आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वासनेचा डोह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रसिक स्पेशल: इतर कुठल्याही वासनेपेक्षा शरीराची वासना माणसामध्ये तीव्र असते. निराश-हताश, अडल्या-नडल्यांच्या ठायी तर ती अधिकच तीव्र असते. सिग्मंड फ्रॉइडसारखा क्रांतिकारी मानसशास्त्रज्ञ माणसाच्या मानसिक-भावनिक समस्यांचं मूळ शरीर वासनेच्या अपूर्णतेत असल्याचं निदान करतो. असे नात्यापासून-समाजापासून तुटलेले-एकेकटे अभावग्रस्त संधीसाधूंचे सहज सावज ठरतात. त्यातूनच शिफू सन-कृती नावाचे पंथ आकारास येत असतात. लैंगिक समुपदेशनाच्या नावाखाली मुंबईतल्या उच्चपदस्थांच्या मुला-मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या या विकृतीचा माग घेणारा हा लेख...

एकोणीसशे साठच्या दशकात जे जे पारंपरिक, लादलेलं ते सर्व धुडकावून लावणारी काऊण्टर कल्चर मुव्हमेंट अमेरिका आणि युरोपात जोर धरू लागली होती. हिप्पी कल्चर हे त्याचं दृश्य रूप होतं. हिप्पींनी प्रस्थापित संस्थांना नाकारलं होतं. मध्यमवर्गीय संस्कारांचा त्यांना तिटकारा होता. अण्वस्त्र स्पर्धेला आणि अमेरिकेने लादलेल्या व्हिएतनाम युद्धाला त्यांचा तीव्र विरोध होता. पौर्वात्य तत्त्वज्ञानाकडे त्यांचा मुख्य ओढा होता. मुक्त जीवनशैली आणि त्या अनुषंगाने आलेला इफ इट्स फिल्स गुड डू इट... हा त्यांचा नारा होता. म्हणूनच त्यांच्या अंगावर रीतीरिवाज नाकारणारे  तडक-भडक कपडे आले, दाढी-मिशा वाढल्या, बाई असो वा पुरुष डोईवरचे केस वाढले. तोंडात सिगरेट आणि हातात गिटार आली. जिमी हेन्ड्रिक्ससारखा रॉकस्टार आणि जेफर्सन एअरप्लेनसारख्या रॉक बँडच्या तालावर डोलणं आलं. गूढवादाची अनुभूती देणारं पं. रविशंकरांचं सतारवादन ऐकणं आलं. बिटल्स आणि बॉब डिलनच्या गाण्यांत हरवून जाणं आलं. मनाला मुक्ती मिळावी म्हणून अमली पदार्थांचं सेवन करून ‘ट्रान्स’मध्ये जाणं आलं.

याच सुमारास अमेरिकेत लैंगिकतेशी जोडल्या गेलेल्या पारंपरिक धारणांना आव्हान मिळू लागलं होतं. ‘एव्हरीथिंग यू ऑलवेज वॉण्टेड टु नो अबाऊट सेक्स’ या डॉ. डेव्हिड रुबेल लिखित पुस्तकाने जणू सगळ्यांच्या तोंडावरच्या पट्ट्याच काढल्या होत्या. पाठोपाठ आलेल्या अॅलेक्स कम्पर्टच्या ‘दी जॉय ऑफ सेक्स’ नावाच्या पुस्तकाने तर सगळीच बंधनं गळून पडली होती. अशा वातावरणात आधीच बंड पुकारलेल्या हिप्पींकडे संशयाने बघितलं जाऊ लागलं होतं. ही मंडळी मुक्त लैंगिकतेची पुरस्कर्ती आहे, इतर तरुण-तरुणींना नादी लावणारी आहे, असे आरोप होऊ लागले होते. हे खरं होतं की, हिप्पींवर बिट जनरेशनच्या प्रेम आणि लैंगिकतेसंबंधीच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अपराधी भाव मनात न आणता वा एखाद्याबद्दल मत्सर न बाळगता लैंगिकतेच्या अनुभवाकडे त्यांचा कल झुकू लागला होता. यातून पुढे सामूहिक-सार्वजनिक लैंगिक कृतींना जोर येऊ लागला होता. समलैंगिकतेचा जाहीर पुरस्कार केला जाऊ लागला होता. बंधनमुक्त संबंध हे हिप्पी जीवनशैलीचं वैशिष्ट्य होऊ पाहात होतं. याचा अर्थ, तुमचं कुणाशी नातं असलं आणि तुम्ही दुसऱ्याकडे आकर्षित झालात, तर अपराधी न वाटून घेता नव्या संबंधांत अडकण्यास मोकळे असता, हे ठसवलं जाऊ लागलं होतं. प्रेम मग ते शरीरावरचं असो वा मनावरचं; हे एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं, तुम्ही अगदी कुणावरही प्रेम करू शकता. 

