आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिकिनी किलर\' चार्ल्स शोभराज, 32 खून केल्याचा देशोदेशीच्या पोलिसांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विस्मृतीत गेलेला ‘बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज गेल्या आठवड्यात अचानक बातम्यांमध्ये चमकला. पाठोपाठ त्याच्याशी निगडित कथा-दंतकथांना नव्याने उजाळा दिला गेला. त्याचे तुरुंगातून सफाईने पळून जाण्याचे किस्से चघळले गेले, त्याला अत्यंत चतुराईने जेरबंद करणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंची कर्तबगारी नव्याने सांगितली गेली. अर्थात, सत्तर-ऐंशीच्या दशकात पोलिसांना गुंगारा देत पसार होण्याचं कसब राखून असलेला शोभराज आता वृद्धत्वाकडे झुकलाय. काठमांडूमधल्या सुंधारा सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारावर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चार्ल्स शोभराज हे जितकं चतुर गुन्हेगारीचं प्रतीक, तितकंच देशोदेशीच्या भ्रष्ट व्यवस्थांचंही प्रतीक आहे. पण याहीपेक्षा ते भल्याभल्यांना न उलगडलेलं मानसशास्त्रीय कोडंसुद्धा आहे. याच कोड्यात टाकणाऱ्या शोभराजनामक वृत्ती-प्रवृत्तीचा हा वेध...
 
घटना पहिली
विदेशी पर्यटकांना लुटण्याबरोबरच महागड्या चोरीच्या गाड्यांची दलाली करण्याचा त्याचा धंदा एकदम जोरात आहे. अमेरिका, भारत, फ्रान्स इथले गर्भश्रीमंत त्याची हक्काची गिऱ्हाइके आहेत. पाकिस्तान आणि इराणमधे चोरलेल्या गाड्या सीमारेषेमार्गे भारतात आणणे त्याच्यासाठी मामुली गोष्ट आहे. पण मोहात पडून अफगाणिस्तानातले लांबलेले वास्तव त्याच्या अंगलट आलेले आहे. त्याची रवानगी काबुल जेलमध्ये करण्यात आली आहे. तिथून बाहेर पडण्यासाठी त्याचे कारस्थानी डोेके विलक्षण वेगाने चालतेय. अशा प्रसंगी पळून जाण्यासाठी त्याने काय करावे? जेलमध्येच लाच देऊन त्याने एक सिरिंज मिळवली. स्वत:चे रक्त काढले आणि ते पिऊन टाकले. ठरल्याप्रमाणे डॉक्टरांनी त्याला अल्सर झाल्याचे निदान केले. नियमानुसार त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि एक दिवस ही संधी साधत हॉस्पिटलमधले डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सीमेवरचे सुरक्षा रक्षक अशा सगळ्यांना गुंगारा देत खरं तर वश करत तो इराणमध्ये पसार झाला...
 
घटना दुसरी
बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पसार होणे सोपे जावे, म्हणून त्याने गुन्ह्यातला साथीदार डेव्हिड हॉलसोबत गोवा गाठले. स्वत:ची ओळख मेक्सिकोहून आलेला पत्रकार "जॉन' आणि साथीदार हॉलची अमेरिकेचा फोटो जर्नालिस्ट "मॅक' अशी करून दिली. बार्देश तालुक्यातल्या ओ कॉकिरो नावाच्या रेस्टॉरंटमध्ये दोघांनीही अड्डा जमवायला सुरुवात केली. हेच हॉटेल का? तर अख्ख्या गोव्यात यासारखे दुसरे ठिकाण नव्हते, जिथून जगाच्या पाठीवर कुठेही एका झटक्यात फोन लागत नव्हता. किंबहुना गोव्यात पर्यटनासाठी येणारे विदेशी पर्यटक याच हॉटेलमधल्या अत्याधुनिक टेलिफोन एक्सचेंजचा वापर करून भले-बुरे व्यवहार करत होते.  ती ६ एप्रिलची रात्र होती. पावणे दहाच्या सुमारास तो रेस्टॉरंटमध्ये आला. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर काहीसा वैताग. सोबत एक छोटी बॅग. त्यामध्ये पिस्तुल. तो आणि त्याचा साथीदार व्हरांड्यात बसले. त्याने हेवर्ड‌्स बिअरची ऑर्डर दिली. वेटर थंड बाटली आणि सोबत दोन रिकामे ग्लास घेऊन आला. त्याने बाटलीला हात लावून खात्री करून घेतली. वेटरने झपकन बाटलीचे बूच उघडले. त्याने  बाटली तशीच टेबलवर ठेवून जाण्याची खूण केली. वेटर निघून गेला. त्याने बाटली उचलली. ती ग्लासात अर्धी रिकामी करतो न करतो तोच मागून एक पंजा त्याच्या खांद्यावर पडला. खर्जातला आवाज त्याच्या कानी पडला, "गेट अप यू ब्लडी...' तो पंजा इन्स्पेक्टर मधुकर झेंडेंचा होता. पाठोपाठ झेंडेंच्या पोलिस साथीदारांनी त्याच्याभोवती कोंडाळे करून त्याला पुरते जखडून टाकले...
 
