आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखकाने वैविध्यपूर्ण विषयांसाठी बाहेरख्यालीच असावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखकाने एकाच विषयाच्या प्रेमात पडणं, वा त्यात जीवन वाया घालवणं हे बरं नव्हे. त्याने विषयाच्या बाबतीत बऱ्यापैकी बाहेरख्याली असायलाच पाहिजे. दहा दरवाजे अाेलांडल्याशिवाय अाणि छप्पन्न माड्या चढल्याशिवाय जीवनाची खरी अनुभूती येतच नाही... नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांनी ‘वाचक पसंती’ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची मुलाखत घेतली. कुसुमाग्रज स्मारकात दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात विलक्षण रंगलेल्या दिलखुलास मुलाखतीचा हा संपादित अंश...

प्रशांत दीक्षित : अभिव्यक्तीचं माध्यम असलेलं पेन अाणि कागद हाच माझा स्वभाव अाहे, हे तुम्हाला काेणत्या वयात जाणवलं? थाेडक्यात, तुमच्यातील व्यक्तिमत्त्व तुम्हाला कधी गवसलं?
विश्वास पाटील : चाैथ्या-पाचव्या इयत्तेत असतानाची ही गोष्ट. गावाच्या बाजूला असलेल्या नदीच्या पलीकडच्या बाजूला अण्णाभाऊ साठे हे महान दलित लेखक राहात हाेते. त्यांची सामाजिक विचाराच्या अंगानं जाणारी अाणि माय मराठीचं लेणं ठरावं, अशी ‘फकिरा’ नावाची कादंबरी मी त्या वयात पाठ केलेली हाेती. त्यांच्या लुसलुशीत भाषेनं आणि धारदार, टाेकदार शैलीनं मला वेड लावलेलं हाेतं. र. वा. दिघे या एका महान लेखकाची ‘सराई’ अाणि ‘पानकळ्या’ या कादंबऱ्या वाचताना माझं मन थरारून गेलं. त्यानंतर अातून वाटायला लागलं की, अापण काहीतरी लिहायला पाहिजे. दहाव्या इयत्तेत असताना पुण्याच्या ‘तरुण भारत’ दैनिकाने कथास्पर्धा घेतली हाेती. त्यात माहेर तुटलेल्या एका मुलीची ‘कायदा’ नावाची कहाणी मी प्रथम लिहिली. तिथेच मला लिखाणाची वाट सापडली.
प्रशांत दीक्षित : करिअरकडे लक्ष देताना तुमच्या व्यक्तिमत्त्वात साहित्याचे राेवले गेलेले बीज तुम्ही जाेपासले कसे अाणि त्याला उत्तेजना मिळाली कशी?
विश्वास पाटील : शब्दांची अाेढ लागलेली असतानाच पुढे अाचार्य अत्रेंची नाटकं, साने गुरुजींचे संस्कारक्षम साहित्य अाणि तुकारामांचे अभंग वाचनात अाले. कथा स्पर्धेनंतर उमेद मिळाली. अाता जसा ‘दिव्य मराठी’चा रविवार ‘रसिक’चा अंक उत्तम निघताे, तसाच त्या काळात ‘मराठा’चा रविवारचा अंक उत्तम असायचा. त्यात उत्तमाेत्तम कथा छापल्या जायच्या. कथांची निवड अाणि त्याचा पाठपुरावा स्वत: शिरीष पै करायच्या. त्यांना खऱ्या अर्थाने माझ्यातला लेखक सापडला. त्यामुळे सुरुवातीच्या काही कथा ‘मराठा’त प्रकाशित झाल्या. त्यानंतर ‘बिल्वदल’ मासिकात कथा प्रकाशित होत गेल्या.
प्रशांत दीक्षित : अापल्यात नक्की काेणती शक्तिस्थळं अाहेत, आणि लेखक म्हणून कुठले गुण अधिक विकसित करायला हवे, हे सांगणारा मार्गदर्शक त्या काळात तुम्हाला मिळाला का?
