आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivekanand Sahitya Samelan At Solapur On 9 And 10 November

विवेकानंदांच्या साहित्य विचारांचा जागर करणारे राष्ट्रीय संमेलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांना खूप भाषणे करावी लागत. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडवण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना साहित्यिक आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच भाषणे केली.

विवेकानंदांच्या ग्रंथांचा प्रभाव
नोबेल पारितोषिकप्राप्त जागतिक कीर्तीचे लेखक रोमां रोलां म्हणतात, ‘आज तीस वर्षांनंतरही विवेकानंदांच्या ग्रंथांना हात लावताना माझ्या शरीरभर विद्युतलहरी खेळून गेल्यासारखे वाटत आहे. मग हे जळजळीत शब्द त्या नरवीराच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकताना ऐकणार्‍यांना किती हादरे बसले असतील. कशी धुंदी चढली असेल.’

साहित्यातून स्वाभिमान जागला
स्वामी विवेकानंदांनी निकोलस टेस्ला यांच्यासारख्या विश्वविख्यात शास्त्रज्ञाला प्रेरित केले तसे आधुनिक जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांचे जीवन बदलून टाकले. लिओ टॉलस्टॉयसारखे विश्वविख्यात लेखकही त्यांचे चाहते बनले. स्वामी विवेकानंदांची भाषणे ऐकून हजारो लोक प्रेरित झाले, त्याच पद्धतीने त्यांच्या वाङ्मयामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली. शेकडो वर्षांच्या परकीय आक्रमणामुळे स्वत्व हरवलेल्या भारतीयांमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले.

पाच ते सात पिढ्यांचे जीवन समृद्ध
विवेकानंदांचे साहित्य गेल्या पाच ते सात पिढ्यांचे जीवन समृद्ध करत आले आहे. हे प्रेरणादायी साहित्य पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर नव्या दमाने यावे, या वाङ्मयातील शक्तीदायी विचारांचे समाजात अभिसरण व्हावे, या वाङ्मयावर निर्माण झालेले सकस साहित्य पुढे यावे, विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन देशभरात सुरू असलेली कामे समोर यावीत, या हेतूने ‘विवेकानंद साहित्य संमेलन’ योजण्यात आले आहे.

भारतातील पहिलेच असे साहित्य संमेलन
स्वामी विवेकानंदांच्या साहित्यावर आयोजित होत असलेले भारतातले हे पहिलेच संमेलन. नरेंद्र कोहली हे हिंदी साहित्यातील लेखक संमेलनाचे अध्यक्ष आहेत. डॉ. सदानंद मोरे, तरुण विजय, स्वामी बुद्धानंद अशा मान्यवर लेखक - विचारवंतांच्या उपस्थितीत होणाºया संमेलनात महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमधून दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

विवेकानंदांचे आद्य चरित्रकार एक मराठी
स्वामी विवेकानंद यांचे पहिले चरित्र विवेकानंद हयात असतानाच 1८९८ मध्ये मराठीतून लिहिले गेले. गणेश वामन गोगटे यांनी हे कार्य केले. यानंतर अन्य भाषेतून विवेकानंदांची चरित्रे लिहिली गेली. श्री. गोगटे यांनी 1913 ते 1919 या काळात विवेकानंदांचे सर्वच साहित्य मराठीत अनुवादित केले. संपूर्ण साहित्य 10 खंडांमध्ये सामावलेले आहे. स्वामी विवेकानंदांची भारतीय व्याख्याने अर्थात कोलंबो ते अल्मोडा, राजयोग, हिंदू तेजा जाग रे, ज्ञानयोग, कर्मयोग ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

कविप्रतिभेबद्दल विवेकानंद म्हणतात...
हिंदूंच्या बुद्धीच्या प्रखर शस्त्राला मखमलीच्या आवरणाप्रमाणे वेढून असलेली त्यांची एक मन:शक्ती म्हणजे कविप्रतिभा. हिंदूंचा धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र हे सर्व कविप्रतिभेच्या पुष्पासनावर शोभत आहे. ज्या भाषेत हे सर्व निर्माण झाले त्या भाषेचे नाव ‘संस्कृत’ म्हणजे ‘परिपूर्ण’ असे आहे. या विविध विषयांची प्रतिमासृष्टी संस्कृतमध्ये जेवढी उत्तम रीतीने व्यक्त झाली आहे तेवढी अन्य भाषांमध्ये होऊ शकली नसती. अगदी गणितासारख्या रूक्ष विषयालाही सुस्वर संख्यापाठाने रुची प्राप्त करून दिली आहे. ही विलक्षण मन:शक्ती आणि दृष्ट्या साहित्य प्रतिभेची भरारी ही हिंदू मनाच्या जडणघडणीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही दोन मिळून हिंदू राष्ट्रीय चारित्र्याचा प्राणस्वर निर्माण झाला आहे. बुद्धी आणि प्रतिभेचे हे असे रसायनच एखाद्या वंशाला इंद्रियज्ञानाच्या पलीकडे झेपावण्याची शक्ती देते. लोह छेदील अशी धारदार आणि तरीही लवविली तर, मंडलाकार होईल इतकी लवचिक अशी ही प्रज्ञाच विश्वरहस्याचा वेध घेते. त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरांत काव्य लिहिले. कला आणि शास्त्रे यांच्यामुळे अगदी घरगुती जीवनातील गोष्टींवरसुद्धा काव्यकल्पनांची आभा झळाळू लागली.

