Home | Magazine | Rasik | vithabai bhau mang narayangaonkar tamasha maharashtra folk artist

लाज धरा पाव्हणं...

नम्रता भिंगार्डे | Update - Mar 03, 2012, 10:54 PM IST

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर. एकेकाळी तमाशा क्षेत्रात दुमदुमलेले नाव. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी लावणी नृत्यांगना.

 • vithabai bhau mang narayangaonkar tamasha maharashtra folk artist

  विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर. एकेकाळी तमाशा क्षेत्रात दुमदुमलेले नाव. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी लावणी नृत्यांगना. सावळा, परंतु देखणा चेहरा, गोड गळा आणि त्याच्या वरचढ अभिनय अशा कोंदणात चमचमणा-या विठाबार्इंच्या जीवनचरित्राची भुरळ जनसामान्य रसिकांना पडणे तसे स्वाभाविकच. पुरुषांच्या जगात वावरलेल्या विठाबाई जिवंतपणीच दंतकथा बनल्या. लफडेबाज, विकृत, व्यसनाधीन असे हिणवून निंदानालस्ती करणा-यांची पर्वा न करता मायबाप प्रेक्षकांनी विठाबार्इंना ‘तमाशासम्राज्ञी’ ही पदवी बहाल केली. आयुष्यभर अत्यंत पोटतिडकीने रसिकांची करमणूक केलेल्या ‘विठाबाई’ नावाच्या या ठिणगीवर काहींना चित्रपट बनवण्याची बुद्धी झाली आणि त्यायोगे पुन्हा एकदा प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी विठाबाई सिद्ध झाली, असेच म्हणावे लागेल.
  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जवळच्या लोकांनी केवळ व्यवसायासाठी विठाबार्इंशी संबंध जोडला. आता मरणोत्तरही चित्रपटाच्या अनुषंगाने त्यांच्यावर एकाच वेळी दोन निर्मात्यांनी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. एका अर्थाने पुन्हा एकदा व्यवसायाच्या तराजूत विठाबार्इंना तोलले जाणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथम विठाबार्इंसारख्या एका तमाशा कलावंतावर चित्रपट येतोय, याहून समाधानाची गोष्ट नाही; पण आता जो चित्रपट येईल, तो दर्जेदारच असावा, अशी माफक अपेक्षा बाळगली तर त्यात वावगे ते काय?
  लहानपणापासून होत असलेली उपासमार, वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरूझालेली विठाबार्इंची तालीम, 15 वर्षे वयाच्या कोवळ्या वयात एका व्यापा-याने केलेला बलात्कार, त्यातून स्वत:च्या तारुण्याची झालेली विखारी जाणीव, पुढे याच मानसिकतेत तारुण्याच्या जोरावर नाव कमावलेली धाडसी नृत्यांगना, प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी कलासक्त स्त्री, अनेक पुरुषांशी तिचा आलेला संबंध, तारुण्य ओसरल्यानंतर वाट्याला आलेले उपेक्षित वार्धक्य, असे चित्तथरारक आयुष्य चित्रपटाच्या दृष्टीने खाद्य ठरणारच. मात्र, विठाबार्इंवर एकाच वेळी दोघांना चित्रपट बनवण्याची दुर्बुद्धी सुचते आणि वाद सुरू होतात. विठाबार्इंच्या आयुष्यावर आजवर केवळ जगदीश खेबुडकर आणि योगिराज बागुल या दोघांनीच लिखाण केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि एकूणच कारकीर्दीचा आवाका ध्यानात घेता हे लिखाण तुटपुंजे असले तरी त्यांच्याबद्दलच्या ऐकीव कहाण्या मात्र विपुल आहेत. जगदीश खेबुडकरांच्या पटकथेवर आधारित संतोष राऊत यांनी चित्रपट तयार करायचा घाट घातला असतानाच, दुसरीकडे पुंडलिक धुमाळ यांनी योगिराज बागुल यांच्या पुस्तकाच्या आधारे चित्रपटाची सुरुवात केली. यामुळे विठाबार्इंवर उपलब्ध असलेल्या केवळ दोन साहित्यकृतींचे दोन भाग होणार, परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी इतके साहित्य पुरेसे नाही, हे चित्रपट बनवणा-यांना कसे काय लक्षात आले नाही, याचे आश्चर्य वाटते. गंमत म्हणजे, विठाबार्इंवर चित्रपटांच्या निमित्ताने संशोधन करण्याच्या दृष्टीने लावणी, तमाशा या कलाप्रकाराशी संबंधित जी काही मोजकी नावे आहेत त्यांच्या भेटीगाठी हे दोन्ही दिग्दर्शक घेत आहेत. यात दत्तोबा फुलसुंदर, संभाजी जाधव, साहेबराव नांदवळकर, मधुशेट नेराळे, अण्णा कामेरकर, प्रकाश खांडगे यांनी पाहिलेल्या वा अनुभवलेल्या विठाबार्इंवर दोन्ही