आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ‘अघोषित उलगुलान’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तीर पैने हो रहे है, कलम तिखी हो रही है, राजा डर रहा है, जेल की दिवारे उंची हो रही है, और बच्चा बडा हो रहा है।’ कितीही माणसं, लेखण्या मोडत गेलो तरी ते पुन्हा राखेतल्या फिनिक्सप्रमाणे उगवतील, झेपावतील, असे अनुजसारख्या भारतभरातील आदिवासी, पीडित, वंचित लेखकाला सांगायचेय.
अनुज लुगुनचे साहित्य आदिवासी अस्मिता आणि संघर्षाची जळती मशाल आहे. ती आदिवासींना अस्तित्वासाठी सतत पेटतं ठेवू पाहतेय. विकासाच्या नावाखाली आदिवासी पुरता लुटला जातोय. सांस्कृतिक चेतनेपासून त्याला वेगळं केलं जातंय.

कोई नही बोलता इनके हालात पर,
कोई नही बोलता जंगल के कटने पर
पहाडों के टुटने पर, नदीयों के सुखने पर
ट्रेन की पटरी पर पडी, तुरीया की लावारिस लाश पर
कोई कुछ नही बोलता, बोलते है बोलनेवाले
केवल सियासती गलीयोंमें आरक्षण के नाम पर
बोलते है केवल उनके धर्मांतरण पर
चिंता है उन्हे, उनके ‘हिंदू’ या ‘इसाई’ हो जाने की
बोलते है लोग केवल बोलने के लिए
लड रहे है आदिवासी अघोषित उलगुलान में
कट रहे है वृक्ष माफियों की कुल्हाडी से
और बड रहे है कंक्रिटों के जंगल, दाण्डू जाये तो कहां जाये
कटते जंगल में या बढते जंगल में?
ही अस्वस्थता आहे. अनुज लुगुन या झारखंडच्या ‘मुंडा’ जमातीत जन्मलेल्या आदिवासी क्रांतिकारी कवी, लेखक तथा सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तरुणाची. देशातल्या करोडो आदिवासींचे हे एक प्रातिनिधिक रूप आहे.

आदिवासीबहुल राज्यांची नावं उच्चारली की, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो नक्षलवाद. डोंगर पोखरणारा खदानी, उद्ध्वस्त होत जाणारा आदिवासी, दमन करणारी भांडवली व्यवस्था यांच्यात सुरू असलेला अनेक दशकांपासूनचा संघर्ष. आदिवासींचं हिरावून घेतलेलं जगणं, भोगली गेलेली आबरू. खरंच कुणी बोलतंय काय यावर? उलट हे सारं दडपून टाकण्यात आलं. त्यांचा आवाज जंगलाच्या आत बंदूकधारी सशस्त्र पहाऱ्यात बंद केला गेला. रक्षकच भक्षक बनू लागल्याचे हे उदाहरण म्हणता येईल. पण आता तोच आदिवासींचा आक्रोश लेखण्या जोरकसपणे मांडू लागलेल्या आहेत. दमनकारी व्यवस्थेच्या विरोधात एक नवा वैचारिक जागर आदिवासी पट्ट्यात उभा राहू पाहात आहे. शस्त्रधारी नक्षलींच्या लढाईची जागा आता कला आणि लेखण्या घेऊ पाहात आहेत. ‘तीर पैने हो रहे है, कलम तिखी हो रही है, राजा डर रहा है, जेल की दिवारे उंची हो रही है, और बच्चा बडा हो रहा है।’ ही लढाई कदाचित तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत आम्ही आदिवासींना समजून घेणार नाही. कितीही माणसं, लेखण्या मोडत गेलो तरी ते पुन्हा राखेतल्या फिनिक्सप्रमाणे उगवतील, झेपावतील, हेच सांगायचंय अनुजसारख्या भारतभरातील आदिवासी, पीडित, वंचित लेखकाला. आदिवासी पट्ट्यांमध्ये जगण्याचे जागरण जोरात चालू झाले आहे. हक्क आणि अधिकारांचा लढा तीव्र होऊ पाहतोय. व्यवस्थेकडून होणाऱ्या जल, जमीन, जंगलच्या लुटीविरोधात नव्याने लढाई उभी राहतेय. यात वैचारिक प्रबोधनाच्या भिन्न भिन्न वाटा तयार होताहेत. महुआ माझी, रणेंद्र, निर्मला पुतुल, ग्लैडसन डुंगडुंग, अश्विनकुमार पंकज, अनुज लुगुन अशा अनेक आदिवासी लेखकांची नावे घेता येतील. या नव्या क्रांतिपथावर अनुज लुगुन नव्याने ‘अघोषित उलगुलान’ पुकारतोय.

प्रतिष्ठेचे भरतभूषण अग्रवाल आणि राष्ट्रीय मुक्तिबोध पुरस्कार मिळाल्यावर उदय प्रकाशसारख्या ज्येष्ठ कवीने अनुजचे केलेले कौतुक बरंच काही सांगून जातं. त्यांच्या मते, ‘अघोषित उलगुलानमध्ये इतिहास आणि सामुदायिक स्मृतींची खोल अशी हादरवून सोडणारी बेचैनी, मोडलेल्या स्वप्नांची, अनुत्तरित, अपूर्ण, आकांक्षांची पडझड लिंपणारी एक आरोळी आहे; जी स्वातंत्र्यानंतर कदाचित हिंदी कवितेत पहिल्यांदाच एवढ्या सघनतेने आणि तीव्रतेने अनुज लुगुन यांच्या कवितेत पुन:पुन्हा ऐकू येते.’