विश्वास पाटील : अारंभीच्या काळात म. द. हातकणंगलेकर, शंकर सारडा या दाेन्ही समीक्षकांनी माझ्यावर साहित्याचे संस्कार केले. त्यांनीच लिहायला प्रेरणा दिली. पण बऱ्याच वेळा असं वाटतं की, जीवनात अापण कष्ट करतच असताे, पण दहा टक्के महत्त्व याेगायाेगाला द्यावं लागतं. त्यामुळे काेण कुणाच्या राशीला लागणार, यावर बरंचसं जीवनातलं यश अवलंबून असतं. ‘पानिपत’ ही कादंबरी तर सुरुवातीला १२ प्रकाशकांनी नाकारली हाेती. त्या वेळी ‘राजहंस’चे माजगावकर वेगळ्या कारणामुळे विमनस्क अवस्थेत हाेते. ‘पानिपत’ वाचल्यानंतर मात्र ते प्रचंड प्रभावित झाले. ते म्हणाले, पानिपताच्या लढाईत लाख मराठे हरले असतील, पण तुम्ही जिंकलेले अाहात.
प्रशांत दीक्षित : तुमच्या साहित्यातील व्यक्तिरेखा वाचकांच्या नजरेसमाेर अगदी सहजतेने प्रकटतात. त्यात जिवंतपणा असताे. त्या अभ्यासाने आकारास येतात, की लिखाण हाती घेता तेव्हा त्या सरसर कागदावर उतरतात?
विश्वास पाटील : या व्यक्तिरेखा सहज येत नाहीत. त्यासाठी मला माझ्या खेड्याच्या परिसराचं देणं उपयोगी येतं. अामच्या गावात वर्षातून एकदा डाॅक्टर यायचे. त्यामुळे इतर वेळी इलाज स्वत:च करून घ्यावे लागत. एखाद्या कड्यावरून बैल पडला, तर त्याच्या माेडलेल्या पायावर अाम्हीच इलाज करायचाे. काेवळ्या बांबूची लस काढून, ती बैलाच्या पायाच्या जखमेत भरायचाे. बांबूचे वा वेलीचे बॅन्डेज लावायचाे. त्यामुळे पुढे सुभाषबाबूंचे किंवा संभाजी महाराजांचे सैन्य कुठे अडकले असेल, तर तिथले घाेडे अाणि अन्य जनावरांची काय अवस्था हाेत असेल, याचे वर्णन करण्यासाठी गावाकडचा अनुभव उपयुक्त ठरायचा. मला मुळातच भटकंतीचे माेठे वेड अाहे. शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे किल्ल्यांपैकी ८५ ते ९० किल्ले मी चढून गेलेलाे अाहे. त्यामध्ये रायगडसारखा किल्ला मी ३५ ते ४० वेळा चढलाे अाहे. या भटकंतीने मला अनेक व्यक्तिरेखा दिल्या आहेत.

प्रशांत दीक्षित : बैठक मारून माेठे प्रकल्प हाती घेण्याचे किंवा भव्यतेचे अाकर्षण तुमच्यात कशामुळे अाले असावे? की पुस्तकांचा परीघ भव्यच ठेवायचा, हे अाधीपासून ठरवून घेतले हाेते?
विश्वास पाटील : भव्यतेचे वेड हे मी बालपणापासून ज्या ग्रामीण भागात राहायचाे, त्या माझ्या अासपासच्या निसर्गातून, डाेंगरदऱ्यांतून माझ्यामध्ये उत्पन्न झाले हाेते. वडिलांनी ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत लाठ्या-काठ्या खाल्ल्या हाेत्या. तर अाईनेदेखील खूप कष्ट उपसले हाेते. त्यामुळे जीवन जगण्याची अाणि लढण्याची वृत्ती मला अशा कणखर अाईवडिलांकडूनच मिळाली. माझा पैसच व्यापक असल्याने तसे घडले असेल. माझ्या अाधीच्या काळातील र. वा. दिघे, ह. ना. अापटे यांनीदेखील वाॅल्टर स्काॅट, थाॅमस हार्डी, टाॅलस्टाॅय अशा दिग्गजांचे वाङ‌्मय काेळून प्यायले हाेते. त्याशिवाय माझे काॅलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक शांतीनाथ देसाई यांनी मला अत्यंत अफलातून असा शेक्सपिअर शिकवला. पुढे अन्य युराेपीय लेखकांचे साहित्यदेखील माझ्या वाचनात अाले. त्यामुळे ताेच संकर माझ्याकडे अाला असावा, असे मला वाटते. मी लिहिलेल्या अनेक पात्रांपैकी अनेक व्यक्तिरेखा अाजही जिवंत असून अशा भिन्न - भिन्न व्यक्तिरेखा केवळ एकत्रित गुंफण्याचे काम मी केले. मलाही माझ्या अासपासची माणसे टिपता अाली. लेखकाने टिपकागदाप्रमाणे असावे. लेखक हा जीवनातील जिवंत व्यक्तिरेखांचा धांडाेळा घेतच घडत जाताे. अापल्या परिघात येणाऱ्या प्रत्येक गाेष्टीला टिपत राहिल्यास, त्याचा परीघ अापसूकच विस्तारत जाताे. मात्र, हे सर्व सहजच घडत जाते.
