आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्‍य व अभिनय (वृषाली दाबके)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना एकीने एक निरीक्षण सांगितलं की, आत्ताच्या काळात किंवा चित्रपटाच्या गतकाळातील अभिनेत्री, विशेषत: ज्यांना वेगळा मान मिळतो अशा, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी अनेक वर्षे शास्त्रीय नृत्याची आराधना करणाऱ्या होत्या किंवा आहेत. यातील संबंध जाणून घेण्याची तिला फार उत्सुकता होती.

खरं आहे. वैजयंतीमाला, मीनाक्षी शेषाद्री, माधुरी दीक्षित, हेमामालिनी अशा असंख्य चित्रपट अभिनेत्री, तर मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या उर्मिला कानेटकर, तन्वी पालव, गिरीजा ओक, शर्वरी जमेनीस, अदिती भागवत अशा असंख्य अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी अनेक वर्षे शास्त्रीय नृत्य शिक्षण घेतले आहे आणि अजूनही घेत आहेत.

भरतमुनींच्या पूर्वी आचार्यांनी ‘नर्तन’ या शब्दाचा वापर आपण समजतो त्यापेक्षा वेगळा केला होता. त्यात नर्तन म्हणजे नृत्त, नृत्य आणि नाट्य अशा तिन्ही तत्त्वांचा मिलाप अपेक्षित आहे. नृत्त म्हणजे कुठल्याही अभिनयाखेरीज, तसेच अर्थपूर्ण शब्दांशिवाय निव्वळ आनंद प्राप्तीसाठी केलेले नृत्त. ‘नृत्य’ म्हणजे ज्याचा आधार अधिकतर अर्थपूर्ण शब्द व त्यास ‘नृत्त’ अंगासहित अभिनयदेखील अपेक्षित आहे असे. तर नाट्य म्हणजे अभिनयासहित नृत्य. शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्यास या तिन्ही तत्त्वांचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्या प्रत्येक तत्त्वांवर प्रभुत्त्व सिद्ध करावे लागते. त्यातील ‘नाट्य’ तत्त्वाचा अभ्यास हा तसा कठीण. कारण त्यात नाटकाप्रमाणे प्रमुख नर्तक स्वत: शब्द उच्चारू शकत नाही. अभिनय करण्यास शब्दांचा, वाक्याचा आधार घेऊ शकत नाही. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवांतून, हालचालींतून गायनातील अथवा कथेतील शब्दांचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा लागतो. यासाठी पंचांग अभिनयाचा अभ्यास करावा लागतो. पंचांग अभिनय म्हणजे
कराभ्यां चरणाभ्यांच शिरसा चा भिनीयते ।
यत्र वस्त्विति विज्ञेय पञ्चड़्गभिनयो हि स ।।

म्हणजेच दोन्ही हात, दोन्ही पाय, शिर यांच्या संयोगाने जिथे कथावस्तु अभिनीत होते, त्यास पंचांग अभिनय म्हणावे.

अभिनयपक्षाचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, पंचांग अभिनय हा अभिनय भेदाच्या चार प्रकारांतील (आंगिक, वाचिक, आहार्य, सात्त्विक) आंगिक अभिनयांतर्गत येतो. अभिनय शिक्षणाच्या वर सांगितलेल्या चार पायऱ्या या आचार्य भरतमुनींनी ‘नाट्यशास्त्र’ ग्रंथात नाटकातील अभिनेत्यास व नृत्यकलाकारास अत्यावश्यक सांगितलेल्या आहेत.

नाटकातील अभिनय व शास्त्रीय नृत्यातील अभिनय यात फरक आहे. परंतु त्यांचा नाट्यशास्त्र हाच आधार आहे. आंगिक अभिनय म्हणजे अंग, प्रत्यंग, उपांगांच्या साहाय्याने प्रदर्शित होतो तो. वाचिक म्हणजे मुखाद्वारे व्यक्त होतो तो. आहार्य म्हणजे वेषभूषा, केससज्जा, रूपसज्जा, मुखवटे, दागिने, पात्रानुसार वेष करून सादर होतो तो आणि सात्त्विक अभिनय म्हणजे मनुष्य अंतर्गत स्थित आठ सत्त्वगुणांचे (स्वेद, स्तंभ, कंप, अश्रू, वैवर्ण्य, रोमांच, स्वरभंग व प्रलय) प्रदर्शन जिथे घडते तो अभिनय.

नृत्य करणाऱ्यास वाचिक अभिनयाचा व आहार्य अभिनयातील पात्रानुसार मुखवटे, वेष यांचा आधार न घेताच अभिनयाची शेवटची पायरी गाठावी लागते. त्यामुळे डोळ्यांतून व अंगमुद्रेतून अभिनय व्यक्त करण्याचा कस लागतो. त्याचबरोबर सादरीकरणात नृत्यबोल म्हणतानादेखील आवाजाचा चढ-उतार, ध्वनी यांचा अभ्यास करावा लागतो. वरील सर्वच गोष्टी मालिका, नाटक, चित्रपट इत्यांदीमध्ये सक्षम अभिनय प्रदर्शित करण्यास मदत करतात. याशिवाय नर्तक जेव्हा चित्रपट इत्यादींमधे अभिनय साकारतो, तेव्हा त्याच्यावर संस्कारित झालेली ताल-लयीची जाण, अभिनयास वेगळेपण देते. नृत्यशिक्षणातून या अभिनय क्षेत्राकडे वळण्याची इच्छा आपसूक होते. व अनेक वर्षांची नृत्यसाधना केल्यामुळे आलेला आत्मविश्वास, चण, सादरीकरणाची उत्तम पद्धत, स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्याची इच्छा या सर्व गुणांमुळे नर्तकीची जेव्हा अभिनेत्री बनते, तेव्हा ती प्रेक्षकांनाही अधिक भावते. अर्थात, अभिनय क्षेत्र हे एक अतिशय अवघड क्षेत्र असून त्याचादेखील वेगळा सखोल अभ्यास करावा लागतो. आणि उत्तम नर्तक नसलेले परंतु आत्यंतिक उच्च दर्जाचा अभिनय साकारणारे अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की, शास्त्रीय नृत्यशिक्षणातून होणाऱ्या विविधांगी संस्कारांमुळे अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना किंवा करण्याकरता एक भक्कम पाया, आधार तयार होतो. ज्याच्या जोडीने अभिनय क्षेत्राचा अभ्यास करण्यास सोपे होते.
बातम्या आणखी आहेत...