आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विपरीत करणी मुद्रा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुद्रा व बंध हे यौगिक प्रकार योगशास्त्रामध्ये अतिशय परिणामकारक व श्रेष्ठ गणले जातात. मुद्रा म्हणजे चिन्ह किंवा आनंद देणारी शारीरिक आकृती, मानसिक भावना किंवा कृती होय. विपरीत करणी मुद्रेमध्ये ‘खाली डोके वर पाय’ अशी शरीराची स्थिती असते. लोळणे व झोपणे या गोष्टी सोडल्या तर एरवी आपली ‘खाली पाय वर डोके’ अशीच स्थिती असते. मात्र, या यौगिक प्रकारात नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच ‘विपरीत’ (खाली डोके वर पाय) अशी शरीराची स्थिती होते. म्हणूनच या मुद्रेचे नाव ‘विपरीत करणी मुद्रा’ असे आहे. रक्ताभिसरण क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी, हृदयाकडे योग्य प्रमाणात अशुद्ध रक्त वाहून नेण्याच्या महत्त्वाच्या क्रियेसाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
सावधानता : तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब व पोटातील स्नायू दुर्बल असल्यास ही मुद्रा करू नये.
पूर्वस्थिती : पाठीवर झोपलेल्या स्थितीत, दोन्ही पाय एकमेकांजवळ घेऊन पावले, घोटे, गुडघे एकमेकांना चिकटवून ठेवावेत. हाताचे तळवे पालथे ठेवून हात शरीराच्या बाजूला मांड्यांजवळ ठेवावेत.
कृती : दोन्ही पाय हळूहळू उचलून वर न्यावेत. पोटाच्या स्नायंूचे अधिक आकुंचन करून, पाय डोक्याच्या बाजूस नेऊन खाली झुकवावेत. नंतर पार्श्वभाग, कंबर उचलून पाय डोक्याच्या दिशेने अजून खाली येऊ द्यावेत. ज्या क्षणी सहजपणे तोल साधेल त्या वेळी हात कोपरात दुमडावेत. कोपर जमिनीवरच ठेवून हात वर न्यावेत आणि कमरेजवळ हाताच्या तळव्यांनी आधार द्यावा. त्या आधाराने पाय हळूहळू वर न्यावेत आणि सरळ करावेत. पायांचा सर्व भार हाताच्या कोपरांवर असावा. दृष्टी चवड्यांच्या टोकांवर स्थिर करावी किंवा डोळे मिटून उदरपोकळीकडे किंवा श्वासाकडे लक्ष द्यावे. हीच ‘विपरीत करणी’ मुद्रेची अंतिम स्थिती होय.
श्वासस्थिती : खास लक्ष ठेवून श्वास रोखण्याची प्रवृत्ती टाळावी. नेहमीप्रमाणे श्वासोच्छ्वास चालू ठेवावा.
आवर्तने : सुरुवातीला 3 ते 5 श्वासांची 3 ते 5 आवर्तने करावीत. सरावानंतर आवर्तने कमी करून अंतिम स्थितीमध्ये जास्त काळ रहावे.
मुद्रा सोडताना : ज्या क्रमाने मुद्रेच्या अंतिम स्थितीमध्ये पोचलो, त्याच्या उलट्या क्रमाने हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यावे.
लाभ : रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने घडते. पायाच्या शिरा फुगण्याचा (Varicose Veins) त्रास कमी होतो. जठर, आतडी, यकृत, प्लीहा इ. अंगे खाली सरकण्यामुळे निर्माण झालेले अपचन, मंदाग्नी, बद्धकोष्ठता टाळता येतात, व हे अवयव पूर्व स्थितीमध्ये येण्यास मदत होते. वीर्यदोष टाळता येऊन लैंगिक जीवन आरोग्य संपन्न होते. मूळव्याध, गुदद्वारातील चीर, भगेंद्र इ. विकारात अश्विनीमुद्रेसहित ही मुद्रा नियमित अभ्यासण्यामुळे, उपचार म्हणून उपयोग होतो. अंतर्गळ (Hernia) टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून ही मुद्रा उपयुक्त ठरते. स्त्रियांसाठी ही मुद्रा विशेष करून उपयुक्त आहे. गर्भाशयभ्रंशची प्रकृती किंवा संभव या मुद्राभ्यासाने कमी होतो. स्वस्थ गर्भधारणा व सुलभ प्रसुतीकरता(Pre-natal) व प्रसुतीनंतर (Post-natal) या मुद्रेचा सराव अत्यंत लाभदायक ठरतो.
विशेष सूचना : मुद्रा व बंध यांचा मुख्यत: शरीरातील नाडी केंद्रे, प्रमुख नाड्या व अंत:स्रावी ग्रंथी (Endocrine Glands) यांच्याशी निकटचा संबंध येतो, म्हणूनच यांचा परिणाम शरीर, मन भावना इ. आसनांच्या तुलनेत त्वरित होतो, तसेच तो तीव्र स्वरूपाचा असतो. यामुळेच हे शिकताना व शिकवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
madhumatinimkar@yahoo.in