प्रशांत दीक्षित : ‘महानायक’ लिहीत असताना ३०० पानी २७ माेठ्या वह्यांमध्ये तुम्ही रिसर्चच्या नोंदी करून ठेवल्याचे मला फार पूर्वी दाखवले हाेते. ते केवळ संशाेधनाचे लिखाण हाेते, कादंबरीचे नव्हे. तुमच्यात हा विशेष गुण कसा अाला?
विश्वास पाटील : पाषाणाला अाकार देताना शिल्पकार छिन्नी हातात घेताे, ताे दिवस माेजत नाही, काळ माेजत नाही. जाेपर्यंत ती मूर्ती बाेलकी हाेत नाही, ताेपर्यंत ताे तिच्यात जीव अाेतताे. मीपण ताेपर्यंत लिहीत राहताे. अापल्याला जाेपर्यंत अावडत नाही, ताेपर्यंत लिहिताे. ‘झाडाझडती’साठी दोन ड्राफ्ट, तर ‘पांगिरा’साठी मी तीन ड्राफ्ट लिहिले अाहेत. काेणत्याही कामासाठी खूप कष्ट करायला हवेत. संदर्भ अाणि कादंबऱ्यांचे ड्राफ्ट लिहून माझी ही बाेटे बघा अशी बेंड झाली अाहेत. शेवटी, किती ड्राफ्ट लिहिले, ते महत्त्वाचे नसते; त्यातून तुमच्या हाताला काय लागते, ते महत्त्वाचे असते. ‘श्रीकांत’ लिहिणाऱ्या शरतचंद्र चॅटर्जीसारख्या लेखकाने अायुष्यभर लिहिले. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव अाहे. किती लिहिता, त्यापेक्षा काय लिहिले, ते महत्त्वाचे असते. अायुष्यात मेहनतीला पर्याय नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे.
प्रशांत दीक्षित : तुम्ही लिखाण करताना परदेशातील अभिजात कलेकडेही वळलेले दिसतात. तेथील भव्यतेचे तुम्हाला अाकर्षण दिसते. पाश्चात्त्य विशेषत: ब्रिटन अाणि अमेरिकेच्या साहित्यात तुम्हाला नक्की काय अाढळते?
विश्वास पाटील : ‘नाॅट गाॅन विथ द विंड’ या माझ्या पुस्तकात जगात गाजलेले चित्रपट अाणि कादंबऱ्या यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला अाहे. ब्रिज अाॅन द रिव्हर क्वाॅय, अाॅल क्वायट इन द वेस्टर्न फ्रंट, ब्लू इंजिन अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या, नाटकं, सिनेमा यांचा तुलनात्मक अभ्यास मी केला अाहे. सुरुवातीला कादंबऱ्या वाचल्या. नंतर त्यापासून चित्रपट कसा तयार झाला असेल, हे अभ्यासले. या वेळी अाढळून अाले की, ‘ला मिझरेबल’ या चित्रपटाबराेबर ‘ब्लू एंजल’ आदी चित्रपटांनी पन्नास वर्षांपूर्वी जगभरातल्या प्रेक्षकांवर माेहिनी घातली गेली हाेती. ‘ब्लू एंजल’मध्ये तर शांताराम बापू यांच्या ‘पिंजरा’तील श्रीधर मास्तर उलगडताे. ताे मराठी नसून जर्मन अाहे, हे कळल्यावर धक्का बसताे. नाइट काॅलेजमधील मुलं सर्कशीतील लाेला-लाेला या नर्तिकेला बघायला जातात तेव्हा शाळेचे शिक्षक त्यांना शाेधायला जातात, अाणि ते सर्कशीतील कॅब्रे डान्सरच्या जाळ्यात अडकतात, हे त्या चित्रपटात दाखविण्यात अाले अाहे. हा १९२९च्या सुमारातील जर्मनीतील पहिला बाेलपट अाहे. त्यानंतर २५ वर्षांनी अनंत माने यांनी पटकथा तयार केली अाणि शांताराम बापूंनी त्यावरून ‘पिंजरा’ सिनेमाची िनर्मिती केली. वेगवेगळे चित्रपट बघितल्यावर अाणि कादंबऱ्या वाचल्यावर लक्षात येते की, माणूस हा सर्वत्र सारखाच अाहे. माेह, मत्सर, द्वेष, राग, संताप हे गुण-अवगुण जगभर सारखेच आहेत. वेगवेगळे कलावंत, लेखक त्याकडे काेणत्या नजरेने बघतात, हे महत्त्वाचे अाहे. याच अनुषंगाने ‘नाॅट गाॅन विथ द विंड’ हे पुस्तक लिहिले अाहे. या पुस्तकाकडे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यासाचा भाग म्हणून बघितले जाते. या पुस्तकाच्या निर्मितीची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या साहित्यिक जीवनातील ताे गाेड अपघात अाहे.

