आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vishal Kulkarni Article About Bollywood Actor Mithun Chakraborty, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अय स्साला... कोई शक?’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थळ : सोलापूरच्या भागवत थिएटर्समधील ‘चित्रमंदिर’ हे चित्रपटगृह.
अवघे 40 रुपये बाल्कनीचे तिकीट असतानाही, पिटातले तिकीट काढून बसलेला मी.
टायटल्स संपतात. चित्रपटाला सुरुवात होते. पिटातल्या त्या प्रेक्षकांमध्ये (माझ्यासकट) प्रचंड चलबिचल.
कधी येणार बे त्येनं? च्यायला मुंग्या आल्या बुडाला... चित्रपट सुरू होऊन पाच मिनिटेही झालेली नसतात. तेवढ्यात एक पिवळ्या रंगाची मेटॅडोरवजा स्कूल बस पडद्यावर दिसते. एका जुनाट घराच्या अंगणात ही स्कूल बस थांबते. त्यातून ड्रायव्हरच्या वेशातला, थकल्यासारखा वाटणारा, चेहर्‍यावर सुरकुत्या पडलेला एक म्हातारा खाली उतरतो आणि पब्लिक जल्लोष करतं... ‘आला बघ... चित्ता!’
दुसर्‍याच क्षणी पडद्यावर चिल्लर उधळली जाते, कुणी तरी दोनच्या, पाचच्या नोटासुद्धा उधळून देतो. कदाचित त्याने गेल्या आठवडाभराच्या बूट पॉलिशच्या पैशांतून त्या बाजूला काढून ठेवलेल्या असतात. सगळीकडे शिट्ट्यांचा गजर चालू असतो. सगळा संकोच बाजूला ठेवून त्या गजरात मीही एक शिट्टी मोकळेपणाने वाजवून टाकतो...
चित्रपट होता ‘गोलमाल-3’! चित्रपटात इतरही तगडे हीरो असताना एका म्हातार्‍याचे असे स्वागत आमच्या सोलापुरातच होऊ शकते. आणि तो चित्ता म्हणजे... आता सांगायलाच हवं का? तरीही सांगतो... ‘अय स्साला..कोई शक?’

असाच अजून एक चित्रपट ! नावाला महत्त्व नाही...
उगाचच मादक दिसू पाहणारी एक मुलगी रस्त्याने चालली आहे. शहर वा गाव कुठले का असो, तिचा पोशाख मात्र घागरा-चोलीच असणार. तर मध्येच रस्त्यात काही गुंड तिला आडवे येतात. त्रास देऊ लागतात. कोणी तरी तिची एक बाही फाडतो (चक्क फाडतोच) तेवढ्यात... अचानक कुठून तरी एक बाटली घरंगळत येताना दिसते किंवा त्रास देण्यात जरा ‘ढ’ असल्यामुळे मागे राहिलेल्या एका गुंडाच्या गालावर जोरदार ठोसा बसतो किंवा त्रास देणारा गुंड एकदम 100 फूट आकाशात उडून 500 फुटांवरची एखादी विटांची (नुकतीच बांधली आहे, हे जाणवून देणारी) भिंत तोडून कोसळलेला दिसतो. सगळे त्या दिशेने बघतात. कोणी तरी विचारतो,
‘कौन है बे तू?’ पलीकडे तो उभा असतो...
मैं हूँ तुम जैसों से नफ़रत करने वाला,
गरीबों के लिए ज्योती, गुंडों के लिए ज्वाला,
तुझे बनाके मौत का निवाला,
तेरे सीने में गाड दूंगा मौत का भाला...
पिटात सगळीकडे शिट्ट्या आणि टाळ्या... पुढची सगळी मारामारी नुसता गोंगाट, कुणी शर्ट फिरवतंय, कुणी टोप्या उडवतंय, तर कुणी चक्क नाणी पडद्यावर फेकतंय! चित्रपटाचं नाव काहीही असो, जवळपास हाच सीन आणि असाच प्रतिसाद. आणि कोणी तरी ओरडतो... ‘आला बघ... चित्ता!’ या पब्लिकच्या लेखी अमिताभ बच्चन काय आणि रजनीकांत काय, दोघेही चिल्लर असतात. त्या स्पेसिफिक क्षणी मीही त्यांच्यातलाच एक असतो...

