आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत तुम्ही घरात हवे आहात...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा मेल पाहून तुम्ही बहीण-भावंडे नक्कीच चकित झाला असाल. आईने पाठवलेला पहिला मेल. दिवाळी उंबरठ्यावर आहे. खरे तर हा शब्द चुकला. घराला उंबरठाच नाही. असे अनेक शब्द तुम्हाला माहीतही नाहीत. दिवाळी येण्यापूर्वी काही दिवस घराचा कोपरान् कोपरा साफ करणे, हे माझे काम. एक तर मी घरात असते आणि हे नसते उद्योग करायला मला आवडतात. घरात तांब्या-पितळेची भांडी फारशी नाहीत. जी आहेत ती पूजेसाठीची. ती मी लखलखीत केली की तुम्ही ‘‘वॉव’’ असा उद्गार काढता. तुमचे बाबा आकाशकंदील आणतात. उंचावर चढून लावतात. त्यांना तो घरच्या घरी लावता येतो. फ्यूज उडाला तर त्यांना तो बसवता येतो. त्यांना थोडे सुतारकाम येते. नळाचे पाणी लीक होत असले तर ते पटकन दुरुस्त करतात. त्यांची पदवी कॉमर्समधली. तुम्हा दोघांसारखे सायन्सचे ते विद्यार्थी नव्हेत. या सर्व गोष्टी तुम्हाला नक्की जमू शकतात; पण तुम्ही व्हर्च्युअल जगात मुक्काम ठोकून असता.
दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. रोषणाई आणि आतषबाजीचे हे सुंदर दिवस. तुम्ही दोघे या दिवसांत आपापल्या मोबाइल आणि पीसीवर दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात दंग असता. गुगल किंवा याहू मेसेंजरवरून कधी शुभेच्छापत्रे, तर कधी इमेजेस क्रॉप करून त्या खाली स्वत:चे नाव देऊन पाठवण्याचा तुमचा खटाटोप. तुम्हाला माहीत नसलेले कित्येक जण. त्यांना तुम्ही एका क्लिकवर भुईनळा उडवायला लावता. फुलबाज्या पेटवायला भाग पाडता. तुमच्या त्या पडद्यावरची दिवाळी आपापसात अगदी आनंदात सुरू असते. घरात फराळाची तयारी मी करते. अत्यंत नाखुशीने तुम्ही सामान आणायला बरोबर येता. व्हॉट्स-अ‍ॅपवर सतत तुम्हाला काही न काही पाठवायचे असते. त्यात खंड पडला की तुमची चिडचिड सुरू होते. चविष्ट, खमंग डिशेस तुम्हाला तुमच्या हातात हव्या असतात. त्याचे फोटो नि वर्णन मित्रमैत्रिणींना सांगायचे असते. माझी आई ग्रेट कुक आहे, असे कौतुक करता तुम्ही माझे; पण मला विचाराल, तर त्यातला तुमचा सहभाग मला हवा असतो.
या दिवाळीत आम्हाला तुम्ही दोघे घरात हवे आहात. मदत करण्यासाठी नसलात तरी बिघडत नाही; पण तुमचे अस्तित्व हवे आहे. पदार्थांची चव घेताना त्याचा आस्वाद तुम्ही घ्यावा, बाकी सारी व्यवधाने दूर करून रोषणाई करावी. नरकचतुर्दशीला पहाटे उठावे, घर प्रकाशमान करायला मदत करावी. दीपावलीच्या या चारही दिवसांत सूर्योदय होण्यापूर्वी अत्यंत उत्साहाचे वातावरण तुम्ही निर्माण करावे, एवढीच अपेक्षा आहे.
तुमच्या जगात एक मोबाइलचा आणि एक पीसीचा पडदा. त्यावर शब्द, चित्र तुम्ही उमटवता. आपण कोकणात गेलो. तिथल्या घराचे, आजी-आजोबांचे फोटो अपलोड केले तुम्ही. आपण किती जणांना हे पाठवू शकतो, याचे प्रात्यक्षिक दाखवले; पण त्या आजी-आजोबांशी तुम्ही फारसे बोललाच नाहीत. सतत डाऊनलोड नि अपलोड करण्यात माणसांना आपण भेटतच नाही आहोत, हे लक्षात येत नाही तुमच्या. आपले नातलग, शेजारी, मित्र-मैत्रिणी सार्‍यांना एका दिवाळीत तरी प्रत्यक्ष भेटावे, असे वाटत नाही तुम्हाला? या पडद्यावरचा संवाद थोडा कमी करून आजूबाजूच्या माणसांसाठी संवादपर्व सुरू करा की तुम्ही. याचा अर्थ तुमच्या नव्या जगाला मी विरोध करतेय असे समजू नका; पण दिवाळीच्या उजेडयात्रेत आमच्याबरोबर मनाने राहा. आपण सर्व जण किमान चार दिवस तरी एकमेकांबरोबर राहू. गप्पा मारू. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज साजरी करणे म्हणजे नवे कपडे खरेदी करणे, दारूकामात पैसा उडवणे नव्हे; तर एकत्र येऊन प्रेम, कृतज्ञता, परस्परांचा सन्मान नि घराला समृद्ध करणार्‍या लक्ष्मीला पूजणे. या दिवाळीत द्याल ना थोडा वेळ आपापल्या आई-बाबांना?
bhargavevrinda9@gmail.com