पण, गोव्यात जेरबंद झालेला तो आणि आधीचा तो यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. म्हणजे, एकीकडे तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, तरी त्याला एक टाइपरायटर देण्यात आला आहे, त्याच्या बॅरेकमध्ये टीव्ही, फ्रीज आणि छोटेखानी लायब्ररीदेखील आहे. कधीतरी सोबतच्या कैद्याला अमली पदार्थ हवा असेल, तर तो तुरुंगातच उपलब्ध करून देण्याची त्याच्यात धमक आहे. तुरुंगातच जंगी मेजवान्या देण्याइतकी त्याची वट आहे. विशेष म्हणजे, तुरुंगात असताना चक्क वीस वर्षांच्या एका तरुणीने त्याच्यासारख्या वयाच्या साठीत असलेल्याशी लग्न करावे, असे भुरळ घालणारे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. तुरुंगात असतानाच त्याच्या आयुष्यावर बनणाऱ्या हॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्याशी रीतसर करार करत जवळपास शंभर कोटी रुपयांचा (अलीकडे १०० कोटींचा व्यवसाय केला म्हणून बॉलीवूडमध्ये स्वत:चे ढोल स्वत:च बडवून घेण्याची फॅशन रुजली आहे. मात्र, शोभराजने खूप वर्षांपूर्वीच एवढी रक्कम वसूल केली आहे.) दाम मागून घेण्याइतके वलय तो राखून आहे. तुरुंगातून सुटल्यानंतरही त्याच्या मुलाखतीसाठी एखादी माध्यम कंपनी त्याला चक्क पाच हजार डॉलर्स द्यायला एका पायावर राजी आहे...अबु सालेम, मुस्तफा डोसा, अरुण गवळी यांच्यासारख्या आजकालच्या डॉनच्या तुरुंगातील ऐशअारामाच्या कथा फिक्या पडाव्यात, अशा एकापेक्षा एक चमत्कारिक, सुरस कथांचा तो नायक आहे (खरे तर खलनायकच म्हणा...). एखाद्याच्या आयुष्यात किती पराकोटीचे नाट्य असू शकते, याचेही तो जिवंत नि दुर्मीळ असे उदाहरण आहे...
 
चार्ल्स गुरुमुख शोभराज. व्हिएतनामी माता आणि भारतीय पिता. पण त्याने नागरिकत्व घेतले होते, फ्रान्सचे. भारतासह अफगाणिस्तान, फ्रान्स, ग्रीस आणि इराण येथील तुरुंगातून हातोहात पसार होण्याची अफलातून कला जाणून असलेला हा एक महाचतुर गुन्हेगार. कुणी त्याला "बिकनी किलर' म्हणे, तर कुणी "सर्पेंट'. पण तो मात्र स्वत:ला एक व्यावसायिक म्हणवून घेणेच पसंत करत असे. खून, चोरी आदी गुन्ह्यांत एकूण २० वर्षे त्याने तिहार कारागृहात जन्मठेप भोगली. गेली काही वर्षे तो नेपाळच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हत्या, लूटमार, शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांचा व्यापार, तुरुंगातून पलायन आणि दागदागिन्यांची चोरी या सर्व गोष्टी त्याच्या डाव्या हाताचा मळच जणू. त्याचा वेष, त्याची भाषा, त्याचा वावर हा सगळा मामला एखाद्या उच्चभ्रूला साजेसा. त्यामुळे चार्ल्स शोभराज हा कायमस्वरूपी एक गूढ बनून राहिला. त्याच्याशी जोडलेल्या दंतकथांनी हे गूढ अधिकच गहिरे केले.
 
