आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vishram Gupte Article On Globalization And Its Effects

उत्सव जागतिकीकरणाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिकीकरणाच्या संदर्भात आपली सांस्कृतिक समज ‘हे किंवा ते’ किंवा कॉम्प्युटरच्या बायनरी लॉजिक म्हणजे ‘0-1’ या द्वंद्वात्मकतेच्या चौकटीतून व्यक्त होते. एक तर हे खरं किंवा ते खरं असं म्हटलं, की या दोन परस्परविरोधी ध्रुवांमधल्या जागेकडे दुर्लक्ष होतं. शंभर टक्के खरं आणि धादांत खोट्यामध्ये मोठा अवकाश असतो. त्याकडे दुर्लक्ष करून फायदा नसतो.

जागतिकीकरणातून आर्थिक समृद्धी आली; पण सांस्कृतिक समृद्धी गेली, असं बरेच साहित्यिक म्हणतात. ‘सांस्कृतिक समृद्धी की आर्थिक समृद्धी?’ असा द्वंद्वात्मक पेच टाकला की माणूस गडबडतो. आर्थिक समृद्धीतून माणूस सांस्कृतिकदृष्ट्या दरिद्री होऊ शकतो, ही अस्सल भारतीय भीती भौतिकतेच्या न्यूनगंडातून आणि आधिभौतिकतेच्या अहंगंडातून येते. ती तर्कशास्त्रावर टिकणारी नाही. श्रीमंत समाजही सुसंस्कृत असू शकतात. उदा. युरोप. ‘संपर्क की संवाद?’ असाही एक द्वंद्वात्मक पेच टाकण्याची नव्या साहित्यिकांना खोड जडली आहे.

जागतिकीकरणाने संपर्कक्रांती झाली. इंटरनेट आणि मोबाइल फोनचे प्रस्थ वाढले. त्यामुळे दूरच्या माणसाशी संपर्क वाढला; पण जवळच्या माणसाशी संवाद तुटला, हे कंठशोष करून सांगितलं जातंय. पण जवळच्याशी संवाद तुटावा, असं काही संपर्कक्रांतीचं लॉजिक नाही. बहुसंपर्काची चूस संपली की संवादाची निकड भासू लागते आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा अडसर दूर सारून एक माणूस दुस-या माणसाला प्रत्यक्ष भेटू शकतो. किंबहुना, तो तसा आजही भेटतो आहेच. जसा मी सगळ्यांशी संपर्क साधू शकत नाही, तसाच संवादसुद्धा. याचं वस्तुनिष्ठ भान मला हवं.

‘लोकल की ग्लोबल?’ हा तिसरा कृतक पेच टाकला जातोय. ग्लोबलने लोकलवर आक्रमण केले. त्यामुळे लोकलचा सत्यानाश झाला. लोकल सुंदर, तर ग्लोबल कुरूप; लोकल संवेदनशील तर ग्लोबल व्यापारी मनोवृत्तीचं, इत्यादी द्वंद्वात्मक युक्तिवाद करण्यात साहित्यिक तरबेज झालेले दिसतात. हे द्वंद्वसुद्धा बोगस आहे. आज लोकल आणि ग्लोबल दोन्हीच्या संपर्कातून आपला सांस्कृतिक अवकाश आकार घेतोय. एकाशिवाय दुस-याला अर्थ नाही. नुसत्या लोकलचा म्हणजेच प्रादेशिकतेचा उदोउदो केला, तर वंचित समाजातली माणसं आहे त्याहून अधिक गर्तेत बुडतील. पारंपरिक गावगाड्यात वंचित समाजाचं तळाशी असणं गृहीत धरलं गेलं. मात्र लोकलमध्ये ग्लोबलच्या चंचुप्रवेशामुळे लोकलमध्ये नवी हालचाल सुरू झाली. पारंपरिक सामाजिक उतरंड डळमळली. उभी (व्हर्टिकल) समाजव्यवस्था आडवी (हॉरिझाँटल) होऊ लागली. लोकलचा आग्रह धरणारे बहुतांश उभ्या व्यवस्थेचे वकील आहेत आणि त्यांची रम्य परंपरा चातुर्वर्ण्यावर बेतलेली आहे.