दिग्दर्शकांना सारखीच माहिती मिळणार; मग दोन्ही चित्रपट वेगवेगळे कसे ठरणार, असा प्रश्न पडतो. या आधीही पुलंची ‘म्हैस’ आणि महानोरांचे ‘अजिंठा’ या दोन साहित्यकलाकृतींवरही अशीच वेळ आली आणि वादाच्या भोव-यात अडकून मूळ ‘कला’ बाजूलाच राहिली. असेच काहीसे विठाबार्इंच्या बाबतीत होणार हे दिसल्याने लोककलावंत दुखावला जातोय याचे भान कुणीच ठेवताना दिसत नाही. चार -दोन ठिकाणी सादर करायला मिळणारी संधी सोडल्यास महाराष्ट्रातली लोककला तशी उपेक्षित राहिली आहे. महाराष्ट्रातले लोककला प्रकार सरकारी उदासीनतेमुळे हतप्रभ झाले. अशा वेळी विठाबार्इंसारख्या अशिक्षित तमाशा कलावंताच्या आयुष्यावर चित्रपट तयार होणे, ही त्या क्षेत्राच्या दृष्टीने लाभदायक गोष्ट. त्यात तमाशा व्यवसायाचे वस्तुनिष्ठ चित्रण चित्रपटात होईल, अशी सर्वच तमाशा कलावंतांची अपेक्षा आहे. मुंबईतल्या हनुमान तमाशा थिएटरचे मालक मधुशेट नेराळे यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटात विठाबाईला ‘आदर्श’ म्हणून आणायचे असेल तर त्यांच्यातल्या अवगुणांनाही यशाचा एक भाग म्हणून दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शकांनी योग्य रीतीने पार पाडावी. विठाबाई ही तमाशा क्षेत्रातली प्रातिनिधिक स्त्री दिसली पाहिजे. विठाबार्इंचे व्यक्तिगत जीवन विखारी निंदानालस्तीला तोंड देण्यात गेले असले तरीही सार्वजनिक जीवनात त्यांची प्रतिमा किंचितही डागाळलेली नाही, हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे भूमिकेचे चित्रण करावे. विठाबाई तमाशा फडात काम करत असल्या, अनेक पुरुषांसोबत त्यांचे संबंध आले असले तरी त्या बाजारू स्त्री नव्हत्या, हेही ठसठशीतपणे दाखवता आले पाहिजे. एकूणच मधुशेट म्हणतात त्याप्रमाणे चित्रपट बनवताना दिग्दर्शकाला शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. तसेच विठाबार्इंनी जो काळ गाजवला त्या काळातले संगीत आणि आजच्या पिढीच्या आवडीचे संगीत यांचा मेळ घालून योग्य अशा लावण्या बसवाव्या लागतील. केवळ चित्रपट चालावा या दृष्टीने उडत्या चालीच्या लावण्या बसवल्या, तर विठाबाई हे काल्पनिक पात्र होऊन जाईल. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात सिनेमात नेसवल्या जाणा-या ‘लो वेस्ट’ रेडिमेड नऊवारी साड्यांवरही मधुशेट यांनी परखडपणे टीका केली. अभिनयात गुणवत्ता नसेल तर नटीला अशा प्रकारे अंगप्रदर्शन करावे लागते असे म्हणत विठाबार्इंच्या देहावरच नव्हे, अभिनयावर प्रेक्षक प्रेम करायचे, असेही त्यांनी सांगितले.
  ‘नाळ’ कथेचा बाजार
  असे म्हणतात, की विठाबाई गरोदर असताना नवव्या महिन्यात नाचण्यासाठी उठल्या आणि नाचता नाचता पोटात कळा येऊ लागल्याने रंगमंचामागे गेल्या. तिथेच बाळंत झाल्या आणि नाळ दगडाने ठेचून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा स्टेजवर नाचण्यासाठी आल्या. नाळ ठेचण्याची ही कथा या आधी सिंधुतार्इंच्या बाबतीतही त्यांच्या चित्रपटात दाखवण्यात आली. याचा अर्थ एक तर विठाबार्इंपासून सिंधुतार्इंपर्यंत नाळ ठेचण्याची कृती हे एखाद्या स्त्रीने आयुष्यात किती खस्ता खाल्ल्या आहेत हे दाखवण्याचे एकमेव परिमाण आहे, असा (गैर)समज प्रेक्षकांचा होऊ शकतो. विठाबार्इंची ही दंतकथा आजही छातीठोकपणे व्यासपीठावर सांगण्याच्या कौशल्याचे कौतुक करावे तितकेच कमी. याचा वापर तद्दन व्यावसायिकदृष्ट्या झाला तरी त्यात आश्चर्य वाटायला नको. ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुनाची?’ ही लावणी अजरामर केलेल्या विठाबार्इंना केवळ पोटासाठी नव्हे, तर कलेसाठी नाचावेसे वाटले. पोटासाठी नाचल्याने कुणी मोठे होत नाही; मात्र कलासक्त विठाबार्इंनी जितके नाव कमावले तितकाच पैसादेखील कमावला. चित्रपट कोणताही यशस्वी होवो मात्र ‘तमाशा’च्या फडावर बिजलीसारख्या कडाडणा-या विठाबार्इंची त्या निमित्ताने आठवण निघेल आणि नव्या पिढीला महाराष्ट्राच्या एका कोप-यातल्या तमाशा या कलाप्रकाराशी तोंडओळख होईल, एवढीच माफक अपेक्षा तमाशा अभ्यासक आणि रसिकांची आहे.

Trending