आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडकाव्य मेघदूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालिदासाची काव्यसृष्टी म्हणजे खरोखरच अमृतमय सरिता आहे. कालिदासाच्या वाङ्मयाचा परिमल दरवळवणा-या एकूण सात कलाकृती उपलब्ध असल्या तरी ‘मेघदूत’ही एकच कलाकृती त्याचे नाव त्रिखंडांत अजरामर करण्यास कारणीभूत झाली आहे.


मेघदूत हे काव्य साहित्याच्या कोणत्या प्रकारात मोडते, याचा साहित्यसूरींच्या दृष्टीने विचार करत असता साहित्यदर्पणकार विश्वनाथाचे असे मत आहे की, ‘खण्डकाव्यं भवेत् काव्य, स्यैकदेशानुसारि च। यथा मेघदूतादि:।’ मेघदूतातील वर्णनानुसार याला खंडकाव्य म्हणावे लागेल. मेघदूतावर टीका लिहिणारा पहिला टीकाकार वल्लभदेव. दुसरा मल्लीनाथ. मल्लीनाथाची टीका मार्मिक टीका म्हणून सर्वमान्य असल्याने ‘टीका करणे’ या अर्थी मल्लीनाथी करणे असा वाक् प्रचार मराठीत रूढ झाला.


* मेघदूताचा मूळ आधार : रामायणातील हनुमत्संदेशाच्या कथेवरून कालिदासाला मेघाला दूत करून संदेश पाठवण्याची कल्पना सूचली, असे बहुतेक प्राचीन आणि अर्वाचीन टीकाकार मान्य करतात. इतकेच नाही तर सबंध काव्यरचनेचा आराखडा आणि त्यातील काही तपशील, विचार, उत्प्रेक्षा याही रामायणावरूनच सुचल्या. महर्षी वाल्मीकींचे हे ऋण मान्य करूनही कालिदासाची प्रतिभा, कल्पनाविलास, ऐतिहासिक, पौराणिक निर्देश, अचेतन सृष्टीवरील चैतन्याचा आरोप या अनमोल गुणसंभाराचे महत्त्व रतिमात्र उणे पडत नाही.


* कथावस्तू : मेघदूत या काव्यात कथानकाला अगदीच गौण स्थान आहे. कल्पनाविलास व रसपरिपोष यांना किमान आधार व समान सूत्र असावे, इतपतच या काव्याचे कथानक कालिदासाने रचिले आहे. ते असे..
काव्याचा नायक देवयोनीतील एक तरुण यक्ष आहे. स्वत:च्या पत्नीवरील प्रमाणाबाहेर आसक्तीमुळे त्याच्या हातून कुबेराने नेमून दिलेल्या कामात चूक झाली. या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून यक्षाला एक वर्षभर आपल्या प्राणप्रिय पत्नीपासून शेकडो मैल दूर असलेल्या रामगिरीवर राहण्याची हद्दपारीची कडक शिक्षा झाली. जिवलग कांतेपासून वर्षभर दूर राहण्याचा प्रसंग यक्षावर प्रथमच आला. त्यामुळे तो अगदीच सुकून जातो. शिक्षेचे आठ महिने कसेबसे घालवले तोच वर्षा ऋतू आला. रामगिरी शिखरावर विसावलेले मेघ पाहून यक्षाचे मन गलबलून आले आणि विरहाने झुरलेल्या आपल्या कांतेला संदेश पाठवण्याची त्याला कल्पना सुचली. त्याने या अचेतन मेघाला अलकानगरीत संदेश पोहोचवण्याची विनंती केली आणि रामगिरी ते अलकानगरीपर्यंतचा मार्ग सांगून खुणेच्या आठवणीसह आपला संदेश सांगितला. कथा ही एवढीच. पण या परिमिताकार कथेला आपल्या प्रतिभेच्या परिसाने महाकाव्याच्या पदवीला पोहोचवण्यातच कालिदासाचे अद्वितीय कौशल्य दिसून येते.


