Home »Magazine »Divya Education» Voulteerly Oretear

उत्स्फूर्त वक्तृत्व

नचिकेत जोशी | Jan 09, 2013, 12:40 PM IST

  • उत्स्फूर्त वक्तृत्व

उत्स्फूर्त वक्तृत्व हा प्रकार ज्याला जमला, त्याला वक्तृत्वकला जमलीच असं समजायला हरकत नाही. अर्थात म्हणूनच सर्वात अवघड आणि भल्याभल्यांना घाम फोडणारा हा प्रकार आहे. अगदी वैयक्तिक मत सांगायचं तर माझा सर्वात आवडता प्रकार आहे हा! याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं तर साधारण चार ते पाच मिनिटांच्या निर्धारित वेळेमध्ये आधीचा स्पर्धक भाषण करेपर्यंत नंतरच्या स्पर्धकाने चिठ्ठीत मिळालेल्या विषयावर विचार करायचा आणि मुद्दे(च) काढायचे. आणि नंतर जाऊन भाषण ठोकायचं. ‘ठोकायचं’ असंच म्हणावं लागेल. कारण जमलं तर शतक ठोकल्याचा आनंद नाहीतर मग शब्दांची ठोकाठोकी करून खाली उतरायचं. अशा वेळी चार-पाच मिनिटेही युगासारखी भासू लागतात. विषयाबद्दल बोलण्यासारखं काहीच नसेल तर नवखा स्पर्धक एक तर मौन पाळून विषयाला ‘श्रद्धांजली’ वाहतो आणि निमूटपणे खाली उतरतो किंवा मग कुठल्याशा असुरक्षिततेच्या भावनेतून सर्व विषय एकाच मिनिटात संपवतो. आणि इथेच अनुभवी ‘तयार’ स्पर्धक आणि नवखा स्पर्धक यांच्यातला फरक स्पष्ट होतो.

अनुभवी स्पर्धकाकडे कुठल्याही विषयासाठी वापरता येतील अशा अर्ध्या-अर्ध्या मिनिटाच्या गोष्टी तयार असतात. किंवा 50 टक्के विषयांवरच्या (मग तो कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असो) चारोळ्या, कविता तयार असतात, जुन्या स्पर्धांमध्ये सांगितलेले किंवा ऐकलेले (अगदी पारितोषिक समारंभामध्ये प्रमुख पाहुण्याने सांगितलेलेही) किस्से असतात आणि मग चिठ्ठीतल्या विषयाबद्दल गुंजभर ज्ञान तयार असतं. ते सगळं चार मिनिटात एकत्र झालं की फक्कड अशा भाषणाची मेजवानी आपल्याला मिळते.

उत्स्फूर्त स्पर्धेचं वेगळेपण विषयाबद्दल असलेल्या भारंभार ज्ञानामध्ये नाहीयेच मुळी! त्यासाठी नियोजित वक्तृत्वाचा प्रांत राखीव आहे. नियोजित स्पर्धा जर एकदिवसीय सामना असेल तर उत्स्फूर्त स्पर्धा हे वक्त्याचा सर्वच आघाड्यांवर कसं पाहणारं टी-ट्वेंटी आहे! (फक्त ये ‘तमीज’से खेला भी जाता है और देखा भी!) उत्स्फूर्त स्पर्धेचे भाषण म्हणजे प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता, विनोदबुद्धी यांचा मनोहर मिलाफ होय! त्यामुळेच अशा स्पर्धेच्या विषयांकडे नजर टाकली तर असं लक्षात येतं की सखोल अभ्यासाची गरज असणारे विषय इथे अडचणीचे ठरतात. उदा. भारतीय स्वातंत्र्याचा हीरकमहोत्सव! ‘उत्स्फूर्त’साठी हा अगदी अयोग्य विषय आहे ना! त्याऐवजी ‘तुतारी’, ‘दोन घडीचा डाव’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘टीटीएमएम’, ‘कुणी जॉब देता का जॉब’, ‘सत्यमेव जयते’, ‘दिल चाहता है’, ‘बर्फी’, ‘कोरा कागद’, ‘सावली’, ‘त्या तिथे...’, ’भिंत’ वगैरे वगैरे विषय वरकरणी धडकी भरवणारे वाटले, तरी चार मिनिटे टिकाव धरण्यासाठी लागणारी पुरेशी ‘रसद’ या विषयांमध्ये नक्कीच आहे.

विषयाला किती वेगवेगळ्या प्रकारे मांडता येऊ शकते, किती निरनिराळे अर्थ विषयाला दिले जाऊ शकतात हा उत्स्फूर्त स्पर्धेसाठी अत्यावश्यक घटक आहे. उदाहरणार्थ, ‘भिंत’ या विषयामध्ये, बांधकामामधील एक घटक हे सगळेच मांडतील. पण ज्ञानेश्वर माऊली भिंत चालवत चांगदेवांना भेटायला गेले होते, राहुल द्रविडला ‘द वॉल’ म्हणजे (भारतीय फलंदाजीची) भिंत म्हटले जात असे असे वेगळे विचार मांडले तर भाषण प्रभावी होईल ना? अगदी ‘फेसबुक’ची ‘वॉल’ हीही एक प्रकारची भिंतच की! बालकवींची ‘भिंत खचली, कलथून खांब गेला’ ही सुप्रसिद्ध कविता सुद्धा विदीर्ण झालेल्या वाङ्मयाचं आणि निराश मन:स्थितीचं हुबेहूब वर्णन करते. भिंतीला (म्हणजे विषयाला) अजून भक्कम करायचं असेल तर भिंत हा पाया असू शकतो, आडोसा असू शकतो, आधार असू शकतो हे मुद्दे येतील आणि सरतेशेवटी, भिंत पडली की अनर्थ उद्भवतो हे जरी खरं असलं तरी संवादाचा प्रवाह रोखून धरलेल्या भिंती मनामनामध्येही हल्ली दिसतात. त्या उद्ध्वस्त करायलाच हव्यात असे म्हणून भाषणाचा शेवट सकारात्मकतेने करता येईल. तुम्हाला अजून सुचतंय का बघा. नक्की सुचेल!

मित्रांनो, उत्स्फूर्त स्पर्धेचा मंच गाजवायचा असेल तर भरपूर वाचणे, इतरांची भाषणे ऐकणे, त्यात स्वत:च्या विचारांची भर घालणे आणि मुख्य म्हणजे हे सर्व सातत्याने करणे या गोष्टींना पर्याय नाही. उत्स्फूर्त स्पर्धेसाठी एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर मला नक्की कळवा! जाता जाता अजून एक विषय देतो, बघा चार मिनिटांमध्ये मांडण्यासाठी काय काय सुचतंय ते! विषय आहे - ‘लव्ह लेटर’!
पुन्हा भेटूच!

Next Article

Recommended