आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णमय जगतं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नटखट स्वभावाने मन मोहून घेणारा बाळकृष्ण सामान्यांना आपलासा वाटतोच, पण नृत्य क्षेत्रातील कलाकारांवर बालकृष्णापासून ते तत्त्वज्ञानी कृष्णापर्यंतच्या सर्व रूपांचा प्रभाव जाणवतो. शास्त्रीय नृत्याच्या कणाकणात वसलेल्या श्रीकृष्णाविषयी नुकत्याच झालेल्या गोकुळाष्टमीनिमित्त हा लेख...

‘गो कुळाष्टमी’, ‘कृष्णजन्म’... सामान्यांचा आवडता सण. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं मोहून टाकणारं बाल्यरूप, बालक्रीडा हा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडता, परिचित विषय. परंतु ‘कृष्ण’ हा भारतातील सर्व शास्त्रीय नृत्यशैलींचा आत्मा आहे, असे म्हणणे योग्यच आहे.

एक गंमत सांगावीशी वाटते. काही दिवसांपूर्वी माझ्या एका नृत्यातच कार्यरत असलेल्या मैत्रिणीस भेटले, मुलगा झाला होता तिला. अभिनंदन करून नाव काय ठेवलं, असं विचारलं तर तिने ‘कान्हा’ असं सांगितलं. मलाही खरं तर माझ्या मुलाचं नाव प्रथम ‘कान्हा’च ठेवायचं होतं. परत येताना मनात विचार आला की, नृत्यक्षेत्रात (शास्त्रीय) कार्य करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपण यशोदा आणि आपलं मूल (मग मुलगा असो वा मुलगी) कृष्णच वाटत असावं. कदाचित नृत्यातून होणाऱ्या संस्कारांचाच हा परिणाम. पण विशेष म्हणजे नृत्याचं शिक्षण घेताना प्रत्येक कलाकार हा बालक्रीडा करणारा बालकृष्ण, गोप-गोपींच्या खोड्या काढणारा नटखट कृष्ण, वीररस दाखविणारा अद्भुत कृष्ण, शृंगाररसाचा प्राण असलेला तरुण कृष्ण आणि गीतोपदेश सांगणारा तत्त्वज्ञानी, दैवी कृष्ण अशा अनेक रूपांचा अभ्यास करतो. त्यामुळे एखादी नर्तकीसुद्धा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कृष्णाचे रूप शोधते. ‘नटवर’ कृष्ण म्हणून त्याची पूजा करते, तर आपल्या पती/प्रियकरातदेखील कृष्णरूप शोधते. आपल्या अपत्यात बालकृष्णच बघते.

खरंच, प्रत्येक नृत्यकलाकाराच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे ‘श्रीकृष्ण व त्याचे चरित्र’.

भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची साहित्य आणि कलेची परंपरा आहे. भारतीय साहित्यातील एक प्रमुख महाकाव्य म्हणजे ‘महाभारत.’ या कथेतील नायक ‘कृष्ण’ हा खऱ्या अर्थाने महानायक आहे, भारतीय जनतेचे आराध्य दैवत आहे. भगवान कृष्ण हे भगवद‌्गीतेतील तत्त्वज्ञानाकरिता जगप्रसिद्ध आहेत. कृष्ण भारतीय इतिहासातील असे चरित्र आहे जे एकीकडे मानवीय नायक, दुसरीकडे अर्धदेव-विष्णूचा अंशावतार, तर तिसरीकडे पूर्णावतार एक मात्र ईश्वर, या रूपात बघायला मिळतात.

श्रीकृष्ण नृत्यनिपुण होते. छालिक्य पद्धतीचे पुरस्कर्ते होते. श्रीकृष्ण हे भारतातील अनेक नृत्यशैलींचे प्रेरणास्रोत होते, असे म्हटल्यास चूक ठरत नाही. भरतनाट्यममधील शब्दम्, वर्णममधील अनेक पदे श्रीकृष्णचरित्रावरच आधारलेली आहेत. मणिपुरी नृत्याचा कृष्णाच्या रासलीलांशी सर्वात जवळचा संबंध आहे. असे म्टटले जाते की, भगवान शंकराने श्रीकृष्णाचे रासनृत्य पाहिले व ते पार्वतीसमवेत करण्यासाठी मणिपूर स्थानाची निवड केली. तसेच मणिपूर क्षेत्रात वैष्णवधर्माचा प्रचार झाला तो कीर्तन, रासलीला यातूनच. यावरून लक्षात येते की, मणिपुरी नृत्य पूर्णपणे रासलीलेवर आधारलेले आहे. कथकलीबाबतीत म्हटले जाते की, कालिकतचा राजा जमेरिनच्या स्वप्नात श्रीकृष्ण आले व त्यांना कृष्णलीलेवर आधारित नृत्यनाट्य बसविण्याचा आदेश दिला व भेट म्हणून मोरपंख दिला. तेव्हा राजाने ‘कृष्णा-अत्तम’ नामक कृष्णलीलेस जन्म दिला. ओडिसी नृत्यातील ‘त्रिभंग’ हा सर्वात महत्त्वाचा घटक, ज्यावर हे नृत्य पूर्णपणे अवलंबून आहे हा ‘नटवरभंग’ म्हटला जात असे. अर्थात याचाही संबंध श्रीकृष्णाशी येतो.

थोडक्यात, या सर्व शैली कृष्णचरित्रामुळे समृद्ध बनल्या आहेत. जयदेवकवींचे ‘गीतगोविंद’ यातील सर्व शैलींमध्ये नाचले जाते. कथ्थकबाबतीत सांगायचे तर कथ्थक कृष्णमय आहे किंवा कृष्णच कथ्थकमय आहे, असे म्हटले जाते. या सर्व नृत्यशैलीत कृष्णचरित्रातील माखनचोरी, कालियादमन, गोवर्धनधारण, द्रौपदीवस्त्रहरण, गीतोपदेश असे अनेक प्रसंग सादर केले जातात. असे म्हणता येईल की, या प्रसंगांशिवाय नृत्य सादरीकरणास पूर्णत्व येत नाही.

श्रीकृष्ण व त्याच्या चरित्राचा नृत्यासमवेत इतर कलांवर असलेला प्रभाव हा खूपच सविस्तर अभ्यासण्याचा विषय आहे. परंतु थोडक्यात असं म्हणता येईल, नृत्याच्या व शास्त्रीय संस्कृतीच्या अणुरेणूत कृष्णच वसलेला आहे, त्यांच्या धमन्यांतून फक्त कृष्णरस वाहतो आहे. हजारो वर्षांपासून कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाने भारतीय जनता, नर्तक आकर्षित झाले आहेत आणि पुढेही होतच राहणार.
vrushali.dabke@gmail.com
बातम्या आणखी आहेत...