आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता ही माझी रक्तवाहिनी- पी विठ्ठल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण कविता का लिहितो? या प्रश्नाचं खरं म्हणजे तार्किक उत्तर देणं खूप अवघड आहे. ‘व्यक्त होणं’ एवढ्याच एका निकडीतून आपण लिहीत असतो का? समजा आपण लिहिलेच नाही, तर त्याचे काही दृश्य-अदृश्य परिणाम आपल्या किंवा समाजाच्या व्यक्तिमत्त्वावर होतील का? आपण लिहितो म्हणजे नेमके काय करतो? वगैरे अनेक प्रश्न मला पडत असतात. माझा जन्म १९७५ चा म्हणजे, वयाच्या चाळीस पायऱ्या चढून (किंवा उतरून) झाल्या. लिहू लागलो त्यालाही दोन दशकांहून अधिक काळ उलटला. अभावग्रस्त असलेला भूतकाळ आणि भौतिकदृष्ट्या संपन्न असलेला वर्तमानकाळ मी जगतो आहे. या दोन्ही काळाचे मोजमाप जेव्हा मी करतो, तेव्हा त्यात फार मोठे अंतर पडलेले दिसते. पहिला काळ हा अभावाचा असूनही संपन्न वाटणारा, तर दुसरा सर्वार्थाने संपन्न असूनही अस्वस्थ करणारा. अर्थात, ही संपन्नता आणि अस्वस्थता केवळ मानसिक स्वरूपाची आहे का? जाणिवेच्या पातळीवर फार प्रगल्भ नसलेल्या काळाबद्दलचं आज वाटणारं आकर्षण, हे शंभर टक्के खरं आहे का? अशा प्रश्नांशी माझा झगडा सुरू असतो. पण एक गोष्ट खरी, मी आज कोणत्याही जाणिवेने लिहीत असेन, पण कळत-नकळत माझी मुळे ही माझ्या भूतकाळाला विसरू देत नाहीत.

गेल्या दोन-तीन दशकांत जागतिक पातळीवर झालेल्या बदलांचे परिणाम व्यक्ती म्हणून जसे माझ्या जगण्यावर झाले, तसे ते माझ्या गावावर आणि पर्यायाने एकूणच मानवी जीवनावर झाले. ‘काल आणि आज’ अशी तुलना याच परिणामातून आपण करत असतो. पण असं करत असताना, फक्त ‘काल’चंच स्मरण मी करत राहू की ‘आज’वर बोलत राहू, असे द्वंद्व माझ्या मनात सतत सुरू असते. कारण ‘बदलपूर्व’ आणि ‘बदल’ असे दोन्ही काळ मी अनुभवलेले आहेत. या दोन्ही काळांशी माझे नाते आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्वच घटनांनी मी प्रभावित झालो आहे. यातूनच माझा अनुभव आकाराला आला. हे अनुभव बदलत जातात, तशी संवेदनशीलता बदलते. या संवेदनशीलतेतूनच मी या घटनांना वेगवेगळ्या पातळीवर भावनिक, मानसिक प्रतिसाद देत असतो. आणि हा प्रतिसाद देण्यासाठी मला अधिक जवळची वाटणारी गोष्ट आहे, कविता! म्हणून व्यक्त होण्यासाठी कविता हे माध्यम मी माझ्यापुरते स्वीकारले आहे.

काळ कधीच स्थिर नसतो. कधी काळी आपल्याला व्यापून असणाऱ्या गोष्टी थोड्याच दिवसांत एकदम गैरलागू ठरतात आणि एकदम नव्या गोष्टी आपल्या अस्तित्वावर येऊन धडकतात. आपण हादरतो. अशा बदलांकडे आपण डोळेझाक करू शकत नाही. या धडकल्याचे परिणाम समूहावर होतात. तिथल्या पर्यावरणावर, मूल्यव्यवस्थेवर, नैतिक-अनैतिक गोष्टींवर, धर्म आणि अध्यात्मावर, परंपरा आणि प्रदेशावर, एकूणच काय तर, माणसाच्या सर्व जाणिवांवर हे बदल आघात करतात. कधी कधी हे बदल आकर्षक वाटतात. नव्या जगाशी आपण आता जोडले गेलो आहोत, ही जाणीवही त्यात अंतर्भूत असते. पण हळूहळू या बदलांचे दूरगामी परिणाम आपल्यावर होत जातात. जुन्या चौकटी तुटून नव्यांची मांडामांड सुरू होते. नवे वाद (इझम), नवी संस्कृती, नवी जीवनप्रणाली, नवी पिढी जन्माला येते. हे सगळे बदल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनशैलीला घडवत जातात. या बदलांना आपण शरण जातो आणि हळूहळू या प्रक्रियेचाच एक भाग बनतो. आपल्या भोवतीचे सांस्कतिक अवकाशही याला अपवाद असत नाही. अशा वेळी माणूस म्हणून जगताना या सगळ्या आसपासच्या घटनांना वगळून आपल्याला जगता येत नाही. या काळात जगताना होणारी आंतरिक घुसमट म्हणूनच मला अस्वस्थ करते. ही अस्वस्थता माझ्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे.

