आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrushalee Kinhalkar Article About Global Warming

आग्रही घट्ट विळखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार-पाच वर्षांपूर्वी एकदा प्रवासात लालजर्द गुलमोहराची झाडं रस्त्यानं पाहिली होती. उन्हाळ्याची काहिली जराशी कमी करणारी ती प्रसन्न टवटवीत झाडं पाहून गाडी थांबवली. मन भरून पाहून घेतलं त्यांना. ड्रायव्हरला गुलमोहराच्या वाळलेल्या शेंगा मुद्दाम आणायला लावून बागेत चार-पाच झाडं लावून टाकली. झाडं मोठी झाली, पण अजूनही लाल फुलं मात्र नाहीत. येतील यंदा, असं मी मनाशी नेहमी म्हणत राहिले.
मागच्या आठवड्यात बोअरचं पाणी एकाएकी संपलं. घरासमोरच प्रचंड मोठं बांधकाम सुरू झालंय. तिथे दोन बोअर पाडलेले आहेत. त्यामुळं आपल्याकडचं पाणी कमी झालं असावं, हा माझा समज. माणसं बोलावून बोअर उघडून पाहणं आलंच. बोअरचे पाइप्स अन् मोटर सगळं घट्ट रुतलेलं. आत चिखल. मोटर अन् पाइप्स खूप प्रयत्नांती उपसून काढले, तर दृश्य वेगळंच होतं!
गुलमोहराच्या मुळ्यांनी पाइपला विळखा घातलेला होता! पाइपमधून थेंबभरदेखील पाणी येऊ नये, इतकी मुळं पाण्यात पसरलेली होती. इतकी मजबूत जाळी त्या मुळांची विणली होती, की जमिनीत पाणी भरपूर असूनदेखील ते पाइपद्वारे वर येणं शक्यच नव्हतं. मुळं कापणारं यंत्र आणून ती सगळी मुळं कापून काढली, तर खाली स्वच्छ आणि भरपूर पाणी होतं!
गुलमोहराच्या शेंगा आणायला सांगितलं होतं, तेव्हा ड्रायव्हर म्हणाला होता, ‘‘बाई, हे गुलमोहराचं झाड घरात लावू नये. लई खराब असतंय.’’ त्याच्या ‘खराब’ या विशेषणाचा अर्थ असा होता, हे आज कळलं होतं. तातडीनं गुलमोहराच्या सगळ्या झाडांची कत्तल झाली, हे ओघानं आलंच.
पण डोळ्यासमोरून ती पाण्याला विळखा घालणारी मुळं मात्र हलत नव्हती! काही तरी चुकतंय, अशी अपराधाची भावना मनात रुजत होती. जमिनीतलं पाणी यंत्रांनी उपसून काढून वापरणारी माणसं आपण. शिवाय ते पाणी वापरणंदेखील अत्यंत बेपर्वाईनं. या असंख्य बोअर पाडलेल्या जमिनीचा ‘एंड ऑन व्ह्यू’ जर फोटोत घेतला तर जाणवेल की, जमिनीच्या छातीची चाळणीच करून टाकत आहोत, आपण सगळे.
प्रत्येकाच्याच घरी-दारी बोअर पाडणं, हे किती नेमाचं दृश्य झालंय हल्ली. निसर्गाचाच दुसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे वृक्ष. हेच गुलमोहराचे वृक्ष जमिनीच्या आतलं पाणी माणसानं बेसुमार उपसू नये म्हणून आग्रही विळखा घालून पाणी अडवतच होते की... तर त्यांना निर्दयपणं कापून टाकलं गेलं! काय अपराध होता त्या झाडांचा?
कवी नारायण सुमंत ‘वृक्षवेद’मध्ये लिहितात-
‘‘माणसांना जर नसते हात
हातागणिक जात
आणि जाती गणिक वस्ती
तर ...
नुसत्या लावण्यानेही झाडे आली असती...’’
किती खरं आहे हे! माझ्याच घरी जे काय घडलं होतं ते मला खोलवर अस्वस्थ करून जात होतं. ‘पृथ्वी माणसांची तहान भागवू शकेल; पण हाव नाही’, असं महात्मा गांधी म्हणाले होते. माणसाची हाव तर दिवसागणिक वाढतेच आहे... घराचं इंटिरियर डेकोरेशनचं काम चालू आहे. डझनभर प्लायवूडचे गठ्ठे घेऊन एक गाडी घरासमोर थांबली. मनात हे सगळे विचार थैमान घालत होते; क्षणभरात माझा घर सजावटीचा सगळा उत्साह मावळून गेला! मला एकदमच आपल्या आतल्या पोकळपणाची जाणीव झाली.