आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतारवयातील पोकळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी मनाच्या गुंतागुंतीचा मुद्दा इथे यासाठी मांडला आहे की, इथून पुढे आपण ज्या क्षेत्रात प्रवेश करून हितगुज करणार आहोत तो प्रदेश अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा आहे. वयाच्या 70-80व्या वर्षांपर्यंत ज्या कुणाचं दांपत्यजीवन अखंडित राहिलं असेल त्याच्या सहजीवनानं जवळजवळ अर्धशतक गाठलं असेल. आयुष्याची सुरुवातीची 20-25 वर्षे ज्यांनी एकमेकांना पाहिलेलंही नसतं असा एक पुरुष आणि एक स्त्री पुढची पन्नास वर्षे एकत्र राहून वयाची सत्तरी वा ऐंशी गाठतात. काळाचं हे गणित जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात नसतं. या दीर्घ सहजीवनाने दोघंही एकमेकांबद्दल तृप्ती अनुभवत असतील तर ते मोठं भाग्य म्हणायला हवं. अशा पुष्कळशा वृद्ध पतिपत्नींना एकमेकांचं उणंदुणं काढताना आपण पाहतो. त्या वेळी दोघांच्या तोंडून निघणारी काही मुक्ताफळंही आपल्या कानावर पडतात. अगदी ‘तृप्त तृप्त झालो मी तुझ्या सहवासानं’ किंवा ‘अगदी तुडुंब पोट भरलं माझं तुमच्याबरोबर राहून!’ (या उद््गारात तृप्तीचा भाव असला तरी ही तृप्ती म्हणजे समाधानाचा ढेकर नाही किंवा या तुडुंब पोट भरण्यात आनंद नसून डचमळून येण्याची भावना आहे.) पण प्रत्यक्षात असं तृप्त होण्याचं भाग्य कुणाच्या वाट्याला येतं का? प्रश्नाची उत्तर द्यायची मुळीच गरज नाही. कारण खरं उत्तर आपल्या कुटुंब आणि समाजरचनेच्या मुळावरच घाव घालण्याची भीती आहे.
एक सुभाषित आहे ‘अतिपरिचयात् अवज्ञा.’ माणसं एकमेकांपासून दूर असतात तोवर एकमेकांचं भरपूर गुणगान करतात. गुजरातीतही या अर्थाची एक म्हण आहे, ‘सोनु लईये कसीने अने माणस जोइये वसीने’ (सोनं घ्यावं कसून आणि माणूस पारखावा एकत्र राहून.) वैवाहिक जीवनात सतत एकत्र राहिल्यावर अशी रासायनिक प्रक्रिया होणारच. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि समजूतदारपणा हा त्यावरचा उपाय आहे. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात आपण ज्याला प्रेम मानतो ते एकमेकांच्या गरजांचं संतुष्टीकरण असतं, संतुष्टीकरण जितकं अधिक तितक्याच परस्परांबद्दल भावनाही अधिक गहि-या. ज्या भावनेला आपण प्रेम म्हणून ओळखतो, वास्तवात तो मोह असतो.
या दीर्घ सहजीवनाच्या काळात दोघांनाही काही अवघड, नाजूक क्षणांतून जावं लागतं. मात्र कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीने ते आता अशा अवस्थेत असतात की अशा क्षणांचं अस्तित्व मान्य करतानासुद्धा मनाचा थरकाप होतो. अशा वेळी आपण आपल्या त्या भावनांचा इन्कार करतो. सामाजिक आणि कौटुंबिक स्थिरतेसाठी हा नकार अनिवार्य असतो. त्यात शहाणपण असतं आणि समजूतदारपणाही. पण या खोलवरच्या भावनांकडे आपण चालवलेली डोळेझाक, त्यांना नकार देणं, हे मनाच्या एका कोप-यात साठत जातं. याचा परिणाम असा की वरून सगळं बहरलेलं, डवरलेलं वाटत असलं तरी आत एक पोकळी कुरतडत असते. ही पोकळी म्हणजे काय याचा थोडा विचार करू.
