आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्‍ययोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नृत्याचे अंतिम ध्येय हे मन आणि शरीराचा मिलाप, एकतानता, स्थिरता, व त्यातून निव्वळ निखळ आनंदाची प्राप्ती हेच आहे. अशा भावनेने शास्त्रीय नृत्याचे अध्ययन म्हणजेच ‘नृत्ययोग’ असे म्हणता येईल.
नुकताच ‘जागतिक योगदिन’ साजरा केला गेला, त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख. योग आणि नृत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नृत्य म्हणजे सजीवतेचे रूप, नृत्यातून मिळणारा आनंद शरीरात ऊर्जा निर्माण करतो. या नृत्याला जेव्हा आध्यात्मिक बैठक प्राप्त होते, नियमांचे बंधन येते, तेव्हा ते शास्त्रीय नृत्य बनते. या शास्त्रीय नृत्यांचा आधारग्रंथ म्हणजे आचार्य भरतमुनी लिखित ‘नाट्यशास्त्र’. या ग्रंथात नृत्याचा व नाट्याचा सर्वांगाने विचार केला आहे. त्यात अभिनयांतर्गत पुढील चार प्रकार त्यांनी नमूद केले आहेत- आंगिक, वाचिक, आहार्य, आणि सात्त्विक. यातील आंगिक अभिनयाचा संबंध ‘योग’ या शब्दाशी जवळचा आहे.
आंगिक अभिनय म्हणजे शारीरिक हालचालींच्या संयोगाने होणाऱ्या अंगमुद्रा, भावमुद्रांद्वारे जो संपन्न होतो तो. आंगिक अभिनय हा अंग, प्रत्यंग व उपांग या तिन्हींच्या संयोगाने होतो. अंग म्हणजे शरीर, हात, छाती, पाठ, कंबर, आणि पाय. प्रत्यंग म्हणजे खांदा, गुडघे, मनगट, मांड्या, बाहू, आणि पोट. उपांग म्हणजे शरीराचे छोटे छोटे अवयव; जसे डोळे, भुवया, पापण्या, बुबुळे, बोटे, हाताचा तळवा वगैरे. शास्त्रीय नृत्य शिकताना या सर्वांचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. सर्व अवयवांवर नियंत्रण आणावे लागते. त्याकरिता मन पूर्णपणे शरीरावर केंद्रित करावे लागते. आंगिक अभिनयात आनंदाखेरीज इतर कुठलेही भाव अपेक्षित नसतात.
ऋषी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांगामधील ‘आसन’ या तिसऱ्या प्रकाराशी नृत्यातील ‘आंगिक अभिनयाशी’ सांगड घालता येईल. आसनांच्या अंतिम स्थितीची लक्षणे म्हणजे शरीराची स्थिरता आणि सुखकरता या दोन ध्येयांमुळेच योगासन आणि व्यायाम यात फरक समजला जातो. हाच फरक नृत्य आणि व्यायामामध्ये समजला जातो. नृत्याचेदेखील अंतिम ध्येय हे मन आणि शरीराचा मिलाप, एकतानता, स्थिरता, व त्यातून निव्वळ निखळ आनंदाची प्राप्ती हेच आहे. अशा भावनेने शास्त्रीय नृत्याचे अध्ययन म्हणजेच ‘नृत्ययोग’ म्हणता येईल. नृत्य आणि योग यातील परस्पर संबंध पुढील टप्प्यांवर अभ्यासला जाऊ शकतो.
नृत्य आणि योग या दोन्हींचा समान धागा म्हणजे अध्यात्म. दोघांचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्षप्राप्ती. जेव्हा योगक्रियेतील अथवा नृत्यातील अंतिम चरण साधकाला साध्य होते, तेव्हा जो ब्रह्मसहोदर आनंद मिळतो तो सारखाच, परंतु योगक्रियेचा आनंद हा वैयक्तिक असतो. जेव्हा एखादा नर्तक त्याच्या नृत्याच्या अंतिम चरणी पोहोचतो, तेव्हा तो स्वतःबरोबर रसिकांनाही ती दिव्यानुभूती देतो. मोक्षप्राप्तीच्या मार्गावर त्यांनाही सोबती बनवितो. उदा. शास्त्रीय नृत्याच्या भावपक्षातील वंदना, स्तुती, भजन सादर करताना नर्तक तल्लीन होऊन जातो, त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षकही तल्लीन होतो. विठ्ठलाचे भजन सादर करताना नामाच्या गजरात नर्तकाबरोबर प्रेक्षकही डोलू लागतात, त्या ध्वनिलहरींमध्ये मिसळून जातात.