खरं तर प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी तुम्ही केवळ तुमच्या लैंगिक जोडीदाराशीच नव्हे तर अधिकाधिक लोकांशी वाटून घेतली पाहिजे. जितकं प्रेम तुम्ही वाटून घ्याल, तितकं ते तुम्हाला परत मिळेल, अशा प्रकारचा विचार हिप्पींमध्ये मूळ धरू लागला होता. यात हिप्पींमधला एक वर्ग केवळ लैंगिकतेचा शरीराच्या पातळीवर विचार करत होता, एक वर्ग त्यातली अाध्यात्मिक बाजू शोधू पाहात होता. त्या काळी अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्निया भागात असे अनेक पंथ उदयास आले होते. सत्तर-ऐंशीच्या दशकात ही लाट भारतात येऊन धडकली होती. ओशो रजनिशांचा आश्रम अशा हिप्पींनी खच्चून भरून जात होता. याचेच बरे-वाईट प्रयोग पुढे भारतात मुख्यत: गोव्यासारख्या पर्यटन स्थळी होत राहिले. परंतु कालांतराने त्यातले तत्त्वज्ञान लोप पावले आणि संधीसाधूंनी सावज घेरत भावनांचं उद्दिपन करणाऱ्या प्रतिमा आणि प्रतीकं वापरून केवळ लैंगिकतेभोवती पंथ निर्माण केले. स्वामी नित्यानंद, कृपालू महाराजसारख्या स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या काहींनी अध्यात्माच्या नावाखाली स्त्री-पुरुषांचे लैंगिक शोषणही केले. सुनील कुलकर्णीची शिफू सन-कृती ही एका अर्थाने त्याच रांगेतली भ्रष्ट प्रतिकृती आहे. 

“अंधेरीच्या महाकाली रोडवरच्या मॉडर्न कॉम्प्लेक्समध्ये मी पोहोचले... आता मला त्या इमारतीचं नेमकं नाव नाही आठवत, पण मी त्या फ्लॅटची डोअरबेल वाजवली, तेव्हा एका मुलीने दरवाजा उघडला... तिने मला काही विचारायच्या आतच, ‘यहाँ कोई देसाई रहता है क्या?’ असे विचारत, मीच थेट त्या फ्लॅटमध्ये शिरले. आतमध्ये गेल्यावर एकदम सिगारेटच्या धुराचा भपकारा जाणवला. माझ्या प्रश्नाने ती मुलगी काही क्षण भांबावली. पण माझा आवाज ऐकून आतल्या खोलीतून आणखी चार पोरी आणि दोन पोरं बाहेर आली. ते सर्व जण जवळपास अर्धनग्न अवस्थेत होते. ‘यहाँ कोई देसाई नही रहता’ असे सांगत, त्या सर्वांनीच जबरदस्तीने मला बाहेर ढकलून दिले आणि दरवाजा लावून घेतला. इमारतीतून बाहेर पडताना सुरक्षा रक्षकाला विचारले, की ‘कुलकर्णी के फ्लॅटपर कौन कौन रहता है?’ तर तो म्हणाला, ‘उनके साथ बहोत लडके-लडकियाँ रहती है. उनमेसे ज्यादा तर सुबह आते है और शामको चले जाते है. कुछ यही पर रहते है.’ सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनंतर मात्र मी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला...”