कारण? फक्त एकच... कोई शक?
मला मिथुन चक्रवर्ती नामक या ‘महामानवा’चं व्यसन कधी लागलं, ते आता नक्की आठवत नाही. मुळात, ज्या वयात ते लागलं त्या वेळी इतर कुठली व्यसनं नव्हती. कदाचित त्यामुळे त्या एकाच व्यसनावर लक्ष जास्त केंद्रित झालं असावं. आणि मग हळूहळू ते रक्तात भिनत गेलं. पुढे या व्यसनाचं रूपांतर भक्तीत होत गेलं आणि ते अधिकच पक्कं झालं...

‘बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही’, म्हणत वेड लावणार्‍या राजेश खन्नाच्या प्रेमात पडण्याचे ते दिवस होते. हळूहळू अमिताभ बच्चन नावाच्या सुपरस्टारभोवतीही आमच्या सार्‍या इच्छा-आकांक्षा, सारी स्वप्ने घोळका करून उभी राहू पाहत होती. तशातच एक दिवस टीव्ही वर ‘हम पांच’ पाहण्यात आला. महाभारताचं कथानक घेऊन सद्य:स्थितीवर भाष्य करणारा दिग्दर्शक ‘बापू’चा हा चित्रपट! बसलो होतो संजीवकुमारला बघण्यासाठी म्हणून; जेव्हा उठलो, तेव्हा डोक्यात पक्की जागा करून बसले होते, ते अमरिश पुरी आणि अर्थातच ‘भीमा’ उर्फ मिथुन चक्रवर्ती!

