आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्तकाचं वेगळेपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुळात एक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे; एखादा नर्तक अथवा नर्तकीकडे बघताना प्रेक्षकांनी एक कलाकार म्हणूनच त्यांची क्षमता बघावी. नर्तक असो वा नर्तकी, त्यास स्त्री किंवा पुरुष आहे या नजरेने न पाहता, तो एक नृत्य करणारा कलाकार आहे, एवढेच लक्षात ठेवावे.
माझ्या पूर्वलेखनात मी नृत्याची सर्वसमावेशकता, नृत्यातून व्यक्त होणे, नृत्याचा मानसशास्त्राशी संबंध आणि नृत्य-योग मिलाप या विषयांवर चर्चा केली. यात प्रकर्षाने एक मुद्दा समोर आला, तो म्हणजे शास्त्रीय अथवा कुठलेही नृत्य पुरुष असो वा स्त्री, आणि सर्व वयोगटांसाठी आवश्यक आहे.
परंतु गेली काही वर्षे पुरुषांनी नृत्यशिक्षण (विशेषत: शास्त्रीय नृत्यशिक्षण) घेण्याबाबत अनेक शंका समाजात निर्माण झाल्या आहेत, हे जाणवते. याचं उदाहरण म्हणजे एका १० वर्षांच्या मुलाने नुकताच माझ्या नृत्यवर्गात प्रवेश घेतला. त्या मुलाचे कथ्थक नृत्याबद्दलचे प्रेम खरोखरच आश्चर्यजनक आहे. त्याच्या आईशी बोलताना असं लक्षात आलं की, त्याने कथ्थक नृत्यशिक्षण घेण्याला त्याच्या वडिलांचा विरोध आहे. परंतु त्या मुलाला कुठल्याही परिस्थितीत कथ्थक शिकायचं असल्याने त्याच्या आईने घरात विरोध पत्करला आहे. वडिलांच्या मनात ‘तो एखाद्या मुलीप्रमाणे वागायला लागेल’ अशी भीती आहे.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, नृत्य शिकून पुरुषीपणा कमी होतो किंवा स्त्रीत्व निर्माण होते, ही भीती का असावी? आणि ती किती प्रमाणात योग्य आहे?
याबद्दल माझ्या गुरुंचं वाक्य मला नेहमी आठवतं, ‘एखाद्या पुरुषाने स्त्रीप्रमाणे वागण्यात नृत्याचा दोष नसून त्या व्यक्तीमधील वेगळेपण आहे, हे स्वीकारले पाहिजे. समाज विनाकारणच शास्त्रीय नृत्याला दोष देतो.’ शास्त्रीय नृत्य शिक्षणामुळे कुठलाही पुरुष ‘बायकी’ बनत नाही, हे आधी सगळ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यातील कथ्थक नृत्याबद्दल तर या अनुषंगाने बोलण्यासारखे खूप काही आहे. कथ्थकच्या इतिहासाचा आढावा घेतल्यावर लक्षात येतं की, ‘कथा कहे सो कथक कहावे.’ अर्थात, असे देवदेवतांच्या कथा सांगणाऱ्यास कथक म्हणावे. असे म्हणतात की, जेव्हा लव आणि कुश यांनी अयोध्येमध्ये रामायण गायले, तेव्हा ते नाचत, गात सादर केले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तेथील लोकांनीही श्रीरामांच्या कथा याच पद्धतीने सर्वत्र प्रसिद्ध केल्या आणि त्यानंतरच्या प्रवासातून कथ्थक नृत्याचा विकास झाला. अर्थात कथ्थकचा उगम लव आणि कुश अर्थात दोन लहान मुलांच्या सादरीकरणातून प्रेरित झाला, हे इथे प्रामुख्याने सांगायचे आहे. त्याचप्रमाणे आज अनेक प्रसिद्ध नर्तक ज्यांनी जगभर नाव कमावले आहे, जे तरुण नर्तक नृत्याचा प्रचार-प्रसार करत आहेत, उदाहरणार्थ, अनुज मिश्रा, विशाल कृष्ण, धीरेंद्र तिवारी, मान्यवरांमधील तर सर्वच गुरू, त्यांमध्ये कुठलेही स्त्रीत्व निर्माण आलेले नाही. पद्मश्री नटराज गोपीकृष्णजी, पं. बिरजू महाराज,
पं. दुर्गालाल, पं. राजेंद्र गंगाणी हे अनेक पुरुष जोरकस तांडव नृत्यपद्धतीकरता प्रसिद्ध आहेत.
त्याचप्रमाणे या सर्वांचे वैयक्तिक आयुष्यदेखील सर्वसामान्यांप्रमाणेच आहे. काही ज्येष्ठ नर्तकांच्या नृत्य करताना नारळाचे तुकडे करणे, हत्ती ओलांडणे अशा चमत्कारांच्याही कथा आहेत. कथकली हे नृत्य तर फक्त पुरुषांनीच करण्याचे नृत्य आहे. या नृत्यात स्त्रीपात्रदेखील पुरुषच सादर करतात. काही नर्तकांमध्ये जर स्त्रीत्व अधिक असेल तर ते नैसर्गिक असू शकते. जे नैसर्गिक आहे तेच उत्तम आहे आणि काही वेळेस लहान मुलांना घरामध्ये जर आईबरोबर अधिक स्त्रियांचा सहवास मिळाला असेल तर त्याचा प्रभाव त्या मुलावर असल्याने काही आवडीनिवडी, हालचाली स्त्रियांप्रमाणे होण्याची शक्यता असते. परंतु याचा अर्थ त्यांच्यातील पुरुषत्व कमी होते, असा नाही. त्यामुळेच शास्त्रीय नृत्य शिक्षणामुळे पुरुषांमध्ये व्यंग निर्माण होत नाही.
मुळात एक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे; एखादा नर्तक अथवा नर्तकीकडे बघताना प्रेक्षकांनी एक कलाकार म्हणूनच त्यांची क्षमता बघावी. नर्तक असो वा नर्तकी, त्यास अभिनय करताना कथेतील पुरुषपात्र व स्त्रीपात्र, लहान मूल, वयोवृद्ध माणूस, संत-खलनायक ही सर्व पात्रे तेवढीच सक्षमतेने दाखविणे गरजेचे असते. त्यामुळे नृत्य करणारा कलाकार स्त्री किंवा पुरुष आहे या नजरेने न पाहता, तो एक नृत्य करणारा कलाकार आहे, एवढेच लक्षात ठेवावे.
बातम्या आणखी आहेत...