आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrushalee Kinhalkar Article About Blessing In Disguise

संकेत नियतीचा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फारच धूसर आहे. विज्ञानाचे शोध तर
रोज नवनवे आभाळ माणसाला दाखवत असतात, पण जगताना काही
अनुभव असे येतात की, त्या अनुभवातून माणसाने नेमका निष्कर्ष काय काढावा, हेच कळत नाही.
एक बाई. वय 39 वर्षे. एका मुलाची आई. शिक्षित. दोन महिन्यांचा गर्भ राहिलेला. नियमित तपासणीस येऊ लागली. वय जास्त असल्यामुळे गर्भारपणातील सर्व धोके तिला समजावून सांगितले. त्यातच तिला रक्तक्षय, आणि थॉयराइड ग्रंथीचे काम थंडावलेले. एकूणातच ती जोखमीच्या गर्भारपणची केस. दर आठवड्यात येऊन जाई.
एक दिवस म्हणाली, ‘मॅडम, थोडं खासगी बोलायचंय, रागावू नका.’ मी उत्तरले, ‘बोल मोकळेपणी.’ ती म्हणाली, ‘मॅडम, माझ्या हातनं एक पाल मेली बघा. गर्भार बाईच्या हातून असं होणं अशुभ असतं म्हणतात. मी दार लावत होते अन् ती त्यात चिणून मेली! शिवाय मॅडम, घरात रोज एक काळं मांजर येतं अन् दूध पिऊन जातं. मांजरालादेखील गर्भार बाईनं सारखं हाकलू नये, म्हणतात. मला तर दिवसातून दहा वेळा त्याला हाकलण्याची वेळ येतेच. मॅडम, माझं बाळ नीट राहील ना हो? मला खूप भीती वाटतेय. सोनोग्राफी करून बघता का? ’
मी तिला तपासलं अन् तिची भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला. अडीच महिन्यांचा गर्भ ठीक होता. तिला सांगितलं, असे वेडेवाकडे विचार करू नकोस, ती गेली घरी. पुन्हा आठवड्यानंतर तिचा फोन- ‘मॅडम, गर्भवती स्त्रीने ऐकावी अशी सीडी आणलीय मी. ती ऐकू का? त्याचा खरंच फायदा होईल का?’ मी तिला सांगितलं, ‘तुझ्या मनाला बरं वाटेल, असं सगळं कर.’ पंधरा दिवस गेले. ती पुन्हा आली. तिच्या सीडी प्लेअरमध्ये सतत सीडी अडकत होती. ऐकणं झालंच नाही, म्हणाली. तरी सीडी ऐकावी, असं तिला फारच वाटत होतं. मनातून फारच अस्वस्थ वाटली. सारखं बाळाबद्दल विचारत होती. तिचं वय गर्भारपणासाठी थोडं जास्त होतं. बाळात व्यंग असण्याची शक्यता अशा केसेसमध्ये असते, त्यामुळे मी तिला अ‍ॅनामली स्कॅनसाठी सोनोलॉजिस्टकडे पाठवलं. दोनच दिवसांनंतर तिचा फोन- ‘मॅडम, ते काळं मांजर आता अजूनच जास्त वेळा येतं आहे. मॅडम, आज ना अंगणात एक मेलेला बेडूक पडलेला होता! अगदी सकाळी उठल्याबरोबर मला तो दिसला. मॅडम, मला खूपच घाबरल्यासारखं होतंय.’ पुन्हा तिचं समुपदेशन. तिला सोनोग्राफीसाठी जाण्याची आठवण करून दिली. संध्याकाळी सोनोलॉजिस्टचाच फोन आला. तिच्या बाळाच्या हृदयात, पोटात अन् फुप्फुसात मोठमोठे दोष होते. आतड्यांमध्येही दोष होते. एकूणात, हे बाळ जगणंच अशक्य, इतके जन्मत:च व्यंग होते सगळ्या अवयवांमध्ये. मला धक्काच बसला!

पाल मरणं, काळ मांजर, मेलेला बेडूक अंगणात पडणं, मन:शांतीसाठी सीडी ऐकण्यात येणारे अडथळे, हे सगळे कसले संकेत? निसर्गाचे की नियतीचे? असतील तर हे कसले संकेत? शुभ की अशुभ? रात्री ती आली. सुकलेला चेहरा आणि रिपोर्ट घेऊन! रिपोर्ट वाचला... अनेक दोष असलेलं ते बाळ. क्षणभर सुन्न झाले मी. पती-पत्नीचं समुपदेशन करून वैद्यकीय गर्भपाताचा सल्ला दिला. जाताना ती म्हणाली, ‘मॅडम, एकच वाटतं, या बाळाच्या हत्येचं पाप माझ्या माथी येईल का हो?’ मी अवाक् होऊन तिच्याकडे पाहिलं! अन् विचार करू लागले- गेल्या दहा वर्षांत याच देशात लाखो निष्पाप मुलींचा गर्भपात करून निकाल लावला गेला. सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान आणि ‘मुलगी’ असणार्‍या गर्भाची विल्हेवाट लावणारे डॉक्टर्स अन् हे गर्भपात करवून घेणार्‍या असंख्य माता... त्यांच्या मनात एकदा तरी असा विचार आला नसावा? त्यांना हे महापाप करताना नियतीने एखादा तरी संकेत का दिला नसेल? मग नियतीचे संकेत खरे की खोटे? काय मानावं? कशावर विश्वास ठेवावा? पण एक मात्र खरं, की या केसमध्ये नियतीच्या संकेतांना उपकारकच मानायला हवं. कारण या विचित्र घटनांमुळे एकच झालं की, तिनं भीतीपोटी का होईना, सोनोग्राफी योग्य वेळेच्या आत करवून घेतली. कायदेशीररीत्या गर्भपात करणं, केवळ वीस आठवड्यांच्या आतच जमू शकतं. हे संकेत तिला मिळाले नसते तर ती निर्धास्त असली असती, पण मग सोनोग्राफीसाठी जायला कदाचित तिने उशीर केला असता; अन् मग दोष असणारं बाळ, अल्पजीवी असणारं ते बाळ नाइलाजाने तिला पोटात वाढवावं लागलं असतं. अन् पुन्हा त्याच्यासाठी प्रसूतिकळा, वेदना अन् नंतर त्या बाळाचा चिरवियोग, हे सगळं तिला सोसावं लागलं असतं. ब्लेसिंग इन डिसगाइस म्हणतात ते यालाच. तरीही मनात प्रश्न उरतोच- त्या अनेक अशुभ सूचक घटना अन् व्यंग असणार्‍या त्या बाळाची नेमकी संगती कशी लावायची? प्रश्न उरतोच. उत्तर मात्र सापडत नाही. जगात रोज अनेक अभद्र गोष्टी घडतात. निर्घृण गुन्हे केले जातात. असं करणार्‍या लोकांना नियती धोक्याचे इशारे का देत नसेल?
vrushaleekinhalkar@yahoo.com