आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्त होण्याची कला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नृत्याद्वारे आनंद, भावना व्यक्त करणे किंवा विशिष्ट वयात नृत्याचे प्रशिक्षण घेणे प्रत्येकालाच शक्य नसते. पण लग्नसमारंभात, मित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरमध्ये, विशिष्ट कार्यक्रमांच्या मिरवणुकीत नृत्यात सहभागी होऊन आनंद व्यक्त करण्याच्या अनेक संधी आपण सोडता कामा नये. नृत्याचे महत्त्व पटावे यासाठीच तर साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नृत्यदिवस...

पती-पत्नीने मुद्दाम सणासमारंभात, मित्रपरिवाराच्या पार्टीत एकत्र नाचावे. त्याकरिता थोडासा वेळ काढून घरच्या घरी टीव्ही, व्हिडिओमध्ये पाहून सोप्या स्टेप्स बसवाव्यात. याने नाते दृढ होण्यास मदत होईल.

मानवाच्या भावभावनांचे प्रगटीकरण करण्याकरताच नृत्याचा उगम झाला. परंतु नृत्याचा उपयोग फक्त भावाभिव्यक्तीइतकाच मर्यादित नाही. मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक या तिन्ही स्तरांवर नृत्याचा विविध प्रकारे उपयोग होतो. यातही विशेषत शास्त्रीय नृत्यशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस अधिक फायदा होतो आणि एक आनंदी, उत्साहपूर्ण, समाधानी आयुष्याचा अनुभव घेता येतो.

नृत्याबद्दलच्या लोकांच्या काही चुकीच्या संकल्पना दूर करणे, नृत्यास समाजात उच्च स्थान मिळवून देणे, नृत्याचा प्रचार-प्रसार, अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेवून अांतरराष्ट्रीय नृत्यदिवस साजरा करण्याची प्रथा १९८२मध्ये युनेस्कोने सुरू केली. २९ एप्रिल ही तारीख कोणत्याही विशिष्ट कारणाकरिता निवडली गेलेली नाही, तरीही एक महान सुधारक जाँ जॉर्ज नोवेरे यांचा स्मृतिदिन म्हणूनही या तारखेस महत्त्व आहे.

आंतरराष्ट्रीय नृत्यदिवस सुरू करण्याचे अजून एक महत्त्वाचे ध्येय म्हणजे, सरकारद्वारे नृत्यशिक्षणास सर्व प्रणालींमध्ये एक योग्य स्थान उपलब्ध करून देणे. यामुळेच २००५मध्ये नृत्यदिनास प्राथमिक शिक्षणाच्या रूपात केंद्रित केले गेले. २००६मध्ये इंटरनॅशनल डान्स काैन्सिलच्या अध्यक्षांनी नृत्यकलाकारांचे एकत्रीकरण, त्या बाबतीत कलाकारांचा निरुत्साह आणि त्यामागील कारणमीमांसा या विषयांचा उल्लेख करून जगभरातील नृत्यकलाकारांनो एकत्र व्हा, असे आवाहन केले. २००७ हे वर्ष लहान मुलांना समर्पित साजरे केले गेले.
आज सर्वत्र नृत्यास निव्वळ मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले जाते. परंतु बदलत्या काळात नृत्यशिक्षण ही प्रमुख गरज बनली आहे. ताणतणावांमुळे अनेकांचे आयुष्य विस्कळित होत आहे आणि त्यावर उपाययोजना करण्याकरिता डाॅक्टरांसोबत मानसोपचारतज्ज्ञांकडेही मोठी रांग लागलेली असते. समुपदेशन हा परवलीचा शब्द झाला आहे. त्या बाबतीत प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये मार्गदर्शन केले जात आहे, या गोष्टी जीवनावश्यक बनल्या आहेत. व्यक्तिमत्त्व विकासासाठी जागोजाग कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