कौटुंबिक स्तरावरचे अनुभव असोत किंवा भोवतालातले असोत, ते आधी आपण नीट समजून घेतले पाहिजेत, असे मला नेहमी वाटते. समजून घेतल्याशिवाय जगण्याचा निर्णय घेता येत नाही. विद्यमानकाळ हा अनेक स्तरीय गोंधळांचा, अफवांचा, आकस्मिक संकटांचा, अंतर्बाह्य भकास करणारा, प्रेमभावाला शून्य करणारा, तडजोड करायला लावणारा, माध्यमांच्या एकाधिकारशाहीतून नवनव्या सवयी लावणारा, वर्णसंघर्षाचा, धर्म, जात आणि सामाजिक वर्तणूकही निर्धारित करणारा आहे. अशा काळात जगणाऱ्या माणसाच्या मानसिकतेसंबंधीचे भान माझ्याकडे असायला हवे. ते असेल तरच मला इथल्या मूल्यव्यवस्थेची चिकित्सा करता येईल. जीवनाविषयी/ वर्तमानाविषयी काही प्रश्न उपस्थित करता येतील. या सगळ्या गोष्टी मी आधी माझ्याशी पडताळून बघतो, म्हणून माझ्या काही कविता आत्मकेंद्री किंवा आत्मनिष्ठ जाणिवांच्या वाटत असल्या तरी, या माझ्या कवितांचा स्वर हा तसा समूहाचाच स्वर आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर ही सामाजिक आत्मनिष्ठेची कविता आहे, असे म्हणता येईल. आयुष्य जसे नीट कळल्याशिवाय नीट जगता येत नाही, तशीच कवितासुद्धा कळायला हवी. आपल्या काव्यगत जाणिवा जर समृद्ध व्हायच्या असतील, समाजमनाचे वास्तवचित्रण आपल्याला करायचे असेल तर अत्यंत आत्मीय भावनेनेच अनुभव समजून घ्यावे लागतील. आज व्यक्ती आणि समाजाच्या सुखदु:खाचे स्वरूप बदलले आहे. अभिरुचीचा स्तर बदलला आहे. काळानुसार कवितेची आशयरूपे आणि आकृतीबंधही बदलत आहेत. कारण कविता ही जीवनाशी समांतर असणारी निर्मिती आहे. माझी कविताही तशीच बदलत गेली आहे. पण आपल्या प्रारंभिक प्रभावातून मुक्त होता आले पाहिजे. आपल्याला आपली कविता सापडायला हवी. कविता पूर्णांशाने कधीच आपल्याला सापडत नसते, हे जरी खरे असले, तरी किमान तिच्या आसपास जाण्याचा तरी आपण प्रयत्न करायला हवा. मी तसा प्रयत्न करतो आहे. अर्थात, अद्याप पोहोचलेलो नाही.

कविता ही खूप गंभीर अशी कृती आहे, असे मला वाटते. ती अगदी सहजपणे तुमच्याजवळ येत नाही. ती आतून आली पािहजे. तशी ती येत नसेल, तर तिच्या जवळही आपण फिरकू नये. कारागिरी करून वाहवा मिळवणारी कविता दुर्दैवाने आज खूप वाढली आहे. अशा प्रदूषित काळात मी माझ्या कवितेला जपण्याचा प्रयत्न करतो. कविता ही माझी रक्तवाहिनी आहे. जर ती रक्तवाहिनी असेल तर मी तिची काळजी घ्यायलाच हवी.
(शब्दांकन - विष्णू जोशी)
(vishnujoshi80@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...