आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रग आणि धगधगः 'नातं माय-लेकराचं'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाश्वेतादेवींचं जगणं आणि लेखन केवळ निमित्तमात्र नाही, तर आईच्या नात्याने आपल्या लेकरांविषयी जगाला सांगणं होतं. प्रेमाने समजावणं होतं. वेळप्रसंगी कठोर होऊन सडकून बजावणंदेखील होतं.
म हाश्वेता देवी गेल्या. भारताने एक महान लेखिका गमावली असेल; पण आम्हा आदिवासी, भटक्या विमुक्तांचं चालतं-बोलतं विद्यापीठ मुकं झालंय. आदिवासी भारत आपल्या मातेला पोरका झालाय. त्या गेल्या म्हणजे, जाणारच होत्या आज ना उद्या, पण केवळ त्यांच्या असण्याने खूप मोठी हिंमत यायची लढणाऱ्यांमध्ये. या साऱ्या लढणाऱ्यांची आई बनून त्यांना आपलेसे करताना स्वत: आदिवासी होऊन, मुक्या ओठांना वाचा देणाऱ्या या माउलीने आदिवासींच्या कल्याणासाठी पायाला भिंगरी बांधून अवघा भारत पालथा घातला होता.

दिसायला अतिशय साधारण. जेमतेम शरीरकाठीची ही माउली. पण आपल्या आत तमाम वंचितांची वेदना घेऊन वावरायची. तिच्या आतून अख्खा उपेक्षित भारत बोलायचा. त्यांनी आजन्म दुबळ्यांशी असलेलं नातं जोपासलं, नि धनदांडग्या, सत्तांधांशी हाडवैर पत्करलं. स्वत:मधला माणूस सदैव जागा ठेवून, लोकशाहीमूल्य, विवेकांशी प्रतारणा करणाऱ्या व्यक्ती आणि व्यवस्थेविरुद्ध अविरतपणे आवाज उठवत राहिल्या. एका अर्थाने महाश्वेताजींनी आपले अवघे जीवनच आदिवासींसोबत जल, जमीन, जंगल आणि हक्क अधिकारांच्या लढ्यात खर्च करून टाकले. आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ डॉ. गणेशदेवी यांच्या सहवासामुळे मी महाश्वेतादेवी यांना जवळून पाहू शकलो. २०१५ला जमशेदपूर येथे ‘आदिवासी संमेलनात’ जाणे झाले, तेव्हा पहिल्यांदा आणि अखेरचे त्यांना बघण्याचे भाग्य लाभले. त्या आजारी होत्या. त्यांच्याशी बोलता आले नाही, ही खंत मनात राहून गेली.

भारतातील सर्व छोट्या-मोठ्या मानवी अधिकारांच्या लढ्यांना, आंदोलनांना त्यांचा सक्रिय खंबीर पाठिंबा असे. वंचितांच्या न्याय, हक्क अधिकारांसाठी लढणाऱ्यांना त्यांचा मातृवत भक्कम आधार वाटत असे. म्हणूनच भारतातला सर्वहारा घटक त्यांना ‘आमची माय’ म्हणून संबोधत असे. आदिवासी हे या भूमीचे मूळ मालक आहेत आणि भटके-विमुक्त हे मूळचे आदिवासी आहेत. त्यांना त्यांचा दर्जा, अधिकार कायद्याने मिळायला पाहिजे, याकरिता त्या आग्रहाने व निग्रहाने लढत राहिल्या. ‘आम्ही लोक तोपर्यंत सभ्य-सुसंस्कृत ठरू शकत नाही, जोपर्यंत त्यांच्या वाट्याचे हक्क, अधिकार त्यांना देत नाही.’ या मताच्या त्या होत्या. आदिम जनांच्या जीवनाला उद‌्ध्वस्त करणाऱ्या क्रूर, शोषक, सभ्य समाजाच्या विकृतींचा त्यांनी बुरखा फाडला होता. हजारो वर्षांपासून मुख्य धारेतून बाहेर फेकलेल्या आदिवासी जगण्याला, प्रश्नांना, अस्मितेला मोठ्या आत्मविश्वासाने जाणीवपूर्वक अक्षरबद्ध केले होते. त्यांचे एकूण लेखनच मानवी हक्कांसाठीचा लढा आहे, असे मानल्यास अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये, इतकी मानवी हक्कांची नि न्यायाची त्यांना चाड होती.