‘शुद्ध संस्कृती की अशुद्ध संस्कृती?’ हा चातुर्वर्ण्याधिष्ठित द्वंद्वात्मक लोचा भारतीयांना जागतिकीकरणात सतावतोय. अशुद्ध म्हणजे भेसळयुक्त. अन्नातली भेसळ प्रकृतीस हानिकारक आहे. जसं की दुधात युरियाची भेसळ. पण सांस्कृतिक भेसळ म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चात्त्य मूल्यांचं मिक्सिंग माणसांना सहिष्णू करतं. ही गोष्ट रवींद्रनाथ टागोरांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितली. त्यांनी शुद्ध-अशुद्ध असं द्वंद्व न मानता, मानवी संस्कृतीतलं संकरमाहात्म्य हेरलं. म्हणून टागोर वैश्विक विचारवंत ठरले. या संकरमाहात्म्याला पोस्टमॉडर्न साहित्यिक चर्चेत एक सुंदर शब्द आहे, ‘चटनीफिकेशन’. चटणीत अनेक गोष्टी एकजीव करून खातात. जागतिकीकरणात सांस्कृतिक चटणीला नाकं मुरडून फायदा नाही. उलट ती खाल्ल्याने माणूस अधिक सहिष्णू आणि कमी हिंसक होतो, असं टागोरांपासून अमर्त्य सेन आणि आशिष नंदी सांगत असतात. तिघेही सांस्कृतिक वैविध्याचे सच्चे प्रवक्ते आहेत. जागतिकीकरण ही व्यामिश्र अशी मानवी जगण्याची अवस्था आहे. ती हिमयुगासारखी अटळ आहे. या अवस्थेपासून माणसाची सुटका नाही. पृथ्वीवरच्या सुमारे साडेसात अब्ज लोकांची भौतिक विकासाची आकांक्षा पूर्ण कशी होईल, याबद्दल अर्थतज्ज्ञ अहोरात्र विचार करताहेत. अ‍ॅडम स्मिथपासून तर अमर्त्य सेनपर्यंत सगळे अर्थशास्त्रज्ञ जगाच्या कल्याणाने प्रेरित होऊनच स्वत:च्या थेअरीज मांडत आलेयत, कवींचं ऐकून नाही. जगातला कुठलाही कवी, कादंबरीकार, चित्रकार आणि भाष्यकार जागतिकीकरणाची प्रक्रिया उलथवून लावू शकणार नाही, हे लक्षात घेणं भाग आहे. व्यापार हा मानवी संस्कृतीचा केंद्र्रबिंदू होता, आहे आणि यापुढेही असेल. व्यापारातून पोट भरतं. ते भरलं की हृदयाची गोष्ट सांगण्याची सोय होते. रिकाम्या पोटी अ‍ॅसिडिटीच होते. त्यामुळे एकीकडे संपर्कक्रांतीतून आणि माध्यमक्रांतीतून मिळणारे फायदे लाटायचे; पण जागतिकीकरणाच्या नावाने शंख करायचा, ही बहुतांश साहित्यिकांची दुटप्पी मानसिकता वाचकांच्या संभ्रमात आणि उदासीत भर घालते. कवी व्यवहारी नसतात आणि अर्थतज्ज्ञ कवी नसतात. सांस्कृतिक स्वास्थ्यासाठी दोन्ही लागतात. जागतिकीकरण वाईट म्हणणारे जागतिकीकरणपूर्व समाज सुखी होते, असं सुचवतात. जे गेलं ते रम्य होतं; जे आलं ते हिडीस, अशा प्रतिगामी विचारसरणीमुळे समाजात नॉस्टॅल्जियाचा प्रादुर्भाव होतो. साहित्यिक जुन्या आठवणीत रमतात. खूपदा ते आठवणींशी प्रामाणिक न राहता त्यांची अफरातफर करतात. नकळत आठवणींचा यूटोपिया रचतात. येणारं वास्तव नाकारतात. आपल्या विशिष्ट परिस्थितीला जागतिकीकरणाची प्रक्रिया कारणीभूत आहे, हे म्हटल्याने साहित्यिकाला स्वत:च्या कृतीची जबाबदारी टाळता येते. समाज कुठलेही असो, आर्ष, आधुनिक किंवा उत्तर आधुनिक. या समाजातली माणसं, जर स्वत:च्या उक्ती आणि कृतीसाठी स्वत:ला जबाबदार न मानता एखाद्या जागतिक ट्रेंडला दोषी ठरवत असतील, तर असे समाज कायम बालिश राहतात. ते कधीच प्रौढ होत नाहीत. प्रौढ होणं म्हणजे स्वत:च्या कृतीची आणि जगण्याची जबाबदारी घेणं, हा मानसोपचारातला आद्य नियम एकूणच मानवी व्यवहाराला लावला तर जागतिकीकरणाचा बाऊ करण्याची गरज उरत नाही. हे जग आणि जीवन परिवर्तनशील आहे. इथे बदल हा एकमेव स्थिर भाव आहे. त्यामुळे काल होतं ते आज नाही. आज असेल ते उद्या नाही. हे स्वीकारलं की भोवताली घडणारे बदल कळतात. पृथ्वीची लोकसंख्या कमी असताना रम्य उत्पादन पद्धती, रम्य मालक-मजूर संबंध आणि रम्य मानवी नातेसंबंधांची तरफदारी शक्य होती. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माणसांची आयुर्मर्यादा वाढली. त्यामुळे जगाची लोकसंख्या वाढली. या लोकसंख्येच्या भरणपोषणाचा आणि प्रतिष्ठापालनाचा प्रश्न निर्माण झाला. मार्क्सवाद, गांधीवाद आणि समाजवाद अपयशी झाल्यानंतरच जागतिकीकरणाची एंट्री झाली आहे, याचं इंगित काय असावं?
ख्रिस्ताच्या चमत्कारामुळे मुके बोलू लागले, आंधळे बघू लागले, बहिरे ऐकू लागले, लंगडे चालू लागले आणि मेलेले जिवंत झाले, असं बायबलमध्ये सांगितलं आहे. असे भन्नाट चमत्कार हिंदू पुराणांमध्येसुद्धा भेटतात.

