आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुमाउली गुरुमंजिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य. संगीत क्षेत्रात गुरूला आत्यंतिक महत्त्व आहे. खरं तर आपल्या जीवनात जिथे जिथे ज्ञानग्रहणाचा प्रश्न येतो त्या प्रत्येक ठिकाणी गुरूशिवाय, त्याच्या मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही. आधुनिक काळात, आत्ताच्या पिढीला हे सांगितले जाते, तेव्हा त्यांना ते प्रवचन वाटते. किंवा गुरुपरंपरेच्या दृष्टीने सांगितले जाणारे नियम जाचक वाटतात. माझ्याकडे किंवा इतर कुठल्याही शास्त्रीय नृत्य शिकवणाऱ्या गुरूंकडे नृत्यवर्गात अशा अनेक मुली येत असतात. कालांतराने त्यांना या परंपरेशी ओळख करून दिल्यावर हळूहळू नियम जाचक न वाटता आवश्यक वाटू लागतात. आणि जर त्या या कलेत रममाण झाल्या तर हीच गुरूशिष्य परंपरा त्यांच्या जीवनाची अविभाज्य घटक बनते.

विद्यार्थिनींना एकदा मी प्रश्न विचारला की, ‘आज मनमोकळ्या गप्पा मारू. किती जणींना नृत्यवर्गात आल्यावर आधी आपल्या गुरूला म्हणजे इथे मला नमस्कार करायचा आणि मगच उभं राहायचं किंवा बसायचं, हे जाचक वाटत होतं किंवा त्या बाबतीत कडक नियम असणं योग्य वाटत नव्हतं?’ माझ्याकडे चार वर्षं नृत्य शिकलेल्या मुलीने हात वर केला आणि सांगितलं की, मला असं वाटत होतं की ही ताई इतकी तरुण आहे, तरी नमस्कार नाही केला तर नृत्यवर्गाच्या सिनियर विद्यार्थिनी नमस्कार करायला सांगतात, असं का? पण सुरुवातीला नियम म्हणून नमस्कार करायला लागत असताना कधी मनापासून करायला लागले, हे कळलंच नाही. आणि जेव्हा घरातल्यांनी सांगितलं की, तू खूप शांत झाली आहेस आणि नम्रही झाली आहेस, तेव्हा हळूहळू या नमस्काराचा अर्थ समजू लागला. तिचं हे बोलणं झाल्यावर अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उकल झाल्यासारखे सगळ्या विद्यार्थिनींचे चेहरे झाले. यातून सांगायचे असे की, माणूस बुद्धिजीवी आहे आणि जिथे विद्या आणि ज्ञानग्रहणाचा विषय येतो तिथे प्रथम नम्रता आवश्यक आहे, समर्पण आवश्यक आहे. गुरूवर असलेला विश्वास आणि श्रद्धा या गोष्टीच माणसाला अधिक प्रगल्भ आणि तेजस्वी बनवितात, यशस्वी बनवतात. माणसाच्या आयुष्यातले पहिले गुरू आईवडील असले तरीदेखील इथे अभिप्रेत असलेला गुरू हा ज्ञानगुरू आहे, कलेच्या उच्च शिखरावर पोहोचवण्याचा मार्ग दाखवणारा आहे. आईवडील आपल्याला जन्म देऊन पालनपोषण करतात. एका बीजाचे मोठ्या वृक्षात रूपांतर करतात. परंतु त्या व्यक्तीस मिळालेला गुरू त्या वृक्षास फलदायी बनवितो. एका संतांनी गुरू या शब्दाची फोड अशी केली आहे, ‘गु’से अंधकार मिट जाये, ‘रु’ शब्द से प्रकाश फैलावे.

संत कबीर म्हणतात, ‘गुरु गोविंद दोऊ खडे, काको लागो पाय, बलिहारी गुरु आपने, जिन गोविंद दियो बतायें.’ म्हणजेच जेव्हा एका भक्तासमोर साक्षात भगवान कृष्ण अवतरले आणि गुरूदेखील उपस्थित झाले, तेव्हा पहिला नमस्कार कोणास करावा, असा प्रश्न पडला. तेव्हा ज्या गुरूच्या कृपेमुळे आज भगवंताचे दर्शन घडले त्या माझ्या गुरूलाच मी प्रथम वंदन करीन, असे भक्त म्हणतो. नृत्यकलेबाबतीत तर गुरूला पर्यायच नाही. ही एक दृश्यकला आहे. आज अनेक ठिकाणी शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम होतात, तेव्हा जाणकारांना एखाद्या नर्तक अथवा नर्तकीची नृत्यपद्धत बघून लगेचच ती व्यक्ती कोणाची शिष्य आहे, हे लक्षात येते. म्हणजेच आपल्या गुरूवर नितांत श्रद्धा ठेवून जेव्हा कला शिकली जाते तेव्हा गुरूच्या नृत्यातले बारकावे आपसूक टिपले जातात, शिष्याच्या ते अंगवळणी पडतात. गुरूचे स्मरण करून नृत्य केले जाते, तेव्हा गुरूची छाप शिष्यावर उमटते. आज गुरुकुल पद्धतीने सगळ्यांना कला शिकता येत नसली तरीदेखील गुरूच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानून त्यातून विचारमंथन व चिंतन करावं आणि त्यातूनच समाधानाचा आणि यशाचा मार्ग शोधावा. माझ्या गुरूंप्रती मला असलेली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न मी एका काव्यात केला आहे.

विघ्नहारिणी सुखदायिनी सुहासवदनी गुरुमंजिरी
पदकमला मृदुवचनी शुभकारिणी गुरुमंजिरी,
कलादेवता कलाउपासिनी सुकोमलामोहिनी गुरुमंजिरी
तूच माता तूच देवी गुरुमाउली गुरुमंजिरी
गुरुमाउली गुरुमंजिरी।।

वृषाली दाबके, डोंबिवली
बातम्या आणखी आहेत...