वंचितांच्या वस्तीत जाऊन लेखनाचे विषय शोधणाऱ्या सोकॉल्ड सेलेब्रिटी लेखक कलावंतांसारख्या त्या आदिवासींच्या जवळ गेल्या नाहीत; तर त्यांच्या प्रश्नांना साहित्याचे विषय कसे बनवता येईल, हाच विचार घेऊन ही महात्मा आदिवासी पाडे, तांडे, वाड्या, वस्त्या, पालांवर त्यांच्यातलीच एक होऊन तहहयात वणवण करत भटकली होती. ‘एक लंबे समयसे मेरे भीतर जनजातीय समाज के लिए पीडा की जो ज्वाला धधक रही है, वह मेरी चिता के साथ ही शांत होगी।’ हे त्यांच्या जगण्याचं ध्येय होतं. त्यासाठी त्या शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहिल्या. ‘जंगल के दावेदार’ला जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तेव्हा आदिवासींनी नाचत गात आम्हाला साहित्य अकादमी मिळालाय, असे गर्वाने गायले होते. त्यांच्या मनात कृतज्ञता होती. ‘मुख्य धारेतल्या समाजाने आम्हाला कधी स्वीकृती दिली नाही. आम्ही इतिहासात कुठेच नव्हतो. तुमच्या लिहिण्याने ते सारे प्राप्त झाले.’ ही आदिवासींची भावनाच सारं काही सांगून जाते.

या मातेने आपल्या रानावनातल्या लेकरांना चित्रपट, साहित्यातूनच नाही, तर इतिहासातील खरेखुरे नायक म्हणून सिद्धत्व मिळवून दिले. संघर्षशील नायकांचे पुत्रवत यशोगान गायले. बुधन, सबर या विमुक्त जमातीच्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी, जन आंदोलनापासून न्यायालयीन लढाईसुद्धा लढली. न्याय मिळवून दिला. या घटनेचा अधिकाधिक प्रसार व्हावा, म्हणून ‘बुधन’ नावाची चळवळ उभी केली. स्वत: त्याविषयी लिहून अनेकांना प्रेरित केले. डॉ. गणेश देवींचे ‘बुधन’ नावाचे नियतकालिक याच प्रेरणेतून उभे राहिले. दक्षिण बजरंगी छाराचे ‘बुधन थिएटर’, ‘बुधन बोलता है।’ आणि देशातला प्रत्येक भटका विमुक्त तरुण बुधनमध्ये स्वत:ला शोधू लागला.

महाश्वेता देवी या अशा पहिल्या लेखिका आहेत, ज्यांनी नक्षलबारी आंदोलनादरम्यान आदिवासींनी ज्या यातना सहन केल्या, त्या प्रस्थापितांपुढे आणण्यासाठी ‘हजार चौरासी की माँ’, ‘अग्निगर्भ’सारख्या कादंबऱ्या नक्षल आंदोलनाला साक्षी राहून जन्माला घातल्या. यातून त्यांनी नक्षलवादाकडेही आईच्या नजरेने पाहिले. ‘जन्मजात गुन्हेगार’, ‘नक्षलवादी’ असे शिक्के मारून जगण्यातून कडेलोट केलेल्या आदिवासींसाठी त्यांचे काळीज सदैव पिळवटून निघाले. स्वातंत्र्य आंदोलनापासून नक्षल चळवळीपर्यंत जगणाऱ्या, जळणाऱ्या, लढणाऱ्या, मरणाऱ्या माणसांचा संघर्ष, संस्कार गीतांसारखा आदिवासींच्या पिढ्यांना गाऊन सांगितला. साहित्य आणि सांस्कृतिक आंदोलनाबरोबरच त्या सामाजिक, राजकीय आंदोलनातही सदा अग्रणी राहिल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्यांनी जोरकसपणे पाठराखण केली. तसलिमा नसरीन यांना कोलकात्यातून बाहेर करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. नंदिग्राम-शिंगूरसारख्या भूमिपुत्रांच्या आंदोलनात त्या उतरल्या.