योगाभ्यासातील ॐकार साधना म्हणजेच त्याच्या ध्वनिलहरींमध्ये एकरूप होऊन मनाची स्थिरता साध्य करणे. अंतरात्म्याशी स्वतःला जोडणे. शास्त्रीय नृत्यातील, विशेषतः कथ्थकमधील सुरेल घुंगरांचा नाद, हा एका नर्तकास याच ध्यानस्थितीकडे नेऊन पोहोचवतो. कथ्थक नर्तक जेव्हा तासन् तास एका लयीत ‘तत्कारां’चा रियाज करतो, तेव्हा तो ध्यानक्रियेत असल्याचाच भास होतो. स्व. गोपीकृष्णजी हे तत्काराचे असे ७-७ तास ध्यानच लावत असत. तेव्हा ते एखाद्या योगीराजासमान भासत.
योगासनांमधील स्थिरता, लवचिकता ही शास्त्रीय नृत्याच्या अनेक अंगमुद्रांमध्ये आढळते. नटराजाची अंगमुद्रा, नृत्यातील एका पायावर उभे राहून करण्याच्या अनेक अंगमुद्रा घेताना योगाभ्यासाइतकेच मन केंद्रित करून शरीराच्या अवयवांवर स्वनियंत्रण ठेवावे लागते. तरीही ते सुखकर असावे लागते.
नृत्य आणि योग या दोन्हींमध्ये सर्वात आवश्यक म्हणजे योग्य गुरुंचे शिष्यत्व स्वीकारणे. शास्त्रीय नृत्यात गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगाभ्यासातदेखील योग्य गुरूचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. त्याच्या अभावी शारीरिक दुखापत, व्यंग, इजा निर्माण होऊ शकतात. तसेच योगाभ्यासकाला योग म्हणजे निव्वळ शारीरिक हालचाल वा आसने नसून त्याची अाध्यात्मिकता, योग हा विचार कळणे आवश्यक आहे, जे गुरुशिवाय शक्य नाही. नृत्यातील हस्तमुद्रा आणि योगाभ्यासातील हस्तमुद्रा यांत फरक आहे. परंतु काही मुद्रा व त्याचा वापर हा दोन्हींमध्ये श्वसनावर व रक्तदाबावर नियंत्रण याकरिता नक्कीच होतो.
वर सांगितलेले सर्वच मुद्दे आपल्याला नृत्य आणि योग याचा परस्परसंबंध पटवून देतात. यातील एक एक मुद्दा हा सखोल अभ्यासण्याचा विषय आहे. योगप्रकारातील प्रमुख प्रकार म्हणजे भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, आणि क्रियायोग ह्यांचा नृत्यांशी असलेला संबंध नृत्यास ‘नृत्ययोग’ म्हणावे, हे स्पष्ट करतो. जसे शास्त्रीय नृत्यातील देवस्तुती, वंदना, भजन, यातून साध्य होणारा ‘भक्तियोग’; कर्म करतानाच निखळ आनंदाची प्राप्ती म्हणजेच कर्मयोग; गुरूकडून नृत्याचे शिक्षण घेताना साध्य होणारा ज्ञानयोग; आणि निव्वळ नर्तक या संज्ञेपासून नृत्यसाधक व नृत्यसाधना या ध्येयाची प्रचिती येण्याकरिता त्या आनंदाची दिव्य अनुभूती घेण्याकरिता आंतरिक ऊर्जा निर्मितीतून क्रियायोग साध्य होतो.
अशा चारही योग प्रकारांचे मिलन शास्त्रीय नृत्यात असल्यामुळे कलाकाराचा मोक्षप्राप्तीचा मार्ग अधिक सुलभ होतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने नृत्य म्हणजे ‘नृत्ययोग’.
vrushali.dabke@gmail.com
बातम्या आणखी आहेत...