आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग हे परिवर्तनाचे शास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग हा आत्मशोधाचा प्रभावी मार्ग आहे, हे खरे; परंतु, योग आणि आधुनिक जीवनशैली यांचा मेळ कसा साधायचा? मन:शांतीत अडथळा ठरणाऱ्या षड‌्रिपूंवर विजय कसा मिळवायचा? धकाधकीच्या जगण्यातही योगशास्त्राला अपेक्षित जीवनशैली कशी जगायची?
आदी प्रश्नांना प्रतिसाद देणारे नाशिक येथील योग विद्या धामचे संस्थापक-अध्यक्ष विश्वास मंडलिक यांचे हे मनोगत...
योग अभ्यास आणि सध्याची जीवनशैली यांचा मेळ साधण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, हा मुळात लोकांचा गैरसमज आहे. आज वयाच्या ७१व्या वर्षी मी नियमितपणे माझा संपूर्ण वेळ योग अभ्यासाला देऊ शकतो, पण यासाठी मला अथक प्रयत्न आणि खूप झगडे करावे लागलेत, असं काहीही नाही. योग म्हणजे जोडण्याचे शास्त्र. सर्वप्रथम माणसांना माणसांशी जोडणारा अभ्यास म्हणजे योग! आज भारतात योग अभ्यासाला स्वतंत्र स्थान प्राप्त आहे. ५३ वर्षांपूर्वी जेव्हा नाशिकमध्ये योगविद्या शिकवण्यास सुरुवात केली, तेव्हा कुतूहलातून लोक हे शिकण्यासाठी येत होते. आता तसं राहिलेलं नाही. जागतिक दर्जा मिळाल्याने लोक अभ्यास म्हणून योगशास्त्र शिकत आहेत.
मी २० वर्षांपूर्वी माझी स्वत:ची इंडस्ट्री योग अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बंद केली. आज प्रत्येक धर्माचे, प्रत्येक वर्णाचे लोक योग विद्या धाममध्ये अभ्यासासाठी येतात. त्यांच्या आयुष्यातील समाधान, स्वास्थ्य आणि सुख पाहिल्यावर इतरांनादेखील मनस्वी आनंद प्राप्त होतो.
योगशास्त्र हे जीवनशैली सुधारणारे, परिवर्तनाचे शास्त्र आहे, असे म्हणता येईल. प्रत्येकाला रुचेल, त्यांच्या शरीरयष्टीला मानवेल, अशी ताण-तणाव मुक्त करणारी शैली म्हणजे योग. यासाठी जीवनशैलीमध्ये फार बदल करण्याची गरज नाही. जो वेळ तुम्ही रोज स्वत:साठी देता, त्या टीव्ही, रेडिओ, गाणी किंवा इतर विरंगुळ्याच्या वेळामध्येच फक्त शरीराला योग्य असा प्राणायाम आणि आसने तुम्हाला बरे वाटेपर्यंत केल्याने अक्षरश: स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होते. हीच गोष्ट मी आत्मसात केली. सुरुवातीस पुण्यामध्ये योग शिक्षण पूर्ण केल्यावर जास्तीत जास्त वेळ योग अभ्यासासाठी आणि शिकलेल्या गोष्टी लिहून काढण्यासाठी दिला. एखादी गोष्ट मिळाल्याने माणसाला निखळ आनंद प्राप्त होतो, पण ती गोष्ट मिळण्यापूर्वी त्याला अतिशय मनस्ताप सहन करावा लागत असतो. योग साधनेचे हेच वैशिष्ट्य, मी माझ्या आयुष्यात पदोपदी अनुभवले आहे.

अनेक कठीण प्रसंगांना तोंड देताना योगाभ्यासाने राग, लोभ आणि अस्वस्थतेपासून दूर ठेवले.
अर्थात योग हे शास्त्र आहे, आरोग्यरक्षणाचा, ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. त्यामुळे त्याला कोणताही धर्म नाही, असे मला वाटते. आज योग शिकवताना अनेक देशांमध्ये जावे लागते. निरनिराळी माणसे भेटतात, वेगवेगळे धर्म, पंथ आणि वर्णाच्या या लोकांमध्ये वावरताना जरादेखील शंका मनात निर्माण होत नाही. कारण, आपण माणसांना जगणं शिकवणारे शिक्षक आहोत, हे आता मनाशी पक्के झाले आहे. ज्यांना विकार आहेत, त्यांचे विकार बरे करण्यासाठी योग आहे. ज्यांना विकार नाहीत, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग आहे. तो कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या जातीचा नाही. हे पटवून देताना मी अनेकांना सांगत असतो, एखादे आसन किंवा ध्यानधारणा करताना प्रार्थनेचा प्रश्न येतो. तेव्हा तुम्हाला आवडेल ती प्रार्थना म्हणा, यासाठी भाषा आणि धर्म गरजेचा नाही. जिथे मन एकाग्र होते, ती शाश्वत आनंद प्राप्त करण्याची शैली योग अभ्यासातून प्राप्त होते.