...लहानपणी कधी तरी उन्हाळ्याच्या सुटीसाठी म्हणून सोलापुरात गेलो होतो. सातवीत किंवा आठवीत असेन बहुधा. दुसर्‍याच दिवशी मावशीच्या मुलाने मिथुनदांचे चित्रपट बघायला मिळतील, अशा एका साधना मंदिराची ओळख करून दिली. ‘पाकिजा व्हिडिओ सेंटर’! विजापूर रोडवरच्या रसूल हॉटेलच्या वरच्या मजल्यावर एका बोळकांडीवजा खोलीत थाटलेलं हे व्हिडिओ सेंटर. तिथे आम्ही मिथुनदांचा ‘कसम पैदा करने वालें की’ बघितला. लगेच संध्याकाळी ‘डिस्को डान्सर’. ‘पाकिजावाला’सुद्धा आमच्यासारखाच मिथुनभक्त होता. त्यामुळे आठवड्यात किमान तीन दिवस तरी त्याचेच चित्रपट असायचे. ‘हम पांच’मधल्या ‘भीमा’नंतर एकदम ‘आय अ‍ॅम अ डिस्को डान्सर’ म्हणत बेभान नाचणार्‍या मिथुनला पाहिले आणि आम्ही चाटच पडलो. तिथेच शेजारी बसलेल्या कुणा मिथुनभक्ताने सांगितले, ‘डिस्को डान्स आणि कराटे’ ही हिंदी फिल्मसृष्टीला ‘प्रभुजीं’चीच म्हणजेच मिथुनची देणगी आहे. मग तर आम्ही अजूनच भारावून गेलो. मग त्यानंतर धडाकाच सुरू झाला. सोलापूर असो वा दौंड वा कुठलेही गाव. तिथे गेलो की आधी गावातली व्हिडिओ सेंटर्स शोधून काढायची आणि त्यावर नजर ठेवायची. मिथुनदांचा चित्रपट लागला रे लागला, की आम्ही पहिल्या रांगेत हजर! त्या आधी मिथुनने बोटावर मोजण्याइतके चित्रपट केलेले होते. त्याला पहिल्याच ‘मृगया’साठी राष्ट्रीय पारितोषिकदेखील मिळालेले होते; पण व्यावसायिकदृष्ट्या ‘मृगया’ अपयशीच ठरला होता. अगदी 1979मध्ये आलेले ‘सुरक्षा’ (अगदी आजचा बडा स्टार असलेला सलमानखानदेखील ‘सुरक्षा’च्या प्रेमात आहे. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात त्याने निखिल अडवाणीला बरोबर घेऊन ‘सुरक्षा’ परत एकदा करणार असल्याचं कबूल केलंय. आता बोला!) आणि थोडा फार चाललेला ‘तराना’ सोडला, तर मिथुनवर फ्लॉप हीरोचाच शिक्का लागलेला होता. एकदा बोलता बोलता कोण श्रेष्ठ, यावर वाद सुरू झाला होता. बहुमत अमिताभ बच्चनला होते. आम्ही नेहमीप्रमाणे भिडस्तपणा पत्करून तळ्यात-मळ्यात करत होतो. एवढ्यात मिथुनदाच्या बाजूने भांडणार्‍या भिडूने विचारले... तुमच्या बच्चनला एक तरी नॅशनल अवॉर्ड आहे का? (‘अग्निपथ’ प्रदर्शित व्हायचा होता तेव्हा) मिथुनदाला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले होते. आहात कुठे? ही बातमी आमच्यासाठी नवीन होती. मग सुरू झाला एक अनंत शोध... मृगयाचा! शेवटी ‘मृगया’ बघितलाच. तोपर्यंत मिथुनदांच्या नॅशनल अवॉर्डसची (मृगया-1977, तहादेर कथा-1993, स्वामी विवेकानंद- 1996) संख्या तीनवर जाऊन पोहोचली होती... त्यानंतर कालौघात पायाखालून बरेच पाणी वाहून गेले. मिथुनदा मेनस्ट्रीममधून बाहेर पडून बी-ग्रेड चित्रपट करत गेले...

पण, माझ्यासारख्या शाळकरी मुलांसाठी मिथुन चक्रवर्ती हे नाव म्हणजे जणू काही एक माइलस्टोन बनलं होतं, तेव्हा. ‘जिमी जिमी.. आजा आजा’ किंवा ‘याद आ रहा है.... तेरा प्यार’ म्हणत सगळी तरुणाई आपल्या तालावर नाचवत मिथुनदांची क्रेझ थेट चीन, रशियापर्यंत जाऊन पोहोचली होती. त्या वेळी मिथुनदासारखी हेअर स्टाइल करायची, हे एक स्वप्नच होतं आमच्यासाठी. जे अखेरपर्यंत स्वप्नच राहिलं. कारण आमच्या नशिबी कायम दौंडच्या एस.आर.पी. कँपच्या हजामाने केलेला सोल्जर कटच होता. जेव्हा स्वत:ची हेअर स्टाइल कशी असावी, हे ठरवण्याचा अधिकार मिळाला; तोपर्यंत मिथुनदांची हेअर स्टाइल इतिहासजमा झाली होती...