प्रशांत दीक्षित : कॅमेऱ्याची भाषा अाणि माध्यमाची भाषा भिन्न असते. तुम्हाला कॅमेऱ्याच्या भाषेचेही अाकर्षण वाटले का? त्या दृष्टीने मराठी कादंबऱ्यांचे प्रयाेग कितपत यशस्वी झाले? टाॅलस्टाॅयच्या अॅना करेनिनाचे चित्रपटात माध्यमांतर घडल्यानंतर तितकाच प्रत्यय येताे का?
विश्वास पाटील : अभिनेत्री विवियन लीने एकदा, तर दुसऱ्या चित्रपटात ग्रेटा गार्बाेने अॅना करेनिना साकारली अाहे. अशा प्रकारचे माध्यमांतर खूप प्रभावी हाेते. माझे जीवनदेखील बरेचसे चित्रपटांसारखे घडत गेले. अनेक माेठमाेठी माणसे माझ्या जीवनात अाल्याने, माझे जीवनदेखील बरेचसे चित्रपटासारखे अाहे. नाैशाद, राम कदमसारखे संगीतकार, दिलीपकुमारसारखा महान अभिनेत्याबराेबर ‘कलिंगा’ नावाच्या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. केवळ पाच टक्के काम राहिल्याने ताे चित्रपट प्रदर्शित हाेऊ शकला नाही. इलया राजांचाही मी फॅमिली फ्रेंड अाहे. विठाबाईसारखी तमाशा कलावंत माझ्या वडलांना मामा म्हणायची, त्यामुळे त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मिळाली. अशा अनेक दिग्गजांशी माझा अायुष्यात संबंध अाला. बरेचदा जीवनात अालेले असे रसरशीत प्रसंगदेखील जीवनात अाले असून, ते तशाच रसरशीतपणे माझ्या साहित्यात अाले आहेत.
प्रशांत दीक्षित : महाभारताचे कधी अाकर्षण वाटले नाही का ? की जवळपासच्या व्यक्तिरेखांनीच अधिक माेहित केले ?
विश्वास पाटील : रामायण, महाभारत, शेक्सपिअर माझे वाचून झाले. महाभारत, रामायणावर निरूपण करणारे अनेक लाेक अाहेत. मात्र, समाजात अशा अनेक गाेष्टी अाहेत, जिथपर्यंत लेखकांच्या लेखण्या पाेहाेचलेल्या नाहीत. असे विषय मला खुणावत अाहेत. मी खपाचा विचार करत नाही. जे मनाला भावते, ते लिहायचे अाहे, असाच माझा निश्चय अाहे. त्यामुळे सामाजिक विषयच मला लिहायचे अाहेत.
प्रशांत दीक्षित : मराठीत फारशा फॅन्टसी नाहीत. जगभरात हॅरी पाॅटर, स्टार वाॅर्ससारखे फॅन्टसीचे दालन खुले आहे. मराठी साहित्यिक क्षेत्रात अशा विषयाची वानवा जाणवते, असे तुम्हाला वाटते का?