‘उलगुलान’ ही बिरसा मुंडा यांच्या चळवळीच्या कृती कार्यक्रमाची घोषणा होती. सर्व पातळ्यांवर सर्वच क्षेत्रांत एकाच वेळी उठाव करायचे. हे आज आदिवासी वंचितांचा जाहीरनामा बनले आहे. ‘अरण्येर अधिकार’मधून प्रख्यात लेखिका महाश्वेता देवींनी याचा उल्लेख ‘अन्यायाच्या विरुद्ध चाललेली अविरत लढाई’ असा केला आहे. इथे १९८५ नंतर मराठी साहित्यात आलेल्या भुजंग मेश्राम यांच्या ‘उलगुलान’ या कवितेचीही आठवण आल्यावाचून राहात नाही. असाच नारा नव्याने भारतीय साहित्याबरोबरच जनामनात ‘अघोषित उलगुलानच्या’ नावाने बिहार केंद्रीय विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक अनुज लुगुन यांनी दिला आहे. खरं तर इथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, अवघ्या २८ वर्षांच्या या युवा प्राध्यापकाला हे ‘अघोषित उलगुलान’ पेटवण्याची गरज का वाटतेय?

‘अनुज’ म्हणजे मागून जन्मलेला, छोटा भाऊ. जो खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांसाठी विचार करू लागलाय. सनातनी व्यवस्थेबरोबरच, वर्गवादी दमनकारी व्यवस्थांचे सारे गड आणि मठ तोडायला तो अभिव्यक्तीचे सारे धोके उचलायला तयार झालाय. भेदभावांच्या, सत्तांधांच्या हुकूमशाही विरोधात तो लिहितोय. ‘मेघालय शिकारी हूं, मेरे साथी मारे जा चुके है, हमने छापामारी की थी, जब हमारी फसलों पर जानवरों ने धावा बोला था। हमने उन्हे बताया, कितना मुश्किल होता है बंजर जमीन को उपजाऊ बनाना, बीज को अंकुरने में कितना खून जलता है। मै एक बुढा शिकारी हूं घायल और आहत, लेकीन हौसला मेरी मुठ्ठीयों मे है, और उम्मीद हर हमले में, मै एक आखरी गीत अपनी धरती के लिए गाना चाहता हूँ।’ ही लढाई सर्वतोपरी न्यायासाठीची आहे.

अनुजचे साहित्य आदिवासी अस्मिता आणि संघर्षाची जळती मशाल आहे. ती आदिवासींना अस्तित्वासाठी सतत पेटतं ठेवू पाहतेय. विकासाच्या नावाखाली आदिवासी पुरता लुटला जातोय. सांस्कृतिक चेतनेपासून त्याला वेगळं केलं जातंय. ‘सलवाजुडुम’च्या नावाखाली नको ते ते संपवलं जातंय. आज आम्ही सगळीकडून शोषण, दमन, अन्याय, अत्याचारात अडकलोत. त्यांच्याविरुद्ध आम्ही संघर्ष करतोय. ज्यात ‘उलगुलान की औरते’ आहेत. यातून कितीतरी बायांनाही खोट्या आरोपांखाली कायद्यात अडकवले जात आहे. ‘गंगाराम कलुंण्डिया’ या आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सैनिकालाही गोळ्या घातल्या जात आहेत. कितीतरी जण तुरुंगात अडकून आहेत. अनेक जण ठार झालेत, तरी हा संघर्ष थांबणार नाही. त्याच्या साहित्याचे हिरो आहोत- झानु बुआ, सोनी सोरी, दयामनी बारला, लिंगाराम, बिरसा मुंडा, रोबडा सोरेन, तुरीया, दाण्डु आदी आदिवासी संघर्षरत साधी माणसं. त्याच्या लेखणीचे विषयही जगण्यातल्या याच परिवेषातले. ‘लालगढ’, ‘मै घायल शिकारी हूं’, ‘यह पलाश के फुलने का समय है’, ‘सुनो’, ‘चिडिया घर मे झेब्रा की मौत’, ‘मेरा पुनर्जन्म नही होगा’, ‘मै जिस जंगल मे रहता हूं वहाँ भेडीये आदमी नही है’, ‘जंगल के सत्व के बिच’, ‘बिरसुंबाबा’, ‘एकलव्य से संवाद’, ‘आजाद लोग’, ‘हमारी अर्थी शाही नही हो सकती’ इत्यादी. या साऱ्याच कवितांमधून आदिवासींच्या आकांताला तोंड फुटलंय. त्याला माहीत आहे, ‘हमारी अर्थी शाही नही हो सकती’, परंतु त्याला हेही माहीत आहे की, शाही प्रेतयात्रेवाले इतिहासात हरवून जातात आणि हक्क आणि अधिकारांसाठी लढणारे शेवटपर्यंत अमर राहतात. त्यांचीच गीते येणाऱ्या पिढ्या गात जातात. आमची मागणी कुठल्याही राजवाड्याची वा राज्याभिषेकाची नाहीये. फक्त जल, जमीन, जंगल आणि तिथला आनंद गाणं आणि जगणं तेवढं उद्ध्वस्त करू नका, एवढंच निवेदन आम्ही राजाला केलं आणि राजाने आमच्याविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सैनिकांना पाठवून दिलंय. आता आमची लढाई आम्हालाच लढावी लागेल. मग ते आमच्या पायात बेड्या ठोकू लागले तर आमचा आवाज जेलमध्येही उठत राहील आणि आमच्या मुठी आवळत जातील. तो संदेश देतोय.
‘ओ मेरे युद्धरत दोस्त, तुम कभी हारना मत,
हम लडते हुये मारे जायेंगे, उन जंगली पगडंडियो में
उन चौराहों में, उन घाटों में
जहाँ जीवन सबसे अधिक संभव होगा.’
veerarathod2@gmail.com