आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रमय नृत्यकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रकला आणि नृत्यकलेतील परस्परसंबंधामुळे दोन्हींची सांगड घालून रंगमंचावर नृत्य सुरू असताना त्या विषयाला धरून अथवा अचानक स्फुरलेले चित्र रंगमंचावरच काढणे, कापडावर नर्तकीने पायाला रंग लावून नाचणे आणि त्यातून उपलब्ध झालेल्या आकारातून चित्र निर्माण करणे, तेदेखील एकाच वेळेस, असे अनेक प्रयोग हल्ली लोकप्रिय होत आहेत.

माझ्या श्री मुद्रा कलानिकेतन या नृत्यवर्गात किमान १० विद्यार्थी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व रहेजा कॉलेजमध्ये शिकणारे आहेत. काही व्यावसाियक चित्रकार, तर कोणी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये कार्यरत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातील प्रत्येकाच्या नृत्य, अंगमुद्रा, देवदेवतांच्या अंगमुद्रा इ. अतिशय सुंदर दिसतात, एखाद्या चित्राप्रमाणे.
खरोखर संगीत म्हणजेच गायन, वादन आणि नृत्य यांचा इतर ललित कलांशी जसे चित्रकला, शिल्पकला, अतिशय जवळचा संबंध आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणात एका कथेत असे म्हटले आहे की, एकदा एक मनुष्य एका गुरुंकडे चित्रकला शिकण्यास गेला, तेव्हा गुरुंनी त्याला प्रथम नृत्य शिकून ये, असा सल्ला दिला. नृत्य आणि चित्रकला यांचा परस्परसंबंध पूर्वापार सिद्ध झालाय, हे यातून लक्षात येतं. नृत्यकला आणि चित्रकला या दोन्हीकडे जेव्हा अभ्यासक वृत्तीने पाहिले, तेव्हा त्यात अनेक साम्य व भेद आढळले. जसे या दोन्ही कला निव्वळ निखळ आनंदाची प्राप्ती या सौंदर्यतत्त्वाच्या पहिल्या पायरीस खऱ्या उतरतात. तसेच चित्रकलेतील एक महत्त्वाचं प्रमाण म्हणजे विष्णू धर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्र, त्यातील नृत्त सूत्र हा अध्याय; तसेच नृत्याचा आधार ग्रंथ नाट्यशास्त्र यातील एक महत्त्वाचा अध्याय चित्राभिनय; या दोन्ही पुराव्यांमुळे त्याचा परस्पर संबंध अधिकच सिद्ध होतो. चित्रकला आणि नृत्य या दोन्ही कला एका चौकटीत राहूनदेखील चौकटीबाहेरचा विचार करून अधिक खुलणाऱ्या आहेत. त्यांतील साम्य बघायचे तर चित्रकलेतील समअंगी चित्र म्हणजे ज्याच्या दोन्ही बाजू समान असतात, शास्त्रीय नृत्य जसे भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, जवळजवळ सगळ्याच प्रकारात शरीराच्या दोन्ही बाजूंचे अंगसंचालन सारखे दाखवले जाते. जसे अनेक नृत्यशैलींमध्ये घराण्यांची परंपरा आहे, तसेच चित्रकलेतदेखील घराणी आहेत, जसे कांगडा घराणे, राजपूत शैली, मोघल शैली इत्यादी. सर्व शास्त्रीय नृत्यप्रकारांमध्ये नायकनायिका भेदांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तसेच चित्रकलेतदेखील नायिका-नायक यांचे भेद हे त्यांच्या बारीक कामातून व रंगरेषांमधील बारकाव्यांतून प्रकट होते. तो नायक अथवा नायिका कुठल्या प्रकारची आहे, हे चित्रातूनदेखील समजणे हे एका निपुण चित्रकाराचे लक्षण आहे. चित्रकलेतील सहा अंगे जसे रंग, रेषा, अवकाश, वेग वगैरे यांचादेखील नृत्यात वापर होतो. एका नर्तकाचं कौशल्य त्याच्या अभिनयातून आणि त्याच्या हस्तकांमध्ये असलेल्या सफाईवरून, ताललयीच्या अभ्यासातून सिद्ध होतं. चित्रकलेतदेखील चित्रातील रेषांमधील सफाई, समानता, रंगसंगती, त्यातून व्यक्तिचित्रात प्रगट होणारे भाव यांवरून चित्रकाराचं कलेतील प्रभुत्व सिद्ध होतं. नृत्य सादरीकरणासाठी असलेला रंगमंच, त्याचा बॅकड्रॉप, त्याचा रंग, त्यात वापरण्यात येणारी प्रकाशयोजना, नर्तकीची वेषभूषा, त्याची रंगसंगती, रूपसज्जा म्हणजेच मेकअप, आणि त्यात नर्तकींचा अभिनय/ नृत्य, यामुळे खरं तर नृत्य म्हणजे एक जिवंत चित्रच वाटते.
या दोन्ही कलांना शिल्प म्हणावे की कला, असा प्रश्न काही वेळेस चर्चेला येतो तेव्हा या दोन्ही कलांना शिल्पकला असे म्हणावे असे सांगतात, याचे कारण; कला म्हणजे मनुष्याची आंतरिक ऊर्मी आणि शिल्प म्हणजे कलेचे शास्त्र, नियमन. या दोन्ही कलांना शिल्प म्हणण्याचा आधार म्हणजे त्यांचे ग्रंथ, त्यांचे शास्त्र, नियम. आणि कला म्हणण्याचा आधार म्हणजे, कलेस आवश्यक असलेले गुण. त्यामुळे नियमांच्या चौकटीत राहून नियमांचा आधार घेऊनही आंतरिक ऊर्मीस, कल्पकतेस भरपूर वाव देणाऱ्या दोन्ही कला ‘शिल्पकलाच’ आहेत.
या दोन्हींच्या परस्परसंबंधामुळे आजकाल दोन्ही कलांची सांगड घालून अनेकविध प्रयोग होत आहेत. रंगमंचावर नृत्य सुरू असताना त्या विषयाला धरून अथवा अचानक स्फुरलेले चित्र रंगमंचावरच काढणे, कापडावर नर्तकीने पायाला रंग लावून नाचणे आणि त्यातून उपलब्ध झालेल्या आकारातून चित्र निर्माण करणे तेदेखील एकाच वेळेस, असे अनेक प्रयोग हल्ली प्रसिद्ध होत आहेत.
असे म्हणता येईल की, एका नर्तकीचे चित्र पाहून ती अंगमुद्रा प्रत्यक्ष नृत्यात करणे, उदाहरण म्हणजे ओडिसी नृत्य, आणि ते नृत्य पाहून एखाद्या चित्रकाराने त्यातील अंगमुद्रांचे वेगाचे रेखाटन करणे, अर्थात दोन्ही कला एकमेकांपासून प्रेरणा घेतात. अधिक खुलतात. म्हणूनच नर्तकाने चित्रकलेचा आणि चित्रकाराने नृत्याचा अभ्यास केल्यास कला अधिक प्रभावी होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...