विश्वास पाटील : नाही, मला फॅन्टसीचे कधी अाकर्षण वाटत नाही. फॅन्टसीपेक्षा फॅन्टास्टिक असलेली भारतभर पसरलेली माणसे मला भावतात. बिहारमधल्या खेड्यातील एका गृहस्थाची पत्नी डाेंगरावरून घसरून पडली, ही बातमी १९९६मध्ये एेकली. त्यामुळे ताे मांझी अख्खा डाेंगर फाेडून रस्ता तयार करायचे काम करत असल्याचे समजले. १९९८मध्ये मी त्या ‘मांझी’ नावाच्या माणसाला भेटायला गेलाे हाेताे. अशा डाेंगर फाेडणाऱ्या माणसाची कहाणीदेखील माझ्या डाेक्यात अाहे. अशा प्रकारच्या माझ्या चार कादंबऱ्या अर्ध्यामुर्ध्या तयार अाहेत. त्या नक्कीच पूर्ण हाेतील.
प्रशांत दीक्षित : प्रशासकीय सेवेत राहून जी जनमानसाची, राजकारणाची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली, त्यातून एखादी राजकीय कादंबरी मनात अाहे का? की निवृत्तीनंतरचा ताे विचार अाहे?
विश्वास पाटील : नाही, असा विचार करून मी कधीच लिहिले नाही. अन्यथा ‘झाडाझडती’ किंवा ‘लस्ट फाॅर लालबाग’ लिहिलीच नसती. किंबहुना ‘लस्ट फाॅर लालबाग’सारख्या पुस्तकातून तुम्ही म्हणता त्या स्वरूपाचे काही लिखाण झाले अाहे. मुंबईत जिल्हाधिकारी असताना अनेक गँगस्टर अाणि एन्काऊंटरफेम पाेलिसांशीही संबंध अाला हाेता. माझे एक काका गिरणी कामगार असल्याने परळमध्ये राहायचाे. गिरणीतील पाळीप्रमाणे झाेपायचीही पाळी असायची. त्यामुळे पुढे जीवनात कळा कशा साेसायच्या, ते मला खऱ्या अर्थाने तिथूनच शिकायला मिळाले.
निळूभाऊंची सहृदयता
मी अाणि उत्तम कांबळे काेल्हापूरला शिकत असताना अामचा निळू फुलेंशी संबंध अाला. माझ्या गरिबीपायी तर ते अनेकदा माझी काॅलेजची फी भरायचे. एकदा त्यांना कुठला तरी पुरस्कार जाहीर झाला म्हणून, अाम्ही पार्टी मागितली. ते म्हणाले, संध्याकाळी ७ वाजता हाॅटेलवर या. अाम्ही हाॅटेलवर पाेहाेचून मालकाला विचारले, तर निळू फुले निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. जवळ पैसे नसल्याने अाता उपाशी पाेटाने झाेपदेखील येणार नाही, असे म्हणत, अाम्ही थाेडे अंतर गेलाे. तर हाॅटेलमधील पाेरगा धावत अाला अाणि मालकाने बाेलावल्याचे सांगितले. मालकाने सांगितले की, दुपारी काम संपल्याने ते लवकरच गेले, मात्र जाण्यापूर्वी तुमच्या दाेघांच्या जेवणासाठी त्यांनी पैसे भरलेत.
ठेवणीतले किस्से...
- ‘रणांगण’ नाटकाचे पहिले वाचन हे नाशकात कुसुमाग्रजांच्या घरी अाणि कानेटकरांच्या उपस्थितीत झाले हाेते.
- ज्ञानपीठ मंडळाचे अध्यक्ष असताना माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी माझ्या ‘पानिपत’ या कादंबरीचे हिंदीत भाषांतर करण्याचे अादेश देऊन त्या कादंबरीचे महत्त्व हिंदी भाषकांसाठीही तितकेच असल्याचे सांगितले हाेते.
- राजहंस अाणि मी एकत्र अाल्याशिवाय विचारांच्या ठिणग्या उडत नाहीत.
- माझ्या पाेतडीतल्या गाेळ्या संपल्या नाहीत. त्यामुळे भैरप्पांसारखे अात्मचरित्र लिहिण्याचा सध्या तरी विचार नाही.
- ‘झाडाझडती’ पुस्तकातील मजकूर हा शासनविराेधी असल्याचे सांगत एका कारकुनाने मला सस्पेन्ड करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिला हाेता.
बातम्या आणखी आहेत...