जागतिकीकरणामुळे कालचे मूक समाज (मोबाइलवर) बोलू लागले. हा एक चमत्कारच आहे. जो भारतीय समाज हजारो वर्षांपासून मुका होता; ज्येष्ठांसमोर ज्याला फक्त मान खाली घालून निमूट बसावं लागायचं, तो भयभीत समाज आज मान वर करून, फोनवर का होईना मनातलं बोलून मोकळा होतोय. यातून नव्या जगात विलक्षण ऊर्जा निर्माण होतेय. या ऊर्जेला जागतिकीकरणाच्या कालखंडात सशक्तीकरण हा शब्द आहे. जागतिकीकरणाने परिघावरच्या कोट्यवधी लोकांचं सशक्तीकरण झालं आहे. यामुळे प्रस्थापित बोलघेवडे समाज भयभीत झाले, तर समजू शकतं; पण साहित्यिकांनी तरी या सशक्तीकरणाला मोकळ्या मनाने स्वीकारावं.

नव्या जगातल्या साडेसात अब्ज लोकांना प्रतिष्ठेचं जगणं कसं शक्य होईल, हे मानवतेसमोरचं खरं आव्हान आहे. ते पेलायचं असेल तर सर्वसमावेशक विचारसरणीला पर्याय नाही. दुस-याचा तो चंगळवाद; आपला तो आवश्यक उपभोग, ही दांभिकताही कामाची नाही. पूर्वी उपभोगाच्या केकचा आकार लहान होता, जागतिकीकरणानंतर तो मोठा झाला. त्यात वाटेकरी वाढले. माणसं कुपोषणाने मरण्याऐवजी अतिपोषणाने मरू लागली. ही गोष्ट शोचनीय नाही. राहता राहिला आत्मप्रत्ययाने जगण्याचा प्रश्न. जागतिकीकरणात माणसाने आत्मप्रत्यय फेकून जगावं, अशी काही ‘डंकेल’ किंवा ‘गॅट’ प्रस्तावात पूर्वअट नाही. सजग माणसाला स्वत:चा आवाज ऐकू येतोच. तो ऐकत जगावं. जागतिकीकरण साजरं करावं.

vishram.sharad@gmail.com