एकीकडे तद्दन मसालापट करत असताना हा मनस्वी कलावंत मधूनच एखादा शौकीन, गुलामी, प्रेमप्रतिज्ञा, अग्निपथ, एक नादिर गल्पो (ए टेल ऑफ ए रिव्हर), तितली, गुडिया यांसारखे वेगळे चित्रपटही करत होता. पण मिथुनदांचे मेनस्ट्रीममधले दिवस संपले होते, हेच खरे. इथूनच मिथुनच्या आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू झाली. हा पडता काळ होता. हिंदीमध्ये टी.एल.व्ही. प्रसादच्या कांती शाह यांना जोडीला घेत साहेबांनी तद्दन बी-ग्रेड चित्रपटांचा कारखानाच सुरू केला. बरं हे चित्रपट पडायचेच असेही नाही, तर ते चालायचे आणि चालायचेच. कारण बॉलीवूडने जरी नाकारलेलं असलं, तरी भक्तांनी आपल्या देवावरची माया अजिबात पातळ केलेली नव्हती. ‘प्रभुजीं’नी जे दिलं ते त्यांनी प्रेमाने स्वीकारलं, डोक्यावर घेतलं, मग ते अगदी कितीही निकृष्ट पातळीवरचं असो. हे चित्रपट इतके चालायचे की, त्या दहा वर्षांतली पाच-सहा वर्षे आमचा हा नायक देशातला सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता बनला होता. गंमत बघा, जेव्हा बॉलीवूडमधल्या तथाकथित सुपरस्टार्सवर कर चुकवल्याच्या केसेस दाखल होत होत्या, तेव्हा आमचे ‘प्रभुजी’ सगळ्यात जास्त कर भरणारा अभिनेता म्हणून ओळखले जात होते! पण मिथुन चक्रवर्ती या सहृदय माणसाची ओळख इथेच संपत नव्हती. सतत अन्यायाविरुद्ध दंड थोपटण्याच्या ज्या वृत्तीने त्यांना नक्षलवादाच्या कुख्यात प्रांगणात नेऊन सोडले होते, त्याच वृत्तीने त्यांना चित्रपट क्षेत्रातील सामान्य कामगारवर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी एक संस्था उभी करायला भाग पाडले होते. त्यातूनच ‘फिल्म स्टुडिओ सेटिंग्ज अँड अलाइड मजदूर युनियन’ या संस्थेला मिथुनदांचे भरभक्कम पाठबळ लाभले होते. कामगारांना सर्व प्रकारची आर्थिक, वैद्यकीय मदत अतिशय कमी दरात उपलब्ध करून देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला, अगदी लहानसहान वैद्यकीय शिबिरालासुद्धा उपस्थित राहण्याची मिथुनदांची ख्याती आहे. असा हा तळागाळातल्या माणसांचं भलं चिंतणारा दिलदार गृहस्थ आता राज्यसभेचा खासदार बनला आहे...

मिथुन चक्रवर्ती हे नाव कालौघात मागे पडतंय की काय, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा गुरू, हाऊसफुल-2, गोलमोल-3, ओह माय गॉड अशा काही चित्रपटांतून मिथुनदांचं दर्शन होऊ लागलं आहे.‘डान्स इंडिया डान्स’ या झी टीव्हीवरील कार्यक्रमाने, एकेकाळच्या या ‘गनमास्टर’ला ‘ग्रँडमास्टर’च्या रूपात पेश करून सहजपणे नव्या पिढीशी जोडलं आहे... म्हटलं तर एक वर्तुळ पूर्ण झालंय.

माझा एक आंतरजालीय ब्लॉगर मित्र, विद्याधर भिसे याने तर आपल्या ब्लॉगला ‘बाबाची भिंत’ असे नावच दिले आहे. त्यावर बाबाबद्दल बोलताना विभि म्हणतो...
‘मिथुनदा हे माझं श्रद्धास्थान आहे. अगदी लहानपणापासून. आणि हे थोडं अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण... वाटो.’
मी एवढेच म्हणेन, विभि, आपलं गोत्र जुळतंय रे. कुणाला अतिशयोक्ती वाटेल, पण वाटो....
(लेखक पुणेस्थित ‘ट्रिंबल नेव्हिगेशन ऑस्ट्रेलिया प्रा. लि.’ नावाच्या कंपनीत दक्षिण आशिया क्षेत्राचे तंत्र व्यवस्थापक आहेत.)
(vkulkarni.omnistar@gmail.com)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, समांतर साम्राज्याचा मालक....