* रसार्द्र निसर्ग :
अलकेसारख्या विलासनगरीत वाढलेला यक्ष एक प्रणयी तरुण आहे. त्यातच कांतेच्या प्रथम वियोगात त्याच्या दृष्टीला निसर्गातील रूपसौंदर्यात आपल्या भावनांचे प्रतिबिंब दिसावे हे स्वाभाविकच आहे. कांतेच्या मिलन सुखास आसुसलेल्या यक्षाला प्रत्येक नदी, पर्वत, वृक्ष, लता यावर स्वत:च्या भावनांचा आरोप करण्याची बुद्धी व्हावी, हेही योग्यच. यक्षाच्या रसार्द्र दृष्टीमुळेच रामगिरी ते अलकेपर्यंतचा निसर्गही असाच रसार्द्र झाला आहे.
यक्ष मेघास म्हणतो,
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेषितस्य
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम्
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्द्रिकाधौतहर्म्या ।।7।।
मेघा! तू थोर कुळात जन्म घेतला आहेस. तू इंद्राचा अमात्य आहेस. तुला हवा तो आकार धारण करता येतो. तुला माझी व्यथा कळते. तेव्हा माझ्या फुलासारख्या नाजूक पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी अलका नगरीस जा, अशी विनंती करून यक्षाने मेघाला मार्ग सांगण्यास प्रारंभ केला.
वारा मंद वाहतो आहे. आनंदित पक्ष्यांची तुला सोबत आहे. तेव्हा याच वेळी तू या रामगिरीचा निरोप घेऊन निघावेस. तुझे कर्णमधुर गडगडणे ऐकून मानस सरोवरास जाण्यास उत्सुक असलेले, कमळांच्या देठाच्या कोवळ्या तुकड्यांची शिदोरी घेतलेले राजहंस पक्षी तुला कैलासापर्यंत सोबत करतील व तुझा हा प्रवास कंटाळवाणा होणार नाही.
तां चावश्यं दिवसगणनातत्परामेकपत्नीम्
अव्यापन्नामविहतगतिर्द्रक्ष्यसि भ्रातृजायाम्
आशाबन्ध: कुसुमसदृशं प्रायशोह्यङनानाम्
सघ:पाति प्रणयि हृदयं विप्रयोगे रुणद्वि।।9।।
मेघा, तू अलकेला पोहोचलास म्हणजे मोठ्या उत्कंठेने दिवस मोजीत असलेली व पातिव्रत्याने राहणारी तुझी भावजय तुला भेटेल. कारण सुकुमार स्त्रियांच्या प्रेमळ व फुलांप्रमाणे कोमल तसेच विरहातही एकदम ठाव सोडणा-या अंत:करणाला आशा तंतू सावरून धरतो. तेव्हा मी तुला आता अलकेचा मार्ग प्रथम सांगतो व नंतर निरोप सांगतो.
रामगिरीतून उड्डाण करून तू प्रथम आम्रकूट पर्वतावर जावेस. नंतर विंध्यपर्वताच्या खडकाळ शिखरावर बारा वाटा फुटून शतधार खळखळणा-या नर्मदेचे दर्शन घ्यावेस. तेथील वेतवत्री नदीच्या जवळ असणा-या ‘नीचैस्’ पर्वतावर विसावा घेऊन सरळ उत्तरेकडे न जाता जरा वाकडे वळण घेऊन उज्जयिनीस जाऊन तेथील सौंधांशी जरूर जवळीक करावी.
यक्ष मेघाला पुढे उज्जयिनी ते क्रौंच रंध्रापर्यंतचा मार्ग सांगून कैलासाचे रसभरित वर्णन करतो. देवांगनांचा दर्पण असा तो शुभ्र कैलास म्हणजे जणू शांकराचे साचलेले हास्यच. त्याच्या शुभांगावर काजळाच्या रंगाचा मेघ पहुडला की ती शोभा गौरवर्ण बलरामाच्या स्कंधावर झुळझुळणा-या नील वसनाच्या शोभेसारखी दिसेल. पुढे यक्ष मेघास म्हणतो, कैलासाच्या उत्संगावर वसलेल्या अलका नगरीस जा.