एक नृत्यांगना, तीही शास्त्रीय नृत्यांगना, म्हणून मी जेव्हा या गोष्टींकडे, वातावरणाकडे बघते तेव्हा शास्त्रीय नृत्यशिक्षणास लहान वयातच सुरुवात केल्याचे समाधान मिळते. एक व्यक्ती जेव्हा शास्त्रीय नृत्यकला शिकते तेव्हा उभं राहण्याचा ढंग, गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व, त्याची जाण, मेहनत, चिकाटी, सामर्थ्य (जे बऱ्याच लोकांमध्ये कमी आढळत असल्याने आत्महत्येसारखे प्रकार अधिक होऊ लागले आहेत), शारीरिक लवचिकतेबरोबर मनाचीही लवचिकता, निग्रह, ध्यास, अध्यात्म, स्वत:वर प्रेम करण्याची भावना, शरीराचा सुडौलपणा, वेळेचे नियमन, उत्तम संभाषण कौशल्य, संस्कृतीचा अभ्यास, अपयश पचविण्याची क्षमता, स्वत:वरील वाढलेला आत्मविश्वास, स्वत:च्या पायावर उभं राहू शकण्याची क्षमता आणि कलोपासनेद्वारे ईश्वरोपासना असे अनेक फायदे मिळतात. मनावर नियंत्रण ठेवण्याचे सामर्थ्य अधिक प्रमाणात निर्माण होते. आयुष्याला एक वळण, शिस्त लागते. स्वत:ला योग्य वेळी स्वत:च समुपदेशन करण्याचे सामर्थ्य निर्माण होते. नृत्याचे शिक्षण घेणाऱ्यास ते मनोरंजनाचे साधन आपोआपच बनते, भावना व्यक्त करण्याकरिता जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा हेच नृत्य आणि अभिनय कामी येतात. उदाहरणार्थ अनेक नृत्यकलाकारांना प्रश्न विचाराल की, ‘तुम्ही रागावलात किंवा निराश झालात तर काय करता?’ यावर नृत्य हेच जीवन मानणारे कलाकार आणि मनोरंजन म्हणून काही वर्षं शिक्षण घेतलेले कलाकार ‘आम्ही खूप नाचतो, कुठलंही गाणं लावून हवं तसं एकटं नाचतो. त्या भावनेत नाचल्यावर एक वेगळीच आणि त्या भावनेला साजेल अशी कोरिओग्राफी होते’, अशीच उत्तरे देतात. ही एक प्रकारची ‘डान्स थेरपी’च असते. ज्यामुळे अतिभावनाशील मन हळूहळू शांत होऊन मानसिक स्थैर्य मिळते, त्याचबरोबर कलादेखील अधिक खुलते आणि सारासार विवेकबुद्धी पुन्हा काम करू लागते.

नृत्याचे हे सर्व जसे मानसिक आणि आजच्या काळाला महत्त्वाचे फायदे आहेत तसेच शारीरिकही आहेत. शास्त्रीय नृत्य, आधुनिक नृत्य, पाश्चिमात्य नृत्य; नृत्य कुठलेही असले तरीही त्याचे प्रमाण म्हणजे निव्वळ निखळ आनंदाची प्राप्ती. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार नृत्यप्रकाराची निवड करते. शारीरिक स्वास्थ्य हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील प्रमुख घटक. जसे मानसिक स्वास्थ्य चांगले तर शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते, आजार कमी होतात; तसेच शरीर सुदृढ नसेल तर मनदेखील शांत, उत्साहपूर्ण, क्रियाशील राहात नाही. अंगावरची चरबी कमी करणे, वजन कमी करणे, सुडौल शरीरयष्टी असणे, स्नायूंची ताकद वाढणे, सुदृढ शरीराकरिता नृत्याची गरज प्रत्येक व्यक्तीस असते. प्रत्येकाने स्वत:ला जे नृत्य करताना आनंद मिळेल ते शिकावे. ‘शिकणे’ असे म्हणण्याचे कारण गणपतीतील, लग्नाच्या वरातीतील नाच हा क्षणिक आनंद देऊन जातो, ताण कमी करतो, हे सत्य असले तरीही मानवाला चिरकाल आपल्यासोबत राहणारी, कधीही एकटेपणा न आणणारी नृत्यकला ही शिकावीच लागते. त्यायोगे आयुष्याचा अंतापर्यंत आनंद हवा तेव्हा, हवा तसा घेता येतो. अनेक वाईट, समतोल ढासळू पाहणाऱ्या प्रकरणांपासून स्वत:स दूर ठेवता येते.

ज्यांना वेळेअभावी शिक्षण शक्य नसते त्यांनी काय करावे? एखाद्या समारंभात मुद्दाम नृत्यामध्ये सहभागी व्हावे. आवडत्या चित्रपटातील गाणे वाजवून आपल्या कुटुंबासहित आठवड्यातून एकदा तरी मनसोक्त नाचावे. यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे संबंध अजून घट्ट होण्यास मदत होते. मित्रपरिवारासोबत नाचावे. पती-पत्नीने मुद्दाम सणासमारंभात, मित्रपरिवाराच्या पार्टीत एकत्र नाचावे. त्याकरिता घरच्या घरी थोडासा वेळ काढून टीव्ही, व्हिडिओमध्ये पाहून सोप्या स्टेप्स बसवाव्यात. याने नाते दृढ होण्यास मदत होईल. इतरांनाही नृत्यशिक्षण घेण्यास प्रेरित करावे. प्रत्येक मुला-मुलीस किमान पाच वर्षे तरी नृत्यशिक्षण (शास्त्रीय नृत्यशिक्षण अधिक महत्त्वाचे) घेण्याची प्रेरणा द्यावी.
भाषा कळत नसलेले बाळ आनंद प्रथम नाचण्यातूनच व्यक्त करते. मानवाच्या या नैसर्गिक आणि अतिशय प्रभावशाली कौशल्याचा सर्वांनी सन्मान करावा. त्याच्या प्रचार-प्रसाराकरिता एकत्रित प्रयत्न करावा. आणि निरोगी, निरामय, आनंदी आयुष्याचा अनुभव जगातल्या प्रत्येक व्यक्तीस घेता यावा, याकरिताच हा नृत्यदिवस साजरा होतो.
(vrushali.dabke@gmail.com)