आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य आणि मानसशास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा क्लासमध्ये गप्पा मारत असताना मोठ्या मुलींना शिक्षण, करिअर याबद्दल विचारलं. सर्व शिष्या १७ वर्षांच्या पुढल्या होत्या, अगदी चाळिशीपर्यंतच्या. गप्पांमध्ये असं लक्षात आलं की, त्यातल्या २५ टक्के जणी कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकणाऱ्या, शिकविणाऱ्या, समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. मानसशास्त्राचे अभ्यासक नृत्य आणि तेदेखील शास्त्रीय नृत्य शिक्षणाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होत आहेत. काय कारण असावे याचे?

मनुष्याच्या आयुष्याचे तीन प्रमुख घटक म्हणजे सुख, शांती आणि समाधान. या तिन्ही शब्दांत समानता दिसली तरी त्यांचे अर्थ भिन्न आहेत. समाधान ही मनाची क्षणिक अवस्था आहे, सुख हे मानण्यावर आहे, तर शांती ही चिरकाळ टिकणारी अवस्था. असमाधानी, दुःखी किंवा अशांत मन अनेक मनोविकारांना आकृष्ट करते आणि त्या त्रासातून बाहेर पडण्याकरताच एखादी व्यक्ती अडचणी घेऊन मानसोपचारतज्ज्ञाकडे किंवा समुपदेशकाकडे जाते. इतक्या विविध प्रकारच्या मनोविकारांना दूर करताना नकळत का होईना, त्या मानसोपचारतज्ज्ञावरदेखील परिणाम होतो. लोकांच्या विवंचना, दुःख यांना तटस्थपणे पाहून त्यात समोरच्याला कळेल अशा पद्धतीने समुपदेशन करावे लागते. परंतु हा तज्ज्ञदेखील माणूसच. त्याच्याही आयुष्यात अनेक अडचणी असतीलच. त्यांना बाजूला सारून इतरांना मदत करण्याचे पुण्यकर्म तो करतो. अशा वेळेस मन:शांती व मनोरंजन या दोन्ही गोष्टींची त्यांना नितांत आवश्यकता भासते आणि त्याकरिता नृत्यापेक्षा उत्तम माध्यम नाही, हे त्यांनाही बहुधा पटते. नृत्यातून माणसाला सुख व समाधान या दोहोंचा अनुभव मिळतो आणि मन:शांतीच्या मार्गावरील सर्व अडथळे दूर होतात.

एखाद्या निरागस बालकाला पहिल्यांदा चालता येण्याचा आनंद ज्या प्रमाणात होतो, अगदी तसाच शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यातील छोट्या-छोट्या गोष्टी जमू लागल्यावर आनंद मिळत राहतो, तोही आयुष्यभर. याचं कारण नृत्य ही कला आहे, त्यामुळेच अमर्याद आहे, अर्थात त्याचे शिक्षणदेखील अमर्याद आहे. मनुष्याच्या मनाची आंतरिक ऊर्मी म्हणजे नृत्य. हे नृत्य भगवान शंकरांनी निर्माण केले, असे म्हटले जाते. भगवान शंकरांनी केलेल्या नृत्याचे अर्थात तांडव नृत्याचे जे प्रकार आहेत- आनंद तांडव, संध्या तांडव, उमा तांडव, गौरी तांडव, कालिका तांडव, त्रिपुर तांडव, संहार तांडव; यांच्या नावावरून आपसूकच मनातील भावभावनांच्या तरंगाचे प्रगटीकरण नृत्यातूनच होते. नृत्य आणि मन यांचे नाते वैदिक काळाच्याही अगोदर सिद्ध झाले आहे.