एका बार्इंना तीर्थयात्रा, प्रवास, पर्यटन यामध्ये प्रचंड रस आहे. अशा प्रवासात येणा-या अडचणी किंवा त्यातील अनिश्चिततादेखील त्यांना आनंद देऊन जातात. त्यांच्या पतीला मात्र प्रवास म्हणजे वैताग असंच वाटत आलं आहे. त्यांना आरामातच राम वाटतो. त्यामुळे शक्यतो प्रवासाला जाणं ते टाळतात. मात्र तसे ते समजूतदार आहेत. पत्नीची प्रवासाची हौस पूर्ण व्हावी या दृष्टीनं ते तिला थांबवत नाहीत. त्यामुळे बाई जेव्हा एखाद्या प्रवासी कंपनीबरोबर प्रवासाला जातात तेव्हा एकट्याच असतात. प्रवासात इतर जोडपी पाहून त्यांना पतीची गैरहजेरी खटकते. पण म्हणून प्रवासाचा शौक त्यांना घरी बसू देत नाही. काही काळानं याबद्दल मनात नाराजी उत्पन्न होते. पतीच्या नकारावर मनातल्या मनात धुसफुसत त्या तीर्थाटनाच्या नावाखाली आणखी प्रवास करत राहतात. आता नव-यालाही त्यांच्या या प्रवासाचा राग यायला लागतो. यात्रेच्या नावाखाली ही भटकंती चालली आहे, असा ग्रह मनात पक्का होतो. त्यामुळे वरून सगळं ‘आलबेल’ दिसलं तरी आत एक अदृश्य अंतर निर्माण होतं.
एका पतिराजांची बौद्धिक क्षेत्रातली झेप उंच आहे. त्यांच्या आवडीच्या विषयालाही एक बौद्धिक स्तर असतो. पत्नीपाशी यातलं काही नाही. ती संसारात रमणारी सुगृहिणी आहे, त्यामुळे दोघांत बौद्धिक विषयावर चर्चा रंगण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. त्यांचा संसार सुरळीत चालत असला तरी दोघांमध्ये एक प्रकारचं अंतर वाढत जातं. पाहणा-याला सगळं ‘छान’ चाललेलं दिसतं, पण कालांतराने दोघांच्यामध्ये एक पोकळी निर्माण होते.
लैंगिक जीवनातही या ना त्या कारणाने एकमेकांना समाधान देऊ न शकणा-या आणि अतृप्तीच्या भावनेनं ग्रासलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं अस्तित्व नाकारता येणार नाही. हा एक असा मुद्दा आहे, जो आपण चटकन स्वीकारत नाही. पण कालांतराने मनातल्या पोकळीव्यतिरिक्त अवांछनीय अशा वैचारिक विकृती निर्माण होतात. सभोवताली पाहिलं तर याचा प्रत्यय येतो. समाजात वावरताना असे काही ज्येष्ठ पुरुष नागरिक असतात जे गप्पांच्या ओघात, अगदी सहज वाटेल अशा पद्धतीनं, शेजारी बसलेल्या स्वत:पेक्षा निम्म्या वयाच्या तरुण मुलीला-स्त्रीला, तिच्या खांद्याला, हाताला किंवा इतरत्र स्पर्श करत असतात, पाठीवर थाप मारत असतात. या महाभागांना ही सवयच असेल तर प्रत्येक वेळी गप्पा मारताना शेजारी बसलेल्या पुरुष मित्रांबरोबरचं त्यांचं वर्तनही तसंच असायला हवं. पण तसं दिसत नाही. आपल्या वयाच्या ज्येष्ठतेचा फायदा घेत शेजारी बसलेल्या स्त्रीवर्गाशी असं वागून मनातली ती पोकळी भरून काढण्याचा हा प्रयत्न असतो. वरवर पाहता त्यांचं हे वर्तन आत्मीयतेपोटी असेल असं वाटू शकतं. पण बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येतं की स्वत:च्या पत्नीच्या उपस्थितीत त्यांची ही सवय अदृश्य होते! बाल्यावस्थेतील अशा वागण्याला आपण बालिश चाळा म्हणू, पण या वयातल्या या वर्तनाला काय नाव देता येईल? म्हातारचळ म्हणतात का?
सामान्यत: अशी पोकळी समजूतदारपणे भरून काढण्याचा प्रयत्न स्त्री-पुरुष दोघांनीही करायला हवा. मनुष्यस्वभावातली ही दुर्बलता एखाद्या वेळी उताराच्या दिशेला नेते. उतारवयात अशा उतारापासून दूर राहणं हा सुज्ञपणाचा मार्ग आहे. कुणाला हा अप्रामाणिकपणा, दांभिकपणा किंवा मुखवटे चढवून जगण्यासारखा पर्याय वाटेल. असं वाटणं तर्काला धरून असलं तरी इथे परिस्थिती दोन जीवघेण्या रोगातला पर्याय निवडण्यासारखी आहे. समजा त्यातल्या एकावर उपाय सापडलेला आहे, पण दुस-यावर अजून सापडायचा आहे. अशा वेळी कशाची निवड करावी? जे मुखवटे चढवून गेली पन्नास वर्षे वावरलो आहोत, ते शेवटच्या पाच-सात वर्षांच्या आयुष्यात उतरवून टाकायचं ठरवलं तर संपूर्ण समाजात अनोळखी चेह-यांचा पूर येईल! म्हटलं आहे ना, व्यापक धर्मरक्षणासाठी, समाजहितासाठी प्रसंगी माणसानं अधर्म आचरावा.
अनुवाद- प्रतिभा काटीकर, सोलापूर
(क्रमश:)