आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्याचे ऑडिट..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबर महिना. ग्रुपमधले सारे मित्र भेटणारच. वर्ष संपणार, तेव्हा लेखाजोखा करायला हवा. अगदी कॉलेजपासून अलिखित असा नियम. भेटायचे. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी या महिन्यात एकत्र यायचे. बारावीनंतर विखुरलेला ग्रुप. कोणी करिअरच्या मागे. मेडिकल, इंजिनिअरिंग या शाखांबरोबर कितीतरी वेगवेगळ्या संधी. जे शिकलोय त्याचा जॉबशी सुतराम संबंध नाही, हे लक्षात आल्यावर आपल्या 17 वर्षे शिक्षणाचे काय, असा प्रश्न मागच्या वर्षी याच महिन्यात नीलने विचारला, त्या वेळेस गंमत वाटली होती. आपण निरुपयोगी वर्षे घालवली, हे एवढ्या वर्षांनंतर कळणे हा साक्षात्कार असू शकतो, यावर सार्‍यांचे एकमत झाले.
कॉलेजमध्ये असताना वर्षाचा शेवट सेलिब्रेशनने झाला पाहिजे, असे उगाच वाटायचे. आपली ओळख इतरांना करून देणारे एकमेव साधन म्हणजे संध्याकाळनंतर रस्त्यावर प्रचंड वेगाने बाइक चालवणे. इम्प्रेशन म्हणजे दिसणे-दाखवणे-सर्व बाह्य. उत्तम कपडे, महागडी गाडी आणि चेहर्‍यावर जरब. तासन्तास कट्टा, सीसीडी, अंधार्‍या जागा नि कोपरे. मज्जा नि चाळा म्हणून जडलेली व्यसने. सगळे प्रकार करायचेच. नीलचा ग्रुप त्याची टर उडवायचा.
डिसेंबर महिना हा खास तरुणांचा महिना. त्यावर आपले आपणच शिक्कामोर्तब केलेले. पण नंतर अचानक कंटाळा यायला लागला. तेच रस्ते, तीच संध्याकाळ, तोच आपल्याच पैशाने सोडलेला धूर.. तीच गर्दी.. तेच चेहरे.. त्याच दाद न देणार्‍या मुली. बसल्या जागी तेच विषय. कधी फ्रस्ट्रेशन... डिप्रेशन.. तर कधी कन्फेशन. आलटून पालटून याच तीन गोष्टी. नवीन काही घडतंय, असे वाटेचना.
कॉलेजची मजा संपली. प्रत्येक पिढीत घडते तसे झाले. म्हणजे गांभीर्य वस्तीला आले. कुवत नि क्षमता यांना दोन्ही खिशात घालत वाटचाल सुरू करावी लागली. ते वर्ष फार खडतर. सगळा माज उतरून जाण्याचा काळ. मार्कांना काही अर्थ नव्हताच. निर्णय घेण्याची सवय नव्हती. घरात संवाद नसल्याने मार्गदर्शनाचे दरवाजे बंद होते. कसे नि काय विचारायचे, असा अहंकार भरून राहिलेला. जॉब मिळाला तरी रोज प्रूव्ह करण्याची स्पर्धा.
वर्ष संपायला आले तेव्हा जो तो आपापल्या कोशात. त्या वेळेस नीलने सुचवले, आता भेटायचे ते आपापले अनुभव घेऊन. रडगाणे नाही. दरवर्षी वेगवेगळ्या शहरात. जो जिथे जगण्याची आशा घेऊन गेला आहे, त्या नवीन गावात. जे शहर आपल्याला माहीत नाही, ते ठिकाण. फक्त एखादा दिवस राहायचे. पण दुसर्‍याला ऐकायचे... मग बोलायचे.
त्या ऐकण्या-बोलण्यात आपलीच उडालेली फजिती होती. भानावर येणे होते, समजून घेण्याचा प्रयत्न होता. पैसा न कमावणारे काही जण स्वत:ला अजमावत होते. जॉब मिळणार्‍या आपल्याच मित्रांचा हेवा वाटतो, लाइफ फारच कॅज्युअल घेतले, असे मोकळेपणाने कबूल करत होते. हा ग्रुप दुसर्‍याला जाणून घेत होता. चुका घडतात, हे मान्य करून पुढे जात होता. शेवटच्या महिन्यात स्वत:चेच आॅडिट करणे त्यांना गरजेचे वाटत होते.
नील या सगळ्यांचा लीडर. त्याने ही सवय लावली. गेल्याच वर्षी मित्रांना याच महिन्यात भेटून परत येताना भरधाव जाणार्‍या गाडीने त्याला उडवले. अपघात भीषण होता. पुढचे कित्येक महिने अनेक हॉस्पिटल्स, स्पेशालिस्ट्स आणि शरीरातल्या यंत्रणा ठीकठाक चालाव्यात म्हणून घातलेले रॉड्स. मित्र जसे जमेल तशी मदत करत होते. पण आता प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रारंभ आणि रोज वाढत जाणार्‍या अपेक्षांची त्यात पडणारी भर. इच्छा असूनही नीलसाठी वेळ देता येणे अशक्य होते.
हे वर्ष नीलला मात्र खूप काही शिकवून गेले. बेदरकार गाडी चालवून हा अपघात करणारा त्याच्याच वयाचा तरुण. त्याचा मूड सेलिब्रेशनचा. त्यामुळे न थांबता तो पळून गेला. मुळात आपल्या हातून गुन्हा घडलाय, याची त्याला जाणीव नव्हती. एखाद्याचे जगणे आपल्या बेपर्वा कृतीमुळे निपचित पडू शकते, याची कल्पना नसणारे तरुण, अव्यंग असणार्‍याला क्षणार्धात अपंग करून टाकणारे वाहन. झिंग. कदाचित ही चूक आपल्या हातून घडू शकली असती. हा असाच वेग आपल्या नसानसात भिनला होता. फक्त अपराध घडला नाही. या वर्षभरात घरच्यांनी त्याला जसे सांभाळले, ते तो विसरूच शकत नव्हता. मित्रांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याच्या बरोबर असणे... ही मात्र सर्वात मोठी पुंजी.
थोडा बरा झालेला नील या डिसेंबरमध्ये सगळ्यांना भेटणार होताच. या काळात वाचलेल्या पुस्तकातील काही वाक्ये त्याला लखलखीत उजळून काढणारी वाटली. ‘‘वाहतो तो झरा आणि थांबते ते डबके! डबक्यावर डास येतात आणि झर्‍यावर राजहंस!’’
त्याच डौलात तो भेटणार होता. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी...
bhargavevrinda9@gmail.com