आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिचय जे. कृष्‍णमूर्तींचा: हिंसा मनामनातली...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा डिस्कव्हरी चॅनलवर शेकडो वर्षांपूर्वी रोम देशात कैद्यांना किती विविध पद्धतींनी मारले जात होते यावर कार्यक्रम लागला होता.... मधमाशांच्या पोळ्यावर माणसाला बांधण्यापासून अनेक पद्धती होत्या.... मधल्या काळात हिटलरने पोलंडमधील छळछावणीत किती क्रौर्याने रोजचे टार्गेट ठरवून कशी माणसं मारली याविषयीची वर्णनं वाचली... भारतीय फाळणीच्या पिसाट हिंसेच्या जखमा विसरताच येत नाही... गुजरातमधला नरसंहार आज निवडणुकीचा अजेंडा बनलाय आणि माणसं अगदी सहजपणे गोध्रा झालं म्हणून नरसंहार झाला असं म्हणून स्वत:च्या असंवेदनशीलतेचा परिचय करून देतात.... हे राजकीय हिंसाचार जगातल्या देशादेशात आहेत....घराघरात आहेत...
गेल्या 100 वर्षातील युद्ध, दंगली यातील बळींची संख्या नक्कीच काही देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त होईल... बर्ट्रांड रसेल महायुद्धानंतर म्हणाले होते... ‘‘फार पूर्वी मला वाटायचं पशू माणसाच्या मनाच्या गुहेच्या खोलवर लपलेला आहे. पण आज अनुभवातून लक्षात येतंय की पशू मनाच्या गुहेच्या अगदी तोंडाशीच बसला आहे....’’
हे सारे तपशील बघितल्यावर माणूस म्हणून जगण्याचीच लाज वाटू लागते....आमच्या सुसंस्कृतता, संस्कृती हे सारे बकवास वाटू लागते.... कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘ शेकडो वर्षे माणूस हिंसकच राहिला आहे. सा-या जगभर धर्मांनी त्याल मृदू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.... हिंसा म्हणजे केवळ दुस-याला ठार मारणे नव्हे तर तिखट बोलणे, अंगविक्षेप करणे, भयापोटी दुस-याचे ऐकणे ही हिंसाच आहे....स्वत:ला भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन, युरोपियन म्हणवून घेता तेव्हाही तुम्ही हिंसकच होत असता. कारण तुम्ही स्वत:ला जगापासून वेगळे काढीत नाही....’’ ते इतक्या तरल पातळीवर हिंसा तपासतात.... महात्मा गांधीची हत्या झाली तेव्हा कृष्णमूर्ती दिल्लीत होते.

तेव्हा ते म्हणाले होते की आपण सारेच त्यांचे खुनी आहोत. कारण आपण हिंदू, मुस्लिम अस्मिता घट्ट धरून बसलो आहोत. त्यातूनच त्यांचा बळी गेला. इतक्या खोलवर ते हिंसेची व्याख्या करतात. युद्धात मुलगा गमावलेल्या एका आईचे खोटे सांत्वन न करता ‘‘ जर अजूनही तू एका देशाची अभिमानी असशील आणि युद्धातील तुमची बाजू योग्य मानत असशील तर मुलाच्या मृत्यूला तूसुद्धा जबाबदार आहेस...’’ इतक्या थेटपणे सुनावतात. प्रश्न शाळेजवळ येऊन थांबतो. मुलांना हिंसामुक्त करायचे असेल तर कृष्णजींच्या दृष्टीच्या प्रकाशात मुलांना कोणत्याच अस्मितेच्या अभिनवेशापासून दूर ठेवायला हवे. देशाची अस्मिता कृष्णजींइतक्या विश्वमानवाइतकी टाळता येणार नसली तरी तिला अभिनिवेशाचे, द्वेषाचे रंग येणार नाहीत तर बांधवांची सेवा असा पदर द्यायला हवा. धर्म, जात, गाव, खानदान या अस्मिता तर बालमनाजवळ फिरकूही देऊ नये. इतिहास शिकवतानाही द्वेषाची लागण व हिंसेचे उदात्तीकरण होणार नाही तर मानवी प्रगतीचा टप्पा असाच इतिहास शिकवायला हवा. शाळेत प्रेममय वातावरण राहण्यासाठी स्पर्धा हद्दपार करणे, शिक्षा न करता प्रेमाने सहकार्याने कार्यवाही होणे याकडे लक्ष द्यावे लागेल.


कृष्णजी पुन्हा हिंसेचे विश्लेषण करून हिंसा करून हिंसा संपेल असे मानत नाहीत तर ते हिंसेच्या निरीक्षणाची, आकलनाची गरज प्रतिपादन करतात. ते म्हणतात, ‘‘तुमच्या मनातील क्रोध जसा आहे तसा तुम्ही पाहू शकता काय.. तुम्ही कोणाचा तरी द्वेष करता... कोणीतरी तुम्हाला अप्रिय आहे... ती वस्तुस्थिती स्पष्टपणे बघता आली पाहिजे... या हिंसकतेच्या सन्मुख राहून तिच्या डोळ्याला डोळा देऊन तुम्ही ती पाहू शकता काय... बाह्य जगातील हिंसाचारच नव्हे तर आंतरिक हिंसात्मकतासुद्धा पाहू शकता काय...’’


याचा अर्थ मुलांच्यातून बाहेर येणारी हिंसा त्यांना शांतपणे अवलोकन करता येईल इतके उदार वातावरण हवे.... मुलात अपराधीभाव निर्माण न होता त्याचे मारामारी करणारे मन, शिव्या देणारे मन, त्याला निरखण्याची कला शिकवावी लागेल.... ती एकूणच सतत स्वत:च्या भावभावनांच्या अवलोकनातूनच आणि शिक्षकाच्या प्रेममय सहवासातूनच फुलू शकेल...