आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छा की अट्टहास ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुपदेशनासाठी आलेलं एक जोडपं. दहा वर्षांचा संसार झालेला. दोन मुलींचे जन्म झालेले, पैकी धाकटी केवळ दहा महिन्यांची. दोघेही वैतागलेल्या मन:स्थितीत. पत्नी जरा जास्तच टोकाची भूमिका घेऊन व्यक्त झाली. ‘मला करायचाच नाही संसार या माणसाबरोबर’ असे वारंवार म्हणत होती.

भांडणाची तात्कालिक कारणे अर्थातच त्यांनी आरंभीच सांगितली; पण दोनचार भेटींतून मग भांडणं आणि वादाचे मूळ लक्षात आले. पती जरासा अबोल, परंतु गरीब परिस्थितीतून शिकून, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला. पत्नी जराशी हट्टी आणि माहेर सुस्थितीतलं. लग्नानंतर साडी नेस, हा पतीचा आग्रह. पत्नीने या मुद्द्यावरच रणकंदन केलं! शेवटी पती­ने एक पाऊल मागे घेतलं.

आजचा भांडणाचा ताजा मुद्दा म्हणजे, पतीचा मोबाइलचा अतिरेकी वापर! अष्टौप्रहर मोबाइलवर बोलणे, गेम्स खेळणे, मेसेज पाठवणे किंवा वाचणे यामुळे पत्नी प्रचंड वैतागलेली. तिला संशय येतोय की पतीची कुणी खास मैत्रीण आहे आणि त्यामुळेच तो सतत मोबाइल हातातच ठेवतो वगैरे.

समुपदेशनाच्या एका टप्प्यावर लक्षात आलं की, लग्नाच्या­नव्यानव्या काळातच पत्नीने साडी नेसण्याच्या पतीच्या विनंतीला ज्या पद्धतीने धुडकावून लावलेलं होतं, त्या क्षणापासूनच हळूहळू पती तिच्यापासून मनाने दूर गेला. जवळ येण्याच्या काळातच नेमका तो दूर गेला आणि मग पुन्हा हे अंतर कापण्याचे प्रयत्न दोघांकडूनदेखील झालेच नाहीत. ती सतत तक्रारीचा सूर लावे आणि मनासारखं करून घेई. पण नवरा मनानं दूर जातोय, हे तिला समजलेच नाही. पहिली मुलगी मोठी झाली. दुसरे अपत्य व्हावे, हा हट्ट पत्नीचाच. पती त्यासाठी अनुत्सुक होता; पण हिने आपला हट्ट पूर्ण केलाच. सध्या पतीची बदली झाली आहे, तालुक्याच्या गावी; पण पत्नीने शहरातच राहणे पसंत केले. परिणामी पती रोज दीडशे किमीचा प्रवास करतो. रोजच्या येण्याजाण्यात थकतो. गेल्या तीनचार वर्षांत तिचा वाढदिवस त्याच्या लक्षात राहिला नाही, यावरून ती रात्र रात्र रडते, भांडते. तो मोबाइलमध्ये गुंग असतो. हट्टाने तिने त्याला महाबळेश्वरला ­नेले; पण तो तसाच मोबाइलमध्ये डोळे घालू­न बसला म्हणे. काय करावे? मला शांता शेळकंेचे अजरामर भावगीत आठवले.
ती न आर्तता उरात
स्वप्न तेन लोचनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी
तोच चंद्रमा नभात...
पती-पत्नीच्या नात्यात असे का घडत असावे? ‘त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा’ असे का होत असावे? मुळात, प्रीतीचा अर्थच आपण समजून घेत नसू. विवाहाचा अर्थ तर त्यापुढची पायरी. प्रपंचातले ताणेबाणे, चढउतार सोसणे, त्याग करणे, निमूट राहणे या आणखी पुढच्या पायर्‍या.