साध्या राहणीच्या लोकांना कधीच हे प्रश्न भेडसावत नाहीत. तुम्ही जितके साधे राहता, तितका तुमचा आत्मा चिरतरुण राहतो. आत्मा चिरतरुण राहिल्यास सौंदर्यंप्राप्ती हा गौण मुद्दा आहे. योग अभ्यासाने तेही साध्य होते. लोकांसाठी दिसणे, हे असण्यापेक्षा महत्त्वाचे होत चालले आहे, यात दुमत नाही. तुमचे दिसणे तुम्ही योगाभ्यासाने नियंत्रित करू शकता. शरीराचे तारुण्य योगाभ्यासाने टिकून राहते. बुद्धिमत्ता वाढते. शारीरिक, मानसिक विकास साध्य करता येतो.
सहज काही उदाहरणं सांगायची झाली तर, आज लोकांवर वाईट प्रवृत्तींचा इतका प्रभाव आहे की, आपल्याकडे चांगली माणसे आहेत, हेच लोक विसरलेत. योग अभ्यासात आम्ही लोकांना शुद्धी शिकवतो, लोक चक्क सदाचारी होताना मी पाहिले आहेत. स्वखुशीने लोक व्यसने सोडतात. एवढंच काय, तर लाच घेणं सोडतात आणि स्वत: येऊन कबूलदेखील करतात. फक्त योगाभ्यास शिकवणाऱ्याची आणि करणाऱ्याची तीव्रता योग्य असावी. धन, दौलत, वारसा हक्क या अशाश्वत गोष्टींसाठी झगडणाऱ्या व्यक्तींसाठी योग सगळ्यात लाभदायी आहे. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविताना मनाची होणारी दमवणूक त्या व्यक्तीस खच्ची करून टाकते. असे न करता फक्त काही काळ शांत बसून स्वत:कडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न तर तुम्ही नक्कीच करू शकता. आजच्या धावत्या जीवनशैलीमध्ये या व्यतिरिक्त आणखी सोपा कोणताच योगप्रकार सांगता येणार नाही. जेव्हा तुम्हाला निरनिराळ्या भाषेची माणसे भेटतात, त्यांची तुमच्याप्रती काहीही नाते नसताना जवळीक निर्माण होते. अशा वेळी लक्षात येते, की माणसाला त्याच्या परमेश्वराशी जोडणारे, म्हणजे त्या शाश्वत आनंदी तत्त्वाशी जोडणारे शास्त्र अस्तित्वात आहे. आज रोज सकाळी साधना करणे, प्राणायाम करणे, दिवसभर विद्यार्थ्यांना आश्रमांत जाऊन भेटणे, या व्यतिरिक्त तसे उल्लेखनीय काम काही नाही. हा वयाचा दोष म्हणावा लागेल, पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, माझ्या दिनचर्येमध्ये दोन योगशास्त्रावर चालणारी इस्पितळे आहेत. माझ्या जीवनशैलीचा सगळ्यात महत्त्वाचा नि आनंदाचा भाग, आज हीच इस्पितळे म्हणावी लागतील.
एरवी मला असे वाटते की, फास्ट फूडच्या जमान्यात खाण्या-पिण्याच्या सवयी बदलणे अनेकांना थोडे अवघड वाटते. पण सवयींवर नियंत्रण ठेवा. योगविद्या कुठेच तुमची असलेली जीवनशैली मोडीत काढून तुम्हाला बंधनांत अडकवत नाही. उलट तुमची या मोह-पाशांतून सुटका करण्याची शैली म्हणजे, योग विद्या आहे. विद्यार्थ्यांनी योगशास्त्रामध्ये अभ्यास करण्यास सुरुवात करावी, आज स्पर्धेच्याच युगाशी तुलना करायची असेल तर योगविद्येला प्रचंड मागणी आहे, हे लक्षात घ्या. बेशक आजच्या काळाशी तुमची विद्या, ज्ञान आणि कौशल्यांची सांगड घालायला हवी. योगविद्या ही पुरातन कला जरी असली, तरी ती आजही प्रत्येकासाठी आहे... कोणत्याही मर्यादा आणि अस्तित्वांच्या लढाईच्या पलीकडे जाऊन, याचा स्वीकार करण्याची मानसिकता असली की तुमच्या जीवनशैलीचा कायापालट होणार, हे निश्चित आहे.
(mandlikguruji@gmail.com)
(शब्दांकन : सई कावळे)
बातम्या आणखी आहेत...