चार्ल्सने तब्बल ३२ खून केल्याचा देशोदेशीच्या तपासयंत्रणांचा दावा आहे. त्याचे बहुतांश बळी या महिला होत्या. महिलांना आकर्षित करू शकेल, असे त्याचे देखणे व्यक्तिमत्त्व होते. मुंबईतील वास्तव्यादरम्यान एकाच वेळी चार पारशी मुलींशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. इतकेच नव्हे, तर त्याचा खटला लढवणारी एक महिला वकीलही त्याच्या प्रेमात पडली होती. त्याच्यावरील पराकोटीच्या प्रेमामुळे त्याच्या पहिल्या पत्नीसह अनेकींनी तर त्याला प्रसंगी गुन्हेगारी कृत्यातही मदत केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असूनही एकाच वेळी इतक्या महिला त्याच्याकडे कशा आकर्षित होत, हे आणखी एक न सुटलेले मानसशास्त्रीय कोडे.
 
सत्तरच्या दशकात थायलंडमधील प्रमुख शहरांना भेटी देणाऱ्या तरुण परदेशी पर्यटक महिलांच्या एका पाठोपाठ एक होणाऱ्या हत्यांमुळे थाई पोलिसांची झोप उडाली होती. तशाच काही हत्या नेपाळमध्येही झाल्याने साहजिकच इंटरपोलचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. हत्या झालेल्या सर्व जणी साधारण विशीतील होत्या. यातले बरेचसे मृतदेह बिकनी परिधान केलेल्या महिलांचे होते. एकाच पद्धतीने होत असलेल्या या हत्यांमागे एखादा वासनांध आणि माथेफिरू सिरीयल किलर असल्याचा निष्कर्ष इंटरपोलच्या तपास पथकाने काढला होता. या हत्यांच्या तपासादरम्यान एकदा नेपाळ पोलिसांनी, तर एकदा बँकॉक पोलिसांनी चार्ल्स शोभराज आणि त्याच्या कॅनेडियन मैत्रिणीची संशयित म्हणून चौकशीही केली होती. पण पुराव्याअभावी त्यांना सोडून देण्यात आले. अखेर कसून तपास केल्यानंतर या हत्यांचा सूत्रधार दुसरा-तिसरा कुणी नसून चार्ल्स शोभराजच असल्याचे सिद्ध झाले होते. अर्थात, तोपर्यंत चार्ल्स भारतात पळून गेला होता.
 
देश बदलला म्हणून शोभराज बदलला नव्हता वा भीतीने सावधही झाला नव्हता.  दिल्लीतील एका हॉटेलमध्ये तरुण परदेशी पर्यटक जोडप्याची हत्या झाली. पाठोपाठ दुसऱ्या एका हॉटेलातील तब्बल पन्नास परदेशी पर्यटकांना अन्नातून विषबाधा झाली. या प्रकरणांच्या पाठीशी शोभराजच होता. अखेर १९७१मध्ये मुंबईतील अशोका हॉटेलमधील दरोड्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिस दलातील धडाडीचे अधिकारी मधुकर झेंडे यांनी त्याला पहिल्यांदा  अटक केली. त्या वेळी त्याच्याकडे रायफल, रिव्हॉल्वर आणि इतरही अनेक हत्यारे सापडली. ही हत्यारे त्याने अफगाणिस्तानातून चोरट्या मार्गाने भारतात विक्री करण्यासाठी आणली होती. दरोड्याच्या प्राथमिक चौकशीनंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. परंतु अवघ्या महिन्याभरातच चार्ल्स रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
 
बांगलादेश युद्धामुळे त्या वेळी दिल्लीत रात्रीच्या सुमारास "ब्लॅकआऊट' केला जात असे, त्याचाच फायदा चार्ल्सने उचलला. पुढे १९७६मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. या वेळी दिल्लीतील परदेशी पर्यटकांच्या हत्या प्रकरणात त्याला बारा वर्षे जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेची शेवटची दोन वर्षे शिल्लक असताना पहारेकऱ्यांवर विषप्रयोग करून चार्ल्स पुन्हा एकदा निसटला. तो किमान पाच वेळा विविध देशांतील तुरुंगातून पळाला. अनेक देशांच्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेल्या चार्ल्सला एकदा नव्हे तर दोनदा साहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर झेंडेंनी जेरबंद केले. त्यातली गोव्याच्या ओ कॉकिरो नावाच्या रेस्टॉरंटमध्ये   झेंडेंनी शोभराजला ताब्यात घेणे एका अर्थाने अॅण्टी क्लायमॅक्स ठरावे इतके निरस होते. दोघांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्ष नाही. पाठलाग नाही, की माइंडगेम नाही. एक मात्र खरे की, शोभराज हाती लागेपर्यंत झेंडेंना प्रचंड संयम राखावा लागला. सहकारी पोलिसांचे मनोधैर्य टिकवून ठेवावे लागले. तरीही चार्ल्स शोभराजमध्ये असलेला पराकोटीचा दुरभिमान त्याला गुन्हेगारी विश्वात अजरामर करून गेला. दुसऱ्यांदा अटक झाल्यानंतर त्याच्यावर चाललेल्या खटल्यादरम्यान त्याने एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे न्यायालयात स्वत:च स्वत:ची बाजू मांडली. त्याला अटक करणाऱ्या मधुकर झेंडेंचीच उलटतपासणी घेतली, कायद्याचा अक्षरश: कीस पाडला. कारण, कायद्याचा त्याचा चांगलाच अभ्यास होता. तरीही झेंडेंच्या मते चार्ल्स हा फारसा बुद्धिमान गुन्हेगार नव्हता. एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे तो जर वारंवार पकडला जात असेल तर त्याला बुद्धिमान कसे म्हणता येईल, हे त्यामागचे त्यांचे स्पष्टीकरण असे.
 