मृणाल गोरे महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या चंद्रा श्रीनिवासन ही माहिती देत होत्या. दोन मुलींच्या पालकांनी ‘शिफू सन-कृती’ पंथाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यांनी २७ जानेवारी २०१७ रोजी पहिल्यांदा चंद्रा श्रीनिवासन यांच्याशीच संपर्क करून आपल्या मुलींची सुटका करण्याची विनंती त्यांना केली होती. मात्र पालकांच्या म्हणण्यावर विश्वास न ठेवता व्यक्तिश: खात्री करून घेण्यासाठी चंद्रा श्रीनिवासन या सुनील कुलकर्णीच्या फ्लॅटवर जाऊन आल्या होत्या. सध्या या सर्व प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी त्यांनी महिला संघटनांच्या मदतीने आंदोलन उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

मुंबईत ‘शिफू सन-कृती’ नावाचा हा पंथ सध्या चर्चेत आहे. लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली या पंथात अमली पदार्थ आणि सेक्सचे रॅकेट चालत असल्याचा आरोप मुंबईतील एका सनदी लेखापालाने केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या सनदी लेखापालाच्या दोन्ही मुली या पंथाच्या पाईक झाल्या आहेत. सुरुवातीला पोलिसांच्या मदतीने मुलींना सोडवण्याचा लेखापालाने प्रयत्न केला. मात्र दोन्ही मुली सज्ञान असल्याने पोलिस हस्तक्षेप करू शकत नाहीत, असे उत्तर त्यांना मिळाले. अखेर उच्च न्यायालयात दाद मागत, या सनदी लेखापाल आणि त्यांच्या पत्नीने ‘शिफू सन-कृती’चा म्होरक्या सुनील कुलकर्णीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळवले.

मुंबईतल्या मालाड उपनगरात राहात असलेल्या सनदी लेखापालाच्या  कॉलेजवयीन मुली एके दिवशी घरातून गायब झाल्या. मुलींचा शोध घेतला असता, त्या सुनील कुलकर्णी नावाच्या डॉक्टरकडे राहात असल्याची बाब त्यांना समजली. या कुलकर्णीची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्या विरोधात दिल्लीत एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तसेच महाविद्यालयीन प्रवेशात घोटाळा केल्याबाबतच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची बाब त्यांना समजली. याच कुलकर्णीने आपण डॉक्टर असल्याचा दावा करत लैंगिक समुपदेशनाच्या नावाखाली गेल्या वर्षभरापासून ‘शिफू सन-कृती’ नावाचा एक उपक्रम फेसबुकवर सुरू केला. सध्या हा कुलकर्णी पोलिस कोठडीत अाहे. त्याच्या घराच्या झडतीतून अश्लील साहित्य, कुलकर्णीसोबत राहणाऱ्या तरुण मुलामुलींची अर्धनग्न किंवा नग्नावस्थेतील छायाचित्रे, ब्लू फिल्म असलेले पेन ड्राइव्ह, कुलकर्णीच्या लेटरहेडवर त्याने सोबत राहणाऱ्या एका मुलीसाठी दिलेली गर्भनिरोधक गोळ्यांची प्रिस्क्रिप्शन्स, कंडोम अशा विविध वस्तू सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच नागपूर विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवल्याचा कुलकर्णीने केलेला दावा खोटा असल्याची बाबही पोलिस तपासातून उघड झाली आहे.  