स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार केला तर पत्नीने काय पोशाख करावा, यावर पतीचे बंधन का? अशी जबरदस्ती पत्नी कधी करते का? तिच्या इच्छांची गळचेपी का? असा खूप कीस पाडता येईल. पण मुळात ‘पोशाख’ या गोष्टीवर नेमकं कोण चुकलं, असं बघू या. लग्नाच्या नव्या नव्या काळात पतीच्या इच्छेला प्रेमळ विनंती समजून पत्नीने होकार दिला असता तर बराच संघर्ष टळला असता.

हळूहळू पतीच्या मनात स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण करून तिनं मनासारखा पोशाख करण्याची इच्छा प्रदर्शित केली असती तर पतीही ती गोष्ट मान्य करता. एरवीही तिच्या रणकंदनापुढे त्याने मान तुकवलेली दिसतच होती ना! पण हट्टामुळे ति­ने पतीच्या मनात स्थान निर्माण करण्याची संधी कायमची गमावली, हे सत्य तिला आत्ता थोडेसे पटत होते; पण आता बराच उशीर झाला होता. नवर्‍याने जिव्हाळ्यानं तिच्याकडे पाहणं हे महत्त्वाचं असतं तिथं मग पोशाख गौण ठरतो, दुय्यम ठरतो, हे तिला उमगलंच नव्हतं! लग्नाच्या केवळ दहा वर्षांच्या सहवासात ती दोघे एकमेकां ना वैतागली होती. मनं विटून गेलेली होती. प्रपंचावर कडवटपणाची साय दाटून आली होती. उगीचच मला जुन्या "वक्त' सि­नेमामधील बलराज साह­नी आणि अचला सचदेव आठवू­न गेले, आणि गाणं आठवलं-
ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम ­नही
तू अभी तक है हँसी और मै जवाँ...
ती­न मुलांच्या ज­न्मामुळे छा­नपैकी फुललेल्या, परिपक्व संसारातलं, पती- पत्नीचं अवीट ­नातं सांगणारं हे गाणं.
तू मीठे बोल जा­नेमन जो मुस्कुराके बोल दे
तो धडक­नों में आज भी शराबी रंग घोल दे...
असं पतीच्या जिभेवर उगीच येत नसतं. त्यासाठी लाख वेळा पत्नीला स्वतःचं म­न बांधू­न ठेवावं लागतं, न थकता संसाराचं गाडं ओढावं लागतं, सोयरेधायरे जोडून ठेवावे लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्‍या अर्थाने प्रपंचात विरघळून जावं लागतं. एखाद्या घरगुती समारंभात सगळे मित्रमंडळी, पाहुणे यांच्या साक्षी­नं पती जर असं म्हणत असेल की दिलों को जीतने का फन, जो तुझमें है कहीं नही... तर पत्नी अंतर्बाह्य सुखावू­न जाते आणि तिच्या आजवरच्या कष्टांचं, यातनांचं पूर्ण हरण होतं. सगळी दुःखं क्षणात विसरायला होतात आणि ओठावर केवळ एकच शब्द येतो संसार हा सुखाचा, मी अमृतात न्हाले!

पण हे सगळं घडण्यासाठी दोघांनाही संयमाचे पाठ गिरवावे लागतात. ‘मी पणा’चा त्याग करावा लागतो. समजूतदारपणा अंगात रुजवावा लागतो. केवळ पत्नीनेच त्याग केला तरीही संसार नेटाने पैलतीरी जातात, हे आपण अनुभवलेलंच आहे. इतिहासात पानोपानी याचे दाखले आहेतच; पण आजच्या आधुनिक युगात, स्त्री-पुरुष समतेच्या जगात दोघांनीही समंजसपणा दाखवायला हवा आहे.

