आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्‍या आत्‍महत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला नव्या नाहीत. पण त्याच वाटेने लहान मुले जाऊ लागली तर! शेतकऱ्यांनी जीवनाचे भयानक वास्तव पाहिलेले असते. त्यातून प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली तर त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. हे एक वेळ समजून घेता येण्यासारखे आहे. पण लहान मुलांनी, ज्यांच्या जीवनाची नुकतीच कुठे सुरुवात होते आहे अशांनी, आत्महत्येचा मार्ग पत्करावा, हे अनाकलनीय आणि मन सुन्न करणारे आहे.
 
फक्त आपल्या महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत एकदोन नव्हे तर चक्क बावीस मुलामुलींनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले. बरं ज्या कारणासाठी आत्महत्या केल्या ती कारणेही क्षुल्लक. टीव्ही पाहू दिला नाही, शाळेतील सहलीसाठी पैसे दिले नाहीत, अभ्यासाचा ताण, पेपर कठीण गेला, आईवडील रागावले, शाळेत शिक्षकांनी शिक्षा केली, मित्रांबरोबर भांडण झाले यांसारख्या कारणांवरून या आत्महत्या झाल्या आहेत. क्षुल्लक कारणासाठी आयुष्य संपवून टाकण्याच्या या लहान मुलांच्या घटनांनी शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांना चिंतेत टाकले आहे.
 
साधारणपणे बारा ते अठरा वयोगटातील ही मुले. यात दोष फक्त मुलांचा आहे असे नाही. आपली बदललेली मानसिकता, मुलांकडून असणाऱ्या अवाजवी अपेक्षा, आपल्या मुलांची इतरांशी सतत तुलना केल्याने आणि त्यावरून सतत त्यांना अपमानित व्हावे लागल्याने त्यांचा होणारा मानभंग या गोष्टीही मुलांच्या आत्महत्येच्या निर्णयाला कारणीभूत होतात.
 
याशिवाय न पेलवणारे अभ्यासाचे, अपेक्षांचे ओझे, सततच्या परीक्षांचा ताण याही गोष्टी कारणीभूत आहेत. त्यांची सहनशीलता दिवसेंदिवस कमी होत आहे. टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम्सवरील हिंसाचार, क्रौर्य या  गोष्टी त्यांची मानसिक, भावनिक क्षमता कमी करत आहेत. पण यापेक्षाही माझ्या दृष्टीने महत्त्वाची काही कारणे आहेत. आजकाल बऱ्याच घरांतून आईवडील दोघेही नोकरी किंवा काही उद्योग करतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजीआजोबा असणारी घरे कमी झाली आहेत.
 
आईवडील आणि मुले यांच्यातील संवाद हरवत चालला आहे. मुलांना समजून घेण्यात आम्ही कुठे तरी कमी पडत आहोत. दुसरे म्हणजे, आजकाल प्रत्येकाला एक किंवा दोन मुले असतात. साहजिकच ती अत्यंत लाडकी असतात. त्यांचे प्रत्येक हट्ट पुरवले जातात. नाही ऐकायची, नकार पचवायची, अपयश पचवायची त्यांची क्षमताच जणू नाहीशी होते आहे.
 
म्हणूनच लहानपणापासून त्यांना जे हवे ते लगेच देण्यापेक्षा काही काळाने द्यावे, तर कधी समजावून सांगून विशिष्ट गोष्टींपासून परावृत्त करावे. बरेचसे आईवडील हे करतातही. त्यांची मुले मानसिकदृष्ट्या सुदृढ बनतात. मी नुकतीच एक गोष्ट वाचली. शेजारीशेजारी सारख्या दिसणाऱ्या दोन घरांसमोर बाग लावली होती. एका घरात एक सेवानिवृत्त आजोबा राहात होते आणि त्यांच्या शेजारी एक भरपूर पगार असणारा इंजीनिअर राहात होता. दोघांनीही बागेत भरपूर झाडे लावली होती. इंजीनिअर साहेब झाडांना भरपूर पाणी आणि खत देत. त्यांची बाग चांगली फुलली होती. झाडे फोफावली होती. शेजारचे आजोबा मात्र झाडांना मोजकेच पाणी आणि खत देत असत, तरी त्यांची बाग छान होती.

एके दिवशी जोराचा वारा आणि पाऊस आला. इंजीनिअर साहेबांच्या बागेतील झाडे उन्मळून पडली. आजोबांच्या बागेतील झाडे मात्र शाबूत होती. असे का झाले, हे इंजीनिअर साहेबांना कळेना. त्यांनी याचे कारण आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले, “साहेब तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या पण अति प्रमाणात. आणि त्यामुळेच तुमच्या झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत.
 
मी झाडांना गरजेपुरतेच किंवा कमी पाणी दिले. त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडांची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याशा वाऱ्याला आणि पावसाला बळी पडली. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने ती मजबुतीने उभी राहिली आणि वाऱ्याला आणि पावसाला तोंड देऊ शकली.” आपल्या मुलांचेही असेच आहे. इमारत मजबूत हवी असेल तर इमारतीचा पाया भक्कम हवा.
बातम्या आणखी आहेत...