आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंट आणि आपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमा आपल्याला बंदिस्त करतात. मग त्या रूढीपरंपरांच्या, वाईट विचारांच्या असतील. त्यात वर्षानुवर्षे आपण स्वत:ला जखडून ठेवलेले असते. त्यातून मुक्त कधी होणार? मला या ठिकाणी कुठेतरी वाचलेली अरब आणि उंटाची गोष्ट आठवते. एका अरबाजवळ पुष्कळ उंट होते. तो त्यांना बांधून ठेवत असे. उंटांनाही त्याची सवय झाली होती. एकदा त्या अरबाकडे एका उंटाला बांधून ठेवण्यासाठी दोर नव्हता. तेव्हा तो एक युक्ती करतो. त्या उंटाला खुंटाला बांधून ठेवण्याचे फक्त नाटक करतो आणि काय आश्चर्य! सकाळी जेव्हा सगळे उंट सोडले जातात तेव्हा तो उंट (न बांधलेला) आपल्या जागेवरून हलत नाही. शेवटी त्या अरबाला पुन्हा त्या उंटाला सोडण्याचे नाटक करावे लागते तेव्हा तो हलतो. ही कथा आपल्याला बरेच काही सांगून जाते. त्या उंटाप्रमाणेच आपणही सवयीचे गुलाम झालेलो असतो. एका अदृश्य शृंखलेने आपण आपल्याला जखडून घेत असतो, एवढे पक्के की आपले आपल्यालाही कळत नाही. जेव्हा कोणी आपल्याला त्याची जाणीव करून देतो, तेव्हाच ते आपल्या लक्षात येते. कधीकधी याच अदृश्य शृंखला आपली प्रगती कुंठित करतात, कारण आपण आपली क्षमताही पूर्णपणे ओळखलेली नसते. आपला न्यूनगंड आपली प्रगती होऊ देत नाही.
या विजयादशमीच्या शुभ वेळी आपण निश्चय करूया. सीमोल्लंघन करूया. देऊ फाटा आपल्या निरर्थक रूढींना, वाईट विचारांना. करूया संकल्प जातीभेदाच्या, उच्चनीचतेच्या, स्त्री-पुरुष भेदाच्या भिंती तोडण्याचा, आणि बळकट करूया शृंखला मानवतेची, प्रेमाची, विश्वबंधुत्वाची.