कथ्थक नृत्य शिकणाऱ्या व्यक्तीचे स्वभावदर्शन त्याच्या नृत्य सादरीकरणात सतत जाणवते. सादरीकरणासाठी गाण्याची केलेली निवड, सम देण्याची पद्धत, बोलण्याचा ढंग आणि रंगमंचावरील वापर यावरून कथ्थक नर्तक/नर्तकीचा स्वभाव नक्कीच स्पष्ट होतो.
शास्त्रीय नृत्य स्वत:च्या मनास आत्मकेंद्रित करणारे, शारीरिक आणि मनोबल वाढवणारे, गर्व-स्वार्थ यास बाजूला ठेवणारे, माणसाच्या भावविश्वाचा एक-एक पदर उलगडून दाखविणारे, दैनंदिन आयुष्यातील एकसुरी जीवनातून बाहेर पडून निव्वळ निखळ आनंदाची प्राप्ती करून देणारे एक उत्तम साधन आहे. याचे शिक्षण घेतल्यावर जेव्हा शिक्षकरूपात व्यक्ती येते, तेव्हा एका समुपदेशकाची भूमिका आपोआपच धारण करते. कारण शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी गुरुंशी निव्वळ नृत्यानेच नव्हे तर मनाने जोडलेले असतात. नृत्याच्या देवाणघेवाणीतून मनातील भावभावनांचे प्रगटीकरण होऊन शिस्तबद्ध वातावरणातदेखील मोकळा श्वास घेण्याची, व्यक्त होण्याची जागा गुरू देतो.

हे सर्व शास्त्रीय नृत्याबाबतीत झाले. परंतु प्रत्येकाला हे जमेल असे नाही. एखाद्या आवडत्या गाण्यावर, संगीतावर हवा तसा नाच करणं हेसुद्धा मनावरचा तणाव मुक्त करण्याचे माध्यम आहे. उदा. सध्या प्रसिद्ध असलेलं ‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ हे गाणं. मीसुद्धा कधी कधी बदल म्हणून माझ्या मुलासोबत नाचते, आणि अगदी ताजीतवानी होऊन नव्याने कामास सुरुवात करते. अनेक नर्तक/नर्तकी अति राग, अति दुःखाच्या काळात नृत्यामध्ये अधिक वेळ रमतात, रियाझ करतात किंवा मनोवस्थेनुसार गाणे लावून नृत्यरचना करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मनोवस्थेत आत्यंतिक सुंदर नृत्यरचना (कोरिओग्राफी) होते, अर्थात नृत्याचे सामर्थ्य हे मनाच्या कुठल्याही अवस्थेचे रूपांतर सर्जनशीलतेत (क्रिएटिव्हीटी) करणे हे आहे. आज अनेक शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये नृत्यवर्ग चालवले जातात. यातून त्यांची कार्यशीलता वाढते, नैराश्य दूर होते, एकटेपणा कमी होतो. स्वयंसेवी संघटनांमध्ये मतिमंद, अपंग, मूक-बधिर, मनोरुग्णांसाठी खास डान्स थेरपिस्ट बोलवले जातात. त्यामुळे त्यांच्यातल्या सुधारणा स्पष्ट कळतात.

नृत्य व मानसशास्त्राच्या नात्याचे महत्त्व लक्षात घेता परदेशात ‘डान्स सायकाॅलॉजी’चा अभ्यासक्रमदेखील अनेक विद्यापीठांत समाविष्ट केला आहे. यात पदवी प्राप्त झालेल्यास ‘डान्स सायकाॅलॉजिस्ट’ म्हणतात. नृत्याच्या करिअरमधील हा अनोखा पैलू आहे.
मनुष्याच्या बहुतांश शारीरिक विकारांचे मूळ मनोविकार आहे आणि या बंदिस्त मनाला मोकळे करण्याचे, व्यक्त होण्याची मोकळीक देण्याचे सामर्थ्य नृत्यात आहे. निरोगी मन, निरोगी शरीराकरिता प्रत्येक माणसाने नृत्यास आपलेसे करणे आवश्यकच आहे.

वृषाली दाबके, डोंबिवली
vrushali.dabke@gmail.com
बातम्या आणखी आहेत...