प्रत्यक्षात मात्र, रातोरात एका देशातून दुसऱ्या देशात तो पसार होत असताना त्याच्या क्रूर आणि कारस्थानी मेंदूचा प्रत्यय जगाला येत असे. त्या बळावर देशोदेशीच्या भ्रष्ट व्यवस्थांना त्याने बोटांवर नाचवल्याचेही उघड होत असे. हत्या केलेल्या लोकांचे पासपोर्ट किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित बाबी तो चोरत असे, पुढे त्याचा वापर तो आपल्या परदेश प्रवासादरम्यान आपली ओळख लपवण्यासाठी, किंवा तस्करीसारख्या आपल्या इतर अनेक बेकायदेशीर धंद्यात अगदी बेमालूमपणे करत असे. झेंडे यांच्या शब्दांत सांगायचे तर, "त्याच्यात एक अशी ऊर्मी आणि गुर्मी होती, जी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीला मला वाटले की, त्याला पैशाची हाव असावी. पण लुटमारीतून त्याने इतका पैसा कमावला होता, तरीही त्याची गुन्हे करण्याची प्रेरणा कमी होत नव्हती. खरे तर त्याच्या रक्तातच गुन्हेगारी होती.'
 
भारतातून १९९७मध्ये शिक्षा भोगून बाहेर पडताच तो फ्रान्सला परत गेला होता. तिथल्या काही काळच्या वास्तव्यादरम्यान त्याने आपल्या नाट्यपूर्ण आयुष्यावर एक पुस्तक लिहून घेतले. आणि एका चित्रपट निर्मात्याला त्याचे हक्क विकून चिक्कार पैसाही कमावला. मग पुन्हा तो भारतीय उपखंडात परतला. या वेळी थेट भारतात न येता तो नेपाळला गेला. परंतु तिथे त्याला २८ वर्षांपूर्वीच्या दुहेरी हत्येच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले. या तुुरुंगातील वास्तव्यादरम्यान त्याने निहिता बिश्वास (मध्यंतरी ही निहिता बिश्वास सलमान खानच्या बीग बॉसमध्ये झळकून गेली. या अवघ्या वीस वर्षांच्या मुलीशी लग्नही केले. ते खूप गाजले. आजही तो नेपाळच्या तुरुंगात आहे. अर्थातच गुन्हेगारी विश्वात वावरताना चार्ल्स शाेभराजने अनेक नावे धारण केली. वेळ आणि सोय पाहून ती बदलली. आठ ते दहा बनावट पासपोर्टच्या आधारावर त्याने नेपाळ, थायलंड, फ्रान्स, पाकिस्तान, इटली, इराण, अफगाणिस्तान, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, स्वीडन अशा कितीतरी देशांत वास्तव्य केले. आयुष्यात त्याने परदेशी कार, मौल्यवान खडे, अमली पदार्थ, शस्त्रास्त्र अशा अनेक वस्तूंचा चोरटा व्यापार केला. हत्या केल्या,  दरोडे घातले. त्याच्या विलक्षण वेगवान आयुष्याला भावनेचा कुठलाच गतिरोधक रोखू शकला नाही. मग अशा निर्दयी आणि हृदयशून्य व्यक्तीच्या हृदयावरील शस्त्रक्रिया करणाऱ्या नेपाळच्या डॉक्टर रमेश कोईरालांना त्याच्या शरीरात हृदय असल्याबद्दल आश्चर्य वाटल्यास नवल ते काय?
 
लेखकाचा संपर्क - ९९३०३६०५४९    
बातम्या आणखी आहेत...