प्रस्तुत प्रसंगात पत्नी स्वतःच्या मनाप्रमाणे सगळं मिळवू शकली; पण या हट्टी प्रवासात पतीचं मन कुठे हरवून गेलं, हे तिला समजलं नाही. आज दहा वर्षांनंतर महाबळेश्वरला एकांतातदेखील तिला तिचा पती सर्वार्थाने गवसलाच नाही
सारे जरी ते तसेच
धुंदी आज ती कुठे?
मीही तोच तीच तूही
प्रीती आज ती कुठे?
अशी अवस्था दोघांनीही अ­नुभवली. याचं कारण- पत्नीचा हट्टी स्वभाव आणि मनमानी. अर्थात तिच्या स्वातंत्र्याबद्दल, तिच्या कपड्यांबद्दल ती बंधनात असणं हे गैरच आहे; पण मला वाटतं, तिने हा अट्टाहास जरा अवेळी केला. इच्छेचं रूपांतर हट्टात आणि मग हट्टाचं रूपांतर दुराग्रहात झालं, हे वाईट. तिचा पोशाख हा वाद करण्याचा विषय असू शकेलही; पण ती वेळ अयोग्य होती. लग्नानंतर नवखा काळ हा एकमेकांचं मन समजून घेण्याचा, एकमेकां­ना ओळखण्याचा काळ असतो.

मनानं जवळ येण्याचा प्रयत्न दोघांनीही करायला हवा, असा तो काळ. स्त्रियांचा प्रवास हा साधारणतः मनाकडून शरीराकडे आणि पुरुषांचा शरीराकडून मनाकडे, असा होत असतो. त्यामुळे कदाचित पुरुष पत्नीच्या बाह्य राहणीमा­नाबाबत थोडे आग्रही असतात. पतीच्या मनात शिरून, त्याचा कल बघून हळूहळू कधी तरी तिनं पोशाखाबाबतची तिची इच्छा व्यक्त केली असती तर? स्त्रीवादी नजरेतून असं म्हणतादेखील येईल की, का प्रत्येक वेळी स्त्री­नंच पडती बाजू घ्यायची? पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, तिला जर पोशाखाबाबत तडजोड करायचीच ­नव्हती तर ति­नं इतर सगळ्या बाबतीत पतीला सुखावणारं वर्त­न करायला हवं होतं. तालुक्याला राहण्यासाठीदेखील तिचा ­नकारच आहे. दुसरं अपत्य होण्यासाठीदेखील तिने तिचाच विचार, इच्छा पुढे रेटली आहे. आणि आज मात्र वाढदिवस साजरा करण्यासाठी अट्टहासाने तिने त्याला महाबळेश्वरला आणलं तर तो सर्वार्थाने, सर्वांगा­ने फुलू­न यावा, ही तिची अपेक्षा म्हणजे पतीला यंत्र समजण्यासारखीच ­नाही का? वरकरणी सगळं तिच्या म­नासारखं करणारा तो... आतू­न विझत चाललाय, हे तिच्या गावीही ­नव्हतं आजवर.

मला वाटतं, ‘तोच चंद्रमा नभात’ या भावगीतामधली उदासी दूर जावी आणि जुन्या "वक्त' चित्रपटातील गीतासारखं नवर्‍याने तिला तू अभी तक है हँसी...असं म्हणावं किंवा न म्हणतादेखील त्या भाव­नेनं पुढचं आयुष्य व्यतीत करावं, असं जर तिला वाटत असेल तर तिनं दिलों को जीतने का फन शिकून घ्यायला हवा. शहरातच राहायचं, या तिच्या अट्टहासाला ती असं कारण देतेय की, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, छोट्या गावात वातावरण पोषक नसतं इत्यादी. पण ताणतणावात असणारे पालक, भांडणारे आईबाप, रडणारी आई, चिडलेले किंवा स्वतःतच रमलेले वडील अशी चित्रं घरात रोज पाहणार्‍या मुलांच्या म­नावर काय काय कोरलं जात असावं, या गोष्टीचा विचार हे जोडपं कधी करेल बरं?
vrushaleekinhalkar@yahoo.com