आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटः समृद्ध अडगळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्मेटसक्तीचे वारे पसरू लागल्यावर कुणाच्या घरचे धूळ खात पडलेले हेल्मेट चकचकीत होऊन मुकुटाप्रमाणे मिरवतेय...
तर अनेकांंच्या घरात या पाहुण्याने ऐटीत पदार्पण करून कायमची जागा पटकावलीय. अशाच एका वाचकाचा अनुभव...

श निवार सकाळी साडेनऊची वेळ. सवयीप्रमाणे ऑफिसला जाण्यापूर्वी घाईघाईत पेपर चाळला. आदल्या रात्री टीव्हीवर बातम्या पाहिल्यामुळे आज सकाळच्या वृत्तपत्रातील बातम्यांत फारसे नावीन्य वाटले नाही. पण औरंगाबाद आवृत्तीतील “१ फेब्रुवारीपासून स्वयंचलित दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती अन्यथा रु. ६००/- दंड भरावा लागेल.” या बातमीने थोडा विचार करण्यास भाग पाडले. हेल्मेटबाबतचे नियम वळवाच्या पावसासारखे येतात आणि जातात. क्षणभर असेच वाटले. परंतु भीषण अपघातांच्या बातम्या मागील अनेक वर्षांपासून सतत वाचनात, ऐकण्यात आल्यामुळे मन विषण्ण होत होते! वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, हेल्मेट वापरणे योग्यच आहे, असे वाटू लागले. बुद्धीलाही पटू लागले. हेल्मेटसक्तीचा विचार घरात आणि घराबाहेरही चर्चेने गाजला.
रविवार, ३१ जानेवारीची पहाट उगवली. सुट्टीचा दिवस म्हणून हक्काने जास्त वेळ झोपायचे ठरवले, परंतु हेल्मेटने जागे केले. पत्नी म्हणाली, “अहो उठा लवकर, आज तुम्हाला बाजारात हेल्मेट खरेदी करायला जायचे आहे.”

मी म्हणालो, “हो, जाता येईल सावकाश. काय घाई आहे. अगं, आरामाचा दिवस आहे ना?”
दुपारी बारा ते एकच्या सुमारास हेल्मेट खरेदीसाठी मार्केटला निघालो. जवळपास असलेल्या मोटरसायकल सर्व्हिसिंग सेंटर तसेच इतर लहानमोठ्या अॅक्सेसरीजच्या दुकानात हेल्मेटची चौकशी करत फिरत होतो. तर काय, चक्क हेल्मेट आत्ताच संपलीत, उद्या स्टॉक येईल, अशी उत्तरे मिळू लागली. तसाच पुढे फिरत राहिलो. पुढे एका दुकानात काही ग्राहक, महिला, मुली, सिनियर सिटिझन काका रांगेत उभे असलेले दिसले. मी पण काकांच्या पाठीमागे उभा राहिलो. काकांची हिटलरसारखी पांढरी मिशी लक्षवेधक होती. डोक्याला बांधलेला पांढरा रुमाल, इन केलेला शर्ट, हातात कापडी पिशवी आणि पायातील गमबूट्स असा त्यांचा पेहराव मी न्याहाळत होतो. पण काकांचा चेहरा चिंताग्रस्त वाटत होता.

न राहवून तेच म्हणाले, “फालतूचा भुर्दंड आहे आम्हा लोकांना. अशी कधी बातमी ऐकायला येते का? भरधाव वेगाने आजोबा गाडी चालवत होते. अमकं झालं, तमकं झालं! अहो, ही सक्ती तरुण पिढीला आवश्यक आहे. काय विमान चालवल्यासारख्या गाड्या चालवतात आणि आयुष्य गमावून बसतात. कारण पोरासोरांना जबाबदारीची जाणीवच नसते. हेल्मेट असावं, परंतु सर्वांसाठी सक्ती नसावी! अहो, आपल्या देशात चांगल्या गोष्टीसाठी सक्ती, दंड का करावे लागतात, तेच कळत नाही. आता या तरुणांनी आम्हाला धडकू नये, म्हणून आम्हाला हे घेणे भागच आहे.”
मी म्हणालो, “तसे नाही काका, सर सलामत तो हेल्मेट पचास! आधी डोक्याची सुरक्षितता पाहिलीच पाहिजे.”

“हजार रुपयांचं हेल्मेट आम्हा पेन्शनर्सना महाग वाटतं. औषधाच्या गोळ्यासुद्धा आम्ही एकदम आणत नाही. गुण आला तर पाहू, म्हणून दोन टप्प्यांत आणतो. आता हे हेल्मेट आम्ही जन्मात घातले नाही. वापरण्याचा सराव नाही. लहान लेकरासारखे बाळगावे लागणार. हेल्मेटचा ग्लास, त्याखाली चश्मा, आधीच कमी ऐकू येते त्यात ही हेल्मेटची कटकट! मला हेल्मेटची सुरक्षितता कमी वाटते. हे सक्तीने पैसे कमवण्याचे धंदे वाटतात, बाकी काय! हेल्मेट घालून काय होणार खड्ड्यातून, स्पीडब्रेकरवरून जाताना आम्हाला सगळं सांभाळून कसरत करावीच लागते!” काकांच्या बोलण्यातून संताप व्यक्त होत होता.

