आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉलीबॉलची ओढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाआधी दिवस-रात्र व्हॉलीबॉलच्या मैदानावर राहण्याची सवय, त्यामुळे खेळ अगदी नसानसात भिनलेला. त्यातच गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आपल्यासोबतच अनेकांपर्यंत हा खेळ पोहोचवण्याची जिद्द. परंतु जेव्हा 1993 मध्ये लग्न होऊन जळगाव येथे आले तेव्हा मला येथील क्रीडाविषयक उदासीनता पाहून अगदी भरून आले. वाटले, आपण इथे खेळासाठी काहीच करू शकणार नाही का? कारण सेक्स स्कँडलसारखे प्रकरण घडून गेल्याने पालक आपल्या मुलांना, विशेषत: मुलींना घराबाहेरही पडू देत नव्हते. मैदानावर पाठवणे तर दूरची गोष्ट होती. मी खूप निराश झाले. 94 मध्ये शाळेत नोकरी लागल्यावर शाळेतील मुलांना शिकवणे सुरू केले. मनात मात्र मुली कशा मैदानाकडे वळतील याचेच विचार असत.
2-3 वर्षांनी माझी मैत्रीण, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व्हॉलीबॉलपटू अंजली पाटील जळगावला स्थायिक झाली. त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून आधी स्वत:च्या नवºयांना व्हॉलीबॉल शिकवला व संध्याकाळी चौघेही मैदानावर जाऊन व्हॉलीबॉल खेळू लागलो. त्यानंतर 2-3 मुलींच्या शाळांमध्ये जाऊनही संपर्क साधला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. हळूहळू आम्हाला सराव करताना बघून काही पालकांनी आपल्या मुलींना मैदानावर पाठवायला सुरुवात केली. प्रत्येकीच्या घरी जाऊन काही काळजी करू नका, आम्ही दोघीही त्यांच्यासोबत कायम आहोत, त्यामुळे बिनधास्त राहा, वगैरे समजूत घालावी लागली. हळूहळू गावाबाहेरील कृषी महाविद्यालयाच्या मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर तळागाळातल्या मुलींना मैदानावर येण्यास प्रोत्साहन दिले.
हळूहळू एक, एकीबरोबर दुसरी, दुसरीबरोबर तिसरी, चौथी अशी संख्या जशी वाढायला लागली, तसा आमचा आत्मविश्वासही वाढला. मग उन्हाळी शिबिर घेऊन सकाळ-संध्याकाळ जास्तीत जास्त सराव घेणे. प्रत्येकीच्या घरी भेट देणे, असे उपक्रम राबवले. खेळण्याबरोबरच योग्य संस्कार कसे होतील याकडेही बारकाईने लक्ष दिले. जसे मैदानावर येताना कानात- हातात काहीही न घालणे, सराव झाल्यानंतर इकडे-तिकडे वेळ न घालवता घरी लवकर जाणे, हातपाय धुऊन देवाची प्रार्थना करणे ही सगळी शिकवण खेळाबरोबरच देत होतो. त्यामुळे पालकांचा विश्वास संपादन करू शकलो. आज जवळपास 50 विद्यार्थिनी दररोज सराव करतात व त्यातील काही जणींची राष्ट्रीय व राज्यस्तरावर निवडसुद्धा झाली आहे. त्याचा निश्चितच अभिमान वाटतो. यापुढेही अशीच विनामूल्य सेवा देत राहण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही दोघीही मैत्रिणी राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पंच असल्याने दोन्हीही पातळीवरील सखोल तंत्र खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचाच आमचा मनापासून प्रयत्न असतो व शेवटपर्यंत राहील.