने तिशीतच एका राष्ट्रीय स्तरावरच्या ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीच्या संपादकपदापर्यंत मजल मारली. 1995च्या सुमारास ‘एनडीटीव्ही’तून पत्रकारितेला सुरुवात केलेल्या अर्णब यांची अथकपणे एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे सलग विश्लेषण करणे ही खासियत. 2008मध्ये मनमोहन सिंग सरकारवरील अविश्वास प्रस्तावाचे सलग 25 तास विश्लेषण असो किंवा 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचे सलग 76 तास केलेले वार्तांकन असो; अर्णब गोस्वामींची जबरदस्त ऊर्जा वेळोवेळी दिसून आली. सध्याच्या काळात महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरच्या त्यांच्या चर्चा या सर्वाधिक पाहिल्या जातात. मात्र अनेकदा या चर्चांमधली भूमिकाही अतिरंजित असल्याचा आक्षेप घेतला जातो.
राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या पहिल्या फळीतल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांमधले आणखी एक नाव म्हणजे अभिग्यान प्रकाश. राजकीय विश्लेषक आणि एक चांगला मुलाखतकार असा लौकिक असलेला अभिग्यान हा हिंदी माध्यमातला सर्वाधिक लोकप्रिय चेहरा. आपल्या धीरगंभीर आवाजात आणि अनेक वर्षे या माध्यमात वावरल्याने आलेल्या सराईतपणाच्या जोरावर अभिग्यान प्रकाश यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले. वृत्तनिवेदकासाठी आवश्यक असलेला विश्वासू चेहरा लाभलेल्या अभिग्यानने अतिरंजितपणा टाळत केलेले संयमी विश्लेषण हे त्याचे बलस्थान आहे. खेळ, व्यापार, चित्रपट, साहित्य यांसारख्या इतर क्षेत्रातल्या व्यक्तींशी सहज संवाद साधणे, ही याची खासियत. आपल्या वृत्तवाहिनीसाठी मुंबईची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या टीमने तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश केला, ज्यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला थेट राष्ट्रपतींकडून कौतुकाची थाप मिळाली.

‘अ जर्नलिस्ट विथ देसी टच’, असे ज्याचे पत्रकारितेतल्या वर्तुळात वर्णन केले जाते, तो रवीश कुमार सध्याचा हिंदीतला सर्वात लोकप्रिय निवेदक समजला जातो. त्याच्या अतिशय सहज आणि आगळ्यावेगळ्या बोलण्याच्या ढंगामुळे तो चटकन लक्ष वेधून घेतो. त्याचे लेखनही त्याच्या वृत्तनिवेदनाइतकेच प्रभावी आहे. रस्त्यावरच्या अतिसामान्य माणसाच्या सामान्य गोष्टी असामान्य पद्धतीने सांगणे यात याची मास्टरी आहे. अतिशय संवेदनशील असा पत्रकार आणि तितकाच बेरकी निवेदक, असे आगळेवेगळे मिश्रण म्हणजे रवीश कुमार. सध्याच्या काळातला
एक हरफन मौला पत्रकार...

विनोद दुआ. हिंदी माध्यमातला 1974 पासूनचा एक नावाजलेला आणि सुपरिचित असा हा चेहरा. दूरदर्शनच्या जन्मापासून ज्या काही मोजक्या व्यक्ती आजही या माध्यमात टिकून आहेत, त्यापैकी एक म्हणता येईल असा. ब्लॅक अँड व्हाइट ते रंगीत आणि रंगीत ते अतिरंजित हा टेलिव्हिजनचा प्रवास ज्याने पाहिला, असा सध्याच्या काळातील कदाचित एकमेव पत्रकार. हजारो तास ज्याने छोट्या पडद्यावर व्यतीत केले असा तो. आपल्या वेगळ्याच संवादफेकीच्या शैलीने आजही टिकून राहिलेला पद्मश्री पुरस्कारप्राप्त पत्रकार. 1984ला प्रणव रॉय यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या त्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विनोद दुआ यांना एक दर्जा लाभला. पुढे ‘जनवाणी’सारख्या कार्यक्रमातून मंत्र्यांशी सर्वसामान्यांचा संवाद साधणे असेल किंवा नव्वदीच्या दशकात लोकप्रिय झालेला ‘परख’ सारखा कार्यक्रम असेल; विनोद दुआंनी मिळेल त्या संधीचे सोने केले. सध्या आयबीएन सेव्हन या नेटवर्क 18च्या कंपनीत कार्यरत असलेले दुआ या निवडणुकीतही आपली जादू दाखवून देतील, यात शंकाच नाही.
निखिल वागळे. मराठी पत्रकारितेतील एक अग्रगण्य नाव. 1977मध्ये ‘दिनांक’ या दैनिकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ‘आयबीएन लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकापर्यंत पोहोचला आहे. नव्वदीच्या दशकातल्या ‘आपलं महानगर’ या निर्भीड दैनिकाचे संपादक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या चळवळ्या संपादकाने चंदेरी आणि षटकार ही दोन नियतकालिकेही नावारूपाला आणली होती. 1989 पासून त्यांनी टीव्ही पत्रकारितेत प्रवेश केला. महाराष्ट्रातले सर्वाधिक वादग्रस्त पण तरीही जनमतावर प्रभाव टाकणारे पत्रकार, असेही त्यांचे वर्णन करता येईल.

मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकपदी सध्या असलेल्या पत्रकारांमध्ये वेगळी पार्श्वभूमी असलेले पत्रकार असा डॉ. उदय निरगुडकरांचा उल्लेख करावा लागेल. पुणे विद्यापीठातून मार्केटिंग या विषयात डॉक्टरेट... विविध क्षेत्रांत मुशाफिरी करून सध्या ‘झी चोवीस तास’ या मराठी वृत्तवाहिनीच्या संपादकपदी असलेल्या डॉ. निरगुडकरांना निवडणूक विश्लेषणात चांगलीच गती आहे. बदलत्या राजकारणाचे विविध पैलू उलगडून दाखवणे, ही त्यांची खासियत आहे.
मराठी वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर आणखी एक तरुण चेहरा लोकांचे लक्ष वेधून घेतो आहे. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीत कार्यरत असलेल्या प्रसन्न जोशी यांनी फार कमी कालावधीत प्रगल्भ वृत्तनिवेदकाकडे वाटचाल केली आहे. राजकीय विषयांवरच्या चर्चांमध्ये आपले वेगळेपण त्यांनी दाखवून दिले आहे.

एकूणच हे सगळे चेहरे आपल्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीचा पट उलगडून दाखवतील. आपापल्या विश्लेषणाच्या आधारे विविध राजकीय घटनांचे कंगोरे उलगडून दाखवतील, यात शंका नाही. सध्याच्या काळात माध्यमांवरचा राजकीय प्रभाव लपून राहिला नाही. म्हणूनच कोणत्याही राजकीय प्रभावाला बळी न पडता केलेले राजकीय विश्लेषण हे या सर्वांसमोरचे आव्हान असेल.
(vinod.talekar@dainikbhaskargoup.com)