आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जडणघडणीची प्रशासकीय आत्‍महत्‍या ( विवेक एम. राठोड )

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी व्यक्ती कर्तृत्व सिद्ध करायला लागली की, त्याची प्रचंड चर्चा होत असते. मात्र, या चर्चेमागे त्या कर्तृत्वापेक्षा ती व्यक्ती ज्या पार्श्वभूमीतून पुढे आली आहे, त्याचा अधिक वाटा असतो. कारण परिस्थितीच व्यक्तीचे कर्तृत्व ठरवत असते. महाराष्ट्रातील जवळपास निम्म्या जिल्ह्यांमध्ये आणि सात-आठ प्रमुख खात्यांमध्ये काम केल्यानंतर अर्थातच कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज लागत नाही. कारण, त्या व्यक्तीचे अनुभवच त्यांच्या कर्तृत्वाची खरी पावती ठरते. मात्र, या अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठीचा संघर्ष अर्थातच व्यक्तीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवत असतो आणि याच संघर्षाला ‘जडणघडण’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशाच प्रकारची जडणघडण आपल्या आत्मचरित्रातून यथार्थपणे विशद केली आहे,
अा. ना. होगे पाटील यांनी. अनुभवाची शिदोरी संग्रही ठेवावी, असा आनंद या पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच मिळतो. आपल्या सावलीला म्हणजेच पार्श्वभूमीला आपल्यासोबत कायम ठेवत पुढे वाटचाल करत राहावे, असा थेट आणि समर्पक असा संदेश या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठापासूनच मिळत जातो. स्वातंत्र्याेत्तर काळात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही चार ठिकाणी करावी लागलेली भटकंती आणि त्यातून घडत गेलेले व्यक्तिमत्त्व. ग्रामीण भागातून उच्चपदापर्यंत मजल मारण्यासाठी त्यांनी अनुभवलेले विश्व. बालवयात शिक्षकांनी दिलेले विशेष लक्ष कदाचित भावी आयुष्यात यशस्वी अधिकारी बनण्यासाठी पुरेसे असावे, असे काहीसे संस्कार आ. ना. होगे यांनी अनुभवले.

जडणघडणच्या माध्यमातून हीच संस्काराची शिदोरी इतरांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रामािणक उद्देश वाखाणण्याजोगा आहे. सध्या सगळीकडे संगणकीकरणाचा बोलबाला आहे. ई-गर्व्हनन्स ही संकल्पना सध्या प्रत्येक क्षेत्रात प्रचंड फोफावली आहे. मात्र, ज्या काळात संगणक म्हणजे काय, हेच कळणे कठीण होते, त्या काळात शासनसेवा करणे किती कठीण असावे? याविषयी आ. ना. होगे पाटील यांनी वर्णन केलेले त्यांचे अनुभव नवीन अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. आत्मचरित्र लिहिण्यामागचा प्रामाणिक हेतू त्यांनी प्रस्तावनेत अगदी प्रामाणिकपणाने स्पष्ट केला आहे. मार्गदर्शन, मनोरंजन आणि प्रबोधन या तीन संकल्पनांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे मत एका प्रगल्भ लेखकाची सचोटी दाखवून देताे. आ. ना. होगे पाटील यांच्या संघर्षपूर्ण वाटचालीला तणाव, थरार अन् संकटांचीही जोड आहे. सिंदी रेल्वे येथे काही तरुणांनी एका विवाहितेविरोधात अभद्र टीका केली. त्या महिलेने त्याची तक्रार पोलिस असलेल्या पतीकडे केली. त्यामुळे त्या पोलिसाने तरुणाला मारहाण केली. या गोष्टीमुळे जमावाने पोलिसांविरोधात काढलेला मोर्चा आणि हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळण्यासाठी आ. ना. होगे पाटील यांनी दाखवलेली तत्परता त्यांच्यातील कार्यकुशलतेचा वेगळाच परिपाक आहे. १९९३मध्ये पाटील वर्ध्याचे जिल्हाधिकारी होते. त्याच वेळी लातूरमध्ये विनाशकारी भूकंप आला होता. वर्धा तसा आकाराने राज्यातील सर्वात लहान जिल्हा. मात्र, पाटील यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जमवलेला निधी अन्य जिल्ह्यांपेक्षा कितीतरी जास्त होता. यावरून त्यांची समाजभावना आणि दयाभाव हे गुण दिसून येतात. वास्तविक शासनदरबारी अशा प्रकारचे लोक खूपच कमी असतात. मुंबई बॉम्बस्फोट, प्लेगचा हाहाकार, सोशल बँकिंग, ऑनलाइन सातबारा इत्यादी प्रकरणे हाताळताना त्यांनी दाखवलेले कौशल्य निश्चितच आजच्या घडीला प्रेरणादायी वाटू लागते. या सर्व बाबींचा ऊहापोह या आत्मचरित्रात आहे. तळागाळातून येणारी व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांकडे वेगळ्या अनुभवाचे प्रतिबिंब म्हणून पाहात असते. किंबहुना तसे पाहणे खरे तर अपेक्षितही असते. परंतु प्रशाासकीय कामे करता करता त्यांच्या आयुष्याला दर वेळी वेगळी कलाटणी मिळत असते. कॅलिडोस्कोपमध्ये दिसणारे दृश्य हलवल्यानंतर बदलते तशीच बदली झाल्यानंतर अधिकाऱ्याची अवस्था असते. हा बदल आणि बदललले काम सकारात्मकपणे घेणारा अधिकारी त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभवही निर्विवादपणे घेऊ शकतो. आ. ना. होगे पाटील अशा सकारात्मक व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतल्या बारीकसारीक घटना-प्रसंगांना केवळ मन:पटलावर टिपलेच नाही तर ते जपलेही. म्हणूनच आपला भूतकाळ त्यांनी या आत्मचरित्रात अगदी सहजपणे मांडला आहे. वाचकांच्या मनी जागा निर्माण करणारे हे पुस्तक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नक्कीच वेगळा दृष्टिकोन देण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
लेखक : आ. ना. होगे पाटील
प्रकाशक : आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
किंमत : रुपये ३००/-
vivek.rathod@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...