* अलका-सुखाची उतारपेठ : अलका ही सुखाची उतारपेठ, संपत्तीचे माहेरघर, स्त्रियांनी गजबजलेले, चित्रांनी युक्त गगनचुंबी प्रासाद, संगीताच्या साथीसाठी निनादणारे मृदंग. सहा ऋतू तेथे एकाच वेळी सेवेला सिद्ध असतात. अलकेतील यक्षांच्या नेत्रांत सदैव आनंदाश्रूच असतात. सर्वांना नित्य यौवनाचे वरदान लाभलेले. अशा या अलका नगरीत कुबेराच्या भव्य प्रासादाच्या उत्तरेला माझे घर आहे.


* माझी प्रिया :
मित्रा, माझी प्रिया ही रमणी, अंगाने शेलाटी आहे. तिच्या दंतकळ्या सुरेख व टोकदार असून अधरोष्ठ पिकलेल्या तोंडल्यासारखा लाल आहे. भ्यालेल्या हरिणीसारखी तिची दृष्टी असून कंबर बारीक व नाभिप्रदेश खोल आहे. नितंबांच्या भारामुळे मंदगामिनी आणि पुष्ट अशा उरोजांमुळे किंचित झुकलेली असली तरी तिच्या शरीराला यौवनसुलभ डौल आहे.
माझ्या विरहामुळे रडून रडून तिचे डोळे सुजले असतील. मांडीवर वीणा घेऊन माझ्या नावाचे गीत गाण्याचा प्रयत्न करत असेल. पण डोळ्यांतून ओघळणा-या अश्रुधारांत विसरलेला आरोह-अवरोह पुन:पुन्हा आठवू पाहत असेल.
मित्रा, तू तेथे जाशील तेव्हा कदाचित माझ्या प्रियेचा डोळा लागला असेल. विरही माणसांना एक तर झोप येत नाही. तेव्हा तिला तू जागे करू नकोस. क्षणभर ती जागी होण्याची वाट पाहा. पण एका प्रहरानंतर ती जागी झाली नाही तर तू आपल्या शीतल जलाचा शिडकावा करून तिला जागी कर व नंतर हा संदेश सांग.


* वार्ता म्हणजे भेट :
भर्तृमित्रं प्रियमविधवे विद्धिमामम्बुवाहम्
तत्सन्देशैर्हृदय निहितैरागतं त्वत्समीपम्।
योवृन्दानि त्वरयति पाथि श्राम्यतां प्रोषितानां
मन्द्रास्मिग्धैर्ध्वनिभिरबलावेणिमोक्षोत्सुकानि।।
है सौभाग्यसंपन्ना स्त्रिये! मी तुझ्या पतीचा जिवलग मित्र आहे. त्याचा संदेश घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. हे शब्द ऐकताच अशोक वनातील सीता ज्याप्रमाणे हनुमंताचा संदेश ऐकून खडबडून जागी झाली, तशी माझी प्रिया जागी होईल. कारण प्रियकराची वार्ता म्हणजे स्त्रियांना प्रत्यक्ष भेटीच्याच तोडीची असते.


यक्षसंदेश
हे आयुष्यमान मेघा! माझ्या सांगण्यावरून व स्वत:वर उपकार करण्यासाठी तू माझ्या प्रियेला सांग की, ‘‘अबले, तुझा पती रामगिरीवरील आश्रमात सुखरूप आहे. प्रिये, ब्रह्मदेवाने आपल्या गाठी घातल्या. त्यानेच त्या सोडून त्यात मोडता घातला. म्हणून तुझ्यासारखाच मीही दु:खी आहे. प्रिये, लतेच्या ठिकाणी तुझी काया, हरिणांच्या दृष्टीत तुझी दृष्टी, चंद्रबिंबाब तुझी मुखकांती, मोराच्या पिसा-यात तुझा केशकलाप आणि लहान लहान नद्यांच्या तरंगांत तुझ्या विलासाचे सादृश्य रूप पाहिले की तुझी आठवण येते. तुझे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करतो. पण आसवे आड येतात. स्वप्नेही अर्धीमुर्धीच पडतात. हे मेघा, तुझ्या वहिनीला धीर देऊन माझा हा संदेश सांग व तिचे कुशल विचारून तिचाही संदेश एखाद्या सुखद आठवणीसह घेऊन ये. अशी विनंती यक्ष मेघाला करतो. माझ्याप्रमाणे तुला पत्नीचा क्षणभरही वियोग होऊ नये, असा आशीर्वाद देतो.