“काका, जे काही चालले आहे ते चांगल्यासाठीच, असे का नाही वाटत तुम्हाला?”
काका चांगलेच खट्टू झाले होते. रांग पुढे-पुढे सरकत होती. माझा नंबर जवळ येताच हेल्मेट संपली. मग मन विचारात अडकलं, आज जर हेल्मेट नाही मिळालं तर उद्या ऑफिसला रिक्षाने जावे लागणार. मला एक नाही तर चार हेल्मेट‌्स घ्यायची होती. कारण बायको, मुले, घरातील सर्वांनाच घराबाहेर पडावे लागते. काहीही करून आज हेल्मेट मिळवायचेच, असे ठरवले आणि फिरू लागलो. तेवढ्यात मित्राचा फोन, “हेल्मेट मिळाले का नाही? इथे चौकात भरपूर स्टॉक आहे.”

मी जाऊन पाहतो तर काय, तिथे एवढी मोठी रांग की, सिक्युरिटीवाले बोलवावे लागले. वाटलं, काही खरं नाही. बायकोचं ऐकलं असतं आणि सकाळीच रांगेत उभा राहिलो असतो तर...
माझ्या बालपणी ‘बॉबी’ आणि ‘शोले’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांच्या तिकिटांच्या खिडक्यांवर एवढ्या लांब रांगा पाहिल्या होत्या. गर्दी बरीच असल्यामुळे दुकानदार मेटाकुटीस आला होता. कपड्याप्रमाणे लोक निवडून निवडून रंग, साइज पाहून घेत होते. तेथे दोन महाविद्यालयीन मुलींचा संवाद चालू होता.

पहिली म्हणाली, “खूप जड वाटतं ना, स्टोलच बरा होता.”
दुसरी म्हणाली, “हेल्मेट घातल्यावर फोन कसा घ्यायचा, मला तर गाडी चालवत असतानाही फोन घ्यायची सवय आहे. ऐकू येईल ना? सगळी पंचाईत आहे.”
“ए काळा नको, हा घे स्काय ब्लू, छान दिसतो.”
“अगं, हेल्मेटमुळे आपल्याला पावडर, क्रिम, लिपस्टिक, कानातले, हेअरस्टाइल या सर्वांनाच मुकावे लागणार.”

“हो गं, पण कॉलेजला जाताना आरसा, कंगवा बाळगावा लागेलच.”
कसेतरी मला हेल्मेट मिळाले. बायकोला फोन केला.

“अगं, तू रिक्षा करून ये. चार हेल्मेट्स मी कशी आणणार?” बायकोसोबत रिक्षातून तीन हेल्मेट‌्स घरी पाठवून मी गाडीवर परत जात होतो. तेवढ्यात ते सिनियर सिटिझन काका रस्त्यात दिसले. एका हातात पिशव्या, दुसऱ्या हातात हेल्मेट घेऊन मला थांबण्याची खूण करीत होते.

मी त्यांच्याजवळ गाडी थांबवली, “काय काका, हेल्मेट मिळाले का?”
“हो मिळाले, जरा रिक्षा स्टँडपर्यंत सोडता का?”
“काका, तुमच्या गाडीला काय झालं?”
“तेच म्हणतोय, सर्व्हिसिंगला टाकलेली गाडी घेईन आणि जाईन घरी!”
काका थोडे मिश्कीलपणे त्रासिक हसले. माझ्या मागच्या सीटवर बसताना त्यांना बरीच कसरत करावी लागली.

मी म्हणालो, “काका, हेल्मेट डोक्यावर चढवा, पिशव्या समोर अडकवतो.” या वेळी काकांनी माझे म्हणणे बिनतक्रार ऐकले. दोनच मिनिटांनी स्पीड ब्रेकर, खड्डा यामुळे काकांचे हेल्मेट माझ्या हेल्मेटवर आदळत होते. काका पुटपुटले, काय डोक्याला ताप झालाय हेल्मेटमुळे! ते काय बोलतात, हे स्पष्ट ऐकू येत नव्हते. पण औषधांचे दुकान जवळ येताच ते ओरडले “अहो थांबा, आयुर्वेद शॉपजवळ थांबा.” मी माझी बाइक थांबवली. काका उतरले, त्यांनी पिशव्या घेतल्या. धन्यवाद म्हणाले व मिश्कीलपणे म्हणाले, “अवर हेल्मेट्स वेअर किसिंग अँड कॅरीबॅग्ज आॅल्सो मिसिंग.” आणि दोघेही खळाळून हसलो.

एक फेब्रुवारी उजाडला. ऑफिसला जाताना हेल्मेटची आठवण करून द्यायचं बायकोचं आणखी एक काम वाढलं होतं. ऑफिसमधून घरी आलो. बायको संक्रांतीचं हळदीकुंकू घ्यायला गेली होती. माझा मी चहा करून घेतला. पेपर वाचत होतो. तेवढ्यात ती आली. पाहतो तर काय, भरजरी साडी, दागिने घालून नटलेल्या माझ्या बायकोने हेल्मेटचा दागिना न चुकता डोक्यावर चढवला होता. मी तिच्याकडे पाहून हसलो अन् म्हणालो, “एक सेल्फी हो जाय!”

ती म्हणाली, अवश्य. कारण हळदीकुंकवाला आलेल्या बऱ्याच बायका दंड भरावा लागला म्हणून वाण महागात पडलं, म्हणून कुरकुरू लागल्या. पण मी मात्र दिमाखात पर्ससोबत हेल्मेट सांभाळून हळदीकुंकू घेऊन आले.

मी म्हणालो, “धन्य तू स्वामिनी, नियम पाळावेत तर ते तुझ्यासारखे!”
मानवी जिवांच्या सुरक्षिततेची गरज आणि सोबत हेल्मेट बाळगण्याची असुविधा या परिस्थितीत हेल्मेट स्वयंचलित दुचाकी वाहनधारकांच्या विश्वातील समृद्ध अडगळ ठरली आहे.