‘वर्तिका’ या मासिकपत्रिकेतून शेतमजूर, आदिवासी, कारखान्यातील कामगार, रिक्षाचालक यांना आपल्या समस्या आणि जगण्यासंबंधाने लिहायला लावले. वेठबिगार मजूर, विटभट्टी मजूर, आपल्याच जमिनीतून बेदखल केल्या गेलेल्या आदिवासींवर त्यांनी विशेषांक केले. म्हणूनच भारतातल्या आदिवासी, भटके-विमुक्त, वंचित समूह, वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या तरुणी महाश्वेतादेवींचं रक्ताच्या नात्यापलीकडचं गणगोत होतं. पलामुंच्या वेठबिगार मजुरांसाठी, मेदनापूरच्या लोधा, पुरुलियाच्या खेडीया सबर आदींसाठी विशेष कार्य करताना त्यांना छोट्या-मोठ्या व्यवसायातून जगण्याचे बळ दिले. आदिवासींच्या हाताला काम, पोटाला भाकर, मानवाचं जगणं अशा मूलभूत गरजांपासून रस्ते, दवाखाने, शाळा अशा साध्या सुविधा स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षात देऊ शकलो नाही, याची खंत व चिंता त्यांना सतत वाटे. व्यवस्थेकडून छळले जाऊनही कधीच हार मान्य न केलेली, लढणंच पसंत केलेली, लढत राहिलेली माणसं मला लिहायला भाग पाडतात. माझ्या लिहिण्यात माझं म्हणून काय आहे? ते सारं काही त्यांचंच आहे. हे अतिशय नम्रभावाने मान्य करणारे महाश्वेतादेवींसारखे किती लेखक सापडतील, सांगता येणे अवघड आहे.

महाश्वेतादेवींचं जगणं आणि लेखन केवळ निमित्तमात्र नाही, तर आईच्या नात्याने आपल्या लेकरांविषयी जगाला सांगणं होतं. प्रेमाने समजावणं होतं. वेळप्रसंगी कठोर होऊन सडकून बजावणंदेखील होतं. ते तेव्हाच येतं, जेव्हा तुमच्या मनात मायेचा अपार झरा अखंडपणे वाहात असतो. पोटच्या लेकरांसाठी काळीज तीळतीळ तुटत असतं, तेव्हाच कुणी तुम्हाला ‘माय’ म्हणून हाक मारत असतो. हीच दौलत होती महाश्वेता देवींची, जी कदाचित कुबेरालाही मिळाली नसेल. शेवटपर्यंत त्यांनी स्वत:च्या मालकीचे घर केले नाही, पण भारतातल्या तमाम वंचितांच्या मनांत कायमचे घर केले. तेथून कुणालाही या मातेला बाहेर काढता येणार नाही. या मातेचे कार्य आणि तिने निर्मिलेले साहित्य कायमच आदिवासी, भटके, दलित, वंचितांना त्यांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठीच्या लढ्याला प्रवृत्त करीत राहील. प्रेरणा देत राहील.
या आदिवासी मातेला जोहार... अखेरचा सलाम.
‘एक लंबे समयसे मेरे भीतर जनजातीय समाज के लिए पीडा की जो ज्वाला धधक रही है, वह मेरी चिता के साथ ही शांत होगी।’ हे महाश्वेतादेवींच्या जगण्याचं ध्येय होतं. त्यासाठी त्या शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहिल्या.
veerarathod2@gmail.com
बातम्या आणखी आहेत...