नरेंद्र कोहली यांचा अल्प परिचय
श्री. नरेंद्र कोहली हे हिंदी भाषेतील विख्यात साहित्यिक आहेत. आधुनिक हिंदी साहित्यावरील त्यांच्या प्रभावामुळे हिंदी साहित्यात 1975 नंतरचा काळ हा कोहली युग म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘तोडो कारा तोडो’ ही ग्रंथमालिका लिहिली. कोणत्याही भाषेत विवेकानंदांवर निर्माण झालेल्या साहित्यकृतींमध्ये ही सर्वश्रेष्ठ साहित्यकृती मानली जाते. 1970 ते 2010 या 40 वर्षांत ९९ पुस्तके लिहिण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. प्रभू रामचंदांवरील अभ्युदय, न भूतो न भविष्यति, वासुदेव हे ग्रंथ विशेष गाजले. प्राचीन महाकाव्यातील तत्त्वज्ञान आधुनिक शैलीतून मांडणे हे श्री. कोहली यांच्या साहित्याचे प्रमुख वैश्ष्ट्यि.

उद्घाटक हणमंतराव गायकवाड
भारतातील सेवा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) संस्थापक. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या छोट्या गावी हणमंतराव यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन ८ लोकांना सोबत घेऊन 1९९७ ला कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून श्री. गायकवाड यांनी आतापर्यंत 35 हजार तरुणांना रोजगार दिला. यातील 75 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी हे ग्रामीण भागातील आहेत. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास, संसद भवन, भारतीय रेल्वे, टाटा, रिलायन्स यासह अनेक सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांना सेवा पुरवण्याचे काम बीव्हीजी करते. सामाजिक ऋण म्हणून महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी, जोतिबा, आळंदी येथील मंदिरांची स्वच्छता बीव्हीजी स्वखर्चाने करते.

विवेकानंदांच्या साहित्याबद्दल मान्यवर म्हणतात....
०स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर : 1898-99 च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली.. त्यांच्या ग्रंथांमुळेच सावरकर यांच्या मनात हिंदू धर्म आणि संस्कृतीविषयी अतूट आस्थेचा उदय होत होता. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणाही यातूनच मिळत होती.
०गुरुदेव रवींद्रनाथ टागोर : तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.
०महात्मा गांधी : मी स्वामी विवेकानंदांच्या समग्र वाङ्मयाचे अध्ययन केले आहे व त्याचमुळे माझे ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेम हजारो पटीने वाढले आहे.
०नेताजी सुभाषचंद्र बोस : श्रीरामकृष्ण आणि विवेकानंदांचे माझ्यावरील ऋण व्यक्त करायला माझ्याजवळ शब्द अपुरे आहेत. त्यांच्या पवित्र प्रभावानेच माझ्यात सर्वप्रथम जागृतीचा स्फुल्लिंग प्रदीप्त झाला. स्वामी विवेकानंद आज असते तर, मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती आणि अनन्य भावाने त्यांचे शिष्यत्व पत्करले असते.
०जवाहरलाल नेहरू : स्वामी विवेकानंद हे भारताच्या भूतकाळ व वर्तमानकाळाला सांधणारा दुवा होते. भारताच्या पुनर्निर्माण कार्याचे ते जनक होते. ज्या असंख्य नर-नारींनी भारताच्या पुनर्निर्माणाचे कार्यात योगदान दिले त्या सर्वांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.
०विल्यम जेम्स, थोर अमेरिकी तत्त्वज्ञ आणि मानसतज्ज्ञ : सांप्रत मी, यापूर्वी माझ्या वाचनात न आलेली इंग्लंडमधील स्वामी विवेकानंदांची व्याख्याने वाचत आहे. स्वामी विवेकानंद ही अखिल मानवजातीस परमेश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे. (जेम्स यांनी विवेकानंदांची अनेकदा भेट घेतली होती.)
०लिओ टॉलस्टॉय, महान रशियन लेखक : मानवाच्या भौतिक जीवनामागे मानवातील आत्मिक शक्तीच कार्य करत असते व या आत्मिक शक्तीची जगाला ओळख करून देण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तत्कालीन भौतिकवादी संस्कृतीविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यात भारतातील प्राचीन ऋषीमुनींनी जगाला दिलेल्या विचारधनाचा, प्रामुख्याने वेदांतील उच्चतम विचारांचा, प्रतिध्वनी मला एकू येत आहे. मला तो अत्यंत हृद्य वाटतो.