आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीटिंग सेंटर्स ! (विनोद तळेकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जुगाड’ हा अनेक भारतीयांचा अत्यंत आवडता शब्द. वेळ मारून नेण्यासाठी अनेकदा जुगाड करतच आपले इप्सित साध्य करण्यात त्याला मोठेपणा वाटतो. असाच मोठेपणा वा अभिमान त्याला कायद्यातून पळवाटा शोधून स्वत:ची भरभराट घडवून आणण्यातही वाटतो. कायदा भारतीय असो वा अमेरिकी, तो वाकवून आपले कौशल्य सिद्ध करण्यात तो पटाईत असतो. त्यातूनच घरबसल्या पैसे कमावण्याची शक्कल तो लढवतो आणि भारतातल्या कॉल सेंटरमध्ये बसून अमेरिकी नागरिकांना नाडण्याची हिंमतही तो राखतो...

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सर्व्हिस सेक्टर अर्थात ग्राहक सेवा क्षेत्राची बेफाम भरभराट झाली. विदेशी कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी स्वस्त मनुष्यबळ पुरवणाऱ्या भारतातल्या कॉल सेंटर्सचा वापर सुरू केला. पाठोपाठ मुंबई-दिल्ली-कोलकाता आदी महानगरांच्या अवतीभवती देशी-विदेशी ग्राहकांना सेवा पुरवणारी कॉल सेंटर्स सुरू झाली. अल्पावधीतच बीपीओ हा यशस्वी करिअरचा नवा मंत्र बनला. बीपीओत काम करणे प्रतिष्ठेचे लक्षण ठरू लागले. परंतु कालांतराने या तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवस्थेचा गैरफायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तींनी या क्षेत्रात प्रवेश केला. त्यातून पुढे सर्रास देशी-विदेशी ग्राहकांची फसवणूक सुरू झाली. क्रेडिट कार्डासाठी, डोनेशनसाठी, वैद्यकीय मदतीसाठी, लकी ड्रॉसाठी वेळीअवेळी फोन येणे सुरू झाले. पाठोपाठ तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे, अमुक रक्कम भरा आणि गिफ्ट घेऊन जा; तुमची क्रेडिट कार्डाची देय रक्कम बाकी आहे, त्वरित भरा नाहीतर कारवाईची तयारी ठेवा, अशा धमक्यावजा सूचनाही मिळू लागल्या. परंतु याही पलीकडे जाऊन कॉल सेंटरमध्ये बसून थेट परदेशी नागरिकांनाही फसवण्यास सुरुवात केली. अमेरिकन इंटर्नल रेव्हेन्यू ऑफिसर असल्याची बतावणी करून पैशांची लुट सुरू केली. यात, अनधिकृतपणे व्हॉइसओव्हर इंटरनेट पोर्टल वापरण्याची चलाखी होती, अमेरिकन अॅक्सेंटमध्ये संवाद साधण्याची हातोटी होती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कायदे आणि नियम धाब्यावर बसवून ‘रॅकेट’ चालवण्याचे धारिष्ट्यही होते.

गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यातल्या मीरा-भाईंदर भागात सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आणि फसवणुकीची सेवा पुरवणारी टोळी उघड झाली. याच निमित्ताने भारतात बसून सेवा देण्याच्या नावाखाली परदेशी नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्यातही भारतीय अाता अग्रेसर असल्याची बाब प्राथमिक तपासातून पुढे आली. वस्तुत: जगभरातील सेवा क्षेत्रात भारतीय कंपन्यांचा दबदबा असणे ही एक अभिमानास्पद बाब होती. बिझनेस प्रोसेस आऊट सोर्सिंग म्हणजेच बिपीअोच्या माध्यमातून भारतात उपलब्ध असलेल्या स्वस्त आणि कुशल मनुष्यबळाच्या जोरावर भारतीयांनी हा नावलौकिक कमावला होता. मात्र मधल्या काळात भारतीयांच्या सेवाक्षेत्रातील मक्तेदारीला फिलिपाइन्स आणि बांगलादेशाकडून जबरदस्त आव्हान निर्माण झालेे. हे आव्हान निर्माण होण्यासाठी जसे भारताच्या तुलनेत अधिक स्वस्तात उपलब्ध असलेले मनुष्यबळ हे एक कारण होते, तसेच सेवा क्षेत्राच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांत भारताने प्राप्त केलेला बदलौकिक हेही महत्त्वाचे कारण होते. गेल्या आठवड्यात ठाणे पोलिसांनी एकाच वेळी सात काॅल सेंटर्सवर छापे टाकले. या निमित्ताने भारताच्या बदलौकिकात अधिकच भर पडली.

जाणकारांच्या मते, भारताच्या सेवा क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा. ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर इथल्या ‘युनिव्हर्सल आऊटसोर्सिंग सोल्युशन्स’ या कंपनीच्या सात कॉलसेंटर्सवर छापे मारून पोलिसांनी तब्बल ७० जणांना अटक केली. कंपनीच्या या सात कॉलसेंटर्समधील ७७२ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अमेरिकन नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असे. अमेरिकन नागरिकांना या बनावट कॉल सेंटर्समधून फोन करून, आपण ‘इंटरनल रेव्हेन्यु सर्व्हिसेस’ म्हणजे अमेरिकेच्या कर प्रशासन विभागातील अधिकारी बोलत असल्याचे सांगितले जात असे. तुम्ही कर थकबाकीदार आहात. तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत अाहे, असे सांगत लवकरच अटक हाेणार असल्याची धमकीही दिली जात असे. तुम्हाला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली आहे. तुमचा सोशल सिक्युरिटी क्रमांकही गोठवला जाणार आहे. याशिवाय तुमचा वाहन परवानाही रद्द केला जाणार असून तुमच्या नोकरीवरही गदा येणार आहे, असे सांगून दंडापोटी किमान १० हजार डॉलर्सची मागणी करण्यात येत असे. या सगळ्या प्रकाराने धास्तावलेला तो अमेरिकन नागरिक त्रासातून सुटण्यासाठी अलगदपणे या ठगांच्या जाळ्यात सापडत असे. त्यानंतर हे घोटाळेबाज लोक दंडाची रक्कम टार्गेट गिफ्टकार्डद्वारे किंवा आय ट्यून्सद्वारे आपल्या खात्यात वळती करून घेत.

सर्वसामान्य माणसासाठी अशा प्रकारचा घोटाळा ही नवीन बाब असली, तरीही अमेरिकी प्रशासनासाठी ही बाब आणि त्यात ‘भारतीय ठगां’चा असलेला सहभाग निश्चितच नवा नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, घोटाळ्यांमध्ये गमावले होते 47 लाख अमेरिकन डॉलर्स...
बातम्या आणखी आहेत...