‘शिफू सन-कृती’च्या फेसबुक पेजवर मज्जासंस्थेच्या माध्यमातून मेंदू आणि शरीराचे संबंध प्रस्थापित करून नैसर्गिक शक्तीची अनुभूती देण्याचे काम आपण करत असल्याचा कुलकर्णीने दावा केला आहे. न्युरो प्लास्टिसिटी रिसिलिएन्स टेक्निकच्या माध्यमातून आत्म्याचे गूढ आपण उकलतो, असेही त्याचे म्हणणे आहे. या फेसबुक पेजचे तब्बल पाच हजाराच्या जवळपास फाॅलोअर्स अाहेत. मात्र लैंगिक शिक्षण आणि समुपदेशनाच्या माध्यमातून आपण तरुणांचे लैंगिक प्रश्न सोडवतो, असा दावा करणाऱ्या कुलकर्णीने त्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर आणि वैध मार्गांचा अवलंब न करता स्वत:ची ओळख लपवत हा उद्योग का आरंभला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण या फेसबुक पेजवर संस्थेचा कोणताही पत्ता किंवा संपर्क क्रमांक नाही. एखाद्याला कुलकर्णीशी संपर्क करायचा झाल्यास, त्या व्यक्तीने आपला मोबाइल क्रमांक या फेसबुक पेजवर नमूद करायचा आणि मग त्याच्याशी आम्ही संपर्क साधू, अशी कार्यपद्धती होती. त्यामुळे आपली ओळख लपवून समुपदेशन करण्यामागचा नेमका हेतू काय, याचे समाधानकारक उत्तरही इथे मिळत नाही. तसेच पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याच्यासोबत राहणारी मुलेही सध्या गायब आहेत. या मुलांना संमोहित करून त्यांना आपल्यासोबत संभोगासाठी कुलकर्णी भाग पाडत असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे. मालाडच्या त्या दोन मुलींच्या पालकांनी धाडस दाखवून या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताच, आता मुंबईतील दिंडोशी परिसरातील एक गुजराती कुटुंबही कुलकर्णीच्या विरोधात पुढे आले आहे. आपल्या दोन मुलांनाही कुलकर्णीने नादी लावल्याचा त्यांचा आरोप आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे पालक आणि मुलांच्या तणावपूर्ण संबंधांबाबत प्रश्न उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या रेव्ह पार्ट्या असोत किंवा शिफू सन-कृतीच्या नावाखाली समोर आलेली एखादी विकृती असो, तरुणवर्गाचे वास्तवाचे भान सुटत चालल्याची ही लक्षणे आहेतच, परंतु समाजमाध्यमांच्या आभासी जगातला वाढत चाललेला त्यांचा अनिर्बंध वावर आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत हेही या सगळ्याच्या मुळांशी आहे, म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
talekarvinod@gmail.com
 
"शिफू'चा अर्थ काय?

शिफू सन-कृती हे कुठच्या संस्थेचे नाव नाही, तर सुनील कुलकर्णीने वर्णन केल्यानुसार, ही गूढवादाकडे निर्देश करणारी एक संज्ञा(!) आहे. शिफू याचा अर्थ गुरू आणि सन-कृती याचा अर्थ प्रकृतीशी जोडलेला कार्यकारणभाव. कुलकर्णींच्या म्हणण्यानुसार, ही  माणसातल्या पशूपासून बंधनमुक्त होण्याची  अंतर्गत स्वरूपाची एक प्रक्रिया आहे. एकदा तुम्ही तुमच्यातल्या प्राण्याला बाहेर काढले की, अलौकिक शक्तीशी जोडले जाता. मग जसे तुम्ही जीवनचक्राच्या नजीक जाता, तसे तुम्ही तुमच्यातल्या नऊ प्रकारच्या जाणिवांशी जोडले जाता. ही अवस्था खऱ्या अर्थाने उन्मनी अवस्था असते, ज्यात तुम्ही आनंद, दु:ख, वेदना, नैराश्य, भूक, नाते, शारीरिक-मानसिक गरजा आदींचा पराकोटीचा अनुभव घेऊ शकता...
 
वन ट्रॅक माइंड
मुंबईतील शीव परिसरातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अभ्यंकर यावर भाष्य करताना म्हणतात की, शिफू सन-कृतीच्या आहारी जाणे हा पालक आणि मुलांमध्ये मनमोकळा संवाद नसल्याचा परिपाक आहे. या वयोगटातील मुलांच्या आपल्या भवतालाविषयी काही स्वप्नाळू कल्पना असतात. त्यापैकी काही वास्तवाला धरून असतात, तर काही अगदीच अवास्तव असू शकतात. मात्र त्या आपल्या पालकांसमोर मोकळेपणाने मांडता येणे गरजेचे आहे. या विशिष्ट प्रकरणात त्या दोन मुली आपल्या पालकांपासून मानसिकरीत्या दूर गेल्याचे दिसते आहे. हा स्वभावदोष आहे, त्याला ‘वन ट्रॅक माइंड’ असे म्हणता येईल. अशा केसमध्ये इतर कोणत्याही बाबींचा सारासार विचार न करता ती व्यक्ती विवेकाचे नियंत्रण हरवून बसते. ज्या गोष्टींबद्दल आकर्षण असते, त्यावर काही सामाजिक बंधने आहेत, याचे भान सुटते.  
 
बातम्या आणखी आहेत...